गायींना वाचवता-वाचवता, आता ’डुक्कर दाखवा’ प्रयोग सुरू झालाय. हादेखील सावरकरांच्या पशुविषयक विचाराला बोकडासारखा सोलून उलटे टांगणारा प्रकार ठरलाय.
वीर सावरकर’ हे कडवे हिंदुत्ववादी आणि
हिंदूराष्ट्रवादी! तथापि, ’हिंदूंसाठी पवित्र समजल्या जाणाऱ्या गायीचं पूजन-रक्षण म्हणजे पुण्य; आणि गोहत्या म्हणजे पाप!’ हे सूत्र सावरकरांना मान्य नव्हतं. त्यांच्या लेखी गाय आणि गाढव, हे मनुष्यासाठी सारखेच उपयुक्त पशू होते. ’गायीच्या दुधाने कुठलाही आजार दूर होत नाही; पण काही रोगात गाढवीचं दूध ब्राह्मणाच्या मुलासही उपचार म्हणून उपयुक्त ठरतं,’ असं सावरकर म्हणत. गोहत्या विरोधकांना त्यांनी ’गाय ही मनुष्यासाठी आहे; मनुष्य गायीसाठी नाही,’ हे ठणकावून सांगितलंय.
सावरकर हे कट्टरपंथी इस्लामींचे विरोधक होते; पण त्याहून ते अधिक सनातनी-कर्मठ हिंदूंचे विरोधक होते. १९३० ते ४० या काळात गोहत्येच्या निमित्ताने हिंदू-मुस्लीम दंगे होत. तेव्हा त्यांनी गायीविषयीचे आपले विचार मांडलेत. हे विचार तोकडे ठरावेत, असा व्यवहार चार दिवसांपूर्वी झालेल्या ’बकरी ईद’ला मुस्लिमांनी केलाय. त्यांनी ’कुर्बानी’साठी बाजारात आणलेल्या गायी पाठवल्या आणि ’गायीला राष्ट्रीय पशू म्हणून घोषित करा,’ अशी मागणी ’मोदी सरकार’कडे केलीय.
हिंदू धर्मियांच्या काही देव-देवतांना खूश ठेवण्यासाठी कोंबड्या-बकऱ्याचे; रेड्याचेही बळी द्यावे लागतात. तशीच बात ’अल्लाह’ची आहे. भक्ताची परीक्षा घेण्यासाठी देव स्वप्नात येतात; तेच ’अल्लाह’देखील करतो. अशा साम्यांमुळे ’पुराण-कुराण’ ही जोड तयार झालीय. असो. तर, पैगंबर इब्राहिम (अब्राहम) यांची परीक्षा घेण्यासाठी ’अल्लाह’ स्वप्नात आले आणि ’सर्वात प्रिय गोष्टीचा माझ्यासाठी बळी दे,’ असा आदेश दिला. इब्राहिम आपल्या एकुलत्या एक मुलाची- इस्माईलची ’कुर्बानी’ देण्यास तयार झाले. त्यांनी डोळे बंद करून हत्यार चालवले. डोळे उघडून पाहिले तर, इस्माईलच्या जागी कोकराचा (बकरीचे पिल्लू) बळी पडलेला दिसला. हा चमत्कार, इब्राहिमची भक्ती पाहून अल्लाहने देवदूतामार्फत घडविला होता. ह्या घटनेची आठवण जागती राहावी, याकरिता मुस्लीम ’बकरी ईद’ (ईद-उल-अधा किंवा ईद-उल-जुहा) सण म्हणून साजरी करतात. प्राण्यांची ’कुर्बानी’ देतात. मशिदीत किंवा ईदगाह मैदानावर जाऊन विशेष ’नमाज अदा’ करतात.
भारतात ’बकरी ईद’ला बकऱ्याव्यतिरिक्त मेंढी, उंट किंवा गायीची ’कुर्बानी’ देण्यास धार्मिक मान्यता आहे; परंतु महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आदि भाजपची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये ’गोवंश हत्याबंदी कायदा’ आहे. तथापि, हा कायदा ’भाजप’च्या सर्वच राज्यांत नाही. ईशान्य भारतातील आसाम, मणिपूर राज्यांप्रमाणेच गोवा राज्यातही ’गोहत्या बंदी कायदा’ नाही. नागालँड, मिझोराम ह्या राज्यांप्रमाणे ’केंद्र सरकार’लाही गोहत्या गैर वाटत नाही. त्यामुळेच ’मोदी सरकार’च्या व्यापार व उद्योग मंत्रालयाने सहा महिन्यांपूर्वीच (डिसेंबर २०२५) ’ओमान सरकार’कडून भारतीय ’हलाल’ पुरवठादार कंपन्यांसाठी मान्यता प्राप्त केलीय. यामुळे भारतीय ’हलाल मांस’ निर्यातदारांचा चाचणी आणि प्रमाणपत्राचा खर्च कमी होईल. तसेच, इतर ५५ इस्लामिक देशांकडून अधिकृत हलाल प्रमाणपत्राचा मान्यता मिळवण्याचा मार्ग सोपा झालाय. तो भारताचे विदेशी व्यापार- चलनही वाढवणारा आहे.
’हलाल’ आणि ’झटका’ असे पशुमासांचे (मटणाचे) दोन प्रकार आहेत. ’झटका’ पद्धतीत प्राण्याची कत्तल करताना एकाच फटक्यात शीर धडापासून वेगळे केले जाते. त्यामुळे प्राण्याला तडफडावे लागत नाही; वेदना कमी होतात, असे म्हणतात. याउलट, ’हलाल’ पद्धतीत प्राण्याच्या गळ्याची मुख्य रक्तवाहिनी धारदार शस्त्राने कापून पूर्ण रक्त बाहेर काढले जाते. यावेळी कत्तल करणारी व्यक्ती ’अल्लाह’चा घोष करते. ’हलाल’ हा अरबी शब्द आहे. इस्लामी धर्मशास्त्रानुसार (शरीयत) ’हलाल’चा अर्थ ’इस्लाम मान्य’ असा होतो. ह्याच्या विरुद्धार्थी म्हणजे ’इस्लाम अमान्य’ शब्दाला ’हराम’ (अवैध/वर्ज्य) म्हणतात.
यानुसार, इस्लाम धर्मात डुक्कर पाळणे, त्याचे मटण खाणे, त्याचा व्यापार करणे, हे ’हराम’ ठरते, कारण ते ’कुराण’ने मानवी शरीरासाठी आणि ’अल्लाह’ला द्यायच्या ’कुर्बानी’साठी निषिद्ध केले आहे. तसेच, कोणत्याही प्राण्याची ’झटका’ पद्धतीची कत्तलही ’हराम’ आहे. यामुळे इस्लामिक देशांना मटण निर्यात करण्यासाठी ’हलाल’चे प्रमाणपत्र आणि त्यास संबंधित देशाची मान्यता आवश्यक ठरते. ह्या ’हलाल’ पद्धतीच्या गायीच्या मटणाला आखातातील मुस्लीम देशांतून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्याचा पुरवठा गेल्या १२ वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढला आहे. २०१४ म्हणजे ’मोदी सरकार’ येण्यापूर्वी गोमास निर्मितीत भारत जगात ९व्या क्रमांकावर होता. आता तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. म्हणजे, देशात एकाच वेळी गायींची वेदनादायी ’हलाल’ पद्धतीने मोठ्या प्रमाणात कत्तल केली जाते; आणि त्याचवेळी कथित गोरक्षकांकडून गोमासांच्या संशयावरून दलित-मुस्लिमांवर झुंडीने जीवघेणे हल्लेही होतात. ह्या विसंगतीस पूरक-प्रेरक ठरावेत, असे ’गोहत्या बंदी’चे कायदे राज्य सरकारे करतात.
हिंदू धर्म संस्कृतीनुसार, गायीला पवित्र मानले जाते. त्यानुसार, गोपालन, गोपूजन, गोरक्षण होते. अशाचप्रकारे भगवान विष्णूचा तिसरा अवतार असलेल्या डुकराचे, अर्थात ’वराह’चे भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्ष तृतीयेला पूजन होते. त्याला ’वराह पूजन’ म्हणतात. यातून डुकराचे मांस सेवन मुस्लिमांप्रमाणे हिंदूही अपवित्र मानतात, हे स्पष्ट होते. तरीही ’बकरी ईद’च्या कुर्बानी कार्यक्रमाला शह देण्यासाठी मुंबई जवळच्या मीरा रोड (ठाणे जिल्हा) भागात डुकराचा गोंधळ घालण्याचा प्रकार झाला. राहत्या इमारतीखाली वा वस्त्यांमध्ये छुप्यारित्या गायीची आणि खुलेआम बकऱ्याची ’हलाली’ कुर्बानी होणे, हे बेकायदेशीर आहे. ते रोखलेच पाहिजे; पण त्यासाठी मशिदीपुढे वाद्ये वाजवून, गुलाल फेकून दंगली घडवायच्या; तसाच पूजनीय ’वराह’ का वापरायचा? अशाने भगवान विष्णूचा अवमान होत नाही का?
गोमांस (बीफ) हिंदूंसाठी निषिद्ध असले, तरी ते मुस्लीम, ख्रिस्ती, यहुदी धर्मीय खातात; आणि डुक्कराचे मांस (पोर्क) मुस्लिमांसाठी धार्मिकदृष्ट्या निषिद्ध असले, तरी ते ख्रिस्ती, यहुदी, बौद्ध खातात, कारण दोन्हीतून मोठ्या प्रमाणात प्रोटीन मिळते. ते मुस्लिमांना मिळू नये; गायीबरोबरच डुकराचाही वापर ’भाजप- संघ परिवार’चे अंधभक्त करू लागलेत; आणि त्यामुळे ’हिंदू खतरेमें’ आले आहेत. कारण, मुस्लीम गायी- बकऱ्याची कुर्बानी देत असले; तरी गोपालन, बकरीपालन ह्या व्यवसायात हिंदू आहेत. ईद निमित्ताने विक्रीसाठी बाजारात आणलेल्या गायींना चौपट भाव मिळतो. ही विक्री- खरेदी विक्री करणारे दलाल- मध्यस्थही बिगर मुस्लीम आहेत. भारतात दरवर्षी बकरी ईद निमित्ताने ४ लाख कोटी रुपयांची उलाढाल होते. हा पैसा कर न देता मोठ्या प्रमाणात बिगर मुस्लिमांच्या खिशात जातो. ह्यातली मोठी कमाई मुस्लिमांनी यावेळी बाजारात आलेल्या गायी विकत घेण्यास नकार दिल्याने गेली. हे पश्चिम बंगाल राज्यात अधिक घडले. तिथे नुकतेच ’भाजप’चे सरकार आलेय. त्या राज्यात मुस्लीम मोठ्या संख्येने आहेत. त्यांच्यावर जरब बसावी, यासाठी तिथे ’गोहत्या बंदी’ कायद्याची चर्चा सुरू झालीय. तिला काटशह देण्यासाठी मुस्लीम मुल्ला- नेत्यांनी ’गायीला राष्ट्रीय पशू म्हणून घोषित करा,’ अशी मागणी ’मोदी सरकार’कडे केलीय. ह्यात राजकारण आहेच आणि त्यासाठी ’गाय उपयुक्त पशू’ ठरतो, असा भारतीय धर्मकारण आणि राजकारण यांचा इतिहासही आहे.
यासाठी ’पुराण- कुराण’मधील लिखाणाचे दाखले देत, हिंदू-मुस्लीम तेढ वाढत ठेवणे; ह्यात शहाणपण नाही. हिंदुत्वाला हिंसक, खुनशी करणे हा अधर्म आहे. अशा प्रसंगी बौद्धिकांचे डोस घेणाऱ्यांनी वाईटपणा घेऊन बौद्धिक शहाणपण दाखवायला पाहिजे. ’गायीची थोडी हत्या झाली, तरी चालेल; पण उभ्या देशाच्या बुद्धीची हत्या होता कामा नये,’ असे राष्ट्रहित जपणारे शहाणपण सावरकरांनी दाखवले होते. ते आपल्या अंधभक्तांच्या पचनी पडू नये, ह्याची काळजी ’भाजप-संघ परिवार’चे कारभारी ’सावरकरांचा उदो उदो’ करीत घेत असतात. हा वापर गाय- डुकरापेक्षा भिन्न नाही. ह्या चलाखीच्या चिंधड्या करणारा फटका देताना ’शेरसिंग’ नावाचा कवी म्हणतो -
गाय न काटो, सुवर न काटो। दोनो मे खुदरत भरी है॥
हम को काटो, तुम को काटो। दोन्हो का खून एक है॥१
हे समजण्यासाठी पब्लिकला हैराण करणारी ’झटका- हलाली- हरामी’ची आवश्यकता नाही. यासाठी इतकंच लक्षात ठेवलं पाहिजे-
जो नफरत करना सिखलाए। वो बेशक इस्लाम नहीं॥
जिसका मन है, प्रेम से खाली। उनके मन मे राम नही॥२
मुल्ला-पंडित की बातों मे। और नही आएंगे हम॥
’ह’से हिंदू, ’म’से मुस्लीम। दोनो मिलके बनते ’हम’॥३
’हम-आपण’ बनून हिंदू-मुस्लिमांनी एकत्र येणे, एकत्र असणे ही काळाची गरज आहे. कारण-
सावधान, अब हवस के बंदे। आग लगाने तय्यार है॥
घर-आंगन मे नफरत का। जाल बिछाने आए है॥४
मेल अगर हो आपसमें तो। ये जोखम है, क्या जोखम॥
जुडेंगे हम एकमेका। जैसी बनती है सरगम॥५
ह्या जुळणीच्या आडवा येणारा धर्मवादी कोणत्याही धर्माचा कट्टरपंथी असो; पुराण- कुराण, बायबल, त्रिपिटिकचे दाखले देत आपल्या धर्माचा, जातीचा, पंथाचा अहंकार दाखवणारा कुणीही असो; त्याचा संविधानाचा दणका देत बिमोड केलाच पाहिजे, कारण-
हम जो है जो, देश के रक्षक। भारत देश हमारा है॥
अपनेही लोगोने खून बहाकर। इसका रूप सजाया है॥६
अब खुद, अपने हाथोंसे। बदलेंगे ये भी मौसम॥
जब तक है, दम में दम। जैसी बनती है सरगम॥७
तूर्त, देशातलं वातावरण ’’गायीसाठी मनुष्य आहे, मनुष्यासाठी गाय नाही!’’ इतकं खराब झालंय. त्यात आता डुकराची भर पडलीय. नकली हिंदुत्ववाद्यांनी सावरकरांच्या विचाराला सोललेल्या बोकडसारखं उलटं टांगलंय!
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
संघाच्या गोठ्यात सावरकरांची गाय
विनायक दामोदर सावरकर हे पुराण-पोथ्यांचे, कर्मकांडांचे आणि चमत्कार-साक्षात्काराचेही विरोधक होते. त्यांच्या मुस्लीमविरोधी विचारांचा सोयीने वापर करणाऱ्या ’भाजप’ची सत्ता आज देशात आहे. हिंदुत्व-हिंदूराष्ट्रवादी म्हणून सावरकरांच्या जीवनकार्याचा उदो उदो होतोय; पण त्यांच्या अंधश्रद्धा विरोधी विचारांना जाणीवपूर्वक झाकून ठेवले जातेय. किंबहुना, त्या विचारांच्या विरोधातले वातावरण ’गोहत्या बंदी’च्या निमित्ताने तयार केले जातेय. सावरकरांनी गायीला उपयुक्त पशू म्हटलेय. ’ती गोमाता असेल, तर ती बैलाची!... गायीच्या पोटात ३३कोटी देव असतील, तर तिच्या पाठीवर एक फटका मारल्यास चार देव खाली पडले पाहिजेत,’ असेही सावरकर म्हणतात. असे असतानाही उत्तर प्रदेशातल्या ’दादरी’ गावातील अखलाक शेख याची केवळ घरात गोमांस आहे, या संशयापोटी हिंदू-जमावाने हत्या केली, (२०१५) तेव्हा ’सावरकरांचे विचार-रहस्य उलगडणाऱ्या चाव्या आपल्याच खिशात आहेत,’ अशा थाटात बोलणारे शेषराव मोरे चिडीचूप होते. त्यांना ’गायीसाठी मनुष्याची हत्या म्हणजे सावरकरांच्या विचारांची हत्या,’ अशी प्रतिक्रिया देता आली असती, पण त्यांनी मौन बाळगलं. या उलट ’भाजप-संघ’ परिवारातील बोलक्या लोकांनी समर्थनाचे विषारी फुत्कार सोडले. ’भाजप’ खासदार साक्षी महाराज यांनी ’गोहत्या करणाऱ्याला देहांताची शिक्षा व्हावी, असा कायदा करावा,’ अशी मागणी केली. त्यापुढची उडी हरयाणाचे तत्कालीन ’भाजप’चे मुख्यमंत्री मनहरलाल खट्टर यांनी मारली. त्यांनी ’मुसलमानांना भारतात राहायचं असेल, तर गोमांस खाणं सोडावं लागेल,’ असा इशाराच दिला. ह्या राष्ट्रघातकीपणाला रोखण्याचं काम रा.स्व. संघ कारभाऱ्यांचं आणि त्यांच्या मुखपत्रांचं होतं. तथापि, संघाचं हिंदी भाषिक मुखपत्र असलेल्या ’पांचजन्य’ने ’गोहत्या करणाऱ्याची हत्या केल्याने कोणतंही पाप लागत नाही, असं वेदात म्हटलंय,’ असा निर्वाळा दिला.
अशाप्रकारे खुनाचं समर्थन करणं, हा संविधानाचा आणि राज्यसत्तेचाही अपमान आहे. तशीच ती ’भाजप’ला मतं देणाऱ्यांचीही फसवणूक आहे. ’भाजप’ आणि नरेंद्र मोदींना मतदारांनी वेदानुसार देशाची सत्ता दिलेली नाही. वेद ’आदि’ असतील आणि अनंत काळ राहातील, पण वेदानुसार अनुचित वागणाऱ्याला संविधानाने तयार झालेल्या कायद्यानुसार शिक्षा ठोठावल्यावर वेदांची किंमत काय राहाते?
’ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद व सामवेद’ असे चार वेद-ग्रंथ आहेत. आणखी बरेच पोटप्रकार आहेत. ते त्यावर पोट अवलंबून असणाऱ्यांनी वेदाभ्यासाच्या नावाखाली सोवळ्यानिशी टिकवले आणि वाढवले आहेत. त्यांना त्याचं कौतुक असणारच! ’वेद’ हे जगातील पहिलं वाङ्मय असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे जगात काही घडलं-बिघडलं की, ’ते वेदात लिहिलेलंच आहे,’ असं ऐकायला मिळतं. तथापि, ही सनातनी खोड सावरकरांना लागली नव्हती; म्हणून ते ’वेदांची जागा कपाटात आहे; जीवनात नाही,’ असं लिहू-बोलू शकले. ’वेद’ ग्रंथ निर्मितीचा काळ प्राचीन आहे. त्याची भाषा जरी संस्कृत असली, तरी शब्दांचे अर्थ शब्दशः घेता येत नाहीत. त्यात लक्षणार्थ आणि गूढार्थ आहे. तो वेद-निर्मितीच्या काळाइतकाच प्राचीन आहे. त्या अर्थाच्या मुळापर्यंत पोहोचणं अशक्य आहे. त्यामुळेच वेदमूर्ती- पंडितांच्या कुवतीनुसार त्यातील प्रत्येक शब्दांचे, ओळीचे वेगवेगळे अर्थ निघतात. त्यातल्या एका ऋचेचा अर्थ असाही करण्यात आलाय की, ’आपल्या घरी आलेल्या पाहुण्याला सर्वेात्तम भोजन द्यायचं असल्यास, त्याला गायीचं वासरू कापून द्या!’ यातूनच देव-देवतांना खूश करण्यासाठी केलेल्या यज्ञ-यागात ब्राह्मण मंडळी गोधनाची आहुती देऊ लागली. यामुळे मोठ्या प्रमाणात गोवंश घटू लागला. हे लक्षात येताच, कणकेचे गाय-बैल-वासरू बनवून त्याच्या आहुत्या दिल्या जाऊ लागल्या. यावर ’अखंडाचा प्रहार’ करताना महात्मा जोतिराव फुले लिहितात-
कणकेच्या गायी, ब्राह्मण भक्षिती कारे चिडवीती, मुसलमाना॥१
आर्य गायी खाती, वरी शुद्ध होती शुद्रा लढवीती, जोती दावी॥२
‘वेद’ हे आर्य- ब्राह्मण धर्माच्या मूलस्थानी आहेत. ’वेदोऽखिलो धर्ममूलम्’ असे ’मनुस्मृती’त वचन आहे. या वचनाची शेंडी पक्की पकडूनच महात्मा फुले यांनी वेदांचे कसब आणि ब्राह्मणाचे कपट नेमक्या शब्दांत उलगडलं आहे. गोहत्या बंदी आग्रहाच्या माध्यमातून ब्राह्मणेतर हिंदूंना मुसलमानांच्या विरोधात लढवणे आणि त्यातच त्यांना गुंतवून ठेवून आपला स्वार्थ साधणे, असा हा भटी डाव आहे. तो यशस्वी होण्यासाठी ’वेदाची भुलावणी’ देण्यात आलीय. ह्या ब्रह्मकपटाची कठोर तपासणी केल्यास त्यात ब्राह्मणेतरांच्या गुलामीचे प्रदर्शन होईल. कारण सध्या ’भाजप-संघ’ परिवाराच्या गोठ्यात गायीबरोबरच ब्राह्मणेतरही मोठ्या संख्येने दावणीला बांधलेले आहेत. त्यांचीही शिरगणती झाली पाहिजे!
ज्ञानेश महाराव
ज्येष्ठ पत्रकार - संपादक |
९३२२२ २२१४५