२०११मध्ये ममता बॅनर्जी यांनी पहिल्यांदा पश्चिम बंगाल विधानसभेची निवडणूक जिंकत सरकार स्थापन केले त्यावेळी या राज्यात भाजपच्या आमदारांची संख्या शून्य होती. २०१६मध्ये ममतांनी आपली सत्ता कायम राखली त्यावेळी भाजप आमदारांची संख्या केवळ तीन होती. त्यानंतर अवघ्या दहा वर्षात भाजपने तब्बल दोनशे जागांवर विजय मिळवित ममतांची सल्तनत गारद केली. हा चमत्कार म्हणता येणार नाही. ममतांच्या झंझावातापुढे राज्यात एकेकाळी प्रबळ असलेले डावे पक्ष आणि काँग्रेस मुळापासून उखडले जात असताना भाजपने चिकाटीने आपले प्रयत्न सुरू ठेवले होते. विरोधी पक्ष म्हणून डावे आणि काँग्रेसच्या जागी स्वत:ला स्थापन करण्यात भाजपने यश मिळविले. एकदा का पाय रोवण्यासाठी जागा मिळाली की पुढे आपला प्रभाव कसा विस्तारित करायचा याची योजना भाजपकडे तयार होती. खरे तर मागच्या विधानसभा निवडणुकीतच भाजप तृणमूल काँग्रेसला हादरा देणार अशी परिस्थिती निर्माण झाली होती; परंतु भाजप नेत्यांच्या काही चुकांचे भांडवल करीत ममतांनी ऐनवेळी बाजी उलटविली. त्या निवडणुकीत भाजपला ७७ जागांवर यश मिळाले होते. त्याचवेळी काँग्रेस आणि डावे पक्ष जवळपास संपुष्टात आले होते. त्यामुळे पुढची निवडणूक भाजप आणि तृणमूल यांच्यातच होणार हे चित्र स्पष्ट झाले. दरम्यान २०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे तब्बल १८ खासदार निवडून आले. मागच्या लोकसभा निवडणुकीत ही संख्या १२ पर्यंत खाली आली असली तरी भाजपचे मजबूत अस्तित्व कायम होते. या विधानसभा निवडणुकीत काहीही करून ममतांचा पराभव करायचा या जिद्दीला पेटलेल्या भाजपने गेल्या वर्षभरापासून या राज्यावर लक्ष वेंâद्रित केले होते. मागच्या निवडणुकीत भाजप नेत्यांच्या काही वक्तव्यांमुळे ममतांना लाभ झाला होता, यावेळी अशी कोणतीही संधी त्यांना मिळणार नाही याची खबरदारी गांभीर्याने घेण्यात आली, उलट ममतांच्या काही वक्तव्यांचा भाजपने लाभ उठविला. म्हणजे मागच्या वेळी भाजपने ज्या चुका केल्या त्या यावेळी ममतांनी केल्या. ममतांनी एका सभेत जर भाजप सत्तेत आली तर 'माछे-भात बंगाली' (मासे आणि भात खाणार्या बंगाली) यांची ओळख मिटवून टाकेल, असा इशारा दिला. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी सार्वजनिकरित्या मासे खाल्ले. काही भाजप उमेदवारांनी माशांसह प्रचार केला. शाह यांनीही माछ-भात खाणाराच बंगालचा मुख्यमंत्री होईल, असे सांगितले. भाजपने इथे उघडपणे ध्रुवीकरणाचे राजकारण केले आणि भाजपच्या या खेळीला अजाणतेपणे ममतांच्या नेत्यांनी हातभार लावला. तृणमूल खासदार सायनी घोष यांनी मुस्लीमबहुल भागांतील रॅलींदरम्यान 'मेरे दिल में है काबा, और मेरी आंखों में मदीना' हे गाणे गायले. याचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला. अमित शाह आणि योगी आदित्यनाथ यांसारख्या भाजप नेत्यांनी याला 'काली विरुद्ध काबा' असे सादर करीत टीएमसीच्या मनात काबा-मदीना असू शकते, पण बंगालच्या मनात फक्त माँ काली आणि माँ दुर्गा वास करतात, असा प्रचार केला. हिंदीत पट्ट्यात 'जय श्री राम'चा नारा देणार्या भाजपने बंगालमध्ये 'जय माँ काली'चा नारा बुलंद केला. मागील निवडणुकीत टीएमसीने भाजपच्या 'जय श्री राम'च्या घोषणेला 'जय माँ काली'ने प्रत्युत्तर दिले होते, ज्याचा त्यांना फायदा झाला. भाजपने ती चूक यावेळी सुधारली. संदेशखाली आणि आरजी कर मेडिकल कॉलेजमधील घटनांनी बंगालमध्ये महिला सुरक्षेशी संबंधित प्रश्न निर्माण केले. भाजपने हा मुद्दा उचलून धरण्यासाठी या प्रकरणांमधील प्रमुख चेहर्यांना तिकिट दिले. गेल्या वेळी भाजप नेत्यांनी 'दीदी-ओ-दीदी' सारख्या घोषणा दिल्या, त्याचा उलट परिणाम होऊन ममता बॅनर्जींना सहानुभूती मिळाली होती. ती चूक यावेळी भाजपने टाळली. भाजपने यावेळी ममतांवर वैयक्तिक हल्ले केले नाही. त्याऐवजी भाजपने ममतांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी आणि सिंडिकेट राजला लक्ष्य केले. यावेळी प.बंगालच्या निवडणुकीत बेरोजगारी, कायदा आणि महिला सुरक्षा तसेच भ्रष्टाचार हे मुद्दे अधिक प्रभावी ठरले. शिवाय भाजपकडून पंतप्रधानांसह केंद्रातील १५ कॅबिनेट मंत्री, १२ मुख्यमंत्री आणि इतर अनेक नेते प्रचाराच्या मैदानात उतरले होते. अमित शाह तर कोलकतामध्येच ठाण देऊन बसले होते. या सगळ्यांच्या विरोधात ममता एकट्या आपली लढाई लढत होत्या. या विषम लढाईचा अपेक्षित तोच शेवट झाला आणि अखेर ममतांचा गड ढासळला.