Breaking News
  • वर्धा जिल्ह्यात मागील २४ तासांपासून संततधार व रिमझिम पावसाची हजेरी
  • दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उद्धव ठाकरेंची भेट घेणार
  • मनोज जरांगे आभिजीत दिपकेंच्या भेटीला
  • नाशिकमध्ये मनसेचं आंदोलन
  • बुलढाण्यात जंतर-मंतर लाठीचार्जचे तीव्र पडसाद; विद्यार्थ्यांची सरकारविरोधात स्वाक्षरी मोहीम
  • ठाकूरबुवांच्या समाधीस्थळी माऊलींचे तिसरे गोल रिंगण भक्तिरसात रंगले
  • जे.पी नड्डा, जितेंद्र सिंह आंदोलकांची भेट घेणार
  • पुणे शहरात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट; एकाच दिवसात ४२ गुन्ह्यांची नोंद
  • पावसाची दडी, पाणी स्रोत आटले; टोमॅटो पिकाला टँकरने पाणी देण्याची शेतकऱ्यांवर वेळ

होम > संपादकीय > अग्रलेख

अग्रलेख

परतीचे दोर....!

आपल्या पक्षाचे सहा खासदार फुटण्याच्या बेतात आहेत, हे कळताच उद्धव ठाकरेंनी ‌‘मातोश्री‌’वर सगळ्या खासदारांची बैठक बोलावली होती; परंतु या बैठकीला लोकसभेतील नऊ पैकी चारच खासदार उपस्थित राहिले.


परतीचे दोर

मागच्या आठवड्यापासून राज्यात सुरू झालेला राजकीय गोंधळ अजूनही कायम आहे. ठाकरे सेनेच्या सहा खासदारांचे नेमके काय, हा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच असल्याचे दिसते. आपल्या पक्षाचे सहा खासदार फुटण्याच्या बेतात आहेत, हे कळताच उद्धव ठाकरेंनी ‌‘मातोश्री‌’वर सगळ्या खासदारांची बैठक बोलावली होती; परंतु या बैठकीला लोकसभेतील नऊ पैकी चारच खासदार उपस्थित राहिले. इतरांनी ‌‘ऑनलाईन‌’ उपस्थिती लावल्याचे सांगण्यात आले. त्यात तथ्य नव्हते. काहींनी ‌‘ऑनलाईन‌’ उपस्थिती लावलीही असेल; परंतु ती नावापुरती होती. त्यामुळे सावध झालेल्या ठाकरे गटाने दिल्लीत संसदीय पक्षाच्या बैठकीचे आयोजन केले आणि त्यासाठी पक्षादेश जारी केला; परंतु या पक्षादेशाला त्यावेळी ‌‘ऑनलाईन‌’ हजेरी लावणाऱ्या पाच आणि बैठकीत उपस्थित राहिलेल्या संजय दिना पाटील या सहाव्या खासदारानेही केराची टोपली दाखविली. त्यामुळे हे सहा खासदार वेगळा विचार करण्यावर ठाम असल्याचे दिसून आले. पुढे त्यांच्यावर पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत कारवाई करण्यासाठी ठाकरे गटाने नोटीस देखील बजावली. या दरम्यानच्या काळात हे सहा खासदार कुठे होते, त्यांनी काय हालचाली केल्या, वेगळा गट स्थापन केला की नाही, त्यासाठी लोकसभा अध्यक्षांना दिलेल्या पत्रावर सहाही खासदारांच्या स्वाक्षऱ्या होत्या की नाही, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले. याच दरम्यान एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर होते. मध्यंतरी ते जयपूरला देखील जाऊन आले. नंतरच्या काळात या सहापैकी पाच खासदार जयपूरच्या एका रिसॉर्टमध्ये असल्याचे समजले; परंतु त्यांच्यापैकी ओमराजे निंबाळकर मात्र पुण्यात होते. याच दरम्यान शिवसेनेच्या दोन्ही गटांनी शिवसेनेचा स्थापना दिवस साजरा केला. त्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि अन्य नेत्यांनी त्या सहा खासदारांवर भरपूर तोंडसूख घेतले. दुसरीकडे एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या पायाखालची वाळू घसरत असतानाही ते आत्मचिंतन करायला तयार नाही, असा टोला लगावत सहा खासदारांच्या फुटीचे स्पष्ट संकेत दिले. याच दरम्यान शनिवारी पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला आणि न्यायालयाने सगळ्या आरोपींची निर्दोष सुटका केली. ओमराजेंसाठी हा मोठा धक्का होता. त्यांनी यापूर्वीच आपला राजकीय निर्णय या खटल्याच्या निकालानंतर घेणार असल्याचे सांगितले होते. हा निकाल त्यांच्या विरोधात गेल्यामुळे ते बरेच अस्वस्थ झाले. आधीच्या काळात मतदारसंघाचे प्रश्न सोडविणे गरजेचे असल्याने निष्ठेपेक्षा मतदारांच्या हिताला आपण प्राधान्य देत आहोत, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. ही भूमिका त्यांच्या शिंदेसेनेतील प्रवेशासाठी सूचक मानली जात होती; परंतु खटल्याचा निकाल अपेक्षेपेक्षा वेगळा लागताच त्यांनी आपण आपल्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी बोलून पुढचा निर्णय घेणार असल्याचे सांगत कुठेतरी माघारीची शक्यताही कायम ठेवली. ही संधी साधत ठाकरे गटाने त्यांना आपल्याकडे खेचण्याचे किंवा कायम राखण्याचे प्रयत्न नव्याने सुरू केले. मिलिंद नार्वेकर आणि कैलाश पाटील यांनी ओमराजेंची रात्री गुपचूप भेट घेतली. त्यानंतर आदित्य ठाकरेंनी कुणाला परतायचे असेल, तर त्यांचे स्वागतच केले जाईल, उद्धव ठाकरेंचे मन तितके मोठे आहे, असे सूचक विधान केले. ओमराजे किंवा कोणत्याही एका खासदाराने परतण्याचा निर्णय घेतला, तर इतर पाच खासदारांवर मोठे संकट ओढवू शकते. पुरेशा संख्याबळाअभावी ते गट स्थापन करू शकत नाही, त्यामुळे त्यांना एकतर ठाकरेंकडे परतावे लागेल किंवा खासदारकी गमाविण्याचे संकट त्यांच्यापुढे असेल. ठाकरे गटाने ओमराजे हा कच्चा दुवा हेरून ‌‘ऑपरेशन टायगर‌’ उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न अगदी जोरात सुरू केला आहे; परंतु या सहा खासदारांनी आधीच आपला वेगळा गट स्थापन केला असेल आणि त्याला  लोकसभा अध्यक्षांनी मान्यता दिली असेल, तर ओमराजेंना एकट्याला वेगळी भूमिका घेता येणार नाही. या परिस्थितीत गोंधळ अधिकच वाढण्याची शक्यता आहे. या खासदारांनी वेगळा गट स्थापन करण्याची प्रक्रिया आधीच पूर्ण केली असेल, तर त्यांना आता कोणत्या तरी पक्षात अर्थात शिंदेसेनेत प्रवेश घ्यावा लागेल. या सगळ्यात मुख्य प्रश्न परतीचे दोर कापले गेले आहेत किंवा नाही हाच आहे.

Related to this topic: