Breaking News
  • माजलगावात अल्पवयीन विवाहितेचा नियमबाह्य गर्भपात? अतिरक्तस्रावानंतर तरुणी बेपत्ता
  • लातूर तुळजापूर महामार्गावर भीषण अपघात, तिघांचा मृत्यू तर 17 जण जखमी
  • वाशिममध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू
  • सलग पाचव्या दिवशी भंडाऱ्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी
  • फसव्या कर्जमाफीविरोधात रविकांत तुपकरांचा एल्गार; उद्यापासून अन्नत्याग आंदोलन
  • FSSAI कंपनीची मोठी कारवाई, ८ फूड कंपन्याना पाठवली नोटीस
  • अण्णा हजारे यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या शुभेच्छा
  • पेरणीची घाई करू नका; दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते : मेघना बोर्डीकर
  • नांदेड जिल्ह्यात पाऊस वादळीवारासह पावसाची हजेरी

होम > संपादकीय > लेख

महागाई म्हणजे फक्त डाळी, तेलाचे आणि खाद्यान्नाचे भाव वाढणे का?


महागाई म्हणजे फक्त डाळी तेलाचे आणि खाद्यान्नाचे भाव वाढणे का

'देशात महागाईची व्याख्याच विचित्र झाली आहे. 
'२०१४ मध्ये ६०-६५ रुपये असलेले पेट्रोल शंभरी ओलांडून गेले, तरी शांतता असते; पण कांदा १० रुपये महाग झाला की देशभर हाहाकार माजतो.'
 बाजारात डाळ दोन रुपये किलोने महाग झाली, खाद्यतेल १०-१५ रुपये लिटरने वाढले की दुसर्‍या दिवशी वर्तमानपत्रात मथळा तयार असतो - 'महागाईने जनता होरपळली!', कांद्याचे भाव ४० - ५० रुपये झाले की 'कांद्याने आणले डोळ्यात पाणी' असे मथळे येतात, दुधाचे दर ५-१० रुपये लिटर मागे वाढले की, 'आता गरीबाचा चहा झालाय महाग' अशी कार्टून येणार, टीव्हीवर चर्चा झडतात. सरकारे स्पष्टीकरणे देतात, विरोधक आंदोलन करतात, कधी सरकारे कोसळतात सुद्धा.
पण माझा एक प्रश्न आहे...
पेट्रोल ६० रुपयांवरून ११५ रुपयांवर गेले तेव्हा हीच अस्वस्थता कुठे होती?
घरगुती गॅस ४०० रुपयांवरून ११०० रुपयांच्या आसपास पोहोचला तेव्हा महागाईची आग कुणाला जाणवली नाही का?
सिमेंट, लोखंड, बांधकाम साहित्य, पाईप, शिक्षण, आरोग्य सेवा, मोबाईल डेटा, दुचाकी, चारचाकी वाहनांचे दर, घरांचे दर, प्लॉटचे दर, सोन्या चांदीचे भाव, हॉटेल मधील खाद्य पदार्थ, कपडे, रेल्वेची, बस ची तिकीट, मजुरी, रासायनिक खते, बियाणे, - या सर्वांनी गेल्या काही वर्षांत विक्रमी झेप घेतली,  प्रामुख्याने २०२० च्या कोरोना काळा नंतर, पण त्याकाळात वर उल्लेख केलेल्या वस्तूच्या  भाववाढीच्या नावाने देशभर गदारोळ झाला नाही.
मग महागाई म्हणजे नेमके काय?
शेतकर्‍याच्या मालाचे, खाण्यापिण्याच्या वस्तूचे भाव वाढले तरच महागाई आणि बाकी मग कुठल्याही वस्तू महाग झाल्या तर ती अर्थव्यवस्थेची गरज? ही दुटप्पी नीती आहे! 
१९६७ साली सोन्याचा भाव होता १०२ रुपये १२ ग्रामला. तर कापसाला भाव होता १८० रुपये प्र. क्वी. आणि गव्हाला, धानाला भाव होता ९० रुपये क्वी. शिक्षकाला पगार होता ४०रु प्र. महिना, मात्र तुलनेत आज ६० वर्ष्यानंतर शेतमालाच्या आधारभूत किंमती म्हणजे गहू, धान २५०० रु आणि कापूस ८००० रु प्र.क्वी. इतक्या न्यूनतम पातळी वर आहेत. तुलना केल्यास असे दिसेल की शेतमालाच्या किंमती २० ते २५ पट वाढल्यात तर इतर सर्व किंमती / शासकीय नोकरांचे, आमदार, खासदार ह्यांचे पगार, भत्ते हे १००० ते १५०० पट वाढलेत, आणि वरून सोई, सवलती वेगळ्याच.
'जर सोन्याचे भाव १५०० पट वाढून १ लाख ६० हजार होणे विकास असेल, तर गहू, तांदूळ, इतर धान्य, आणि कापसाचे भाव  २०-२५ पट वाढणे महागाई कशी ठरते?' 
त्या काळात शेतीला लागणारे बियाणे, खते, घरीच होती, आणि मजुरी धान्यात द्यावी लागायची, म्हणजे बाहेरून काही आणावेच लागत नव्हते. आज शेतीला सरकारी धोरण आणि हरितक्रांती मुळे सर्व बाहेरून विकत घ्यावे लागते, ज्याच्या किंमती दरवर्षी अव्वाच्या सव्वा वाढत आहेत. आणि  सरकार मात्र हमी भावात (की कमी भावात ) गहू आणि धान खरेदी करून तो ८० कोटी लोकांना फुकट वाटते, त्यातील निम्मा गहू आणि तांदूळ मग पुन्हा बाजारात १०-१२ रुपयात विकल्या जातो, अशा प्रकारे शेतकर्‍यांचे १००-१२५ कोटी ग्राहक सरकार काढून घेते, मग शेतकर्‍यांनी गहू, तांदूळ विकावा कुणाला, आणि डाळी, तेल स्वस्तात आयात करते मग ते उत्पादन शेतकर्‍यांनी करावे कशाला आणि कुणासाठी ?
'सरकार शेतकर्‍याकडून धान्य स्वस्तात खरेदी करते, ते मोफत वाटते आणि त्याच वेळी औद्योगिक वस्तू मात्र सरकार ना कमी भावात विकत घेत ना कुणाला फुकट देत!
उद्योगपतींचा माल बाजारभावाने विकला जातो. देशातच नव्हे तर जगात अशी दुसरी कोणती उद्योगव्यवस्था आहे जिचे ग्राहक सरकार स्वतः काढून घेते?'
शेतीला लागणार्‍या सर्वच वस्तू मात्र शेतकर्‍यांना भरमसाठ किमतीमध्ये विकत घ्याव्या लागतात! 
ही कुठली नीती?
देशातील सर्वच घटकांना त्यांच्या मालाचा आणि सेवांचा वाढीव मोबदला चालतो. उद्योगपतीला चालतो. बिल्डरला चालतो. डॉक्टरला चालतो. शाळांना चालतो. मोबाईल कंपन्यांना चालतो. पेट्रोलियम कंपन्यांना चालतो. सरकारला कर वाढवून महसूल वाढवणे चालते.
पण शेतकर्‍याला त्याच्या मालाचा भाव वाढला की मात्र देशाला महागाईची आठवण होते!
ज्याच्या मालाच्या किमतीवर सर्वाधिक चर्चा होते, तोच देशातील सर्वाधिक कर्जबाजारी आणि आत्महत्या करणारा वर्ग आहे, मात्र त्यावर ना चर्च्या, ना उपाय योजना!! हा विरोधाभास नाही का?
खरे तर महागाईचा सर्वाधिक फटका शेतकर्‍यालाच बसतो. कारण तो महाग झालेल्या भावातच पेट्रोल, डिझेल, पाईप, सिमेंट, औषधेही विकत घेतो, खते, कीटकनाशक विकत घेतो आणि सरकारने शाळा बंद केल्या तरी खाजगी शाळेत आपल्या मुलांचे शिक्षणही करतो. पण त्याच्या उत्पादनाचा भाव जरा वाढला की त्यालाच दोषीच्या पिंजर्‍यात उभे केले जाते.
महागाईची ही व्याख्या बदलण्याची आता वेळ आली आहे.
महागाई म्हणजे फक्त गहू, तांदूळ, कांदा, डाळ, तेल किंवा साखर नव्हे.
'निर्यातबंदी, आयातमुक्ती आणि साठाबंदीच्या धोरणात्मक हस्तक्षेपांपासून सरकारने दूर राहिले तरी शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळू शकतो.'
महागाई म्हणजे सामान्य माणसाच्या जगण्याशी संबंधित प्रत्येक वस्तू आणि सेवेच्या किंमतीतील वाढ.
जोपर्यंत समाज 'शेतमाल स्वस्तच हवा' या मानसिकतेतून बाहेर पडत नाही, तोपर्यंत शेती संकटातच राहणार आणि शेतकरी अन्याय सहन करत आत्महत्या करत राहणार.
'देशाला स्वस्त अन्न हवे आहे, पण स्वस्त अन्न पिकवणारा माणूस मात्र कायम कर्जबाजारी, आत्महत्याग्रस्त आणि दरिद्री राहावा अशी अपेक्षा आहे. ही अर्थनीती नाही; हा समाजाने शेतकर्‍याविरुद्ध केलेला ऐतिहासिक अन्याय आहे.'
येथे लक्षात घेण्यासारखी बाब मी आपल्याला सांगतो. जगात आपण बाहेर कुठेही गेला विशेषता जे विकसित झालेले देश आहेत त्या देशांमध्ये, म्हणजे अमेरिका, युरोप, लंडन, जपान, जर्मनी, कॅनडा, ब्राझील, मेक्सिको, चिन इत्यादी तर येथे तुम्हाला सर्वाधिक महाग जर काय मिळेल तर ते म्हणजे खाण्यापिण्याचे पदार्थ.
'शेतकर्‍याला त्याच्या मालाचा भाव मिळणे हा प्रश्न महागाईचा नाही; तो न्यायाचा प्रश्न आहे.'
'अनेक विकसित देशांमध्ये शेतकर्‍यांना थेट अनुदाने, संरक्षणात्मक आयात धोरणे आणि उत्पादनाला हमी देणारी व्यवस्था दिली जाते. त्यामुळे शेती टिकाऊ राहते आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत राहते.'
'देशात महागाईची व्याख्या बाजाराने ठरवलेली नाही; ती राजकारणाने ठरवलेली आहे. म्हणूनच उद्योगपतींचा नफा 'विकास' आणि शेतकर्‍याचा भाव 'महागाई' ठरतो.'
'महागाईची व्याख्या बदलल्याशिवाय शेतकर्‍याचे भविष्य बदलणार नाही; आणि शेतकर्‍याचे भविष्य बदलल्याशिवाय देशाचे भविष्य बदलणार नाही.'

-प्रकाश कमलाताई गोपाळराव पोहरे 
मो.नं.९८२२५९३९२१ 

Related to this topic: