ढाका, मीरपूर, आशुलिया आणि गाजीपूरमध्ये कामगारांचे आंदोलन तीव्र; पोलिसांकडून अश्रुधुराचा मारा, पाण्याचे फवारे आणि साऊंड ग्रेनेडचा वापर
बांगलादेशातील औद्योगिक क्षेत्र पुन्हा एकदा हिंसक आंदोलनामुळे अस्थिर झाले आहे. वेतनवाढीच्या मागणीसाठी हजारो कापड उद्योगातील कामगार रस्त्यावर उतरले असून, अनेक ठिकाणी पोलीस आणि आंदोलकांमध्ये संघर्ष सुरू आहे. रस्ते अडवणे, कारखाने बंद पाडणे, दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनांमुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. विशेष म्हणजे, या आंदोलनामागे सत्तांतराची मागणी नसून वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर मिळणारे अपुरे वेतन हे प्रमुख कारण आहे.
#WATCH | Dhaka, Bangladesh: Bangladeshi garment workers launch massive violent protests over wages. Vandalism and clashes reported in Dhaka and Gazipur. A heavy police force and Border Guard Bangladesh have been deployed to restore order in the industrial areas. https://t.co/Ga0zZ8fo5X
— ANI (@ANI) November 1, 2026
३१ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या या आंदोलनाची व्याप्ती ढाका, मीरपूर, आशुलिया, सावर आणि गाजीपूर या प्रमुख औद्योगिक भागांमध्ये वाढली आहे. कामगारांनी अनेक रस्ते रोखून धरले असून गारमेंट उद्योगातील कारखान्यांचे कामकाजही बंद केले आहे. या आंदोलनाचा परिणाम सुमारे ५२९ कारखाने आणि किमान १० लाख कामगारांवर झाल्याची माहिती आहे.
काही भागांमध्ये आंदोलकांकडून दगडफेक आणि तोडफोड करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. जमावाला पांगवण्यासाठी पाण्याच्या फवाऱ्यांसह साऊंड ग्रेनेडचाही वापर करण्यात आला. काही संवेदनशील परिसरांमध्ये सीमा सुरक्षा दल अर्थात BGB तैनात करण्यात आले आहे.
Thousands of garment workers have taken to the streets across Bangladesh, pressing for a minimum monthly wage of 30,000 taka—more than double the current rate of 12,500 taka. In Dhaka, police fired tear gas and used water cannons to disperse the crowds, while demonstrators blocked roads in Gazipur. The government has set up a six-member wage board, but the protests show no sign of stopping. #Bangladesh
— Ashoke Raj (@Ashoke_Raj) November 2, 2026
तिसऱ्या दिवशीही आंदोलनाचा भडका
आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी परिस्थिती सामान्य होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, सोमवारी त्याच्या उलट चित्र पाहायला मिळाले. अधिक संख्येने कामगार रस्त्यावर उतरले आणि ढाक्यातील मीरपूर परिसरातील विविध गल्ल्यांमधून निदर्शने सुरू ठेवली. अनेक ठिकाणी पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोन्ही बाजूंमध्ये जोरदार संघर्ष झाल्याचे वृत्त आहे.
मीरपूरमध्ये सकाळपासूनच पोलिसांशी संघर्ष
बांगलादेशातील 'प्रथम आलो' या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी सुमारे १० वाजून ४५ मिनिटांनी मीरपूर-१० येथील सेनपारा परबटा परिसरात कामगारांचा एक गट अरुंद गल्लीमधून मुख्य रस्त्यावर येण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, पोलिसांनी त्यांना अडवून पांगवण्याचा प्रयत्न केला. यासाठी अश्रुधुराचा वापर करण्यात आल्याने परिसरात तणाव निर्माण झाला.
यानंतर मीरपूर-२ मधील स्टेडियमजवळ असलेल्या प्रोशिका चौकातही कामगारांनी एकत्र येत रस्त्यावर उतरण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी हस्तक्षेप करत त्यांना तेथून हटवले. दरम्यान, शहरातील इतर भागांमध्येही कामगारांची निदर्शने सुरूच होती.
१२ हजार टका वेतनावर कुटुंब चालवणे कठीण
बांगलादेशातील कापड उद्योगात काम करणाऱ्या मजुरांना सध्या दरमहा सुमारे १२ हजार टका वेतन मिळते. मात्र, वाढत्या महागाईमुळे या रकमेत कुटुंबाचा खर्च भागवणे अशक्य होत असल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांनी मासिक किमान वेतन ३० हजार टका करण्याची मागणी केली आहे.
अन्नधान्य, घरभाडे, वाहतूक आणि आरोग्यावरील खर्चात मोठी वाढ झाली आहे. परिणामी, मिळणाऱ्या पगाराच्या तुलनेत दैनंदिन खर्च वाढल्याने कामगारांची आर्थिक कोंडी झाली आहे. सध्याच्या वेतनात कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे दिवसेंदिवस कठीण होत असल्याचे आंदोलक सांगत आहेत.
जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात कपड्यांची निर्यात करणाऱ्या बांगलादेशच्या गारमेंट क्षेत्रात कामगारांना तुलनेने अत्यल्प वेतन दिले जात असल्याचा मुद्दाही या आंदोलनातून पुन्हा ऐरणीवर आला आहे.
यापूर्वी जुलै २०२४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरोधात बांगलादेशात मोठे आंदोलन झाले होते. त्यानंतर आता सुमारे २८ महिन्यांनी कामगारांच्या प्रश्नावरून देशातील रस्ते पुन्हा आंदोलनाने गजबजले आहेत. मात्र, यावेळी आंदोलनाचे केंद्र वेतनवाढ आणि कामगारांचे आर्थिक प्रश्न हे आहेत.