Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > संपादकीय > लेख

गुदगुल्या

शेतकऱ्याईच्या पोराईहो, ‘काॅक्रोच’ परस, शिवबाचे मावळे बनून कष्टाची लळाई जिका...?

सोंगाळं सरकार नव्या जवानाईले झुरळावानी समजते काय?


शेतकऱ्याईच्या पोराईहो ‘काॅक्रोच’ परस शिवबाचे मावळे बनून कष्टाची लळाई जिका

अ बे ओ हेंबाळ्या बाबुराव, कुठी हिंडून रायला बे हा बीनाझेंड्याचा दांडा खांद्यावर घीवून! काल-परवा तं तू भगवी छापी भगवा झेंडा घीवून बेज्याच रस्त्यावर उतरुन दांगळो करुन रायलता! अन् आज  ससरीच्या गचकन भगवा झेंडा गायप अन् हा रीकामा बीना झेंड्याचा दांडा काहाले खांद्यावर घेतला?
मी तुमच्या नजरीत आलो की काहून बयादाटून मायाशी झिलप्या झाळत रायता हो जानुआबा! आजपासून ‘काॅक्रोच पार्टी आमची-ताकद दाखवू नव्या दमाची’, ‘आयडिया हायकमांडची पन रट्टे खायाची आदत आमची’, अशी आरोयी ठोकून नव्या पक्षाचं उद्घाटन  व्हनार हाये! सोंगाळं सरकार नव्या जवानाईले झुरळावानी समजते काय? आता आमी जवानाईची ताकद दाखूनच दिवू! झेंड्याचा रंग हायकमांडनं ठरोल्यावर तो झेंडा घीवून रस्त्यावर उतरु!
अबे हेंबाळेहो, आजलोगच्या साऱ्याच पक्षाईनं जवान पोट्ट्याईच्या खांद्यावर रंगारंगाचे झेंडे दिवून जवानापनीच म्हतारं केलं अन् तेईचं पानदान वाजोलं ना! कोन्या पार्टीनं जाती-पातीत भांडन चेतोलं तं कोन्या पार्टीनं धर्म-पंथाच्या आळून मान्सा-मान्सात दुश्मन्या भळकोल्या! कोनं ‘हिंदु खतरेमे है’ ची गर्जना केली तं कोनं गोमाताले माय समजून तीचं रक्षन करता करता मलाई भक्शन केली! कोनं जय श्रीरामचा नारा दिवून सर्वधर्मसमभावाचा बोजवारा वाजोला! जो तो पक्ष ईच्यामायले नव्या दमाच्या जवान पोट्ट्याईले हाताशी पकळून तेईच्या तोंडात कमल-ईमल छाप गुटख्याच्या पुळ्या खोचते! दारुच्या कुप्प्याईचा दरोजचा उकळा लावून अख्खी जीनगानीच बरबाद केली! गोरगरीब जनतेले ‘फुकटछाप’ सरकारी योजनेचा ‘अलप’ लावून यैदी बनोलं! कष्टकरी शेतकऱ्याले कर्जमाफीचं खोटं आश्वासन दिवून बँकाईची ‘कर्जवसुली’ केली अन् बेभावाच्या कैचीनं शेतकऱ्याची उलटी हजामत केली! पीकईम्याचा खोटा तितंबा करुन ईमा कंपन्याईले मोठं केलं! तरी बावा आजून नव्या दमाच्या जवानाईले अन् कष्टकरी शेतकऱ्याले ‘अक्कलदाळ’ फुटली नाई?
या सोंगाळ्या कमलाबाईच्या ठुमक्यावर अख्खा होल ईंडिया ईच्यामायले जसा थयथय नाचून रायला? कीतीबी ताकदबाज राजोटा असला, तरी कमलाबाईच्या येका ईशाऱ्यावर त्याले ते जे म्हनील ते झक मारुन कराच लागते! आजच्या राजकारनात ज्याच्या आंगात बंडखोरीची धमक हाये तोच खुर्चीले चिपकून रायते! जनतेचं  कोनाले ‘काईच घेनं-देनं नाई फक्त खुर्ची टिकोयाची बेज्या घाई’! सरकारी पावन्याईची येकजूट हाये! तेईच्या येकजुटीच्या ताकदीले सरकार घायबरते म्हनून तेईले आपोआप आयोगावर आयोग हातोहात भेट्टात! पन कष्टकरी शेतकऱ्याच्या हाती थत्तुरा देते? गळेहो, या चतऱ्या सरकारनं पयलेच नवी पीळी आपल्या हाताखालची बोलकं बह्याळ ‘बावलंग’ करेल हाये! म्हनून ते निढंग्या पोराच्या बापाले म्हंजे बुळातल्या शेतकऱ्याची खोटं बोलून जथी-तथी ‘दमकोंडी’ कराची हिम्मत दाखोतात! तेईले सळो की पळो करुन मातीत घालाची भाषा वापरतात.बापहो म्हाराष्टाची माती हे छत्रपती शिवबा-संभाजीच्या साम्राज्याची भूमी हाये! स्वाभिमान-अभिमान जपन्याची परंपरा असली, तरी आजकालची नवी पीळी ‘काॅक्रोच’वानी रस्त्यावर उतरते पन हेच ताकदबाज पीळी (शेतकऱ्याचे लेकरं) येकजुट व्हवून शिवबाच्या मावळ्यावानी ‘हरहर महादेवचा’ गजर करत उतरली पायजे! ताच कुठी कुंभकर्नावानी झोपेल सरकारले खळवळून जाग यील! शेतकरी संघटना साऱ्याच राज्यात हायेत पन आता साऱ्या राज्यातल्या संघटनेतल्या कष्टकरी मावळ्याईनं येकजुट व्हवून आपल्या मनगटातली ‘ताकद’ सरकारले दाखून द्याची गरज वाट्टे!
म्हाराष्टातले शेतकरी नेते, बारोमास शेतकऱ्याच्या प्रश्नाले दिल्ली दरबारी वाचा फोळनारे अभ्यासू लोकनेते प्रकाशभौ पोहरे या शेतकऱ्याच्या लेकराने ‘किसान बिग्रेड’चं ईवलंसं रोपटं लावून, कार्यकर्त्याच्या कष्टानं अन् विश्वासानं आज त्या रोपट्याचा वटवृक्ष झाला! योगायोग प्रकाशभौ पोहरे हे देशपातळीवरच्या ‘सिफा’ संघटनेचे अध्यक्ष हायेत! साऱ्याच  राज्यातल्या संघटनेच्या नेत्याईचा किसान बिग्रेडले पाठिंबा भेटल्यानं बिग्रेडच्या कार्यकर्त्यांची ताकद वाढली हाये! फक्त आता गळेहो, गावगाळ्यातल्या शेतकऱ्याच्या लेकराईनं हे बयताळ झेंडे-फंडे, सतरंज्या उचलनं बंद करुन, काॅक्रोच परस, आपल्या बापाच्या कष्टाच्या ‘घामाले दाम’ भेटासाठी, शिवबाच्या मावळ्यावानी येकजुट दाखवून हरहर महादेवच्या गजरात रस्त्यावर उतरलं पायजे! जगाच्या पोटातली भूक भागोनाऱ्या शेतकऱ्यासाठी, किसान बिग्रेडची ताकद मोठी कराची हिम्मत ठुली पायजे! ‘शेतकरी जगला तर जग जगील’, पन सरकारच्या आळमुठ्या धोरनानं, सईन व्हनाऱ्या  इचुकाट्यानं त्यानं मातीतले हेलपाटे बंद केले तं खासाल काय? म्हनून बापहो, जातपात, धर्म-पंथ हे थोटांग सोळून सर्वधर्मसमभावाची हक्काच्या ‘कष्टाची लळाई’ लळाच लागील, ताच कुठी सरकारचे डोये उघळतील अन् ‘शेतकरी सुखी तं जग सुखी’ व्हईल...??

 

अरुण मोडक
मो. नं.: ९८२२५९३९४७ 

Related to this topic: