Breaking News
  • माजलगावात अल्पवयीन विवाहितेचा नियमबाह्य गर्भपात? अतिरक्तस्रावानंतर तरुणी बेपत्ता
  • लातूर तुळजापूर महामार्गावर भीषण अपघात, तिघांचा मृत्यू तर 17 जण जखमी
  • वाशिममध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू
  • सलग पाचव्या दिवशी भंडाऱ्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी
  • फसव्या कर्जमाफीविरोधात रविकांत तुपकरांचा एल्गार; उद्यापासून अन्नत्याग आंदोलन
  • FSSAI कंपनीची मोठी कारवाई, ८ फूड कंपन्याना पाठवली नोटीस
  • अण्णा हजारे यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या शुभेच्छा
  • पेरणीची घाई करू नका; दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते : मेघना बोर्डीकर
  • नांदेड जिल्ह्यात पाऊस वादळीवारासह पावसाची हजेरी

होम > संपादकीय > लेख

अजितदादांच्या मृत्यूचे गूढ कायम


अजितदादांच्या मृत्यूचे गूढ कायम

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे विमान अपघातात मृत्यु झाला, त्यांच्याबरोबर वैमानिकासह, अन्य चार जणांनाही जीव गमवावा लागला. या घटनेला चार महिने उलटून गेले, अजितदादांचा विमान अपघात नेमका कशामुळे झाला? हवामान खराब होते का? वैमानिकाचा निर्णय चुकला का? त्यांच्या मृत्युला जबाबदार कोण? विमानात अचानक तांत्रिक बिघाड झाला, की विमान धावपट्टीवर उतरवताना वैमानिकाचा अंदाज चुकला? सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी होत्या का? नेमकी चूक कोणाची? या प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळू शकलेली नाहीत. अजितदादा पवार हे काही विस्मरणात जाणारे नेते नाहीत. तरुणाईचे व ग्रामीण जनतेचे ते प्रेरणास्थान होते. दिलेला शब्द आणि दिलेली वेळ अचूक पाळणारे नेते होते. त्यांच्या मृत्युनंतर त्यांनी स्थापन केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विस्कळीत झाला आहे. पक्षांतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. अजितदादांच्या पत्नी सुनेत्रावहिनी या त्यांच्या राजकीय वारस आहेत. दादांच्या रिक्त झालेल्या जागेवर त्यांनी चौथ्या दिवशीच उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्या कधी विधीमंडळात आमदार नव्हत्या. त्या कधी मंत्री नव्हत्या. तरीही त्यांनी एवढी मोठी जबाबदारी स्वीकारली. सासर व माहेर अशा दोन्ही घरातून त्यांना राजकारणाचे धडे मिळाले आहेत. अजितदादांच्या मृत्युनंतर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी स्वीकारली आहे. पार्थ आता राज्यसभेवर खासदार असून पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. जय हे पक्षाचे राष्ट्रीय सचिव झाले आहेत. सुनेत्रावहिनी उपमुख्यमंत्री असून राष्ट्रवादी काँग्रेस (अप) पक्षात सर्वोच्च स्थानावर आहेत. तरीही अजितदादांच्या मृत्युची चौकशी कुठपर्यंत आली आहे हे चार महिने झाल्यानंतरही कुणाला काहीच कळत नाही.
बारामतीला झालेल्या विमान अपघातानंतर अनेक तर्क- वितर्क व्यक्त झाले. राष्ट्रवादी काँग्रेस (शप) चे आमदार रोहित पवार व राष्ट्रवादी काँग्रेस (अप) चे माजी आमदार अमोल मिटकरी हे अजितदादांच्या मृत्युची वेगाने व पारदर्शक चौकशी व्हावी म्हणून सतत मागणी करीत आहेत. रोहित पवार यांनी मुंबई व बारामती येथे पोलिसांकडे एफआयआर नोंदविण्याचाही प्रयत्न केला; पण पोलिसांनी नकारात्मक भूमिका घेतली. अजितदादांचा मृत्यू ही संवेदनशील घटना आहे. त्यामुळे वरिष्ठांकडून जशा सूचना असतील तसेच पोलीस वागणार. रोहित पवार यांनी जिद्द सोडली नाही, कर्नाटकात जाऊन एफआयआर नोंदवला व तेथील पोलिसांनी तो पुढील तपासासाठी महाराष्ट्राकडे पाठवला. या घटनेलाही बरेच दिवस लोटले. पुढे काय झाले हे समजलेच नाही. स्वत: सुनेत्रावहिनींनी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली व अजितदादांच्या विमान अपघाती मृत्युची सीबीआय कडून चौकशी व्हावी, अशी मागणी केली. त्या मागणीचे पुढे काय झाले हे गूढच आहे. अजितदादांच्या मृत्युप्रकरणाची चौकशी एवढ्या धिमेपणे का चालू आहे? अजितदादा हे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असताना विमान अपघात झाला. ते अर्थमंत्रीही होते. अर्थमंत्री म्हणून राज्याचा त्यांनी आठ वेळा अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम केला होता. महायुती सरकारमध्ये प्रमुख घटक असलेल्या पक्षाचे ते राष्ट्रीय अध्यक्ष होते. महाराष्ट्रातले ते एक प्रभावी नेते होते. प्रशासनावर पकड, निर्णय क्षमता आणि सत्तेत असलेला प्रभाव यामुळे ते नेहमीच चर्चेत राहिले. व्हीव्हीआयपी म्हणून त्यांना घटनेने अधिकार होते. मग त्यांच्या मृत्युच्या चौकशीबाबत चालढकल का होते आहे? त्यांच्या मृत्युनंतर झालेल्या राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या घटनेवर चर्चासुद्धा झाली नाही, याचे कारण काय असावे?
अजितदादांच्या मृत्यूमागे कट कारस्थान आहे का? भोंदूबाबा अशोक खरात यांचीही या संदर्भात चौकशी करावी, अशी मागणी पुढे आली होती. ज्या नेत्याने आयुष्यभर इतरांना न्याय दिला, खचलेल्यांना आधार दिला, निराश झालेल्यांना दिलासा दिला, गरजवंतांना उभारी दिली, अजितदादांना बघितल्यावर सभा- मिरवणुकांमध्ये उत्साहाचे वादळ निर्माण व्हायचे. 'एकच दादा, अजितदादा' अशा बेभान घोषणांनी परिसर दणाणून जायचा. त्या नेत्याच्या अंत्यदर्शनासाठी लाखो लोक बारामतीला दूरवरून आले होते. त्यांच्या मृत्युने महाराष्ट्र हळहळला होता. असे अचानक झालेच कसे, या विचाराने लाखोंना हुंदके आवरले नाहीत. आपल्या कामातून जनतेच्या ह्रदयात स्थान मिळविलेल्या अजितदादांच्या मृत्युचे गूढ का उकलत नाही हे कळेनासे झाले आहे. 
अजितदादांच्या मृत्युवर राज्यकर्ते काही बोलत नाहीत, तपास कुठपर्यंत आला ते सांगत नाहीत. चौकशी सीबीआयकडे दिली की नाही, हे समजत नाही. राज्यात अगोदरच इंधन टंचाईने जनता त्रस्त आहे. पेट्रोल, डिझेल, सीएनजी यांच्या दरात पाठोपाठ वाढ होत आहे. महागाईने अगोदरच कंबरडे मोडले आहे. पेट्रोल -डिझेल एकशेवीस, एकशे तीसपर्यंत जाणार, असे अंदाज बोलून दाखवले जात आहेत. दुसरीकडे राज्याच्या विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीमध्ये शेवटपर्यंत खेचाखेच चालू होती. सत्तेवर असलेल्या मंत्र्यांच्या मुलाला, भावाला किंवा पुतण्याला आणि सग्या सोयर्‍यांना आमदार व्हायचे म्हणूनही लॉबिंग चालू असलेले बघायला मिळाले. ज्या पक्षाने घराणेशाहीवर टीका करून मते मिळवली तो पक्ष मित्र पक्षांच्या घराणेशाहीपुढे माना तुकवताना दिसतो आहे. ज्या पक्षाने निवडणुकाrत विरोधी नेत्यांना भ्रष्टाचारी म्हणून हिणवून त्यांना जेलमध्ये पाठविण्याची धमकी दिली, तोच पक्ष त्या नेत्यांचे गालिचे अंथरून स्वागत करताना दिसतो आहे. पक्ष विस्ताराच्या नावाखाली विरोधी पक्षांच्या तोडफोडीला उत्तेजन दिले जात आहे. जागतिक संकटाला तोंड देण्यासाठी जनतेला मात्र काटकसर करण्याचे आवाहन केले जात आहे. अशा वातावरणात कोट्यवधी जनतेचे लाडके असलेल्या अजितदादांचा सत्ताधारी व विरोधी पक्षाला विसर पडला तर नाही ना? मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री दर महिन्याला दिल्लीला जाऊन पंतप्रधान व केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटत असतात. या भेटीत अजितदादांच्या मृत्युच्या चौकशीबाबत कितीवेळा चर्चा केली, सीबीआय चौकशीचा आग्रह किती वेळा धरला? 
लोकशाहीत मोठ्या नेत्यांच्या झालेल्या अकस्मात मृत्युंची चौकशी तत्काळ, वेगाने व पारदर्शक होणे गरजेचे असते. लोकप्रिय नेत्यांचा अपघाती झालेला मृत्यू ही काही केवळ शोकांतिका नसते. दोषी कोण हे जनतेला समजले पाहिजे. कुणाला टार्गेट करण्यापेक्षा व्यवस्थेत काय त्रुटी किंवा दोष होते हे चौकशीत वेळीच पुढे आले पाहिजे. सुरक्षा यंत्रणा निष्काळजी असेल, तर त्याची जबाबदारी निश्चित केली पाहिजे. जनतेचा लोकशाहीवरचा विश्वास दृढ निर्माण करण्यासाठी पारदर्शक चौकशी यंत्रणा असली पाहिजे. 
 महाराष्ट्रात मोठा जनाधार असलेले भाजपाचे दिग्गज नेते, माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांचा ३ जून २०१४ मध्ये दिल्लीत मोटार अपघातात मृत्यु झाला. तेव्हा ते मोदी सरकारमध्ये केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री होते. पोलीस तपासात हा अपघात असल्याचे सांगण्यात आले. चालकावर गुन्हा दाखल झाला. चौकशी झाली; पण त्यांच्या मृत्युविषयी अनेक प्रश्न जनतेच्या मनात कायम राहिले. बारा वर्षांनंतरही मुंडेसाहेबांच्या मृत्युबाबत असे काय नेमके घडले, हा प्रश्न मनात कायम आहे. अजितदादांच्या मृत्युबाबत असे होऊ नये हीच अपेक्षा.    
                            
डॉ. सुकृत खांडेकर
९५९४२२४०००
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)
 

Related to this topic: