चुकीचा इतिहास लोकांना सांगून त्यांचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न जर होत असेल, तर ते अत्यंत चुकीचे आहे; याचे भान कीर्तनकार, प्रवचनकार यांनी ठेवणे गरजेचे आहे. जर चुकीचा इतिहास मांडत असाल, तर तुम्ही 'शास्त्री' नव्हे; तर 'अशास्त्री' आहात, हे तुम्ही स्पष्ट केलेय. शास्त्रींना असे 'अशास्त्रीय' बोलणे शोभत नाही, याचे भान या तथाकथित शास्त्रींनी ठेवणे गरजेचे आहे!
'शास्त्री'चा अर्थ काय, तर साध्या भाषेत ज्याला 'शास्त्र' कळते, तो 'शास्त्री'; अर्थात शास्त्र कोणते? जे लोकउपयोगी आहे. समाजाच्या हिताचे आहे. सूडभावना, द्वेषभावना, लोभ, मोहमाया यांच्यापलीकडे जाऊन सुंदर समाजाच्या निर्मितीसाठी प्रयत्न करणारा 'गुरुजी' म्हणजे 'शास्त्री'.
शास्त्री म्हटले, की आपल्यासमोर आदर्श नाव येते, ते देशाचे दिवंगत पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे! शास्त्रीजी देशाचे पंतप्रधान बनल्यानंतरही त्यांची राहणी एवढी साधी होती, की ते आपले कपडे रात्रीला धुऊन सकाळी परिधान करीत होते. भारतीय जवान आणि शेतकर्यांप्रती या माणसाने आपल्या कुटुंबालाही त्याची जाणीव पदोपदी करून दिली आहे. एकदा शास्त्रीजींच्या पत्नीने त्यांना भेटवस्तू दिली, तेव्हा शास्त्रीजींनी त्याचा स्वीकार करीत 'अगं तू एवढे पैसे आणले कुठून?' असे विचारले. त्यावर शास्त्रींच्या पत्नी म्हणाल्या, शास्त्रीजी तुमच्या मानधनातील एक आणा माझ्याकडे शिल्लक राहत होता, त्यातूनच मी तुम्हाला ही भेटवस्तू दिलीय. शास्त्रीजी मनातल्या मनात हसले आणि दुसर्या दिवशी सचिवालयात जाऊन म्हणाले, की माझ्या मानधनातील एक आणा तुम्ही कमी करा, माझ्यासाठी किंवा कुटुंबासाठी त्याची गरज नाही. देशाच्या पैशावर डल्ला मारणार्या वर्तमानकाळातील नेत्यांसाठी ही सणसणीत चपराक आहे.
हे सगळे सांगण्याचे कारण म्हणजे आधुनिक युगातील असेच एक शास्त्री फार चर्चेत आहेत. त्यांचे नाव धिरेंद्र शास्त्री असे आहे. भागवत धर्माची कथा सांगताना तुम्ही रामायण- महाभारताची उदाहरणे देऊन लोकप्रबोधन करू शकता, त्या उपासनापद्धतीचे स्वातंत्र्य संविधानाने तुम्हाला बहाल केले आहे. मात्र, यामागे एका गोष्टीची जाणीव असणे फार गरजेचे आहे, की चुकीचा इतिहास लोकांना सांगून त्यांचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न जर होत असेल, तर ते अत्यंत चुकीचे आहे; याचे भान कीर्तनकार, प्रवचनकार यांनी ठेवणे गरजेचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या देदीप्यमान व जाज्वल्य राष्ट्रभक्तीच्या स्वराज्याची कथा ही युगानुयुगे आमच्या तरुणांना प्रेरणा देत राहील. जर आपण चुकीचा इतिहास मांडत असाल, तर तुम्ही 'शास्त्री' नव्हे; तर 'अशास्त्री' आहात, हे तुम्ही स्पष्ट केलेय. शास्त्रींना असे 'अशास्त्रीय' बोलणे शोभत नाही, याचे भान या तथाकथित शास्त्रींनी ठेवणे गरजेचे आहे!
धनंजय मिश्रा
९९२२४ ४२०८१