Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > संपादकीय > लेख

'DM' च्या सकारात्मक व नकारात्मक बाजू

जेव्हा एखादी व्यक्ती म्हणते की, 'मला DM करा,' तेव्हा त्याचा अर्थ असतो की मला खासगीत मॅसेज पाठवा असा होतो.


dm च्या सकारात्मक व नकारात्मक बाजू

Direct Message |

(Direct Message) जेव्हा एखादी व्यक्ती म्हणते की, 'मला DM करा,' तेव्हा त्याचा अर्थ असतो की मला खासगीत मॅसेज पाठवा असा होतो. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील मॅसेजला प्रामुख्याने 'DM' म्हटले जाते.

खासगी संवादासाठी DM चा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. सार्वजनिक पोस्ट किंवा कमेंट्सपेक्षा हे वेगळे असते. यात पाठवलेला मॅसेज फक्त पाठवणारा आणि प्राप्त करणारा या दोनच व्यक्तींना दिसतो. नातेसंबंधांच्या संदर्भात DM हे एक दुधारी शस्त्र आहे. आजच्या डिजिटल युगात नाते जोडण्यासाठी आणि टिकवण्यासाठी याचा मोठा वाटा आहे, पण तेच नाते बिघडवण्यासाठीही ते कारणीभूत ठरू शकते.

DM च्या सकारात्मक व नकारात्मक अशा दोन बाजू आहेत. त्यापैकी सर्वप्रथम आपण सकारात्मक बाजूचा विचार करू. नातेसंबंध अधिक प्रभावी करण्यासाठी मॅसेज गरजेचा आहे. सतत संपर्कात राहण्यासाठी, कामानिमित्त किंवा शिक्षणासाठी दूर असलेल्या व्यक्तींशी दिवसभरात छोटे-छोटे मेसेजेस करून जसे 'जेवलास का?', 'आजचा दिवस कसा गेला?', 'कुठे आहेस?, 'काय करतोस?' असा मॅसेज जवळीक टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वाचा ठरतो. अवघड असलेल्या गोष्टी सांगण्यासाठी कधीकधी जे समोर बोलता येत नाही ते मॅसेजद्वारे नीट मांडता येते. मनातील भावना व्यक्त करण्यासाठी DM हा एक सुरक्षित पर्याय सर्वांना वाटतो. जुने फोटो, व्हिडिओ किंवा एखादी आठवण करून देणारी पोस्ट शेअर केल्याने नात्यातील ओलावा टिकून राहतो. कुटुंबातील किंवा ग्रुपमधील इतरांना न समजता दोन व्यक्तींना आपला खासगी संवाद गुप्त ठेवता येतो.

काही नकारात्मक बाबींचा विचारसुद्धा या निमित्ताने करता येईल. लिखित स्वरूपातील संवादात 'सूर' समजत नाही. तुम्ही विनोदाने म्हटलेली गोष्ट समोरची व्यक्ती रागात किंवा टोमणा म्हणून समजू शकते ज्यातून वादाला सुरुवात होते व गैरसमज निर्माण होतो. मॅसेज पाठवल्यानंतर त्याच्या प्रतिसादाचीसुद्धा आतुरता असते त्यामुळे 'मेसेज वाचला पण रिप्लाय दिला नाही', Blue Tick आली नाही ही गोष्ट सध्याच्या नात्यांमध्ये वादाचे सर्वात मोठे कारण ठरत आहे. यामुळे संशय किंवा दुर्लक्ष केल्याची भावना निर्माण होते. सोशल मीडियावरील DM मुळे अनोळखी व्यक्तींशी संवाद साधणे सोपे झाले आहे. यामुळे अनेकदा चालू असलेल्या नात्यात असुरक्षितता किंवा तिसऱ्या व्यक्तीमुळे वाद निर्माण होतात. अति संवाद हासुद्धा घातक ठरतो, प्रत्येक मिनिटाला 'कुठे आहेस?', 'काय करतोयस?' असे मॅसेजेस विचारणे हे समोरच्या व्यक्तीसाठी घुसमटवणारे ठरू शकते.

नात्यांमध्ये DM चा वापर करताना काही पथ्य पाळले पाहिजे. जिथे महत्त्वाचे वाद असतील, चर्चा गंभीर असेल तेथे DM चा वापर करू नका, प्रत्यक्ष संवाद साधा किंवा प्रत्यक्ष भेट घ्या हे केव्हाही चांगले. समोरच्या व्यक्तीच्या वेळेचा आदर करा, तुमच्या वेळेतच त्यांनी रिप्लाय द्यावा ही अपेक्षा सोडा. शंका असल्यास समोरच्या व्यक्तीला नेमके काय म्हणायचे आहे याची स्वतःहून खात्री करून घ्या.

DM कडे जर सकारात्मक दृष्टीने पाहिले तर ते आधुनिक युगातील एक मोठे 'वरदान' ठरू शकते. विशेषतः संवाद साधण्याच्या पद्धतीत यामुळे जे क्रांतिकारी बदल झाले आहेत. भौगोलिक सीमांच्या पलीकडे आपण पोहोचलो आहोत. पूर्वी कोणाशी तरी खासगीत संपर्क साधायचा असेल तर पत्रव्यवहार किंवा प्रत्यक्ष भेटण्याशिवाय पर्याय नसायचा. आता DM मुळे तुम्ही जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असलेल्या व्यक्तीशी एका सेकंदात जोडले जाऊ शकता. हे अंतर कमी करण्याचे एक प्रभावी साधन आहे. आजच्या काळात मोठे उद्योजक, लेखक, कलाकार किंवा अधिकारी यांच्याशी संपर्क साधणे DM मुळे शक्य झाले आहे. संकटकाळात किंवा तातडीच्या कामात फोन लागणे कठीण असते, तेव्हा एक छोटासा मॅसेज माहिती पोहोचवण्यासाठी खूप प्रभावी ठरतो. तसेच, महत्त्वाच्या माहितीचा 'लिखित पुरावा' राहत असल्याने भविष्यातील संदर्भासाठी ते सोयीचे पडते. तुम्ही एखाद्या विषयात तज्ज्ञ असाल किंवा तुम्हाला काही शिकायचे असेल तर DM द्वारे थेट तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेता येते. शैक्षणिक साहित्य, दुवे म्हणजे Links आणि महत्त्वाची कागदपत्रे त्वरित पाठवण्यासाठी हे वरदान आहे.

'जेव्हा अंतर जास्त असते आणि वेळ कमी, तेव्हा DM हे नात्यांना आणि कामाला जोडणारा एक भक्कम पूल ठरते.'

प्रशांत वामनराव शेवतकर

अकोला, ९६३७०४६१४०

Related to this topic: