आरएसएस ही एक उजव्या विचारसरणीची हिंदू स्वयंसेवी संघटना आहे. तिची स्थापना १९२५ मध्ये वैद्य असलेले, हिंदू राष्ट्रवादी केशव बळीराम हेडगेवार यांनी सध्याच्या महाराष्ट्रातील नागपूर येथे केली.
आरएसएस ही एक उजव्या विचारसरणीची हिंदू स्वयंसेवी संघटना आहे. तिची स्थापना १९२५ मध्ये वैद्य असलेले, हिंदू राष्ट्रवादी केशव बळीराम हेडगेवार यांनी सध्याच्या महाराष्ट्रातील नागपूर येथे केली. हिंदुत्व हा एक हिंदू वर्चस्ववादी विचार असून, भारताला घटनात्मकदृष्ट्या धर्मनिरपेक्ष राष्ट्रातून हिंदू राष्ट्रात बदलण्याचे त्याचे उद्दिष्ट आहे. आरएसएसला फॅसिस्ट संघटना म्हणून ओळखले जाते. भारतात अल्पसंख्याकांवर हल्ले वाढले आहेत. भारताची राजकीय व्यवस्था धार्मिक अल्पसंख्याकांप्रति असहिष्णुतेला प्रोत्साहन देते. आरएसएसवर मर्यादित स्वरुपात बंधने टाकावीत, अशी शिफारस करणारा अहवाल १८ नोव्हेंबर २०२५ रोजी वाशिंग्टन डीसी येथे प्रकाशित झाला. हा अहवाल अमेरिकी संसदेच्या (काँग्रेस) आंतर्राष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य आयोगाचा ( USCIRF ) आहे.
‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) कधीच झोपत नाही....’ असे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यापूर्वी कधीतरी बोलले आहेत. त्यांच्या या विधानाची दखल प्रत्येकजण आपापल्या दृष्टीनुसार घेत असते. संघाच्या संदर्भात गेल्या काही महिन्यातील घडामोडी लक्षात घेता, भागवतांच्या वरील विधानाची दखल घेण्याची गरज आहे. आमचे हे मत अनेकांना रुचणार नाही. आमचा नाईलाज आहे.
इंटरनेटवर संघाची स्वतःची rss.org ही वेबसाईट ( संकेतस्थळ )आहे. त्यावर संघाच्या कार्यक्रमांची माहिती मिळते. या संकेत स्थळावरील गेल्या १२ मे (२०२६) रोजीचे प्रसिद्धी पत्रक वाचले पाहिजे. आरएसएसचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी आरएसएसच्या शताब्दी वर्षानिमित्त गेल्या एप्रिल महिन्यात अमेरिका, ब्रिटन आणि जर्मनीचा दौरा केला. या तिन्ही देशांतील यजमान संस्थांच्या निमंत्रणावर हे दौरे आयोजित करण्यात आले होते. दौऱ्यानंतर त्यांनी १२ मे रोजी नवी दिल्लीतील संघ कार्यालयात पत्रपरिषद घेतली. ही पत्रपरिषद परदेशी वृत्तसंस्थासाठी होती. संघाच्या प्रसिद्धी पत्रकानुसार, होसबळे यांनी ब्रिटनमधील शैक्षणिक, धोरणनिर्मिती, संसदीय, उद्योग आणि सामाजिक क्षेत्रातील प्रतिनिधींशी संवाद साधला.
“आरएसएस आणि नागरी संस्था” या विषयावरील शैक्षणिक गोलमेज परिषदेत ऑक्सफर्ड विद्यापीठ, युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन, स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीज, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, केंब्रिज विद्यापीठ आणि ससेक्स विद्यापीठ येथील संशोधक आणि प्राध्यापक सहभागी झाले.
हाऊस ऑफ कॉमन्स आणि हाऊस ऑफ लॉर्ड्स येथील खासदार आणि मान्यवरांसोबत आयोजित सर्वपक्षीय स्नेहभोजनात कन्झर्व्हेटिव्ह पक्ष, लेबर पक्ष आणि लिबरल डेमोक्रॅट्सचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत “भारताच्या भविष्यात आरएसएसची भूमिका” या विषयावर चर्चा झाली.
लंडनमधील वरिष्ठ उद्योग नेत्यांसोबत झालेल्या अनौपचारिक चर्चेत सध्याच्या भू-राजकीय परिस्थितीत आरएसएसचा जागतिक दृष्टीकोन मांडण्यात आला. एका अनौपचारिक बैठकीत ब्रिटनमधील हिंदू समाजाचे नेते आणि विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले.
रग्बी येथे हिंदू स्वयंसेवक संघ (HSS) यूके यांची कार्यकर्ता मंडळ बैठक झाली. या बैठकीत ब्रिटनमधील एचएसएसच्या व्यापक जाळ्यात कार्य करणारे स्वयंसेवक आणि पदाधिकारी सहभागी झाले.
अमेरिका दौरा; दहा दिवसांचे कार्यक्रम:
ग्लोबल सायन्स इनोव्हेशन फोरमच्या निमंत्रणावर स्टॅनफोर्ड फॅकल्टी क्लबने आयोजित केलेल्या पहिल्या शिखर परिषदेत भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते आणि अमेरिकेचे माजी ऊर्जा सचिव प्रा. स्टीव्हन चू , अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार लेफ्टनंट जनरल एच. आर. मॅकमास्टर, गूगलच्या संस्थापक संचालक मंडळाचे सदस्य राम श्रीराम, खोसला व्हेंचर्सचे संस्थापक विनोद खोसला, न्यूझीलंडच्या पंतप्रधानांच्या माजी मुख्य वैज्ञानिक सल्लागार प्रा. डेम ज्युलिएट गेरार्ड यांचा सहभाग होता.
वॉशिंग्टन डीसी येथे परराष्ट्र धोरण अभ्यासक आणि इतिहासकार वॉल्टर रसेल मीड यांच्यासोबत झालेल्या संवादात होसबळे यांनी आरएसएसच्या विचारांना प्रेरणा देणाऱ्या ‘एकात्मतेच्या तत्त्वज्ञानाचे’ विवेचन केले. ते म्हणाले, “हिंदू तत्त्वज्ञान आणि हिंदू संस्कृतीत वर्चस्ववादाला (Supremacism) स्थान नाही. हिंदूंनी कधीही कोणत्याही देशावर आक्रमण केले नाही आणि हिंदूंना कोणाचीही माफी मागण्याचे कारण नाही.”
फाउंडेशन फॉर इंडिया अँड इंडियन डायस्पोरा स्टडीज यांनी हडसन इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने आयोजित केलेल्या परिसंवादात वॉल्टर रसेल मीड आणि आरएसएसचे दीर्घकाळ अभ्यासक वॉल्टर अँडरसन सहभागी झाले. वॉल्टर अँडरसन यांनी आरएसएसचे वर्णन भारतातील स्थैर्य निर्माण करणारी एक प्रभावी शक्ती असे केले.
जर्मनी दौरा:
बर्लिनमध्ये दोन दिवस विविध जर्मन धोरणविषयक संस्थांचे प्रतिनिधी आणि भारतीय समुदायाशी चर्चा करण्यात आली. स्टिफ्टुंग व्हिसेनशाफ्ट उंड पोलिटिक (Stiftung Wissenschaft und Politik) अर्थात जर्मन इन्स्टिट्यूट फॉर इंटरनॅशनल अँड सिक्युरिटी अफेअर्स येथे बदलत्या जागतिक परिस्थितीत भारताचे स्थान, आंतरराष्ट्रीय संबंधांतील सभ्यतात्मक दृष्टीकोन आणि सामाजिक एकात्मतेत नागरी संस्थांचे योगदान यावर चर्चा झाली. हिंदू स्वयंसेवक संघ (HSS), जर्मनी यांच्या मेळाव्यात देशभरातून आलेले २०० हून अधिक स्वयंसेवक सहभागी झाले.
डॅमेज कंट्रोल मोहीम:
वरील पत्रपरिषदेला “रायटर्स” आणि “अल जझीरा” या वृत्तसंस्थांचे प्रतिनिधी हजर होते. या प्रतिनिधींनी “दुर्मिळ” अशा शब्दात या पत्रपरिषदेचे वर्णन केले. अलजझीराने १२ मे रोजी, तर अल जझीराने १५मे रोजी वृत्त दिले.
रायटर्सचे वृत्त:
दिल्लीतील आरएसएसच्या नव्याने उभारलेल्या १२ मजली मुख्यालयात आयोजित “दुर्मीळ” पत्रकार परिषदेत संघाचे सहकार्यवाह होसबळे यांनी सांगितले की, “संघावर करण्यात येणारा अल्पसंख्याकांवरील हल्ल्यांचा आरोप चुकीचा आहे.
अल्पसंख्याक समुदायांवर हल्ले करणारी निमलष्करी संघटना असल्याची संघाची प्रतिमा खोडून काढण्यासाठी त्यांनी अमेरिकेत, जर्मनीत आणि ब्रिटनमध्ये विविध सभांना संबोधित केले. अशा आणखी भेटींची योजना आहे.
आरएसएसबद्दल असलेले काही गैरसमज आणि चुकीच्या समजुती दूर करणे हा या भेटींचा उद्देश आहे. आरएसएसवर होणारे प्रमुख आरोप असे आहेत, की ती “समाजाला मागे खेचणारी संघटना आहे”, ती एक “निमलष्करी (paramilitary) संघटना आहे, ती “हिंदू वर्चस्ववादी विचारांना प्रोत्साहन देते” आणि “इतर नागरिकांना दुय्यम दर्जाचे नागरिक बनवले आहे; परंतु, वास्तव यापेक्षा पूर्णपणे वेगळे आहे, असेही होसबळे म्हणाले.
रायटर्सने आपल्या वृत्तात पुढे लिहिले- “अधिकृतपणे धर्मनिरपेक्ष असलेल्या आणि हिंदू बहुसंख्य असलेल्या देशात हिंदू-मुस्लीम राजकीय दरी अधिक तीव्र होत आहे. मोदी तरुणपणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सामील झाले आणि त्यांच्या भारतीय जनता पक्षाचे (भाजप) जवळजवळ राष्ट्रीय स्तरावर वर्चस्व निर्माण होण्याचे श्रेय मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विशाल जाळ्याला दिले जाते.
१९२५ मध्ये स्थापन झाल्यापासून संघावर अनेक वेळा बंदी घालण्यात आली आहे, ज्यात १९४८ मध्ये एका माजी सदस्याने महात्मा गांधी यांची हत्या केल्यानंतर घातलेल्या बंदीचाही समावेश आहे.
अल जझीरा:
रायटर्सने दिलेल्या बातमीची पुष्टी करीत ंअल जझीरा’ या वृत्तसंस्थेने स्वतःच्या वृत्तात म्हटले- “भारतात गेल्या वर्षी धार्मिक अल्पसंख्याकांविरुद्ध द्वेषपूर्ण भाषणात वाढ झाली. तज्ज्ञांच्या मते, कट्टर उजवी संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ “डॅमेज कंट्रोल” करत आहे. आरएसएस हिंदू अति-उजव्या विचारसरणीचा वैचारिक उगमस्थान आहे.
आरएसएस ही एक उजव्या विचारसरणीची हिंदू स्वयंसेवी संघटना आहे. तिची स्थापना १९२५ मध्ये वैद्य असलेले, हिंदू राष्ट्रवादी केशव बळीराम हेडगेवार यांनी सध्याच्या महाराष्ट्रातील नागपूर येथे केली.
हिंदुत्व हा एक हिंदू वर्चस्ववादी विचार असून, भारताला घटनात्मकदृष्ट्या धर्मनिरपेक्ष राष्ट्रातून हिंदू राष्ट्रात बदलण्याचे त्याचे उद्दिष्ट आहे. आरएसएसला फॅसिस्ट संघटना म्हणून ओळखले जाते. भारतात अल्पसंख्याकांवर हल्ले वाढले आहेत. भारताची राजकीय व्यवस्था धार्मिक अल्पसंख्याकांप्रति असहिष्णुतेला प्रोत्साहन देते. आरएसएसवर मर्यादित स्वरुपात बंधने टाकावीत, अशी शिफारस करणारा अहवाल १८ नोव्हेंबर २०२५ रोजी वाशिंग्टन डीसी येथे प्रकाशित झाला. हा अहवाल अमेरिकी संसदेच्या (कॉंंग्रेस) आंतर्राष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य आयोगाचा ( USCIRF ) आहे.
वरील अहवालानंतर “डॅमेज कंट्रोल” करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) पश्चिमेकडे लॉबिंग करत आहे. संघाचे दौरे सुरू झाले आहेत. आमचे आकलन स्पष्ट आहे. संघ कधीच झोपत नाही, हे भागवत यांचे विधान वरील पत्रपरिषदेने सिद्ध केले आहे.
प्रभाकर कोंडबत्तुनवार
मो. ९४०५७५०४६०
(प्रस्तुत लेखक प्रसिद्ध पत्रकार आणि ज्येष्ठ संपादक आहेत.)