ओरेगनमधील मॅकमिनविल म्युनिसिपल एअरपोर्टजवळ दुर्घटना; फ्लाइट इन्स्ट्रक्टर, स्थानिक पायलट आणि ब्रिटिश प्रशिक्षणार्थीचा मृत्यू, NTSB आणि FAA कडून तपास सुरू
ओरेगन (अमेरिका) : अमेरिकेत दोन हेलिकॉप्टरच्या हवेत झालेल्या भीषण अपघातात तिघांना आपला जीव गमवावा लागला आहे. उत्तर-पश्चिम ओरेगनमधील मॅकमिनविल म्युनिसिपल एअरपोर्टजवळ ही दुर्घटना घडली. उड्डाण करत असताना दोन हेलिकॉप्टर एकमेकांवर आदळली आणि त्यानंतर दोन्ही जमिनीवर कोसळली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, सुरक्षेच्या कारणास्तव जवळचा महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला.
यमहिल काउंटीचे शेरीफ सॅम इलियट यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत टेक्सासमधील फ्लाइट इन्स्ट्रक्टर मॅडी आस्बो, ओरेगनमधील पायलट टायलर स्टर्डिवेंट आणि ब्रिटनमधील एका प्रशिक्षणार्थी पायलटचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मॅडी आस्बो या एका हेलिकॉप्टरमधून ब्रिटिश प्रशिक्षणार्थी पायलटसोबत प्रवास करत होत्या. तर दुसऱ्या हेलिकॉप्टरमध्ये टायलर स्टर्डिवेंट एकटेच होते. पोर्टलँडपासून सुमारे 40 मैल नैऋत्येला असलेल्या मॅकमिनविल म्युनिसिपल एअरपोर्टच्या जवळील एका शेतात दोन्ही हेलिकॉप्टर कोसळली.
अपघाताची तीव्रता इतकी होती की, लाल रंगाचे हेलिकॉप्टर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले, तर हिरव्या रंगाचे हेलिकॉप्टर उलट्या अवस्थेत जमिनीवर पडलेले आढळले. घटनास्थळी हेलिकॉप्टरचे अवशेष आणि इतर साहित्य विखुरले होते. तपास पथकाकडून या अवशेषांची बारकाईने पाहणी केली जात आहे.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितला अपघाताचा थरार
स्थानिक वेळेनुसार दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. अपघातानंतर परिसरातील हायवे 233 चा सुमारे एक मैलाचा भाग बंद करण्यात आला. तसेच नागरिकांनी घटनास्थळाच्या आसपास जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले.
रोड्रिगेज नावाच्या प्रत्यक्षदर्शीने या अपघाताचा थरारक अनुभव सांगितला. ते आपल्या कुटुंबासह द्राक्षांच्या मळ्यात असताना अचानक मोठा स्फोटासारखा आवाज ऐकू आला. आवाजाच्या दिशेने पाहिले असता दोन हेलिकॉप्टर हवेत एकमेकांना धडकताना दिसली. काही क्षणांतच दोन्ही हेलिकॉप्टर जमिनीवर कोसळल्याचे त्यांनी सांगितले.
NTSB आणि FAA कडून चौकशी सुरू
या दुर्घटनेचे नेमके कारण शोधण्यासाठी अमेरिकेच्या नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डाने (NTSB) तपास सुरू केला आहे. फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन (FAA) देखील या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करत आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त हेलिकॉप्टरपैकी एक रॉबिन्सन R-22 प्रकारचे होते. या हेलिकॉप्टरचा वापर प्रामुख्याने प्रशिक्षणासाठी केला जातो. दुसरे हेलिकॉप्टर एअरबस AS350 प्रकारचे होते. या प्रकारच्या हेलिकॉप्टरचा वापर देखभालीशी संबंधित उड्डाणांसाठी केला जातो.
या दोन्ही हेलिकॉप्टरपैकी एक जेरी ट्रिम्बल हेलिकॉप्टर्स कंपनीचे होते. या दुर्घटनेबद्दल कंपनीने दुःख व्यक्त केले असून, तपास यंत्रणांना आवश्यक ते सहकार्य करण्याची भूमिका स्पष्ट केली आहे.
दरम्यान, दोन हेलिकॉप्टर हवेत एकमेकांसमोर कशी आली, त्यांच्यात टक्कर होण्यामागे तांत्रिक बिघाड होता की अन्य काही कारण, याचा शोध तपास अधिकारी घेत आहेत. तपास पूर्ण झाल्यानंतर या भीषण दुर्घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.