Breaking News
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आज शेगाव खामगाव दौऱ्यावर
  • लोणावळा–देवले मार्गावर दरड कोसळून मोठ्या प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर
  • शाळेच्या प्रांगणात खेळताना विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; बीडमध्ये खळबळ
  • डॉक्टरांना मारहाण प्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवक रमेश म्हात्रे यांना जामीन मंजूर
  • खामगाव ग्रामीण पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; १३ जणांविरुद्ध गुन्हा
  • पाचगणी–महाबळेश्वर रस्त्याची दुरावस्था, खड्ड्यांमुळे रस्त्याची झाली चाळण
  • रत्नागिरी-शहरातील पटवणे फगरवठार रस्ता पुन्हा खचला
  • भंडाऱ्यात तीन वर्षीय बालिकेवरील अत्याचाराच्या घटनेने तीव्र संताप
  • एका दिवसात सोने ८०० रूपये तर चांदी तब्बल ₹ ५ हजारांनी महाग

होम > संपादकीय > अग्रलेख

अग्रलेख

धक्का नक्कीच, परंतु...!

पोटनिवडणूक राष्ट्रीय चर्चेचा विषय ठरली आहे, कारण या निवडणूक निकालाने राजकारणाची हवा झपाट्याने बदलत असल्याचे संकेत दिले आहेत.


धक्का नक्कीच परंतु

सध्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या नीतीन नवीन यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे, कारण बांकीपूर मतदारसंघावर कायम भाजपचे वर्चस्व राहिलेले आहे. नीतीन नवीन यांनी पाच वेळा या मतदारसंघातून विजय प्राप्त केला आहे. गेली तीस वर्षे अभेद्य ठरलेल्या भाजपच्या या किल्ल्याला जनसुराज पक्षाचे अध्यक्ष प्रशांत किशोर यांनी खिंडार पाडले. या मतदारसंघात भाजपला नेहमीच पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक मतदान होत आले आहे, ही पृष्ठभूमी लक्षात घेता प्रशांत किशोर यांचे यश अधिकच उल्लेखनीय ठरते. मागच्या काळात दिल्लीत झालेल्या विद्यार्थी आंदोलनाचे मोठे पडसाद बिहारमध्येही उमटले होते. बिहारमध्येही विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून मोठ्या प्रमाणात निदर्शने केली होती. या नवतरुण मतदारांच्या रोषाचा फटका भाजपला बसल्याचे स्पष्ट दिसत आहे. बिहार विधानसभेची निवडणूक होऊन अजून वर्षही उलटलेले नाही. त्या निवडणुकीत भाजप, जदयू आणि चिराग पासवान यांच्या युतीने प्रचंड मोठे यश प्राप्त केले होते. आता बांकीपूर जागा जिंकून जायंट किलर बनलेल्या प्रशांत किशोर यांच्या पक्षाला त्यावेळी एकही जागा मिळविता आली नव्हती, एवढेच नव्हे तर तब्बल २३६ जागा लढविणाऱ्या त्यांच्या पक्षाला २३४ जागांवर अनामत रक्कमही वाचविता आली नव्हती. या पृष्ठभूमीवर वर्षभराच्या आत बिहारचे वारे इतके कसे बदलले, हा एक व्यापक चर्चेचा विषय ठरू शकतो. खरे तर विधानसभेतील एक जागा कमी झाल्याने ना बिहारच्या सत्ताकारणावर परिणाम होणार आहे, ना राष्ट्रीय राजकारणात काही बदल घडणार आहे, तरी देखील ही पोटनिवडणूक राष्ट्रीय चर्चेचा विषय ठरली आहे, कारण या निवडणूक निकालाने राजकारणाची हवा झपाट्याने बदलत असल्याचे संकेत दिले आहेत. त्याचा परिणाम पुढच्या वर्षी होणाऱ्या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत दिसू शकतो. उत्तरप्रदेश विधानसभेची निवडणूक अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. उत्तरप्रदेशमध्ये भाजपचा पराभव झाला, तर पुढच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला खूप मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. बांकीपूरच्या निकालाने उत्तरप्रदेशमधील भाजप समोरच्या संभाव्य संकटाचे संकेत दिल्याचे मानले जात आहे. बांकीपूरमध्ये उच्चवर्णीय मतदारांचे प्रमाण तुलनेत अधिक आहे आणि त्यामुळेच या जागेवर भाजप सातत्याने विजयी होत आली. यावेळी भाजपला पराभव स्वीकारावा लागला त्यामागे विद्यार्थ्यांचा असंतोष हे एक कारण तर होतेच; परंतु भाजपच्या परंपरागत उच्चवर्णीय मतदारांनीही यावेळी भाजपला म्हणावी तशी साथ दिली नाही, असे दिसून येते. उच्चवर्णीय मतदारांचा हा कल उत्तरप्रदेशमध्येही दिसून आला आणि त्याला विद्यार्थी मतदारांची अशीच साथ मिळाली, तर आधीच गटबाजीने पोखरलेल्या भाजपला उत्तरप्रदेशात मोठा धक्का बसू शकतो. शिवाय बांकीपूरच्या भाजप विरोधी कौलामुळे विरोधकांचाही आत्मविश्वास दुणावला आहे. थोडक्यात बांकीपूरचा विजय विरोधकांचे मनोधैर्य वाढविणारा आणि त्याचवेळी भाजपला चिंतेत टाकणारा असला, तरी आता केवळ निवडणुकीचीच देरी आहे, भाजपला आपण सहज भुईसपाट करू या भ्रमात विरोधकांनी न राहिलेलेच बरे. ठेच लागल्यावर शहाणपण येण्याची प्रक्रिया भाजपमध्ये जितकी जलद होते तितकी अन्य कोणत्याही पक्षात होत नाही. बांकीपूर ही भाजपला लागलेली जबरदस्त ठेच आहे आणि  त्यामागे असलेल्या कारणांच्या मुळाशी भाजप नक्कीच जाणार. चुका कुठे झाल्या ते शोधले जाईल आणि त्या चुकांची पुनरावृत्ती होणार नाही याची खबरदारीही घेतली जाईल. मागच्या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या आधी योगी आदित्यनाथांचा गढ असलेल्या फैजाबादमध्ये लोकसभेची पोटनिवडणूक झाली होती आणि त्या निवडणुकीत भाजपला पराभव स्वीकारावा लागला होता, तो धक्का असाच मोठा होता आणि त्याहीवेळेस विरोधक आता आपण भाजपला सहज नमवू अशा आत्मविश्वासात वावरत होते; परंतु त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप आघाडीने ४०३ पैकी तब्बल २९४ जागा जिंकल्या होत्या, त्यापैकी एकट्या भाजपच्या जागा २५७ होत्या. सांगायचे तात्पर्य झालेल्या  चुकांचा धांदोळा घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची भाजपची क्षमता किंवा ताकद दुर्लक्षित करता येणार नाही. त्यामुळे बांकीपूरचा निकाल भाजपसाठी धक्कादायक असला तरी तो निर्णायक धक्का आहे, असे आताच म्हणणे धाडसाचे ठरेल.
 

Related to this topic: