Breaking News
  • विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड
  • Gadchiroli : जपतलाई घटनेतील दोषींवर कठोर कारवाई; ५१३ आश्रमशाळांचे थर्ड पार्टी ऑडिट
  • कुंभमेळ्यासाठी १३ प्रमुख आखाड्यांसह धार्मिक संस्थांनाही पायाभूत सुविधांसाठी १५ लाखांपर्यंत निधी मिळणार
  • दोडामार्ग पाळये गावात हत्तींचा धुमाकूळ; माड, व केळी बागा उद्ध्वस्त
  • Nashik : आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर
  • शिवप्रतिष्ठान युवाच्यावतीने दीप प्रज्वलन करून दीप अमावस्या साजरी
  • Ratnagiri : रत्नागिरीतल्या पालीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
  • Ahilyanagar : कॅफेच्या नावाखाली गैरकृत्य, श्रीरामपूरमध्ये पोलिसांची 4 कॅफेवर छापेमारी
  • Nanded : झेंडूच्या फुलशेतीतून शेतकऱ्याला मिळाला आर्थिक आधार

होम > संपादकीय > लेख

प्रासंगिक

आनंदाची पंढरीवारी

चला हो पंढरी जाऊजीवाच्या जीवलगा पाहू।।संत महंत होतील भेटीआनंदे नाचु वाळवंटी।।हे तिर्थांचे माहेरसर्व सुखाचे भांडार।।जन्म नाही रे आणिकतुका म्हणे माझी भाक।।


आनंदाची पंढरीवारी

आषाढी वारी ही केवळ पंढरपूरची यात्रा नसून भक्ती, समता, सेवा आणि अध्यात्माचा अखंड प्रवाह आहे. विठ्ठलनामाच्या गजरात लाखो वारकरी पायी चालत पांडुरंगाच्या भेटीस जातात आणि जीवनातील अहंकार, लोभ व दुःख मागे टाकून भक्तीचा आनंद अनुभवतात. संतांच्या अभंगातून व्यक्त झालेला विठ्ठलप्रेमाचा संदेश आजही प्रत्येक भक्ताला अंतर्मुख करतो. या आनंदवारीचे आध्यात्मिक महत्त्व आणि वारकरी संप्रदायाची जीवनदृष्टी उलगडणारा हा लेख.

  सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
  कर कटावरी ठेवोनिया

आज आषाढी एकादशी. पंढरपूरची आषाढी वारी ही जगविख्यात आहे. या पंढरपूरच्या वारीची ओढ ही केवळ वारकरीच नव्हे, तर विठ्ठल भक्त असलेल्या प्रत्येक जीवाला लागलेली असते. पंढरीच्या राणाचे वर्णन करताना संत तुकाराम महाराज म्हणतात, विटेवर उभा असलेला परमात्मा त्याचे ध्यान सुंदर, मनमोहक असे असून त्याचे हात कमरेवर आहेत. अशी मूर्ती पाहता मी धन्य होऊन जातो. तो पितांबर नेसलेला, गळ्यात तुळशीची माळ, कानी मोसोळीच्या आकाराचे कुंडले, गळ्यात  कौस्तुभमणी धारण केलेला आहे. असे ध्यान माझे सर्व सुख आहे. असे सुशोभित ध्यान मी नेहमीच आवडीने पाहीन. हेच ध्यान पाहण्यासाठी प्रत्येक वारकरी आंनदाची पंढरीची पायी वारी मोठ्या आवडीने करत असतो.
पंढरपूरची वारी हा एक अलौकिक सोहळा आहे.  मृगाचा पाऊस पडला, की शेतकरी विठ्ठल नाम घेत शेत पेरणी करून मोकळे होतात. आणि तो सोहळा पाहण्यासाठी वारीत सहभागी होतात. आषाढ सरीत पीक चांगले अंकुरीत होऊन वारी वरून परतताना शिवार सारा हिरवा शालू ओढून डोलत असतो. धरतीचा हा साज पाहून पंढरीरायाची कृपा झाल्याची भावना मनात रुजत जाते. ही श्रद्धा व कृपा कायम राहावी म्हणून पुन्हा पुन्हा आनंदवारीची ओढ कायम राहते. अशी वारी का करावी याबाबत एका अभंगात संत तुकाराम महाराज म्हणतात,
चला हो पंढरी जाऊ
जीवाच्या जीवलगा पाहू।।
संत महंत होतील भेटी
आनंदे नाचु वाळवंटी।।
हे तिर्थांचे माहेर
सर्व सुखाचे भांडार।।
जन्म नाही रे आणिक
तुका म्हणे माझी भाक।।

जीवाचा जीवलग अर्थात परमात्मा विठ्ठल होय, त्याला पाहण्यासाठी पंढरीला जावे लागते. पंढरीत गेल्यावर सगळे संत, महंत यांची भेट होईल, अशा भेटीने मग चंद्रभागेच्या वाळवंटात नामसंकीर्तन करून नाचू, गाऊ. जगातल्या सर्व तीर्थांचे हे माहेर आहे. जशी सासुरवाशिणीला माहेर ओढ लागते, तशीच संतांना व भक्तांना विठू माउलीच्या भेटीची ओढ लागते. या सारखे सुख नाही, ते सुखाचेच भांडार आहे. हे सुखाचे भांडार पाहण्यासाठी जन्म पुन्हा नाही. म्हणून या जन्मी हा सुख सोहळा विठ्ठल दर्शनाने सार्थक करून घ्यावा. अशी आनंदाची वारी या जन्मी पुन्हा पुन्हा करावी.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजसुद्धा पंढरीला जाऊन हा सुख सोहळा कसा पाहावा हे सांगतात.
चला हो! पंढरी जाऊ, जिवाच्या जिवलगा पाहू।
भीवरे स्नान करुनीया, संत-पद-धूळ शिरि लावू॥

पंढरीला जाऊन विठ्ठलाला पाहू, चंद्रभागे स्नान करून संतांच्या पायाची धूळ चरणी लावू, बोधरूपी तुळशीची माळ घालू, कपाळी चंदन लावू, सतत हरीनाम घेऊ.  ज्ञानदीप लावून आनंदाचा सोहळा पाहू. विठ्ठल सर्वत्र पसरलेला असून विश्वाची पेठ ही पंढरीच आहे. यापेक्षा वेगळा वैकुंठ नाही. येथेच भक्तीभावाने दृढ राहू. येथेच सर्व सुख आहे. जगात दुसरे सुख नाही, असा आनंदही नाही.
“तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख,
पाहीन श्रीमुख आवडीने!”

संत तुकाराम महाराज पांडुरंगाला म्हणतात, की हेच माझे सर्वसुख आहे. संतांना मोहमाया नसल्याने त्यांना पंढरीच्या परमात्म्यातच सर्वसुख दिसून येते. हे सुख पाहताना मन भरत नाही. असे श्रीमुख आवडीने पाहीन कारण ते श्रीमुख पाहताना सर्व सुखाचे सर्वोच्च शिखर गाठल्यासारखे वाटते. या सुख सोहळ्याचे वाटेकरी होण्यासाठी वारकरी नेहमी आतुर झालेला असतो. ज्यांना पंढरीच्या वारीला प्रत्यक्ष जाता येत नाही, ते भक्त वारीचे महात्म्य वाचून, वृत्तचित्र आणि दूरचित्रवाणीवरील प्रक्षेपणातून या भक्तिसोहळ्याचा अनुभव घेतात. आषाढीच्या निमित्ताने ते मनोभावे विठ्ठलाची पूजा-अर्चना करून नामस्मरणात तल्लीन होतात. 
आनंदाचे डोही आनंद तरंग।
आनंदची अंग आनंदाचें॥
काय सांगो जाले काहीचियाबाही।
पुढे चाली नाही आवडीने॥

संत तुकाराम महाराजांच्या या अभंगातून परमानंदाची अनुभूती व्यक्त होते. भक्तीच्या परिपूर्ण अवस्थेत मनातील सर्व दुःख, चिंता आणि अस्वस्थता नाहीशी होऊन अंतःकरण आनंदाने भरून जाते. हा आनंद शब्दांत व्यक्त करणेही कठीण होते. भगवंताच्या सान्निध्यात मिळालेली ही अनुभूती इतकी व्यापक असते की, मन त्या आनंदसागरात पूर्णपणे तल्लीन होते. संत तुकाराम महाराजांनी या अभंगातून भक्तीमधून प्राप्त होणाऱ्या आत्मिक समाधानाचे आणि ईश्वराशी एकरूप होण्याच्या आनंदाचे सुंदर वर्णन केले आहे. जसे मातेच्या गर्भात आपण मातेच्या जवळ असतो, तितकेच भगवंता जवळ पोहचलो आहे. 
या भावनेचे वर्णन शब्दांत करणे अशक्य आहे. जसे एखाद्या लहान बाळाला काही हवे असते, पण ते व्यक्त करता येत नाही; मात्र त्या बाळाची भावना आई सहज ओळखते आणि त्याची गरज पूर्ण करते. तसाच अनुभव संत, सद्गुरू आणि वारकऱ्यांच्या भक्तिभावात येतो. संत तुकाराम महाराज सांगतात की, हा परमआनंद केवळ भगवंताच्या कृपेनेच प्राप्त होतो; त्याशिवाय तो कोणीही देऊ शकत नाही. अंतःकरणात आणि बाह्य जगात जे काही चांगले आहे, ते सर्व ईश्वरकृपेचेच फलित आहे. अशी भगवंताची कृपा सदैव राहावी, मनातील अहंकार, लोभ, क्रोध आणि इतर दुर्गुण दूर व्हावेत, या भावनेने वारकरी कोणत्याही अपेक्षेविना पंढरीची वाट आनंदाने चालत राहतो. विठ्ठलनामातून मिळणारा हा आत्मिक आनंदच त्याच्या जीवनाची खरी शिदोरी बनतो.
पंढरपूरचे महात्म्य सांगणारी आषाढी-कार्तिकी वारी ही वारकर्‍यांच्या माहेरची वाटच जणू , मुखी विठ्ठल व संतनाम घेत, आषाढाच्या सरी अंगावर घेत, वारा, थंडी यांना मागे सारत वारकर्‍यांची मांदियाळी पंढरपूरच्या दिशेने अखंडपणे वाटचाल करीत असते. नाचत, अभंग गात, टाळ-मृदंगाचा निनाद करत, रिंगण, फुगडी, भारुडे आदी भक्तीचा आविष्कार सादर करत देहभान विसरून ते आनंदाची यात्रा पार करत असतात. ही वारी करताना अहंकार, लोभ, माया, क्रोध, मत्सर यांचे सारे पाश गळून जातात. अंतरंगात विठ्ठलाची मूर्ती बसवून भक्तीभाव ओसंडून वाहत असतो.

 विठ्ठल वळसे पाटील
 मो. ८४८४०६६०४२
 vithalvalse@gmail.com
 

 

Related to this topic: