‘आपून दोघं भाऊ-भाऊ, संध्याकाई टेबलावर संग-मंग खाऊ’, तेरीबी चुप-मेरीबी चुप! राजकारनात बारोमास बंडखोरी अन अधिकारी भरतात सोताची तिजोरी! असं उरफाटं काम चालू हाये!
उरे ‘जय भवानी-जय शिवाजी’ हो चतरे देवनाथाभौ! ईतल्यात तं बेज्याच दांगळो चालु हाये बावा आपल्या शिवआबाच्या महाखटल्यात! बेेज्याच आंगभर झाली ना हो हे खुलेआम ‘फोळाफोळी’, गचकन जनतेच्या नजरीत पळली! कई कई लयच डेरींग करता बावा तुमी! जरा बुळातल्या गोरगरीब जनतेचं, शाळेतल्या लेकराईचं पायत जा ना फुरसत भेटली तं! शेंड्यावरचं तुमचं बंडखोरीचा, फोळाफोळीचा ‘तितंबा’ पावून तिकळे शिक्शन खात्यातबी येकामांग येक ‘पेपरफुटीचे’ याटमबाॅम्ब फुटून रायले ना! या शिक्शन खात्याचा कोनी वाली हाये का नाई हेच परीक्षा देनाऱ्या ‘ईद्याथ्याईले’ समजत नाई! पेपराच्या पयल्या रातीच ‘परीक्षा रद्द’चा मॅसेज आला का ईद्यार्थी ‘कोमात’ जातात!
येवळे ताकदबाज महाखटल्यातले ‘धुरकरी’ असल्यावरबी पयले नीटचे, मंग सीईटीचे पेपर फुटले! लय हिम्मत झाली ना हो पेपर फोळनाऱ्याईची? सीईटीचा पेपर फुटनं म्हंजे गुर्जीचा पेपर असूनबी कसा फुटला हे मालूम नाई! पयलेच तं तुमच्या सरकारी आळव्या-तिळव्या उरफाट्या कामानं गुरजी ‘घायल’ व्हयेल हायेत! तेईच्या मांग भर ऊनात जनगनना, मंग येसआयआरचं लच्यांड, आता शाळेच्या ओपनिंगची धावपय, घ्या हजेरी, शिवा कपळे शिजवा खिचळी म्हंजे गुर्जीनं लेकराईले शिकवावं का हे सोंगाळे सरकारी काम करावं या ईचारानचं साऱ्या शाळेतले गुर्जी ‘कोमात’ जायेल हायेत!
या शिक्शनाच्या गंगाजलवानी पवित्र खात्यात येवळेमोठे घापले व्हून रायले तरी तुमी फक्त चौकशी समिती नेमू नेमू, ईळीमिळी गुपचिळीवानी बेसुद पळाचं ‘सोंग’ घेता! म्हंजे परीक्षा घेनाऱ्याईले, पेपर फोळनाऱ्याले कोनाचाच धाक रायला नाई! तुमी जसे खासदार-आमदार फोळ्यात गुतले तसे या खात्याचे मंत्री-संत्री, अधिकारी शिक्शनाचा बट्ट्याबोळ करुन करोळो रुपयाची ‘मलाई’ खावून रायले!
असं हेंबाळं काम या खात्याचं झालं! ‘आपून दोघं भाऊ-भाऊ, संध्याकाई टेबलावर संग-मंग खाऊ’, तेरीबी चुप-मेरीबी चुप! राजकारनात बारोमास बंडखोरी अन अधिकारी भरतात सोताची तिजोरी! असं उरफाटं काम चालू हाये!
मले तं त्या तुकारामभौचं बेधळक काम पटलं बाॅ! येका मयन्यात साऱ्या गुटखापुळ्या, भेसळवाल्यावर धाळी टाकून थंडेगार केले! मंग तुकारामभौवानी कळक अन सत्य सोभावाचा शिस्तबाज अधिकारी भेटल्यानं दुध-पनीरवाले, तंबाखू, तेल, किराना हटेलवाले, भेसळ करुन मेवा खानारे दोन नंबरी दुकानदाराची दातखई बसली! तेईच्या नावाचा येवळा दरारा हाये का हरेक वस्तूवर कंपनीचा जसा ट्रेडमार्क (टीयेम) असते तसा आता भेसळखोराले तुकाराम मुंडे (टीयेम) या ब्रॅन्डचा ‘धाक’ हाये! पन अशा कर्तबगार अधिकाऱ्याले तुमी ‘बदली’चा ‘ढोरकोंबा’ दिवून अदमोसं करता ना बावा?
तुमाले ईम्मानानं सांगतो देवनाथाभौ, तुमच्या खटल्यातल्या हरेक सरकारी खात्यात असे तुकाराभौवानी ‘तुफानातले दिवे’ भरती करा! तेईले खुलेआम भेसळवाल्याची पोलखोल कराची येकतरी संधी दिवून पा! शिक्शन खातं, कृषी खातं, पीक ईमा, बी-खताईच्या कंपन्या, मेडीकलवाले, अशा साऱ्याच कंपन्याईतल्या दोन नंबरी शकुनीमामाले ‘धोबीपछाळ’ दिवून खरी जनसेवा कराची संधी भेटली पायजे!
पन तुमी राजा मेन काम सोळून, त्या ‘मोठेआबा’च्या फोळाफोळीच्या नांदी लागता?
येवळी कायीभोर दाळी, कपायावर अष्टगंधाचा टिळा, ‘नाथ माझा लेकुरवाळा’ अशा राजबिंड रुपाचे धनी असल्यावरबी या सरकारी जवाईबाॅले सत्याच्या जनसेवेचा मार्ग धराले लावत ना?
हरेक खात्यातला बोकांडेल भ्रष्टाचार, भेसळीची उदई जथलोग बुळातून भाईर निंगनार नाई, तदलोग सारे खाते सळतच रायतील! आजकाल ज्या-त्या सरकारी खात्याले बुळापासून तं शेंड्यालोग ‘खावं-खावं’ सुटली! अन खासदार-आमदाराले करोळोची कमाई करुन रानबोक्यावानी जगन्याची ‘बिमारी’ झोंबली हाये! या शाईनिंग ईंडियातल्या भ्रष्टाचारी किळ्याईले खल्लास कराचं असील तं तुकाराम भौवानी बेधळक जनतेेच्या ‘कायजातलं दुखनं’ जाननाऱ्या अधिकाऱ्यावर भरोसा ठुन हा गोरगरीब ‘जगन्नाथाचा रथ’ तुमच्या गोळ जोळीले ओढाच लागील! ताच कुठी या स्वाभिमानी, अभिमानी, सर्वधर्मसमभावाच्या महाराष्टात ‘ईकासा’चा झेंडा फळकोयाच्या अधिकाराचे हकदार व्हाल? पेपरफुटीची बिमारी अन राजोट्याईची लाॅटरीचा तुमच्याच हातात ईलाज असल्यावरबी करत नसाल तं आखरी गोरगरीब जनता ईव्हीयेमच्या बटनातून ‘जनतेची ईच्छा’ दाखवून दिल...??
अरुण मोडक
मो. नं.: ९८२२५९३९४७