Breaking News
  • पुणे शहरात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट; एकाच दिवसात ४२ गुन्ह्यांची नोंद
  • पावसाची दडी, पाणी स्रोत आटले; टोमॅटो पिकाला टँकरने पाणी देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
  • मुक्ताईनगरात दोन गुटखा तस्कर जेरबंद, वाहन जप्त
  • नाशिकला पुढील 3 दिवसाचा पावसाचा यलो अलर्ट
  • मराठवाड्यात अद्यापही समाधानकारक पाऊस नाही
  • सरकारी कार्यक्रमात आमदारपुत्राचा प्रचार? उमरग्यातील बॅनरवरून वादाची चिन्ह
  • जंतर-मंतरवरील कथित लाठीचार्जचा बुलढाण्यात निषेध; रमाईच्या लेकींचे आंदोलन
  • बुलढाण्यात आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार?
  • सायली खरे यांचा सुरांनी दिला CJP आंदोलनाला पाठिंबा!

होम > संपादकीय > लेख

आजकाल

रामराज्यात चौकीदार चोर!

अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिर आणि घोटाळ्यांची मालिका खूप मोठी आहे. जिथे बाबरी मशीद होती; तिथे आताचे मंदिर उभे नाही; हाच मोठा घोटाळा आहे.


रामराज्यात चौकीदार चोर

‘राम नाम की लूट है,
लूट सके तो लूट।
अंतकाल पछताएगा,
जब प्राण जाएगे छूट॥’

 संत कबिरांचा हा ‘दोहा’ अयोध्येतल्या “रामजन्मभूमी मंदिर”च्या कारभाऱ्यांनी शब्दशः आचरणात आणला आणि भाविकांच्या दान- देणग्यांवर ७ कोटी रुपयांचा डल्ला मारल्याचे उघडकीस आले. इतक्याच रकमेचे म्हणजे, साडेचार किलोचे सोन्याचे दागदागिने यापूर्वी केरळातील शबरी मंदिराच्या कारभाऱ्यांनीच लंपास केल्याचे यापूर्वीच उघड झाले आहे. तिरुपतीच्या वेंकटेश्वर मंदिरातील (तामिळनाडू) “लाडू घोटाळा” २५० कोटी रुपयांचा; तर वैष्णोदेवी मंदिरातील (जम्मू- काश्मीर) “चांदी घोटाळा” ५५० कोटी रुपयांचा आहे. ह्या दोन्हीच्या तुलनेत राम मंदिर आणि शबरीमाला मंदिराचे घोटाळे किरकोळ म्हटले पाहिजे. राम मंदिर वगळता इतर तीन मंदिरे ही जागृत आणि नवसाला पावणारी देवस्थानं आहेत; पण दानात आणि प्रसादात चोऱ्या होत असताना तिथले देव- देवता झोपलेले होते. अयोध्येचे राम मंदिर हे राजकीयदृष्ट्या जागृत मंदिर आहे. ते मंदिर- मशीद वादाच्या आंदोलनातून निर्माण झाले आहे.
हे आंदोलन कधीच शुद्ध धार्मिक वा आध्यात्मिक हेतूने केलेले नव्हते. ते कायम वादग्रस्त आणि घोटाळ्याचे राहिलेले आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दोनच वर्षांत अध्योध्येतील बाबरी मशीदमध्ये रामलल्लाची मूर्ती घुसवून चमत्काराची अफवा पसरवण्यात आली. तेव्हापासून मंदिर-मशीद वादाचा विषय न्यायप्रविष्ट झाला. यानंतर १९८६-८८ ह्या काळात शाहबानो पोटगी प्रकरणाने मुस्लीम कट्टरता वादाचा भडका उडाला. त्याला तोडीसतोड उत्तर देण्यासाठी संघ- भाजप परिवाराने लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली “रामजन्मभूमी मुक्ती रथयात्रा” काढली. ह्याच दरम्यान, “विश्व हिंदू परिषद”तर्फे छोट्या बाटल्यांतून गंगाजल विक्रीच्या यात्रा निघाल्या. ह्या विक्रीतून जमलेल्या पैशांचा हिशेब कधीच जाहीर झाला नाही. देश-विदेशातून मंदिर निर्माणासाठी अयोध्येत जमवलेल्या विटांचे पुढे काय झालं, ते रामसेवकांनी कधी विचारलं नाही; तेच २०२२ मध्ये राम मंदिर निर्माणाच्या जमवलेल्या निधीबाबत झाले. 
 अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिर आणि घोटाळ्यांची मालिका खूप मोठी आहे. जिथे बाबरी मशीद होती; तिथे आताचे मंदिर उभे नाही; हाच मोठा घोटाळा आहे. तिथे जर रामजन्मभूमी मंदिर उभे करायचे नव्हते, तर बाबरी मशीद पाडण्याचे कारण काय? बाबरी मशीद पाडताना मी पाहिले आहे. तेव्हा पत्रकार म्हणून मी अयोध्येत होतो. त्यावेळी जे वाटले- लिहिले; त्या मताशी आताही ठाम आहे. बाबरी मशीद ही परकीय आक्रमकांनी किती क्रूरपणे हिंदूंना अपमानित करून भारतावर राज्य केले, ह्याचा पुरावा होता. त्याच्या बाबरीवरच्या खुणा पाहताक्षणी संताप आणायच्या. त्या नष्ट करण्याचे नादान काम संघ- भाजप परिवाराने केले आहे. ही हरामखोरी होती. म्हणूनच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीआधी अयोध्येत रामजन्मभूमी मंदिर उभारणे, ही “संघ-भाजप”साठी मजबुरी ठरली. 
मंदिर उभारणी हा संघ-भाजप परिवाराचा एकच एक उद्देश असता; तर बाबरी मशिदीचे पतन होताच मंदिर उभारणीचे काम सुरू झालेले दिसले असते. तसे झाले नाही. त्याचप्रमाणे, हिंदू खरंच रामजन्मभूमी मंदिर निर्माणाबाबत आग्रही असते; तर त्यांनी मंदिरासाठी जमिनी दान केल्या असत्या; त्या चढ्या भावात घोटाळे करून मंदिराच्या ट्रस्टला विकल्या नसत्या. हा जमिनींनी खरेदीचा घोटाळा मंदिरातल्या दान- दागिन्यांच्या लंपासगिरीपेक्षा कित्येक पटीने मोठा आहे. रामजन्मभूमी मंदिर निर्माणासाठी “श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट”तर्फे जमीन खरेदी करण्यात आली. त्यातही मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाले.
नमुन्यादाखल दोन उदाहरणं -
अ) कुसुम पाठक यांच्याकडून १८ मार्च २०२१ रोजी संध्याकाळी ७ वाजून १० मिनिटांनी राजू तिवारी यांनी सुलतान अन्सारी यांच्याकडून दोन कोटी रुपयांत जमीन खरेदी केली; आणि त्याच दिवशी पाच मिनिटांनंतर; म्हणजे १८ मार्च २०२१ रोजी ७ वाजून १५ मिनिटांनी तीच जमीन “श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट”ने अठरा कोटी रुपयांना विकत घेतली.
ब) महंत देवेंद्र प्रसाद यांनी दीपनारायण उपाध्याय यांना ८९० चौरस मीटर जमीन २० फेब्रुवारी २०२१ रोजी २० लाख रुपयांना विकली. ती जमीन दीपनारायण उपाध्याय यांनी ३ महिन्यांनी; २१ मे २०२१ रोजी “रामजन्मभूमी मंदिर ट्रस्ट”ला अडीच कोटी रुपयांना विकली. म्हणजे ३ महिन्यांत जमिनीची किंमत १२ पटीने वाढली. या सौद्यात “रामजन्मभूमी ट्रस्ट”चे सदस्य अनिल मिश्रा आणि राजकुमार दास हे साक्षीदार होते. 
या जमीन घोटाळाप्रकरणी ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता ते म्हणाले, “शंभर वर्षांपासून आम्ही आरोपच ऐकत आहोत‌. आमच्यावर महात्मा गांधींच्या हत्येचाही आरोप झाला होता. आरोपाची आम्ही चिंता करत नाही. तुम्हीसुद्धा करू नका.” विशेष म्हणजे, दोन्ही सौद्यांमध्ये साक्षीदार समान आहेत. मंदिर उभारणीचा पायाच इतका भ्रष्टाचाराने भुसभुशीत झाला असेल, तर दान- देणग्या सत्पात्री आणि सुरक्षित कशा राहणार? महिपाल सिंग हे “श्री रामजन्मभूमी मंदिर”चे लेखा प्रभारी म्हणजे “अकाउंट्स इन चीफ” होते. तेव्हा त्यांनी व्यवस्थापनात आणि देणग्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचे  आरोप पुराव्यांसह केले होते. ते असे होते-
अ) रोख रकमेची मोजणी करताना, प्रत्यक्ष रकमेपेक्षा कमी रकमेची व्हाउचर्स बनवली जातात. या पद्धतीचा वापर करून शिल्लक रक्कम लंपास केली जाते.
ब) भाविकांनी देवा चरणी अर्पण केलेले सोने, चांदी आणि इतर मौल्यवान वस्तूंचा कोणताही अधिकृत हिशोब ठेवला जात नाही. तसेच, ह्या किमती वस्तूंची भाविकांना तपशिलासह पावती दिली जात नाही. ही प्रशासकीय उदासीनता संशयास्पद आहे.
क) भाविक मूर्ती चरणी रोख रक्कम अर्पण करतात किंवा मूर्तीला सोन्या- चांदीचे दागदागिने घालतात; त्याला “चढावा” म्हणतात. त्याचे “सीसीटीव्ही”मध्ये चित्रीकरण होते. ते दान- देणग्यांच्या हिशेब तपासणीसाठी महत्त्वाचे असते. हे ठाऊक असूनही सीसीटीव्ही फुटेज मुद्दाम डिलीट (नष्ट) करण्यात येते. जेणेकरून तेथील हालचालींचा कोणताही पुरावा उरणार नाही. ही आर्थिक गैरव्यवहाराची आणि भ्रष्टाचाराची सविस्तर माहिती महिपाल सिंग यांनी “श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट”चे सरचिटणीस चंपत राय यांना दिली होती. मात्र, दोषींवर कडक कारवाई करण्याऐवजी त्यांनी महिपाल सिंग यांनाच त्यांच्या पदावरून हटवले. 
अयोध्येतील राम मंदिरातील सेवेकऱ्यांनी दान- देणग्यांवर मारलेला करोडोंच्या डल्ला जाहीर होताच, “शिवसेना” नेते व राज्यसभा खासदार यांनी “उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराला दिलेली ४ किलोची चांदीची वीट आणि १ कोटी रुपये कुठे आहेत,” असा प्रश्न विचारलाय. ह्या दान- देणगीची पावती अद्याप मिळाली नाही, अशीही त्यांची तक्रार आहे. ह्या दोन्ही बाबी त्यांच्या तल्लख बुद्धीला साजेशा नाहीत. दुष्काळ पडला. प्रजा भुकेने कासावीस झाली. म्हणून दामाजीपंताने विठ्ठलाचे नाव घेत धान्याची सरकारी कोठारं लोकांसाठी खुली केली. त्याने चवताळलेल्या आदिलशहाने “धान्याचे पैसे दे, नाहीतर फाशीच्या शिक्षेला तयार राहा,” असं फर्मान दामाजीपंताच्या विरोधात काढलं. दामाजी प्रामाणिक नोकर असल्याने कफल्लक होता. त्याने “विठ्ठलाचा धावा” सुरू केला. आणि भर दरबारात विठुराया “विठू महार”च्या रूपात हजर झाला. त्याने दामाजीच्या माथ्यावर आदिलशहाने ठेवलेले कर्ज फेडले आणि दामाजीचे प्राण वाचवले. अशी आख्यायिका आहे. हा प्रसंग “झाला महार पंढरीनाथ” ह्या चित्रपटात आहे. त्यावर चित्रित केलेल्या गाण्यामध्ये ग. दि. माडगूळकर लिहितात -
खळखळा ओतल्या मोहरा
त्याची पावती करुनी द्या-

सारांश, पावती जेव्हाच्या तेव्हा मागायची; घ्यायची असते. मुद्देमाल गुल झाल्यावर पावती काय मागतात? आणि आता ती मिळाली; तर ती दाखवून दिलेलं दान- देणगी परत मागणार का? मुळात, उद्धव ठाकरे यांनी दान- दक्षिणा देण्यापूर्वी आपल्या आजोबांनी; “प्रबोधन”कार ठाकरे यांनी लिहिलेली “देवळांचा धर्म, धर्माची देवळे”  ही छोटी पुस्तिका नजरेखालून घातली असती, तर आज उलटी-पालटी कसरत करावी लागली नसती.
   देव- देवळे भटी सापळे 
   घातक झाले देशा-
   मोडा तोडा, उलथुनि पाडा
   उखडा त्याच्या पाशा-

 असे थेटपणे लिहिणारे- बोलणारे, “प्रबोधन”कार ठाकरे “देवळांचा धर्म, धर्माची देवळे”मध्ये लिहितात, “देवळातील मूर्ती म्हणजे देव नव्हे! केवळ धोंडा. भातुकलीच्या खेळातल्या बाहुलीसारखी क्षुद्र वस्तू. हे पुजारी, भटदलालांपासून ते तिच्यापुढे कपाळे घासणाऱ्या भक्त- भक्तिणींपर्यंत सर्वांना स्वच्छ माहिती असते. असल्या धोंड्याची पूजा-प्रार्थना करून, आत्मोन्नती होणे शक्य नाही; आणि प्राणावर बेतले तर हा शृंगारलेला दगड स्वतःचे किंवा भक्तांचे मुळीच संरक्षण अगर तारण करू शकणार नाही, हे प्रत्येक हिंदूला कळते. तरीही देवळातल्या घंटा बडवायला सांज-सकाळ कोट्यवधी हिंदू का जातात? बाप, आजे, पणजे गेले म्हणून जातात; का, त्यांना एखादी गुप्त जादू तेथे ओढून नेते! हिंदू लोकांची देवळे, देवांविषयीची भावना सरळ आणि अत्यंत प्रेमाची असती; तर हिंदुस्थानात मुसलमानी बडग्याला एकही देऊळ व देव नक्कीच बळी पडला नसता! अर्थात, नाटके, सिनेमे, तमाशाची थिएटरे जशी क्षणभर विरंगुळ्याची ठिकाणे असतात. करमणूकच्या करमणूक आणि पटला काही उपदेश तर पटला; नाही तर निसटला! यापेक्षा देवळांची विशेष किंमत हिंदू लोकांनी बाळगलेली दिसत नाही. तरीही देव- देवळांविषयी शाब्दिक प्रेमाचा हिंदू जिव्हेचा धबधबा पाहावा; तो त्याच्या धडधडाटापुढे गिरसप्पा, नायगाराच्या कानठळ्या बसतात! हे काय भटीबंगाल आहे? हे भटबंगाल हिंदुस्तानाच्या नकाशात सापडणारे नसून ते थेट भटाच्या पोटात आहे! देवळांचा धर्म म्हणजे भटाच्या पोटाचे गुप्त मर्म आहे. या मर्माचे वर्म अफाट भटेतरांना कधीच उमगू नये, म्हणून भटांनी अठरा पुराणांची पैदास करून ठेवलेली आहे. गीता व उपनिषद आदी विचार- क्रांतिकारक आणि सत्यशोधक ग्रंथ कितीही असले, तरी देवळांवर देह जगवणाऱ्या या भूदेवांचा विशेष मारा पुराणांवरच असतो. पुराणांच्या पचनी पडलेला  प्रत्येक प्राणी; ईश्वरविषयक कल्पनेत इतका पागल बनतो की, दगड्या देवाच्या पायाऐवजी तो भटाच्या पायावर टाळकी घासतो आणि त्याचे पाय धुतलेले पाणी “पवित्र तीर्थ” म्हणून घटाघटा पितो. देवळात कथा, कीर्तने, पुराणे, प्रवचने होतात, पण सर्वांची झाप छिनाल भागवतावर आणि पाचकळ पुराणांवरच असते.”
१८ पुराणांत तिसरे “विष्णू पुराण” आहे. पुराणांना “प्रबोधन”कार पाचकळ म्हणतात. कारण त्यात देवलोकांच्या बऱ्याच भानगडी आहेत. त्यातही कल्पनाविलास ठासून भरलाय. अशा भगवान विष्णूचा सातवा अवतार म्हणजे प्रभू रामचंद्र! ज्याचा जन्मच कल्पना-विस्तारात झालाय; त्याचे जन्मस्थानही काल्पनिकच असणार! पण त्यातूनही आपल्या देशात अधर्म आणि दहशतीचे रामायण- महाभारत दोन्ही एकाच वेळी घडलं. गाडगे महाराज सांगत, “देवळात पुजाऱ्याचे पोट असते.” त्या पोटाला आता ट्रस्टी-पदाधिकारी यांची आणि देवळाचा कारभार शासकीय ट्रस्ट अंतर्गत असेल, तर त्यांना नेमणाऱ्या आकांचीही पोटे जोडलेली असतात. ही साखळी तयार होते, तेव्हा भ्रष्टाचार सराईतपणे होतो. असेच सर्वच धर्मांच्या धर्म/प्रार्थनास्थळांमध्ये चालते. फक्त झोलझपाट्यात भिन्नता असते. कोल्हापूर, सांगली आणि सिंधुदुर्ग ह्या जिल्ह्यांची मिळून “पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती” नावाची शासकीय समिती आहे. ह्या समितीच्या अखत्यारीत तीन जिल्ह्यांतील ३,००० मंदिरं आणि त्यांची २६,००० एकर जमीन आहे. ह्या जमिनी राजे- महाराजांनी आणि दानशूरांनी दिल्या आहेत. त्यामागे जमिनींच्या उत्पन्नातून देवळांच्या देखभाल- दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध व्हावा, हा उद्देश आहे. दरम्यान, त्या  जमिनी उत्पन्नासाठी ज्यांना कसायला दिल्या होत्या, त्यांनीच हडप केल्यात. ह्या हडपेगिरीत  देवळाच्या ब्राह्मण- भटांनी आघाडी मारली असून त्यांना समिती सदस्यांनीही साथ दिली आहे. अशी साथीदारी अयोध्येतील मंदिर घोटाळ्यात चंपत राय यांचीही होती; म्हणून त्यांची ट्रस्टच्या सरचिटणीस पदावरून हकालपट्टी झाली.
हिंदीत “चंपत”चा अर्थ गायब/फरार होणे, असा होतो. चंपत राय स्वतः गायब/फरार झाले नाही; मुद्देमालावर निभावले, हे बरेच झाले!  ह्या घोटाळ्यात संघ-भाजप परिवाराशी संबंधित लोक सापडावेत, हा योगायोग नाही; आणि ते अनपेक्षितही नाही. शंकराचार्यांना टाळून रामजन्मभूमी मंदिराचे उद्घाटन केल्याने त्यांची “शापवाणी” बाधली, असेही नाही. सत्ता खरे रूप दाखवते, हेच सत्य आहे.
 देव-देवळं हा साधू-संन्यासी आणि भट-भिक्षुकांचा पोट भरण्याचा उद्योग आहे.  भक्त-भाविक त्याचे गिऱ्ह‍ाईक आहे. हा उद्योग ‘संघ-भाजप’ परिवाराने सत्तालाभासाठी आपल्या ताब्यात घेतलाय. म्हणजे, मुळातला खोटा धंदा सोंगाकडून ढोंगाकडे गेलाय. हे सोंगा-ढोंगाचे नाटक बिनदिक्कत चालू राहावे, यासाठी उमा भारती, आदित्य योगी यांसारख्या साध्वी- साधूंना राज्याचे मुख्यमंत्री बनवून परमार्थाचंही प्रदर्शन करण्यात आलेय. तथापि, ह्यातील मूळच्या खोटेपणाची हजामत करताना स्वामी विवेकानंद म्हणतात, “हिंदुस्थानातील साधू-संन्याशांनी, पुरोहितांनी गरिबांसाठी काय केलं? त्यांना अध्यात्म शिकवलं! भुकेल्या माणसाला परमार्थ सांगणं, ही धर्माची शुद्ध चेष्टा आहे! आज लक्षावधी लोक अन्नान्न करीत आहेत. ही जनता परमेश्वर नाही का? भारताचे भवितव्य ह्या जनतेवर अवलंबून आहे!’’ हे चौकीदारच चोर असतील, तर कोणाला ऐकवायचं?    

ज्ञानेश महाराव
ज्येष्ठ पत्रकार - संपादक 
९३२२२ २२१४५

Related to this topic: