Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > संपादकीय > अग्रलेख

अग्रलेख

‌‘अल निनो‌’चे संकट कायम....!

नासाच्या हवामान संशोधकांनीही यावेळी मान्सूनवर ‌‘अल निनो‌’चा मोठा प्रभाव राहील, असे वारंवार सांगितले आहे.


‌‘अल निनो‌’चे संकट कायम

दीर्घ प्रतिक्षेनंतर महाराष्ट्रात मान्सून सरींचे आगमन झाले. जवळपास संपूर्ण राज्यात मान्सूनने आपली हजेरी लावली आहे. कोकण आणि सोलापूरजवळ खोळंबलेल्या मान्सूनने जवळपास तीन आठवड्यानंतर आपला मुक्काम पुढे हलविला. या मान्सून सरींमुळे सर्वसामान्य लोकांसोबतच शेतकरी देखील सुखावला आहे. पेरणीसाठी खूप आधीपासूनच तयारी करून ठेवलेल्या शेतकऱ्यांनी या पावसाने पेरणीची लगबग सुरू केली असली, तरी सध्या पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी थोडी सावधगिरी बाळगायला हवी. केवळ भारताच्याच नव्हे, तर अगदी नासाच्या हवामान संशोधकांनीही यावेळी मान्सूनवर ‌‘अल निनो‌’चा मोठा प्रभाव राहील, असे वारंवार सांगितले आहे. देशात साधारण पंधरा ते वीस टक्के पावसाची घट होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. कदाचित यात थोडा फार फरक पडू शकतो, परंतु यावेळी पावसाचे प्रमाण कमी राहील हे निश्चित. त्यामुळे यावेळी शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेऊनच आपल्या पिकाचे नियोजन करावे. आधीच आखातातील संकटामुळे शेतकऱ्यांना खताचा तुटवडा जाणवत आहे. खतांच्या किमती वाढल्या आहेत, पेरणीसाठी पुरेशा प्रमाणात बियाणे मिळत नाही, त्यातही बोगस खते आणि बियाणांचे सावट आहेच. त्यात भर म्हणून यावेळी हे ‌‘अल निनो‌’चे संकट समोर आले आहे. सरकारने देखील शेतकऱ्यांनी सरकार आणि कृषी विभागाकडून दिल्या जाणाऱ्या सल्ल्यानुसार पीक नियोजन करावे, असे आवाहन केले आहे. खरे तर हवामान बदलाचा असा फटका अगदीच अनपेक्षित नाही. निसर्गाच्या चक्रात मानवी हस्तक्षेप प्रचंड प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे निसर्गाचा समतोल दिवसेंदिवस ढासळत आहे. उत्तरेतील ग्लेशियर वितळण्याचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे समुद्राच्या पाण्याची पातळी वाढण्याचा धोका आहे. समुद्रातील काही बेटे तर येत्या काही वर्षांत कायमची पाण्याखाली जातील अशी भीती व्यक्त केली जात आहे. प्रचंड प्रमाणात वाढलेले औद्योगिकीकरण, वाहनांची संख्या यामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात कार्बन डाय ऑक्साईड, मोनाक्साईड सारख्या विषारी, घातक वायूंचे प्रमाण वाढत आहे. परिणामी पृथ्वीचे तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. या सगळ्याचा एकत्रित परिणाम निसर्गाचा समतोल ढासळण्यात होत आहे. समुद्राच्या पाण्याचे वाढलेले तापमान ‌‘अल निनो‌’च्या स्वरूपात एक मोठे संकट ठरत आहे. त्यामुळे भारतासारख्या कृषिप्रधान देशावर प्रतिकूल परिणाम होत आहे. आजही भारतातील बहुतेक शेती मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे. हे मान्सूनचे चक्रच आता बिघडत चालले आहे. कधी खूप पाऊस, तर कधी अवर्षणासारखी परिस्थिती हा प्रकार अलीकडील काळात खूप वाढला आहे. शिवाय पावसाचे दिवस देखील खूप मर्यादित झाले आहेत. पाऊस सरासरी एवढा किंवा अधिक पडला तरी तो अगदी थोडेच दिवस पडतो. त्यामुळे पिकाला आवश्यक तेव्हा पाणी मिळत नाही आणि बरेचदा नको तेव्हा पाऊस आल्याने उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान होते. निसर्गाच्या चक्रातील माणसाचा हस्तक्षेप थांबत नाही तोपर्यंत ही परिस्थिती सुधारणार नाही आणि हा हस्तक्षेप थांबण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. भारतातही हिमाचलाच्या कुशीत प्रचंड खोदकाम, बांधकाम केले जात आहे. परिणामी दर पावसाळ्यात दरड कोसळणे, नद्यांचा प्रवाह बदलणे असे प्रकार सुरू आहेत. शेतकऱ्यांनी आता ही बदलती परिस्थिती स्वीकारून आपल्या पिकांचे नियोजन करणे भाग आहे. दर दोन-चार वर्षांनी दुष्काळ किंवा अतिवृष्टी हे ठरलेलेच आहे. अशा परिस्थितीत बदलत्या निसर्गाला प्रतिसाद देणारी किंवा जुळवून घेणारी शेती पद्धती अवलंबिणे गरजेचे आहे. यावेळच्या संकटाला ‌‘अल निनो‌’ कारणीभूत आहे, पुढच्या काळात कारणे बदलतील; परंतु नैसर्गिक संकटाची तीव्रता तशीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कमी पावसात किंवा अनियमित पावसात तग धरू शकणारी पिके शेतकऱ्यांनी स्वीकारावी. सरकारनेही या बदलत्या नैसर्गिक परिस्थितीचा विचार करून शेतकऱ्यांना साथ द्यायला हवी. शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचा योग्य भाव तर मिळायलाच हवा, शिवाय शेतकऱ्याचे प्रत्येक उत्पादन सरकारने योग्य हमीभावात खरेदी करावे.

Related to this topic: