नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला असून आतापर्यंत १६५ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १ हजारांहून अधिक नागरिक बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे.
रसुवा भागातील महापुरामागे ग्लेशियरचा मोठा भाग कोसळणे कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांचे मत; चीनच्या राजदूतांनी भूकंपानंतर हिमस्खलन आणि भूस्खलन झाल्याचा दावा
नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला असून आतापर्यंत १६५ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १ हजारांहून अधिक नागरिक बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. पुराच्या तडाख्यात अनेक इमारती, रस्ते, पूल आणि संपूर्ण गावांचे मोठे नुकसान झाले आहे. आपत्तीग्रस्त भागात बचाव आणि मदतकार्य वेगाने सुरू आहे.
या महापुराच्या कारणावरून वेगवेगळे दावे समोर येत आहेत. तज्ज्ञांच्या मते, या आपत्तीमागे भूकंप नसून उंच पर्वतीय भागातील ग्लेशियरचा मोठा हिस्सा तुटून खाली कोसळणे हे प्रमुख कारण असू शकते. मात्र, नेपाळमधील चीनचे राजदूत झांग माओमिंग यांनी ग्लेशियर तुटण्यामागे भूकंप कारणीभूत असल्याचा दावा केला आहे.
चीनच्या राजदूतांचा नेमका दावा काय?
रसुवा जिल्ह्यातील भीषण पूरस्थितीबाबत चीनचे राजदूत झांग माओमिंग यांनी नेपाळमधील एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. या संकटाच्या काळात चीन नेपाळच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचे त्यांनी सांगितले.
उपलब्ध प्राथमिक माहितीनुसार, नेपाळच्या बाजूला भूकंप झाला. त्यानंतर बर्फाचा हिमस्खलन आणि पुढे भूस्खलन झाल्याचे झांग माओमिंग यांनी सांगितले. या घटनांच्या मालिकेमुळे ग्यिरोंग-रसुवागढी सीमावर्ती परिसरातील नेपाळ आणि चीन या दोन्ही बाजूंना मोठी जीवितहानी झाली असून अनेक जण बेपत्ता आहेत, असा दावा त्यांनी केला.
ग्लेशियर कोसळल्याने नदीचा प्रवाह अडला
लॅंगटांग लिरुंग पर्वताच्या उत्तर उतारावर सुमारे ५२०० मीटर उंचीवर असलेल्या ग्लेशियरचा खालचा भाग तुटून सुमारे १२०० मीटर खाली दरीत कोसळला, अशी माहिती समोर आली आहे. मोठ्या प्रमाणात बर्फ आणि दगड खाली कोसळून ल्हेंदे खोला नदीच्या प्रवाहात अडथळा निर्माण झाला. त्यामुळे नदीवर काही काळ नैसर्गिक स्वरूपाचा तात्पुरता बांध तयार झाला.
हा अडथळा तुटल्यानंतर पाणी, चिखल, दगड आणि मोठ्या प्रमाणातील मलबा वेगाने खाली वाहू लागला. ल्हेंदे खोला ही तिबेटमधून वाहत येणारी उपनदी असून रसुवागढी आणि तिमुरे परिसरात ती भोटेकोशी नदीला मिळते. ग्लेशियर कोसळणे किंवा आइस-रॉक एव्हलांचमुळे मोठ्या प्रमाणात बर्फ, दगड आणि मलबा नदीपात्रात आल्याने पाण्याच्या प्रवाहात अचानक मोठी वाढ झाली.
अवघ्या ३० मिनिटांत नदीची पातळी ७ ते ९ मीटरने वाढली
ल्हेंदे खोलामधून आलेली पुराची लाट पुढे भोटेकोशी नदीत पोहोचली. तिबेटमधून नेपाळमध्ये प्रवेश करणारी भोटेकोशी नदी रसुवा जिल्ह्यातून वाहते. तिमुरे परिसरातून पुराचे पाणी नदीच्या प्रवाहासोबत पुढे गेले.
यानंतर भोटेकोशी नदी त्रिशूली नदीला जाऊन मिळते. त्यामुळे पुराचा परिणाम पुढील भागांवरही झाला. नुवाकोट आणि धादिंग यांसारख्या खालच्या भागांमध्ये पाणी पोहोचले. काही ठिकाणी त्रिशूली नदीची पाणीपातळी अवघ्या ३० मिनिटांत ७ ते ९ मीटरने वाढल्याचे सांगण्यात आले आहे.
सॅटेलाइट छायाचित्रांमधूनही ग्लेशियरशी संबंधित पुराचे संकेत
दरम्यान, प्लॅनेट लॅब्सने पुरापूर्वी आणि पुरानंतरची सॅटेलाइट छायाचित्रे प्रसिद्ध केली होती. या छायाचित्रांच्या प्राथमिक अभ्यासातून ल्हेंदे नदीत बर्फ आणि दगडांच्या भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात मलबा वाहून आल्याचे संकेत मिळाले.
नेपाळच्या राष्ट्रीय आपत्ती जोखीम न्यूनीकरण आणि व्यवस्थापन प्राधिकरणाने (NDRRMA) देखील यासंदर्भात व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. प्लॅनेट लॅब्सच्या सॅटेलाइट छायाचित्रांच्या विश्लेषणावर आधारित प्राथमिक निरीक्षणानुसार, नेपाळ-चीन सीमेवरील रसुवागढी बॉर्डर क्रॉसिंगपासून सुमारे २० किलोमीटर ईशान्येला बर्फ आणि दगडांचे भूस्खलन झाले. यानंतर ल्हेंदे नदीत ग्लेशियरशी संबंधित पूरस्थिती निर्माण झाल्याचे प्राथमिक अभ्यासातून दिसून आले आहे.
या नैसर्गिक आपत्तीमुळे नेपाळच्या अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत झाले असून बेपत्ता नागरिकांचा शोध आणि मदतकार्य सुरू आहे. दरम्यान, या महापुरामागील नेमक्या कारणाबाबत तज्ज्ञांचे निरीक्षण आणि चीनकडून करण्यात आलेले दावे यामुळे घटनेच्या कारणावरून वेगवेगळी मते समोर आली आहेत.