अशोक खरातच्या काळ्या कर्तृत्वावर प्रकाश पाडण्यात आला आहे. त्याच्या कृत्यांमुळे समाजातील अंधश्रद्धा वाढत आहे आणि त्याच्या खोट्या ओळखीचा लोक फायदा घेत आहेत.
प्रहार
एकट्या अशोक खरात नामक ह्या भामट्याने सगळे इलेक्ट्रॉनिक मीडिया चॅनल्स, संपूर्ण सोशल मीडिया व्यापून टाकले. दिवसरात्र त्याच्याच काळ्या कारनाम्यांच्या बातम्या सुरू आहेत. अशा वेळी सर्वसामान्य जनता, विद्यार्थी, बेरोजगार तरुण आणि शेतकर्यांच्या बातम्या गहाळ झाल्यात. आपण त्या एकट्या खरातला दोष देऊ शकत नाही, त्याच्या पायाशी नतमस्तक होणार्या नालायक लोकांनाच खरे दोषी मानले पाहिजे.
जगद्गुरू वंदनीय तुकाराम महाराजांच्या शब्दांत सांगतो,
''सत्य आम्हा मनी, नव्हे 'गबाळाचे' धनी।
देतो 'तीक्ष्ण उत्तरे', पुढे व्हावयासी बरे..।।''
म्हणून आज हा 'प्रहार' करीत आहे. शहाण्यांनी समजून
घ्यावे, अशी अपेक्षा बाळगतो.
'सत्य सांगा लोका। जरी कडू लागे,
चाला नाही मागे। आला कोणी।।'
हे सांगून मी कुठलीही भीडभाड न ठेवता, या अंधश्रद्धेवर, बुवाबाजीवर, भोंदूंवर नेहमीच 'प्रहार' करीत असतो. सध्याच्या घडीला अशोक खरात प्रकरणाचा मोठा गवगवा झाला. तथाकथित खरात स्वामी उर्फ बाबा उर्फ महाराजांविषयी बरेच काही लिहून आले. आपल्या देशाचा इतिहास असा आहे, की बाबा, बुवा, गुरू, साधू या नावांनी ओळखल्या जाणार्या व्यक्तींनी लोकांच्या, विशेषत: स्त्रियांच्या मानसिक दुर्बलतेचा, अज्ञानाचा आणि भीतीचा गैरफायदा घेत सातत्याने समाजाचे आर्थिक, शारीरिक शोषण केले आहे. हीच घटना जर अमेरिका, चीन किंवा इतर हुकूमशाही राष्ट्रांमध्ये घडली असती, तर तिथे अशा भोंदूंना गोळ्या घालून ठार केल्या गेले असते. भारतात मात्र एकट्या खरातने इतका उच्छाद मांडला, की त्याच्या काळ्या कर्तृत्वांनी संपूर्ण मीडिया काबीज केला, ज्या पद्धतीने बातम्या येत आहेत, त्यावरून तरी असेच म्हणावे लागेल.
व्यवस्थेतील दोषामुळे कावलेल्या सामान्य जनतेने एखाद्या बाबाच्या नादी लागून आंधळी भक्ती स्वीकारणे आणि या भक्तांवर, खासकरून महिलांवर डोळा ठेवून असणार्या राजकारण्यांनी मतांची बेगमी करण्यासाठी थेट या बाबालाच कवेत घेणे; असले प्रकार सर्रास सर्वत्र सुरू आहेत. संत व प्रबोधन परंपरेची महती गाणारा महाराष्ट्र ह्या अशा नालायक गोष्टींमध्ये अडकून पडणे, हे मोठे दुर्दैव म्हटले पाहिजे. भक्तांसोबतच राजकारण्यांचे या बाबा, महाराजांसमोर लीन होण्याचे प्रकार नित्याचेच आहेत. आपल्यासमोर बाबा राम रहीम, नित्यानंद बाबा, आपल्या निर्बुद्ध लोकांनी 'बापू' बनविलेला 'आसाराम' ही उदाहरणे डोळ्यापुढे असताना आपले व्यक्तिस्तोम माजविणार्या खरात बाबापुढे लोकं नतमस्तक होऊच कसे शकतात, हा संशोधनाचा विषय आहे. जनतेने या आपल्या आजूबाजूला वावरणार्या भोंदूंकडे आता तरी डोळसपणे बघण्याची गरज आहे.
भारत हा अंधश्रद्धाळू लोकांचा देश आहे, ही केवळ भावनिक प्रतिक्रिया नसून ते सामाजिक वास्तवाचे कठोर प्रतिबिंब आहे, असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही. हजारो वर्षांच्या सामाजिक रचनेत धर्म, कर्मकांड, परंपरा आणि आध्यात्मिकता यांचा प्रभाव इतका खोलवर रुजलेला आहे की, तो केवळ श्रद्धेपुरता मर्यादित राहत नाही, तर तो अनेकदा विवेकबुद्धीवर मात करतो. बाबा, बुवा, गुरू, साधू या नावांनी ओळखल्या जाणार्या व्यक्तींनी लोकांच्या याच मानसिक दुर्बलतेचा, अज्ञानाचा आणि भीतीचा गैरफायदा घेत सातत्याने समाजाचे शोषण केले आहे- विशेषत: स्त्रियांच्या शोषणाच्या घटना वारंवार समोर येतात.
'स्त्रियेसारिखी मोहिनी नाही। स्त्रियेसारिखी वैरागिणी नाही। स्त्रियेसारिखी मुलायम नाही। आणि कठोर रणचंडिका।।' अशी तुमची महती ग्रामगीतेमध्ये वं. रा. श्री. तुकडोजी महाराजांनी वर्णिली आहे. तरीही माय माऊल्या आपले सामर्थ्य अशा कशा विसरल्या? याचेच आश्चर्य वाटतेय. हा प्रश्न मी माझ्या तमाम भगिनींना करीत आहे. तरीही समाजाचा एक मोठा घटक अशा व्यक्तींच्या मागे अंधपणे उभा राहतो, ही गोष्ट केवळ दुःखद नाही, तर चिंताजनक आहे. अहो, अगदीच महिला आयोगाची अध्यक्ष महिला या बलात्कारी बुवाच्या नादी लागते, ती महिलांना काय न्याय देणार? आणि, शिक्षण खात्याचे पूर्वीचे मंत्री दीपक केसरकर, राधाकृष्ण विखे पाटील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा इतर लोकप्रतिनिधी त्या बुवाच्या पाया पडतात, ते तरी जनतेला काय न्याय देणार? त्यामुळे मी म्हटले, की त्या बुवाचा तो धंदाच आहे; पण खरे नालायक त्याच्यापुढे नतमस्तक होणारे लोक आहेत.
मध्यंतरी प्रदीप मिश्रा नामक एका बुवाने असाच फाजीलपणा सुरू केला होता. तो म्हणायचा, की ''जर मुलाने वर्षभर अभ्यास केलेला नसेल तरी चालेल; पण परीक्षेच्या दिवशी त्याच्या आईने बेलपत्र घेऊन शिवपिंडीला वाहावं, म्हणजे तिचा मुलगा परीक्षेत पास होईल'', इतकंच नाही तर तो बेरोजगारांनाही सांगतो, की ''तुम्हाला जॉब मिळत नसेल, तर शिवपिडींवर धतुर्याचं फळ- पान वाहावं, म्हणजे तुम्हाला जॉब मिळेल''. मी सांगतोय की याचा प्रयोग केल्याने जर तुम्हाला जॉब नाही लागला, तर याच्याच धतुर्यावर लाथ घातली पाहिजे..कारण, असे हे 'नॉन-प्रॅक्टिकल' आणि 'अवैज्ञानिक' फालतू काहीतरी हे बुवा- बापू बरळत असतील, तर हे शुद्ध अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची पायमल्ली करण्याचे प्रकार आहेत. कर्मयोगी गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, डॉ. श्री. भाऊसाहेब पंजाबरावजी देशमुख यांच्याकडून काय शिकलो आम्ही? तुम्हाला तुकडोजी महाराज खरच समजले? महाराज म्हणतात,
''वास्तविक संत नव्हे जादुगार। करावया चमत्वâार।
हा तो चालत आहे व्यवहार। पोटभर्यांचा..!''
(ग्रामगीता- अध्याय ३१, ६८वी ओळ)
एकदा वाचा आणि समजून घ्या आणि अशा पद्धतीने अंधश्रद्धा पसरविणार्यांना फटके मारण्याऐवजी सभागृहात कायदे बनविणारेच जर अशा भोंदूंच्या चरणी लोटांगण घालत असतील, तर हा शुद्ध नालायकपणा म्हटला पाहिजे. अंधश्रध्दा विरोधी कायदा १४ डिसेंबर २०१३ रोजी महाराष्ट्र विधानसभेत पारित करण्यात आला होता, त्याचे पुढे काय झाले? त्या कायद्याद्वारे महाराष्ट्रात काय कारवाया झाल्या? हादेखील संशोधनाचा विषय आहे.
इतिहासाच्या पृष्ठभूमीवर पाहिले, तर प्राचीन आणि मध्ययुगीन काळात लोक मोठ्या प्रमाणावर निरक्षर होते. शिक्षणाची साधने मर्यादित होती आणि ज्ञानाचा प्रसार अत्यंत कमी होता. त्यामुळे निसर्गातील घटनांचे, आजारांचे, अपघातांचे किंवा अनिश्चिततेचे स्पष्टीकरण देण्यासाठी लोकांकडे कोणताही वैज्ञानिक आधार नव्हता. अशा परिस्थितीत धर्मगुरू, बाबा, बुवा आणि धार्मिक कथाकथन करणारे लोक म्हणजे कीर्तनकार हेच 'ज्ञानाचे केंद्र' बनले. त्यांनी सांगितलेल्या कथा, पुराणातील आख्यायिका आणि कर्मकांड यांवर लोकांनी विश्वास ठेवला. त्यामुळे त्यांना तात्पुरता मानसिक आधार मिळाला असेल; पण त्याच वेळी त्याचा गैरफायदा घेऊन अनेक बाबा-बुवांनी राज्यकर्त्यांना हाताशी धरून स्वतःचे साम्राज्य उभे केले. ज्योतिषी अशोक खरात, तो स्वतःला 'अंकशास्त्रज्ञ' (न्यूमरोलॉजिस्ट) आणि 'कॅप्टन' म्हणवून घेतो. 'मर्चंट नेव्ही'मधून अधिकारी म्हणून आपण निवृत्त झाल्याचे सांगतो. ह्या खोट्या ओळखीचा वापर करून त्याने स्वतःला बड्या राजकीय नेत्यांशी जोडून लोकांचा विश्वास संपादन केला होता, आणि आज प्रकरण गंभीर झाले.
आधुनिक काळात, विशेषतः स्वातंत्र्यानंतर शिक्षणाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला. विज्ञान, तंत्रज्ञान, वैद्यकशास्त्र, अभियांत्रिकी अशा विविध क्षेत्रांमध्ये भारताने प्रगती केली. तरीही अंधश्रद्धा कमी होण्याऐवजी अनेक बाबतीत ती अधिक बळकट झालेली दिसत आहे. ही विसंगती समजून घेणे आवश्यक आहे. शिक्षण म्हणजे केवळ माहिती मिळवणे नव्हे, तर विचार करण्याची क्षमता विकसित करणे होय.
विज्ञान सांगते की, निसर्ग अनिश्चित आहे, बदल हा त्याचा स्थायीभाव आहे, पण ही अनिश्चितता स्वीकारणे माणसाला कठीण जाते. त्यामुळे तो 'निश्चिततेचा भास' देणार्या बाबा-बुवांकडे आकर्षित होतो. ते भविष्य सांगण्याचा दावा करतात, संकट टाळण्याचे उपाय सांगतात आणि 'देवाच्या कृपेने सर्व काही ठीक होईल' असा दिलासा देतात. हा दिलासा वैज्ञानिकदृष्ट्या खोटा असला, तरी मानसिकदृष्ट्या सामान्य जनांना आकर्षक वाटत आला आहे, अशोक खरातने नेमका त्याच मानसिकतेचा फायदा घेतला. याच वळणावर अंधश्रद्धेचा सर्वांत मोठा प्रभाव पडत असतो, कारण अंधश्रद्धा माणसाला वास्तवापासून दूर नेते आणि त्याला खोट्या सुरक्षिततेच्या भावनेत ठेवते. उदाहरणार्थ, एखादा आजार झाल्यावर निसर्गोपचार किंवा वैद्यकीय उपचार घेण्याऐवजी बाबा-बुवांकडे जाणे, किंवा आर्थिक अडचणींवर उपाय म्हणून पूजा-पाठ करणे, हे केवळ अवैज्ञानिक नाही, तर धोकादायकही आहे. अशा कृतींमुळे समस्या सुटत तर नाहीच, उलट त्या अधिक गुंतागुंतीच्या होतात.
अनेक बाबा-बुवांनी 'आध्यात्मिक साधना', 'देवाची कृपा' किंवा 'उपचार' यांच्या नावाखाली स्त्रियांचे लैंगिक शोषण केले आहे. तरीही त्यांच्या अनुयायांनी त्यांना समर्थन दिले, ही गोष्ट समाजाच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उभे करते. याचे एक कारण म्हणजे अंधश्रद्धेमुळे निर्माण झालेली अंधभक्ती. जेव्हा एखाद्या व्यक्तीला 'देवाचा अवतार' मानले जाते, तेव्हा त्याच्या कृतींवर प्रश्न विचारणे लोकांना धर्माला विरोध करणे वाटते. याचा विचार केला, तर एक गोष्ट स्पष्ट होते- अंधश्रद्धा ही केवळ अज्ञानाची समस्या नाही, तर ती एक सामाजिक, मानसिक, आर्थिक आणि राजकीय समस्या आहे. तिचा मुकाबला करण्यासाठी बहुआयामी प्रयत्न आवश्यक आहेत.
शेवटी सर्वांत महत्त्वाचे म्हणजे अंधश्रद्धेचा मुकाबला हा केवळ वैज्ञानिक लढा नाही, तर तो मानवी स्वातंत्र्य, सन्मान आणि प्रगती यांसाठीचा लढा आहे. जोपर्यंत समाजात विवेकबुद्धीचा, प्रश्न विचारण्याचा आणि सत्य शोधण्याचा आग्रह निर्माण होत नाही, तोपर्यंत बाबा-बुवांचे साम्राज्य टिकून राहील. आणि जोपर्यंत हे साम्राज्य टिकून आहे, तोपर्यंत खर्या अर्थाने प्रगत, वैज्ञानिक आणि मुक्त समाजाची निर्मिती होणे कठीण आहे.
केवळ राजकारणी नेतेच नाही, तर चांगले शिक्षित लोकही या महाराजांच्या नादी लागतात व कोट्यावधींची उधळण करत असतात. बाबा, महाराजांवर पैसा उधळण्यापेक्षा तो समाजातील वंचितांवर खर्च करावा, कायम डोके वर काढून बसलेल्या समस्या सोडवण्यासाठी वापरावा, असे यापैकी एकालाही वाटत नाही. या सार्यांच्या अंगावर अंधश्रद्धेची झूल एवढी घट्ट पांघरलेली असते, की त्यांना वास्तवाचे भानच उरत नाही. समाजातील विषमता, गरीब व श्रीमंतांमध्ये रुंदावत चाललेली दरी, त्यातून उद्भवणारे वाद, द्वेषाचे वातावरण, धार्मिक तेढ यातले काहीही या भक्तांना दिसत नाही. उलट बाबा व महाराजांच्या दरबारात सारेजण विषमता व द्वेष विसरून कसे एकत्र येतात, याची रसभरीत वर्णने करण्यात हे भक्त अफूची गोळी खाल्ल्यासारखे गुंग असतात व सामाजिक एकोपा कसा वाढतो, ते सांगत असतात. भक्तांनी घेतलेले भुलीचे इंजेक्शन व राजकारण्यांचे मतांसाठी डोळे मिटणे यातूनच हा बाबा, महाराजांचा धंदा सर्वत्र फोफावला आहे. एखाद्या प्रदेशाची अशी ओळख निर्माण होणे किती वाईट ठरते, हे कुणाच्याही लक्षात येत नाही हे खरे दुर्दैव!
म्हणून तुकोबारायांच्याच अभंगातून कळकळीने सांगतो-
'आतां तरी पुढे हाचि उपदेश। नका करूं नाश आयुष्याचा।।
सकळांच्या पायां माझें दंडवत। आपुलालें चित्त शुद्ध करा।।'
प्रतिक्रिया देण्यासाठी थेट प्रकाश पोहरेंना संपर्क करा किंवा आपल्या प्रतिक्रिया 2prakashpohare@gmail.com या इ-मेल किंवा ९८२२५९३९२१ या व्हॉट्अॅसअप वर पाठवा. प्रतिक्रिया देताना कृपया आपले नाव, गाव लिहायला विसरू नका.
प्रकाश पोहरे
मो. नं.: +९१-९८२२५९३९२१