Breaking News
  • तळकोकणात गणेशभक्तांचा उत्साह शिगेला; गणपती बाप्पाचे वाजत गाजत आगमन
  • नाशिकच्या बागलाणमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद
  • मयूर रथातून होणार दगडूशेठ गणपती बाप्पाची आगमन मिरवणूक
  • नागपुरात अतिक्रमणधारकांविरोधात मनपा-पोलिसांची कठोर कारवाई
  • बुलडाण्यात आढळला स्वाइन फ्लूचा रुग्ण
  • मानाचा पहिला कसबा गणपती मंदिरासमोर ढोल वादन सुरू
  • गावा गावातून मराठा बांधव आक्रमक, मुंबईच्या दिशेने निघण्याची तयारी सुरू
  • रायगडमध्ये घरोघरी गणरायाच आगमन
  • बाप्पासाठी चांदीचा थाट! येवल्यात चांदीचे मोदक, फुलं अन् उंदीरमामांची क्रेझ

होम > विदेश

Nepal Floods

नेपाळमध्ये पुन्हा महापुराचा धोका! नुवाकोटमध्ये ‘पॅनिक मोड’; 20-25 मिनिटांत पुराचे पाणी पोहोचण्याचा इशारा

नेपाळमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या भीषण पुरातून परिस्थिती सावरत असतानाच नुवाकोट जिल्ह्यात पुन्हा मोठ्या पुराचा धोका निर्माण झाला आहे.


नेपाळमध्ये पुन्हा महापुराचा धोका नुवाकोटमध्ये ‘पॅनिक मोड’ 20-25 मिनिटांत पुराचे पाणी पोहोचण्याचा इशारा

Nepal Floods |

त्रिशूली नदीची पातळी अचानक वाढण्याची शक्यता; नदीकाठची घरे-दुकाने रिकामी करण्याचे पोलिसांचे आदेश, चिनी सीमेवरील डॅम्ड लेक ओव्हरफ्लो

नेपाळमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या भीषण पुरातून परिस्थिती सावरत असतानाच नुवाकोट जिल्ह्यात पुन्हा मोठ्या पुराचा धोका निर्माण झाला आहे. धुंडे बाजार आणि आसपासच्या परिसरात प्रशासनाने तातडीची खबरदारी घेत ‘पॅनिक मोड’ लागू केला आहे. वरच्या भागातून पुराचे पाणी अवघ्या 20 ते 25 मिनिटांत खालच्या भागात पोहोचू शकते, असा इशारा देण्यात आल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.

धोका लक्षात घेऊन पोलिसांकडून माईकद्वारे नागरिकांना सतर्क करण्यात येत आहे. विशेषतः नदीच्या काठावरील घरे आणि दुकाने तातडीने रिकामी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांनी विलंब न करता सुरक्षित किंवा उंच ठिकाणी स्थलांतर करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, वरच्या भागात हिमनदी फुटणे (glacier burst) किंवा पाणी सोडले जाणे यामुळे त्रिशूली नदीच्या पाणीपातळीत अचानक आणि वेगाने वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर होण्यापूर्वी नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

आधीच्या पुरापेक्षा मोठ्या महापुराची भीती

स्थानिक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, संभाव्य पूर आधीच्या पुराच्या तुलनेत तब्बल पाच पट अधिक धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे संवेदनशील भागातील नागरिकांना बाहेर काढण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहे.

नुवाकोट परिसराला यापूर्वीच भोटेकोशी-त्रिशूली नदीच्या पुराचा मोठा फटका बसला आहे. पुरामुळे अनेक रस्ते आणि पूल मोठ्या प्रमाणावर बाधित झाले असून, अशा परिस्थितीत पुन्हा पुराचा धोका निर्माण झाल्याने प्रशासनासमोरील आव्हान वाढले आहे.

चिनी सीमेवरील ‘डॅम्ड लेक’ ओव्हरफ्लो

दरम्यान, चिनी सरकारी माध्यमांच्या माहितीनुसार, ग्यिरोंग बॉर्डर पोर्टच्या वरच्या भागात तयार झालेली कृत्रिम तलावासारखी ‘डॅम्ड लेक’ ओव्हरफ्लो होऊ लागली आहे. या तलावातून मोठ्या प्रमाणावर पाणी अचानक खाली येण्याची शक्यता असल्याने सखल भागात पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका वाढला आहे.

तलाव फुटण्याची शक्यता लक्षात घेऊन नेपाळी लष्कराने खबरदारीचा उपाय म्हणून पुढील काही तासांसाठी बचावकार्य स्थगित केले आहे. या पार्श्वभूमीवर नेपाळ पोलीस आणि स्थानिक प्रशासन नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

सध्या त्रिशूली नदीच्या पाणीपातळीवर सातत्याने लक्ष ठेवले जात असून, परिस्थितीनुसार पुढील निर्णय घेतले जात आहेत. नागरिकांनी प्रशासन आणि पोलिसांच्या सूचनांचे पालन करून सुरक्षितस्थळी जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related to this topic: