भाषा ही केवळ संवादाचं साधन नसते, तर ती माणसाच्या अस्तित्वाची, संस्कृतीची आणि ओळखीची मूळ असते. 'माझी भाषा माझी अस्मिता, माझा अभिमान' हे वाक्य केवळ एक घोषवाक्य नाही, तर प्रत्येक व्यक्तीच्या मनात दडलेल्या स्वाभिमानाचं प्रतीक आहे.
मातृभाषा ही आपल्या पहिल्या ओळखीचा पाया असते. आपण जगात पहिल्यांदा जे शब्द उच्चारतो, जे विचार व्यक्त करतो, जे भावनांचे रंग अनुभवतो, ते आपल्या मातृभाषेतूनच. मराठी भाषा ही अशीच एक समृद्ध, संस्कारित आणि ऐतिहासिक वारसा असलेली भाषा आहे. संत ज्ञानेश्वरांनी 'ज्ञानेश्वरी'तून अध्यात्माची गोडी दिली, तुकारामांनी अभंगातून जीवनाचं तत्त्वज्ञान मांडलं, तर आधुनिक साहित्यिकांनी समाजातील वास्तवाला शब्द दिले. भाषा ही संस्कृतीची वाहक असते. एखाद्या समाजाची परंपरा, चालीरिती, सण-उत्सव, लोककला आणि जीवनशैली या सगळ्यांचा आरसा म्हणजे भाषा. आजच्या जागतिकीकरणाच्या युगात इंग्रजीसारख्या आंतरराष्ट्रीय भाषांचे महत्त्व नाकारता येणार नाही. त्या आपल्याला प्रगतीची, शिक्षणाची आणि रोजगाराच्या संधी देतात. मात्र, या प्रक्रियेत आपल्या मातृभाषेकडे दुर्लक्ष होणं ही चिंतेची बाब आहे. अनेक वेळा मराठी बोलणं कमीपणाचं समजलं जातं, ही मानसिकता बदलण्याची गरज आहे. आपली भाषा बोलताना अभिमान वाटायला हवा, लाज नाही.
भाषेचा सन्मान राखणं म्हणजे केवळ ती बोलणं नाही, तर तिचं जतन आणि संवर्धन करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. मराठी साहित्य वाचणं, नव्या पिढीला मराठी शिकवणं, सामाजिक माध्यमांवर मराठीत संवाद साधणं, आणि शासकीय, तसेच सार्वजनिक ठिकाणी मराठीचा योग्य वापर करणं- या सर्व गोष्टी भाषेच्या जतनासाठी आवश्यक आहेत. बहुतेक वेळी आपण पाहतो दोन मराठी भाषिक व्यक्ती जेव्हा एखाद्या हॉटेलमध्ये किंवा इतरत्र एकमेकांसमोर असतात तेव्हा ते हिंदी भाषेचा सर्रास वापर करतात. आणि हे गृहीत धरून, की याला मराठी येत नसेल म्हणून. मग त्यातील एका व्यक्तीने हिंदी भाषेचा वापर केला आणि मग समोरील व्यक्तीसुद्धा मराठी येत असतानाही सहजपणे हिंदीला प्रतिसाद देतो. काय कारण, असे का? आजचा युवा वर्ग मराठी बोलणे टाळताना दिसत आहे, कारण हिंदीमध्ये बोलणे हे प्रतिष्ठेचे वाटत आहे. एकतर इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेतलेली ही पिढी आधीच मराठी लिखाणात अतिशय कमकुवत आहे. यांच्या मराठी बोलण्यात व लिखाणात असंख्य चुका आहेत, कारण त्यांच्या अभ्यासक्रमात मराठी ही तृतीय क्रमांकची भाषा आहे व तिच्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते. जोपर्यंत मूल मातृभाषेतून शिक्षण आत्मसात करत नाही, त्याचा भावनिक विकास साध्य होत नाही. इतर भाषेतून मिळते ते माहितीवजा ज्ञान. त्याने कौशल्य विकसित होतील; परंतु संवेदनशीलता विकसित करण्यासाठी मुलांना मातृभाषेतून दिलेली नैतिक मूल्येच महत्त्वाची ठरतात. यासाठी प्राथमिक शिक्षण तरी विद्यार्थ्यांना मातृभाषेतून देण्याची आपली जबाबदारी आहे. आज इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात मराठी सहज बाजूला सारून आपण इतर भाषांचा वापर करतो. ह्याला कारणही आपणच मराठी माणूस आहोत. इतरांना मराठी कळत नाही याच उदात्त भावनेने आम्हीच त्यांची भाषा शिकून घेतो. इतर भाषांचा आदर राखणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. प्रत्येक भाषेला तिचे स्वतंत्र सौंदर्य आणि महत्त्व आहे; पण आपल्या भाषेचा सन्मान राखताना इतर भाषांचा तिरस्कार करणे योग्य नाही. खरी प्रगती ही समतोल साधण्यात आहे- जिथे आपण जगाशी जोडलेले राहतो; पण आपल्या मुळांपासूनही दूर जात नाही. आजची तरुण पिढी ही या बदलाची किल्ली आहे. त्यांनी मराठीला आधुनिकतेशी जोडून तिचा वापर वाढवला, तर भाषा अधिक सशक्त होईल. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मराठीचा प्रसार करणे, नव्या कल्पनांना मराठीतून व्यक्त करणे- ही काळाची गरज आहे.शेवटी, 'माझी भाषा माझी अस्मिता, माझा अभिमान' ही भावना प्रत्येकाच्या मनात रुजली पाहिजे, कारण भाषा टिकली, तर संस्कृती टिकेल, आणि संस्कृती टिकली, तर आपली ओळख कायम राहील.
प्रा. सागर चौथे
८३२९६०५११४