Breaking News
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आज शेगाव खामगाव दौऱ्यावर
  • लोणावळा–देवले मार्गावर दरड कोसळून मोठ्या प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर
  • शाळेच्या प्रांगणात खेळताना विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; बीडमध्ये खळबळ
  • डॉक्टरांना मारहाण प्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवक रमेश म्हात्रे यांना जामीन मंजूर
  • खामगाव ग्रामीण पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; १३ जणांविरुद्ध गुन्हा
  • पाचगणी–महाबळेश्वर रस्त्याची दुरावस्था, खड्ड्यांमुळे रस्त्याची झाली चाळण
  • रत्नागिरी-शहरातील पटवणे फगरवठार रस्ता पुन्हा खचला
  • भंडाऱ्यात तीन वर्षीय बालिकेवरील अत्याचाराच्या घटनेने तीव्र संताप
  • एका दिवसात सोने ८०० रूपये तर चांदी तब्बल ₹ ५ हजारांनी महाग

होम > संपादकीय > लेख

लोकनामा

बदलत्या राजकीय हवेची चाहूल...?

२० जुलै रोजी तरुणांनी संसदेवर मोर्चा नेला, कठडे तोडले, त्यांच्यावर पोलीस तुटून पडले, लाठीमार केला, अश्रूधुराची नळकांडी फोडली, पाण्याचा मारा केला, त्याला न जुमानणाऱ्या विद्यार्थ्यांनी इतिहास घडविला.


बदलत्या राजकीय हवेची चाहूल

नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या निषेधातून उभे राहिलेले विद्यार्थी आंदोलन आता केवळ परीक्षेपुरते मर्यादित राहिलेले नाही. शिक्षण व्यवस्था, बेरोजगारी, पारदर्शकता आणि उत्तरदायी शासनाच्या मागणीसाठी देशभरातील तरुण रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनाने लोकशाहीतील युवकांच्या असंतोषाला नवी दिशा दिली आहे.

नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या निषेधार्थ दिल्ली पेटली आहे. विरोधी पक्षांनी संसदेत गदारोळ घातला असून, रस्त्यावर विद्यार्थी आंदोलन सुरू आहे. जंतरमंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. देशातील अर्थव्यवस्थेची घसरगुंडी आहे. रुपयाची घसरण आहे. वाढती महागाई आहे. विक्रमी बेरोजगारी. स्पर्धा परीक्षांतील गैरव्यवहार आहे. तरुणांच्या भविष्यावर दाटलेले संकट आहे, तर दुसऱ्या बाजूला सत्ताधारी राजकीय सत्तेची गणितं जुळविण्यात व्यस्त आहेत. किळसवाणी पक्षांतराची मालिका आहे. निवडणुकांचे अंकगणित आहे. सामान्य माणसाच्या जीवनाशी संबंधित प्रश्न मागे पडत आहेत. देशातील तरुण रस्त्यावर उतरू लागले. २० जुलै रोजी तरुणांनी संसदेवर मोर्चा नेला, कठडे तोडले, त्यांच्यावर पोलीस तुटून पडले, लाठीमार केला, अश्रूधुराची नळकांडी फोडली, पाण्याचा मारा केला, त्याला न जुमानणाऱ्या विद्यार्थ्यांनी इतिहास घडविला. सरकारला धडकी भरली तेव्हा चर्चेचे निमंत्रण आले. सत्तेच्या विरोधात हवा वाहू लागल्याची ही एक झलक होय! त्यात काँग्रेस, सपा नेत्यांनी भर घातली. पंतप्रधानांचे निवासस्थान गाठले आणि धरणे आंदोलन केले. तिथेही बळाचा वापर झाला. त्यात विरोधी पक्ष नेते राहुल गांधी जखमी झाले. या घटनांनी आता राजकीय हवा बदलत असल्याचे संकेत दिले.
नीटचा प्रश्न हिट झाला. जंतरमंतरवर पर्यावरणवादी सोनम वांगचूक काॅक्रोच जनता पार्टीच्या मंचावर उपोषणास बसले. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि एनएसयूआयचे कार्यकर्ते देशभर विद्यार्थ्यांसोबत रस्त्यावर आहेत. कोटा येथील सभेनंतर त्यांनी देहराडूनमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सरकारी अडथळे, मुसळधार पावसातही लाखो युवकांनी प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांचा बुलंद आवाज आणि घोषणाबाजी सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. दिल्लीतील जंतरमंतरवर सोनम वांगचूक यांचे उपोषण सुरू होते. उपोषणाच्या १९व्या दिवशी पोलिसांनी त्यांना तेथून हटवून रुग्णालयात दाखल केले. या कारवाईला विद्यार्थ्यांनी दडपशाही संबोधले आणि त्या निषेधार्थ मोठ्या संख्येने विद्यार्थी रस्त्यांवर उतरले. जंतरमंतरवर बाजूच्या मंचावरही डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटनांचेही उपोषण सुरू होते. तिकडेही पोलीस गेले. मात्र, विद्यार्थ्यांनी पोलिसांचा डाव उधळून लावला. जेएनयू विद्यार्थी नेत्या नेहा बोरा हिच्यासह नव विद्यार्थी उपोषणावर होते. मात्र, नेहा यांचे उपोषण २२ व्या दिवशी अभिनेत्री शबाना आझमी, अभिनेता प्रकाश राज, योगेंद्र यादव यांनी सोडले. काॅक्रोच आंदोलनात खरा रंग जेएनयूच्या विद्यार्थ्यांनीच भरला.
२० जुलै रोजी जंतरमंतरच्या विद्यार्थ्यांनी संसदेवर धडक दिली. पोलिसांनी बळाचा वापर केला, वातावरण चिघळले, पोलिसांनी लाठीमार केला, अश्रुधुराची नळकांडी फोडली, साध्या वेषातील दंडूकधाऱ्यांनीही मोर्चेकऱ्यांवर हल्ले केले. हे गुंड कोण, असा प्रश्न आहे. ३०० वर मुले जखमी झाली. त्यात नागपूरचा भरत बानाईतसुद्धा आहे. नागपुरातही विद्यार्थी रस्त्यावर उतरले. त्यात शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रफुल्ल गुडधे समर्थकांसह सहभागी झाले. मुंबईत आदित्य ठाकरे यांनी माहौल केला. या काळात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ प्रभावहीन दिसले. जंतरमंतरवर वांगचूक यांच्या उपोषणालाच अधिक प्रसिद्धी मिळाली. त्यामुळे व्यक्तिकेंद्रित चर्चेला अधिक वाव मिळाल्याची टीका झाली. तथापि, वांगचूक यांच्या उपोषणाचे एक महत्त्वाचे यश नाकारता येणार नाही. या आंदोलनामुळे अनेक अभिनेते, लेखक, विचारवंत, कलाकार, नेते आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती प्रत्यक्ष जंतरमंतरवर पोहोचल्या. त्यामुळे आंदोलनाला सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्राचे काही प्रमाणात समर्थन मिळाले. नीट प्रश्नपत्रिका फुटीने देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अनिश्चिततेच्या भोवऱ्यात ढकलले. अनेक विद्यार्थ्यांनी दोन-दोन, तीन-तीन वर्षे कठोर परिश्रम घेतले. कुटुंबांनी लाखो रुपये खर्च केले. ग्रामीण भागातील पालकांनी शेती विकली, कर्ज काढले, मुलांना कोचिंगसाठी पाठविले. अशा परिस्थितीत प्रश्नपत्रिका फुटल्याच्या आरोपांनी संपूर्ण परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास हादरला. संपूर्ण शिक्षण व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले, विद्यार्थी संतप्त झाले, पालक हतबल झाले, शिक्षक अस्वस्थ झाले. अशा वेळी देशभर एक व्यापक, पक्षभेद विसरून उभे राहिलेले विद्यार्थी आंदोलन अपेक्षित होते; परंतु आंदोलनाची विभागणी झाली. काही जण उपोषणाच्या मार्गावर गेले, काही रस्त्यावर उतरले. इतिहास सांगतो, की मोठे परिवर्तन तेव्हाच घडते जेव्हा विविध प्रवाह एका ध्येयासाठी एकत्र येतात. विभाजित आंदोलने अनेकदा नैतिक ऊर्जा गमावतात. सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला जनसमर्थन मिळाले. मात्र, अपेक्षेप्रमाणे नाही. यास सरकारी दडपशाही कारणीभूत होती. असे म्हणणे पुरेसे नाही. सार्वजनिक जीवनात विश्वासार्हता सर्वात मोठे भांडवल असते. वांगचूक यांचे शैक्षणिक व पर्यावरण क्षेत्रात मोठे काम आहे हे कोणी नाकारू शकत नाहीत. मात्र, त्यांनी यापूर्वी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे स्वागत केले. जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाचे समर्थन केले होते. तिहेरी तलाक विरोधी कायद्यालाही पाठिंबा दर्शविला होता. या भूमिका मांडणे हा त्यांचा लोकशाही अधिकार आहे. आज त्याच सरकारच्या शिक्षण व्यवस्थेविरोधात ते उभे झाले. लोकांनी त्यांच्या भूमिकेतील सातत्याबाबत प्रश्न उपस्थित केले. लोकशाहीत प्रश्न विचारणेही तेवढेच महत्त्वाचे असते. याचसंदर्भात आणखी एक मुद्दा चर्चेत आला. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेने जम्मू-काश्मीर गाठले होते. त्या काळात वांगचूक यांनी त्या यात्रेपासून अंतर राखले होते. त्यांनीच आता विरोधी पक्षांकडून व्यापक पाठिंब्याची अपेक्षा व्यक्त केली. काही जणांनी ही विसंगती अधोरेखित केली. अभिजित दीपके या मराठी तरुणाने दिल्लीवर छाप पाडली. मात्र, स्वत:वरील ‘आप’ची छापही तेवढ्याच तत्परतेने दूर करावी लागेल. आंदोलनाची नैतिक ताकद त्यांच्या पारदर्शकतेत असते. संशय निर्माण झाला, की लोक भावनिक पाठिंबा देतात; पण प्रत्यक्ष रस्त्यावर उतरायला कचरतात. याउलट राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर थेट रस्त्यावर उतरून संघर्षाचा मार्ग स्वीकारला. कोटा आणि देहराडूनमधील कार्यक्रमांना मोठी उपस्थिती लाभली. भर पावसात उभे राहून विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. हा संताप संपूर्ण रोजगार, शिक्षण आणि भविष्याविषयीच्या असुरक्षिततेविरोधातील होता. त्यामुळे नीटचा प्रश्न हा व्यापक युवक असंतोषाचे प्रतीक बनला. त्यांनी पंतप्रधान निवासासमोर धरणे दिली. या आंदोलनाने पेपरफुटी आंदोलनाला नवी ऊर्जा दिली.
पत्रकारांच्या प्रश्नावर राहुल म्हणाले, “मला फरफटत नेले, मानहानीपर वागणूक दिली, याकडे दुर्लक्ष करा. विद्यार्थी आंदोलनावर फोकस करा. केंद्र सरकारचे शिक्षणाचे वार्षिक बजेट असते तेवढा खर्च एका नीट परीक्षेवर विद्यार्थी व त्यांचे कुटुंब करतात. दहा वर्षांत १५२ नीट पेपर फुटले. त्याची झळ साडेसात कोटी विद्यार्थ्यांना बसली, पण दोषींना अद्याप शिक्षा झाली नाही हे अधिक गंभीर आहे. परीक्षेला बसणारे मध्यम व गरीब कुटुंबातील आहेत. ते संतप्त आहेत, त्या सर्वांसोबत मी आहे.”
लोकांना काॅक्रोच आंदोलनातही नैतिक मूल्याची अपेक्षा आहे. देश एका गंभीर वळणावर आहे. स्पर्धा परीक्षा वारंवार वादात सापडत आहेत. भरती प्रक्रिया वर्षानुवर्षे रखडत आहे. तरुणांमध्ये असुरक्षितता वाढत आहे. नीटचा प्रश्न हा देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे. परीक्षा व्यवस्थेत आमूलाग्र सुधारणा हवी. पारदर्शक तपास, दोषींना कठोर शिक्षा हवी. अन्यथा तरुणांचा लोकशाहीवरील विश्वास डळमळीत होऊ शकतो.
विद्यार्थ्यांचे आंदोलन हा केवळ निषेध नसून एक स्पष्ट संदेश आहे. देशाची तरुणाई उत्तरदायी शासन, पारदर्शक व्यवस्था आणि न्यायाची मागणी करत आहे. याकडे सरकारने विरोधी पक्षांचे आंदोलन म्हणून बघू नये. देशाच्या भविष्यासाठी दिलेला इशारा म्हणून बघावे. हवेची दिशा खरोखर बदलत आहे, की हा केवळ राजकीय आभास आहे. याचे उत्तर येणारा काळ देईल. मात्र, एक गोष्ट निर्विवाद आहे, जेव्हा विद्यार्थी रस्त्यावर उतरतात, तेव्हा तो राष्ट्राच्या भविष्याचा प्रश्न बनतो.
 

भूपेंद्र गणवीर
ज्येष्ठ पत्रकार,नागपूर
९८३४२४५७६८

Related to this topic: