पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सोमवारी होत आहे. ही मतमोजणी अनेक दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे. या मतमोजणीनंतर जे काही निकाल समोर येतील त्याचा त्या राज्यांच्या राजकारणावर तर परिणाम होणार आहेच, शिवाय राष्ट्रीय राजकारणातील समीकरणेही बदलू शकतात. केरळमध्ये काँग्रेसप्रणीत आघाडीची सत्ता येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसे झाल्यास काँग्रेससाठी तो खूप मोठा बूस्ट ठरेल. केवळ एका राज्याची सत्ता ताब्यात येणे इतक्यापुरती ही गोष्ट महत्त्वाची किंवा मर्यादित नसेल, तर या विजयामुळे पुढच्या काही महत्त्वाच्या राज्यांतील निवडणुकीसोबतच पुढच्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस नेतृत्वाचे आणि कार्यकर्त्यांचे मनोधैर्य त्यातून उंचावणार आहे. पक्षाला आलेली राजकीय मरगळ संपविण्यासाठी हा विजय अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. इतर चार राज्यांमध्ये काँग्रेसच्या विजयाची शक्यता नाही. तामिळनाडूत कदाचित द्रमुक सोबत काँगे्रस सत्तेत येऊ शकते, परंतु तामिळनाडूच्या राजकारणात काँग्रेस आणि भाजपचे स्थान जवळपास सारखे आहे. आसाममध्ये तरूण गोगोई काँग्रेस आघाडी सत्तेत येणार असल्याचा दावा करीत असले तरी तशी शक्यता खूपच कमी दिसते. भाजप आसाममधील आपली सत्ता कायम राखेल असेच बहुतेक सगळ्या निरिक्षकांचा अंदाज आहे. पुद्दुचेरीतही भाजपप्रणीत रालोआची सत्ता कायम राहण्याची शक्यता आहे. चुरस आहे ती प.बंगालमध्ये आणि या राज्याचा निकाल राजकीयदृष्ट्याही खूप महत्त्वाचा ठरणार आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून तिथे सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी भाजप विरोधी राजकारणाचे एक प्रतिक बनल्या आहेत. प्रचंड शक्तीशाली भाजपला थेट रस्त्यावर उतरून भिडण्याची धमक ममतांनी वैâकवेळा दाखविली आहे आणि यापूर्वी सगळ्या प्रकारचे प्रयत्न करूनही भाजपला ममतांचा गड भेदण्यात यश आलेले नाही. ज्या केंद्रीय यंत्रणांच्या दहशतीचा वापर करीत भाजपने इतर अनेक पक्षांना किंवा त्यातील बड्या नेत्यांना जेरीस आणले त्या केंद्र्रीय यंत्रणांना ममतांनी काडीचीही किंमत दिली नाही. कोलकत्यात दाखल झालेल्या सीबीआयच्या अधिकार्यांनाच अटक करण्याचे बेमुर्वत धाडस त्यांनी यापूर्वी दाखविले आहे. संसदेत, विधिमंडळात, न्यायालयात, रस्त्यावर असे सगळीकडेच ममता भाजपला नडलेल्या आहेत. त्यामुळेच ममता बॅनर्जी विरोधकांसाठी एका वेगळ्या अर्थाने प्रेरणास्त्रोत ठरत आल्या आहेत. विरोधकांसाठी ममतांचे अस्तित्त्व त्यासाठीच महत्त्वाचे ठरते. त्यामुळेच प.बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत. ममता विरोधकांच्या पाठीचा कणा आहेत, याची जाणीव भाजप नेतृत्वालाही आहे आणि म्हणूनच काहीही करून यावेळी ममतांना पराभूत करायचे असा चंगच भाजप नेतृत्वाने बांधला होता किंवा आहे. भाजपची तयारी तशी खूप आधीपासून सुरू झाली होती. निवडणूक आयोगाला हाताशी धरून प.बंगालमध्ये ठएसआयआर' राबविण्यात आला. त्या माध्यमातून जवळपास ९१ लाख मतदारांची नावे वगळण्यात आली. ममतांनी या ठएसआयआर' विरोधात थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला, परंतु यावेळी भाजप पुरेशा तयारीनिशी मैदानात उतरला होता. त्यामुळे ममताचा लढा अपयशी ठरला. त्यानंतर निवडणुकीदरम्यान प.बंगालमध्ये अभूतपूर्व बंदोबस्त ठेवण्यात आला. केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवळपास पाच लाख जवानांची तैनाती करण्यात आली. विशेष निरीक्षक म्हणून उत्तरप्रदेश सारख्या राज्यातून निवडक आयपीएस अधिकार पाठविण्यात आले. सीबीआय, आयकर, ईडी सारख्या यंत्रणांना ठअलर्ट मोड'वर ठेवण्यात आले. निवडणुकीनंतर गरज भासल्यास या यंत्रणांच्या माध्यमातून फोडाफोडीचे राजकारण करण्याची तयारी आधीपासूनच सुरू आहे. या इतक्या विपरीत परिस्थितीतही ममतांनी आपला गड राखलाच तर ते एक मोठे आश्चर्य असेल आणि भाजप नेतृत्वाला एक मोठा धक्का. भाजप अजेय नाही, भाजपला पराभूत केले जाऊ शकते, हा संदेश त्यातून मिळेल आणि तो विरोधकांचे ऐक्य बळकट करण्यासोबतच पुढच्या लढाईसाठी विरोधकांचे मनोधैर्य उंचावणारा असेल, परंतु ममता पराभूत झाल्या तर मात्र विरोधकांचे अवसान गळू शकते. थोडक्यात प.बंगालचा निकाल केवळ निवडणुकीचा निकाल नाही, त्या निकालाला अनुषंगिक राजकारणाचे अनेक पदर लगडलेले आहेत.