पाकिस्तान-व्याप्त काश्मीर (POK) मधील मुझफ्फराबाद येथे पुलवामा हल्ल्याशी संबंधित असलेल्या एका महत्त्वाच्या दहशतवादी कमांडरचा अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळ्या झाडून खात्मा केला.
हमजा बुर्हान (उर्फ अर्जुमंद गुलजार दार) याच्यावर गोळीबार; मुझफ्फराबादमध्ये घटना
(POK Terror Incident) : पाकिस्तान-व्याप्त काश्मीर (POK) मधील मुझफ्फराबाद येथे पुलवामा हल्ल्याशी संबंधित असलेल्या एका महत्त्वाच्या दहशतवादी कमांडरचा अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळ्या झाडून खात्मा केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.
मृत व्यक्तीची ओळख हमजा बुर्हान (खरे नाव अर्जुमंद गुलजार दार) अशी असून, तो 2019 च्या पुलवामा हल्ल्याशी संबंधित असल्याचा सुरक्षा यंत्रणांचा दावा आहे. त्याला 2022 मध्ये भारताच्या गृह मंत्रालयाने दहशतवादी म्हणून घोषित केले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, मुझफ्फराबादमध्ये झालेल्या हल्ल्यात त्याच्या शरीरात अनेक गोळ्या लागल्या असून तो गंभीर जखमी अवस्थेत सापडला होता. स्थानिक रिपोर्टनुसार, हल्लेखोर अज्ञात होते आणि घटनास्थळावरून फरार झाले.
हमजा बुर्हान कोण होता?
मूळचा पुलवामा जिल्ह्यातील खारबटपोरा (रत्नीपोरा परिसर) येथील रहिवासी असलेला हमजा बुर्हान 2017 मध्ये शिक्षणाच्या बहाण्याने पाकिस्तानात गेला होता. त्यानंतर तो बंदी घातलेल्या संघटना अल-बद्र मध्ये सामील झाला आणि पुढे कमांडर पदापर्यंत पोहोचला.
सुरक्षा यंत्रणांच्या माहितीनुसार, तो दक्षिण काश्मीरमध्ये युवकांचे ब्रेनवॉशिंग आणि दहशतवादी नेटवर्क विस्तारण्यात सक्रिय होता. पुलवामा आणि शोपियां परिसरात त्याचा प्रभाव असल्याचे सांगितले जाते.
त्याचा संबंध 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या पुलवामा हल्ल्याशी जोडला जातो, ज्यात CRPF च्या 40 जवानांना प्राण गमवावे लागले होते. तसेच 2020 मधील ग्रेनेड हल्ल्यातही त्याचा सहभाग असल्याचा आरोप आहे.
‘गूढ हत्यांची’ मालिका?
गेल्या काही काळात पाकिस्तान आणि POK मध्ये विविध दहशतवादी संघटनांशी संबंधित कमांडर आणि कार्यकर्त्यांच्या “अज्ञात हल्लेखोरांनी” केलेल्या हत्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे.
यापूर्वीही लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिज्बुल मुजाहिदीनच्या अनेक प्रमुख व्यक्तींना अशाच प्रकारे लक्ष्य करण्यात आले आहे, अशी माहिती विविध रिपोर्ट्समध्ये नमूद केली जाते.
याच पार्श्वभूमीवर हमजा बुर्हानच्या हत्येमुळे पुन्हा एकदा या “गूढ हल्ल्यांच्या मालिके”ची चर्चा सुरू झाली आहे.