Breaking News
  • आमदार जितेंद्र आव्हाड यांनी घोड्यावर बसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला
  • धक्कादायक! बुलढाण्यात सिलेंडरचा स्फोट झाल्यानं घराला भीषण आग, 85 वर्षीय वृद्धेचा मृत्यू
  • भिवंडीत तरुणाचा साप गळ्यात घालून स्टंट; व्हिडिओ व्हायरल
  • भाजपचे शहराध्यक्ष नितीन धांडे आमदार व्हावे यासाठी साकडे घालणार- नवनीत राणा
  • नागपूरच्या धरमपेठ परिसरात मध्यरात्री वादातून 20 वर्षीय अभियांत्रिकी विद्यार्थ्याची चाकूने हत्या करण्यात आली. आरोपी अल्पवयीन असल्याचे समोर आले असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.
  • पेपर लीकनंतर सरकारने NEET परीक्षा रद्द केली!
  • NEET UG 2026 परीक्षा रद्द; प्रकरणाची चौकशी CBI कडून होणार
  • आता नेपाळ जाण्यासाठी 'विशेष ओळखपत्र' दाखवणे अनिवार्य
  • रोहित आणि कोहली MS धोनीच्या खास क्लबमध्ये दाखल!

होम > संपादकीय > लेख

नवीन सामाजिक व्यवस्थेसाठी प्रसारमाध्यमे निर्णायक!


नवीन सामाजिक व्यवस्थेसाठी प्रसारमाध्यमे निर्णायक

उपाय म्हणून माध्यमांनी सत्याधारित आणि संवेदनशील पत्रकारिता करणे आवश्यक आहे. समाजहिताला प्राधान्य देणे, सकारात्मक दृष्टीकोन ठेवणे आणि राष्ट्रनिर्माणाची भावना जपणे गरजेचे आहे. त्याचवेळी समाजानेही जबाबदार नागरिक म्हणून विवेकाने बातम्या स्वीकारणे, अफवांपासून दूर राहणे आणि सकारात्मकतेला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.

’जो दिखता हैं 
वही सच नही होता हर बार, 
मीडिया की जिम्मेदारी है 
दिखाना असली किरदार...’

वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन रविवार ३ मे रोजी साजरा करण्यात आला, दरम्यान ३० एप्रिल ते ४ मे पर्यंत माउंट आबू येथे ब्रह्माकुमारीज मीडिया प्रभागाच्या वतीने राष्ट्रीय मीडिया सेमिनारही पार पडला. 'वैश्विक शांतीची गरज: मीडियाची भूमिका' या विषयावर हा मीडिया सेमिनार झाला. विविध माध्यमांतील देशभरातील शेकडो संपादक, पत्रकार उपस्थित होते. यामध्ये एका चर्चासत्रात 'नवीन सामाजिक व्यवस्थेच्या निर्मितीत माध्यमांची उत्प्रेरक (गती वाढविणारे माध्यम) म्हणून भूमिका' या विषयावर मी मांडलेले मत असे.
आजचा काळ माहिती आणि संप्रेषणाचे युग म्हणून ओळखला जातो. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे जग अत्यंत जवळ आले आहे. एका ठिकाणी घडलेली घटना काही क्षणात संपूर्ण जगभर पोहोचते. अशा परिस्थितीत माध्यमे केवळ बातम्या देणारी साधने राहिली नसून समाजाची दिशा, विचारसरणी आणि मानसिकता घडवणारी एक प्रभावी शक्ती बनली आहेत. माध्यमे ही विचारांची देवाण-घेवाण घडवणारी, जनभावनांचे प्रतिबिंब दाखवणारी आणि समाजपरिवर्तन घडवणारी सशक्त यंत्रणा आहे; मात्र आजच्या सामाजिक व्यवस्थेकडे पाहिले असता अनेक गंभीर आव्हाने समोर येतात. नैतिक मूल्यांची घसरण, कुटुंब व्यवस्थेचे विघटन, वाढता ताण-तणाव, हिंसा आणि गुन्हेगारी, व्यसनाधीनता, भ्रष्टाचार, पर्यावरणीय संकट, तसेच जातीय आणि धार्मिक विभाजन ही काही ठळक उदाहरणे आहेत. यासोबतच अफवा आणि भ्रामक माहितीचा प्रसार ही नवीन युगातील मोठी समस्या बनली आहे. या पृष्ठभूमीवर समाजाला नव्या विचारांची आणि नव्या व्यवस्थेची गरज आहे. नवीन सामाजिक व्यवस्था म्हणजे केवळ भौतिक प्रगती नव्हे, तर मूल्यांवर आधारित सर्वांगीण जीवनपद्धती होय. स्त्री-पुरुष समानता, शिक्षण आणि संस्कार यांचा समतोल, आर्थिक प्रगतीसोबत नैतिक उन्नती, पर्यावरणाबद्दल संवेदनशीलता आणि आध्यात्मिक दृष्टीकोन यांचा समावेश असलेली ही व्यवस्था असावी. अशा समाजनिर्मितीसाठी केवळ कायदे पुरेसे नाहीत, तर लोकांच्या विचारांमध्ये बदल आवश्यक आहे. आणि हा बदल घडवण्याची ताकद माध्यमांमध्ये आहे.
माध्यमे समाज परिवर्तनाची उत्प्रेरक बनू शकतात. ती जनजागृतीचे प्रभावी साधन ठरू शकतात. आरोग्य, स्वच्छता, शिक्षण, पर्यावरण, महिला सुरक्षा आणि व्यसनमुक्ती यांसारख्या विषयांवर प्रभावी मोहिमा राबवून समाजात सकारात्मक बदल घडवू शकतात. 
दुसरे म्हणजे, सकारात्मक बातम्यांना प्राधान्य देणे गरजेचे आहे. आजच्या नकारात्मकतेच्या वातावरणात प्रेरणादायी घटना आणि व्यक्तिमत्त्वे समाजात आशा निर्माण करू शकतात.
तिसरे म्हणजे मूल्यनिष्ठ पत्रकारिता अत्यावश्यक आहे. पत्रकारितेचा उद्देश केवळ व्यावसायिक नफा नसून सत्य, निष्पक्षता आणि जनहित असावा.
 चौथे म्हणजे माध्यमांनी युवकांना योग्य दिशा देणे आवश्यक आहे. युवा शक्तीला योग्य प्रेरणा मिळाल्यास समाजाला नवी ऊर्जा मिळू शकते, तसेच माध्यमे समाजातील विविध घटकांमध्ये संवादाचे व्यासपीठ निर्माण करून समस्यांचे समाधान शोधण्यास मदत करू शकतात.
डिजिटल युगात प्रत्येक व्यक्ती माध्यम बनली आहे. सोशल मीडियाचा योग्य वापर केल्यास ज्ञान, सकारात्मकता आणि सद्भावना पसरवता येते. मात्र, याच माध्यमांचा गैरवापर झाल्यास फेक न्यूज, अफवा आणि द्वेष पसरवण्याचा धोका वाढतो. त्यामुळे माध्यमांसमोर जबाबदारी अधिक वाढली आहे. 
आज माध्यमांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. फेक न्यूज, सनसनाटीपणा, पक्षपाती वृत्तांकन, टीआरपीची स्पर्धा आणि गोपनीयतेचे उल्लंघन. या आव्हानांवर नियंत्रण ठेवले नाही, तर माध्यमे समाज विघटनास कारणीभूत ठरू शकतात. 
यावर उपाय म्हणून माध्यमांनी सत्याधारित आणि संवेदनशील पत्रकारिता करणे आवश्यक आहे. समाजहिताला प्राधान्य देणे, सकारात्मक दृष्टीकोन ठेवणे आणि राष्ट्रनिर्माणाची भावना जपणे गरजेचे आहे. त्याचवेळी समाजानेही जबाबदार नागरिक म्हणून विवेकाने बातम्या स्वीकारणे, अफवांपासून दूर राहणे आणि सकारात्मकतेला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. याशिवाय, माध्यमांनी केवळ बाह्य घटनांचे चित्रण न करता अंतर्मनातील परिवर्तनाला चालना देणे गरजेचे आहे. 
म्हणूनच आज गरज आहे ती माध्यमांना केवळ व्यवसाय न मानता सेवा, संस्कार आणि समाजपरिवर्तनाचे साधन म्हणून विकसित करण्याची. तेव्हा सर्वांनी मिळून अशा माध्यमांची उभारणी करावी, जी नवीन सामाजिक व्यवस्थेची खरी उत्प्रेरक ठरतील. जिथे मानवता, नैतिकता, शांती आणि विश्वकल्याणाचा विचार केंद्रस्थानी असेल.
शेवटी या बाबतीत मला एक शेर आठवतो....
’मीडिया अगर ईमानदार हो तो समाज संवर जाता है,
झूठ का साथ दे तो विश्वास बिखर जाता हैं,
कलम की ताकद को पहचानो सही दिशा मे चलाओ,
क्योंकी यही भविष्य का नया समाज बनाता हैं।’

डॉ. राजेश राजोरे
९८२२५९३९०३
rajeshrajore@gmail.com
खामगाव, जि. बुलडाणा. 
(लेखक हे दैनिक देशोन्नतीच्या बुलडाणा आवृत्तीचे संपादक तसेच पत्रकारितेत पीएच.डी.पदवी प्राप्त आहेत.)

Related to this topic: