‘एक ध्वज, एक नेता, एक विचार’ असा एकत्वाचा नारा देणाऱ्या शिवसेनेचे गेल्या चार वर्षांपासून दोन भाग झाले आहेत.
‘एक ध्वज, एक नेता, एक विचार’ असा एकत्वाचा नारा देणाऱ्या शिवसेनेचे गेल्या चार वर्षांपासून दोन भाग झाले आहेत. गेल्या चार वर्षांपासून शिवसेनेचे एकाच दिवशी दोन स्वतंत्र मेळावे, दोन स्वतंत्र सभा दोन वेगळ्या नेत्यांच्या मार्गदर्शनात होत आहेत. साम्य केवळ एकच, हे दोन्ही नेते आपला ध्वज आणि विचार एकच असल्याचा दावा करीत असतात. सत्तेत होते तोपर्यंत मूळच्या हिंदुत्ववादी भूमिकेला थोडे कोपऱ्यात ढकलणाऱ्या उद्धव ठाकरेंनी सत्ता जाताच आपणच खरे हिंदुत्ववादी अशी भूमिका घेतली. बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेल्या शिवसेनेचे आपणच खरे वारसदार, बाळासाहेबांचा पूत्र म्हणून शिवसेनेवर आपलाच खरा अधिकार, असा दावा उद्धव ठाकरे करत असतात.अर्थात महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवण्याची वेळ येते तेव्हा त्यांचे कडवे हिंदुत्व हलकेच सर्वसमावेशक वगैरे होते. दुसरीकडे मूळ शिवसेनेने हिंदुत्ववादी विचारांशी फारकत घेतल्यामुळे स्वतंत्र पक्ष स्थापन करावा लागल्याचा तर्क देणाऱ्या आणि मूळ शिवसेनेच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या एकनाथ शिंदेंचा मूळ शिवसेनेचे आपणच खरे वारसदार असल्याचा दावा, त्यामुळे एकाच दिवशी दोन मेळावे, दोन हुंकार, दोन गर्जना वगैरे पहायला मिळत आहे. बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा हीरक महोत्सव साजरा होत असताना या दुभंगलेल्या दुर्दैवाविषयी मराठी माणसाला नक्कीच वेदना होत असणार; परंतु राजकारण म्हटले, की हे सगळे प्रकार होणे अपेक्षितच असतात. वैचारिक वारसा, विचाराशी बांधिलकी, नेत्यावरची श्रद्धा, त्याच्याशी इमान या सगळ्या गोष्टी सत्ता सुंदरी समोर अनेकदा निरर्थक ठरतात. शिवसेनेत पहिली मोठी फूट पडली ती छगन भुजबळ यांच्या रूपाने. विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद पक्षाने मनोहर जोशी यांच्याकडे दिल्यामुळे भुजबळ नाराज झाले आणि त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. नंतरच्या काळात मुंबईच्या बाबतीत सगळे अधिकार आपल्याला हवे हा राज ठाकरेंचा आग्रह बाळासाहेबांनी मान्य केला नाही आणि त्यांना नाशिक वगैरे प्रांताची जबाबदारी दिली. तेव्हापासून राज ठाकरे नाराज होते. पुढे पक्षातील उद्धव ठाकरेंचे वाढते वर्चस्व त्यांना सहन झाले नाही किंवा त्यांचा पक्षात जाणीवपूर्वक कोंडमारा करण्यात आला म्हणून म्हणा राज ठाकरे पक्षाबाहेर पडले. राज ठाकरे प्रमाणेच नारायण राणे यांनादेखील पक्षात सापत्न वागणूक मिळू लागली. नारायण राणे भविष्यात मुख्यमंत्री पदासाठी एक मोठे स्पर्धक ठरू शकतात ही भीती कदाचित त्यामागे असावी. नारायण राणे देखील याच कारणामुळे पक्षातून बाहेर पडले. डावलले जात असल्याची भावना आणि पक्ष नेतृत्व करीत असलेले चौकडीचे राजकारण एकनाथ शिंदे यांना बंड करण्यास प्रवृत्त करून गेले. थोडक्यात सत्ता, अधिकारपद या गोष्टी विचार, वारसा आणि निष्ठा यावर नेहमीच वरचढ ठरत आल्या आहेत. ठाकरे बंधू, राणे, भुजबळ, शिंदे या सगळ्यांनी एकत्र येऊन पुन्हा पूर्वीची वैभवशाली शिवसेना उभी करावी ही सर्वसामान्य मराठी माणसांची, बाळासाहेबांच्या चाहत्यांची कितीही इच्छा असली तरी ते केवळ एक स्वप्न आहे. बाळासाहेबांचे एकेकाळचे खंदे शिलेदार आज वेगवेगळ्या गटांत, वेगवेगळ्या पक्षांत स्थिरावले आहेत आणि त्यांच्या सोबतच बाळासाहेबांचे स्वप्नदेखील वेगवेगळ्या गटांत विखुरल्या गेले आहे. शिवसेना या पक्षावर नेमकी मालकी कुणाची हा प्रश्न सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. पुढे कधीतरी त्या प्रश्नाचा निकाल लागेल. एकनाथ शिंदे किंवा उद्धव ठाकरे यापैकी कुण्या एकाच्या बाजूने हा निकाल असेल; परंतु एका विशाल साम्राज्याच्या ठिकऱ्या उडाल्या आणि एकेकाळी सम्राटासारखे वावरणारे नेते आता कुणाचे तरी मांडलिक झाले आहेत, ही वस्तुस्थिती बदलणारी नाही.