काय तो कायजाले भीळनारा मातीचा सुगंध, काय ते शेतकऱ्याची धावपय, वावरातली जांभुयवाई, पट्टापास, उभाटीवाई, बी-भरनाची जुळवा-जुळव असं कष्टाच्या अनंदाचं वातावरन आपोआप तयार व्हते!
औंदा मिरगात वदरच्या पान्याची वाट पावू-पावू शेतकरी थकला पन अरदळीच्या नक्षत्रात वरुन देवानं हजेरी लावून काया मातीतल्या कष्टाच्या कातोळ्याचा आरंभ झाला! पयल्या पान्याचा माहोल झाल्यावर कष्टाच्या अनंदाले उधान येते! शेतकरी, ढोरं-वासरं, पाखरापासून तं जंगली जनावराले नवी उर्जा भेट्टे! कायी माती पयल्या पान्यात भिजते अन् त्या सुटनाऱ्या सुगंधानं साऱ्याच कष्टकरी जनतेले कष्ट कराची स्फुर्ती येते!
काय तो कायजाले भीळनारा मातीचा सुगंध, काय ते शेतकऱ्याची धावपय, वावरातली जांभुयवाई, पट्टापास, उभाटीवाई, बी-भरनाची जुळवा-जुळव असं कष्टाच्या अनंदाचं वातावरन आपोआप तयार व्हते! वावरातल्या मशागतीचा ‘तितंबा’ अटपल्यावर, पोटभर पानी आलं का पेरनीची धामधुम सुरु व्हते! ‘पेरते व्हा... पेरते व्हा’ अशी देवपाखराची आरोयी आयकल्यावर कायाकुट्ट ढगाईच्या सावलीत, धळाळधुम्म ईजाच्या गळगळाटाच्या अवाजात, राघु-मैयनाच्या कुहूकुहूत..., बैलाच्या गयातल्या कसांडीच्या संगीतात, पोटाशी ओटी बांधून महादेव तिफनीनं काकर काळते अन् पार्बती सरत्यावर बी उन्हारते! पायाले काटा रुतून रगत सांडते, तहान-भुक ईसरुन शेतकरी हिरव्या सपनाची रांगोई काळत हा पेरनीचा ‘कष्टाचा महाउत्सव’ साजरा करते!अशा कष्टाच्या कातोळ्याच्या अनंदात वराळी भाषेचा बापमानुस श्री. विठ्ठल वाघ सरांची कविता-गानं ‘काया मातीत मातीत...’
आपोआप हरेकाच्या ओठावर येते! कवितेतल्या शब्दा-शब्दात काया मातीतल्या सुख-दु:खाचा, शेतकऱ्याच्या कायजातल्या हिरव्या सपनाचा, बारोमासातल्या हंगामातल्या संकटाईचा व्यथा-वेदनेचा ‘अर्थ’ लपेल हाये! म्हनून हे कष्टाच्या अनंदाचं गानं अजरामर व्हयेल हाये!
काया मातीत मातीत... तिफन चालते
ईज थयथय नाचते, ढग ढोलं वाजोते
सदाशिव हाकालते, नंदीबैलाच्या जोळीले
संग पार्बती चाले, ओटी बांधून पोटाले
सरीवर सरी येती, माती न्हातीधुती व्हते
कस्तुरीच्या सुवासानं, भुल जीवाले पळते
भुल जीवाले पळते, वाट राघुची पायते
राघु तिफन हानते, मैना वाटुली पायते
काया मातीत... मातीत...
काया ढेकलात डोया, हिरवं सपन पायते
डोया सपन पायते, काटा पायात रुतते
लाल रगत सांडते, हिरवं सपन फुलते...!
गळेहो, अशा हिरव्या सपनात, हेलपाट्यात, निसर्गाच्या चमत्कारात साऱ्या जगाचा ‘बाप’ कष्ट करते पन या बांडबुहाऱ्या सरकारी संकटाच्या ईचुकाट्यानं शेतकऱ्याची जीनगानीची बंडी ‘उलाय’ व्हयेल हाये! जथीतथी शेतकऱ्याले गच्यांडी दिवून त्याच्या सपनाले मातीत घाल्याचं काम, त्याच्याच मताच्या भरोशावर निवळून येल कोन्त्याबी पक्षाचं हेंबाळं सरकार करतेच! खोटे आश्वासनं, कर्जमाफीत अटी-शर्तीची फसवनुक, बेभावाची गपकनी, सोंगाळं आयात-निर्यात धोरन अशा चारीमेरीनं येनाऱ्या संकटाईनं सद्या ‘वावरं वायन म्हंजे गयफासाले जोळ करनं’ हाये! फक्त बुळाखालची खुर्ची टिकोयासाठी हेंबाळं सरकार शेतकऱ्याले गलचेपी दिवून लाळक्या दोस्ताईसाठी जीवाचं रान करते!
निवळनुकीच्या आंधी ‘शेतकऱ्याले चोपळनं अन् सत्ता आल्यावर संकटाच्या खाईत लोटनं’ हा येककलमी कार्यक्रम चालू हाये! आता तं ईच्यामायले नवाच जबरदस्तीचा कुटाना मांडला! जनतेच्या भरोशावर निवळून येल खासदार-आमदाराले करोळोनं ईकत घीवून पक्ष मोठा कराचा अट्टाहास सुरु झाला! खुलेआम सरकारमान्य खरेदी-ईक्रीची नवी ‘दुकानदारी’ जन्माले आली! खासदार-आमदाराले निवळून जनता देते अन् भोपंजी तेईले बजारातल्या कमळाबाईच्या दावनीले बांधतात! शेतकऱ्याच्या कर्जमाफीले पयसा नाई अन् खासदार-आमदाराच्या बजारात लागील तितका पयसा उफनतात? हा कोन्ता उरफाटा धंदा या बेसरम सरकारचा हाये?
लोकशाईच्या वावरात
व्हते सत्तेच्या खुर्चीचं पेरनं?
खोट्या आश्वासनाचं आवतन
व्हते शेतकऱ्याचं मरनं!
कृषिप्रधान देशात
कसं हेंबाळं सरकारी धोरन?
दोस्ताईच्या माथी पयशाचं तोरन,
अन् बळीराजाचं, गयफासानं मरनं?
खासदार-आमदाराची फोळाफोळी
अंदरुन भेव दाखोते ईळीमीळी?
कर्जमाफीच्या अटी-शर्ती लय भारी
कोमात गेलारे बाप शेतकरी?
असा कसा रे ‘ईंडिया’ महान
‘भारत’ देश ठुला गहान?
हमीभावाची नाई ग्यारंटी
रसायनानं माती केली वांजोटी?
जनता कशी झाली रे मेंढरं
खुलेआम बाजिंदा कारभार?
जातीपातीच्या खेयाले भेट्टे अधार
कसा करावं रे बावा कष्टाचा सोंसार?
नाई जनतेचं रायलं घेनं-देनं
राजोटेईनं ईकलं ईमान
भेट्टे आपोआप खुर्चीचं वरदान!
लोकशाईच्या वावरात
कसं हेंबाळं हे सत्तेचं पेरनं...?
अरुण मोडक
मो.९८२२५९३९४७