प्रत्येक राष्ट्र हे आपल्या संस्कृती आणि परंपरेमुळे एक राष्ट्रीय चरित्र (character) धारण करीत असते.
भारत- अमेरिका संबंधांना आता या १० -१२ वर्षांतील घटनांमुळे एक नवीन मिती प्राप्त झाली आहे. अमेरिकेच्या पराकोटीच्या अहंकारी, हुकूमशाही आणि बेमुर्वतखोर वर्तनाचे हे वास्तव भारताने कधीच विसरू नये! व्हिएतनाम, इराक, व्हेनेझुएला, अफगाणिस्तान आणि आता ताजे इराण, अशी सर्वत्र आपली दादागिरी चालवणारी अमेरिका चिंताजनक आहेच; पण-भारत कोणत्या कारणामुळे एवढा मुखदुर्बळ बनला, यावरही संशोधन झाले पाहिजे!
‘अगम्य’ कारणाने मागील २-३ वर्षांपासून भारताचा पाणउतारा करण्याची एकही संधी ट्रम्प यांनी सोडलेली नाही! प्रत्येक राष्ट्र हे आपल्या संस्कृती आणि परंपरेमुळे एक राष्ट्रीय चरित्र (character) धारण करीत असते. जगात अमेरिकेची फार चांगला देश, अशी ख्याती कधीच नव्हती. अमेरिका कधीही भारताचा मित्र नव्हता. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील प्रत्येक मा मल्यात अमेरिकेने नेहमीच पाकिस्तानच्या पारड्यात आपले वजन टाकले आहे.
१९५०ला पिपल्स रिपब्लिक ऑफ चायनाला नेहरूंनी मान्यता दिली, तेव्हा अमेरिकेचा जळफळाट झाला. नेहरूंनी अलिप्तता चळवळ उभी केली तेव्हा अमेरिका चरफडली.भारताविरुद्ध अमेरिकेने सतत पाकिस्तानला लष्करी मदत केली; परंतु प्रखर देशभक्त पंतप्रधान नेहरूंनी अमेरिकेसमोर झुकायला नकार देत, तिसऱ्या जगासमोर एक नवा पर्याय दिला.शास्त्रीजींसमोर धान्य संकट होते. हरित क्रांती जन्माला यायची होती; पण शास्त्रींजी तेव्हाही अमेरिकेसमोर झुकले नाहीत. इंदिरा गांधींना घाबरवायला अमेरिकेने १९७१ला भारताविरुद्ध सातवा बेडा प्रशांत महासागरात उतरवला! तरीही रणचंडीकेने बाणेदारपणे ‘कुछ भी हो, हम पिछे नही हटेंगे’, अशी गर्जना रेडिओवरून केली!
२० जुलै २००५ ला डॉ. मनमोहन सिंग यांनी अमेरिकेत वाशिंग्टन येथे एक पत्रकार परिषद घेतली. (तेव्हा देशात तर घेतच; पण परदेशातही पत्रकार परिषद घ्यायचे!) आणि अमेरिकेत मनमोहन सिंग कडाडले, ‘अमेरिकेने इराकवर हल्ला केला हे चुकीचे आहे.’ मनमोहन सिंग आत्मप्रौढी व अहंकारी नव्हते, तसेच मै..मै…मै…करत त्यांनी कधी सी ग्रेडचे फिल्मी डाॅयलाग मारले नाहीत, परंतु ज्वलंत राष्ट्रभक्तीतून अमेरिकेला सुनवायला ते कधीच कमी पडले नाहीत!
मनमोहन सिंग पंतप्रधान असताना अणुकरार करताना अमेरिकेने जंगजंग पछाडले; पण मनमोहन सिंग आपल्याच मसुद्यावर ठाम राहिले. भारताने ५२ वर्षांपूर्वी १९७४ ला केलेल्या अणुचाचणीपासून अमेरिकेने लावलेली बंधने मनमोहन सिंग यांनी ठाम राहून नाकारली!
हा संपूर्ण ‘भारतीय स्वाभिमानी वृत्तीचा संग्राम’ आज प्रकर्षाने आठवतो, कारण हिमालयासारखे वर उल्लेख केलेले १९४७ पासून २०१४ पर्यंतचे राष्ट्रभक्त पंतप्रधान आता फक्त आठवत राहण्याशिवाय आपल्या हाती फारसे काही राहिलेले नाही!
मागील २ वर्षांत अमेरिकेने भारतावर चालवलेली दादागिरी खूप प्रकर्षाने जाणवण्याएवढी वाढली आहे. जिवंत असलेल्या कोणत्याही राष्ट्रातील सुजाण नागर समूह खाली लिहिलेला अपमानाचा पाढा वाचून पेटून उठल्याशिवाय राहूच शकणार नाही!
आपल्या भारतमातेवर प्रेम असलेल्या कोणत्याही अस्सल भारतीय नागरिकास क्लेशकारक वाटतील, अशा घटनांची एक मालिकाच अमेरिकेकडून घडली आहे.
(१) मागील वर्षी अमेरिकेने व्हिसा संपूनही आपल्या देशात राहत असलेल्या विदेशी नागरिकांना देशाबाहेर घालवले. त्यात काही फारसे चुकीचे नाही.
काही मेक्सिकोसारख्या छोट्या देशांनी अमेरिकेकडून आपले नागरिक परत स्वीकारले, काही देशांनी विमानाने परत नेले व अमेरिकेने तशी परवानगी दिली; मात्र भारतीय नागरिकांना अमेरिकेने पायात साखळदंड बांधून आणि प्रातर्विधीची सोयसुद्धा नाकारून मालवाहू विमानात कोंबून परत पाठवले.
हा अमानुषपणा चिनी नागरिकांबाबत करण्याची अमेरिकेची हिंमत झाली नाही किंवा अनेक छोट्या देशांचे नागरिक अत्यंत सन्मानाने परत पाठवले; पण भारतीयांचा अपमान व छळ केला.
(२) ‘भारत पाकिस्तान युद्ध किंवा आपरेशन सिंदूर मी थांबवले’, असा दावा ट्रम्प यांनी केला. एवढेच नव्हे, तर ‘प्रत्यक्ष युद्ध थांबल्या’ची घोषणाही ट्रम्प यांनीच केली! हा दावा ट्रम्प यांनी ७० -८० वेळा केला.
हा भारताच्या सार्वभौमत्वाचा अपमान आहे! पण आपण मात्र गप्पच ! राहुल गांधी संसदेत समोरासमोर मोदींना म्हणाले, ‘ट्रम्प बोलले ते नाकारा’ मोदी गप्प! (का असतील?)
(३) ट्रम्प एकदा म्हणाले, की ‘मी मोदींची राजकीय कारकीर्द खराब करू शकतो; पण तसे करणार नाही.’ हे विधान भारताच्या पंतप्रधानांबाबत असल्यामुळे हा संपूर्ण भारत देशाचाच अपमान समजला पाहिजे; पण आपण गप्पच !
(४) मागील ४-५ महिन्यांपासून सुरू असलेल्या इराण-अमेरिका- इस्रायल युद्धात इराणचे वयोवृद्ध नेते खोमेनेई यांची कुटुंबातील स्रियांसह हत्या झाली. संपूर्ण जगात दुःख व्यक्त झाले! अमेरिका व इस्रायलने लहान मुलींच्या शाळेवर हल्ला करून १६८ लहान मुलींचा जीव घेतला! सर्व जगाने अमेरिकेवर टिका केली! या दोन्ही घटनांनंतर भारताने प्रदीर्घ काळ गप्प राहणेच पसंत केले!
(५) भारत इराण आणि रशियाकडून कच्चे तेल आयात करीत आलेला आहे. हे दोन्ही देश आपल्याला कमी किमतीत व कित्येक पट कमी वाहतूक खर्चात पेट्रोल देत होते; परंतु अमेरिकेने भारताला रशिया आणि इराणकडून तेल खरेदी करण्यास बंदी घातली! ट्रम्प म्हणाले, ‘भारताने रशिया व इराणकडून तेल घ्यायचे नाही.’ आपण ही आज्ञा शिरसावंद्य मानून गप्पच बसलो !
(६) पुढे तर अमेरिकेने कहरच केला! ‘जा, तुम्हाला १ महिन्याची सूट दिली आहे! या काळात हवेतर रशियाकडून तेल खरेदी करू शकता.’ आणि आपण खरोखरच अमेरिकेच्या या १ महिना मुदतीचा सदुपयोग केला! ‘सार्वभौम भारताला मुदत ठरवून देणारे तुम्ही कोण?’ हा खरेतर ट्रम्प यांना विचारायचा प्रश्न होता! पण आपण मान खाली घालून गप्प!
(७) आता, भारत- अमेरिका टॅरिफ कराराबाबत विचार करू या! हा करार पूर्णतः अमेरिकेच्या एकतर्फी फायद्याचा आहे, हे सहज लक्षात येते. भारतीय मालावर अमेरिका १८ ते २५ टक्के टॅरिफ लावेल आणि भारत मात्र अमेरिकी मालावर ‘शून्य’ दराने टॅरिफ लावेल !
भारत अमेरिकेकडून दरवर्षी ९.५ लाख कोटी रुपयांची आयात करेल, अशी हमी देतोय; पण त्याचवेळी अमेरिकेवर तसे बंधन नाही.
करारात दोन्ही पक्षांचा फायदा होत असतो; पण हा जणू काही अमेरिकेच्या फायद्यासाठीच करायचा करार होता!
इतिहासात १९१९ ला व्हर्साय कराराने पराभूत जर्मनीवर दंड लावला व जर्मनीने डोळे झाकून करारावर सही करून मान खाली घातली! तसे झाले. भारताने मात्र गप्प राहण्याचे कारण नसून हा करार का केला? हे कळण्यास काहीच मार्ग नाही. हे सर्व खूप रहस्यमय अशा प्रकारचे वाटते! सर्वकाही अगदीच एका बाजूला झुकल्यासारखे वाटते!
(८) यानंतर आता यात अजून एका घटनेची भर पडली आहे. जी या वरील मालिकेलाच अजून पुढे नेते. ती घटना म्हणजे पुन्हा अमेरिकेने केलेली आगळीक आहे. भारताच्या ३ तेलवाहू जहाजांवर अमेरिकेने हल्ला केला आणि त्यात ३ भारतीयांचा मृत्यू झाला. भारतीय सैन्यातील निवृत्त मेजर जनरल जी. डी. बक्षी यांनी हे कृत्य अमेरिकेने जाणीवपूर्वक केले, असे म्हटले आहे. जनरल बक्षी म्हणतात, की ‘चीनची शेकडो जहाजे तेल घेऊन सुखरूप जात आहेत, रशियाच्या जहाजांना धोका होत नाही, मग भारतीय जहाजांनाच अमेरिकेने का लक्ष्य केले असावे? हे कोडे आहे. जेव्हा याबाबत जाब विचारला जातो, तेव्हा अमेरिकेचा उद्दामपणा आणि असंवेदनशीलता एवढ्या टोकाला जाते, की ते माफी सोडा सहवेदना व्यक्त करायलाही तयार नाहीत!
आणि आश्चर्य तर अजून पुढे आहे-
भारताकडून जेव्हा ३ भारतीय नागरिकांच्या मृत्यूबाबत जाब विचारण्यात आला, तेव्हा अमेरिकन सेक्रेटरी आॅफ स्टेट रूबीओ मार्को यांचे उत्तर असे होते, की ‘हे सत्य आहे; पण असेच वागलात, तर भविष्यात पुन्हा हेच घडू शकेल!’
दिलगिरी वगैरे तर दूरच; पण ‘पुन्हा भारतीयांना मारू’ ही धमकी स्वीकारून आमचे परराष्ट्र मंत्री परतले!
भारत- अमेरिका संबंधांना आता या १० -१२ वर्षांतील घटनांमुळे एक नवीन मिती प्राप्त झाली आहे.
अमेरिकेच्या पराकोटीच्या अहंकारी, हुकूमशाही आणि बेमुर्वतखोर वर्तनाचे हे वास्तव भारताने कधीच विसरू नये!
व्हिएतनाम, इराक, व्हेनेझुएला, अफगाणिस्तान आणि आता ताजे इराण, अशी सर्वत्र आपली दादागिरी चालवणारी अमेरिका चिंताजनक आहेच; पण-भारत कोणत्या कारणामुळे एवढा मुखदुर्बळ बनला, यावरही संशोधन झाले पाहिजे!
अमेरिकेचा हा अहंकार वृथा नक्कीच नाही! कोणा कोणाचे हात अमेरिकन दगडाखाली अडकलेले आहेत ? व कृपेची नितांत गरज आहे ? कोणा कोणाबाबत नजीकच्या काळात सौम्यता दाखवली गेली? कोणा- कोणाला काही दाखवून (आणि काही झाकून) फायदा पोहचवला जाऊ शकतो? इस्रायलने नाच म्हणता, का नाचावेच लागते?
‘भारत- अमेरिका- इस्रायल,’ या त्रिकोणात भारताचे भविष्य अडकलेले आहे ! पुढील पिढी याच त्रिकोणी तिलिस्मात गोते खाऊ नये, असे वाटत असेल तर आपल्या जवळ फार अल्पकाळ आहे!
पुरुषोत्तम गावंडे
मो. नं. : +९१-७९७७१६३७७४