प्रहार

मतांचा बाजार आणि लोकशाहीचे भवितव्य

शिक्षण क्षेत्रातील प्रश्न सभागृहात मांडणारा आणि सरकारला जाब विचारणारा आवाज म्हणून या प्रतिनिधींकडे पाहिले जाते.एकेकाळी बी. टी. देशमुख यांनी आपल्या कार्यातून पदवीधर मतदारसंघाला वेगळी उंची मिळवून दिली.

मतांचा बाजार आणि लोकशाहीचे भवितव्य

लोकशाही व्यवस्थेचा पाया हा विचार, मूल्ये आणि नैतिकतेवर उभा असतो. निवडणूक ही केवळ प्रतिनिधी निवडण्याची प्रक्रिया नसून, ती लोकशाहीवरील विश्वास आणि नागरिकांच्या विवेकाची कसोटी असते. मात्र, निवडणुकीत पैशांचा आणि भेटवस्तूंचा प्रभाव वाढत असल्याच्या चर्चांमुळे मतदारांची वैचारिक बांधिलकी, नैतिकता आणि लोकशाही मूल्यांची जपणूक यांचा गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.

राज्यातील प्रत्येक विभागात दर सहा वर्षांतून शिक्षकांमधून एक आणि पदवीधरांमधून एक अशा प्रकारे ७ + ७= १४ मतदारसंघांची निर्मिती ही केवळ १४ अतिरिक्त प्रतिनिधी निवडण्यासाठी झालेली नाही, तर ती शिक्षण क्षेत्रामध्ये आवश्यक ते बदल घडवून आणण्याकरिता चर्चेकरिता उपलब्ध करून दिलेले सभागृह असते. सध्या शिक्षण क्षेत्रात अनेक समस्या आहेत, त्यातील काही महत्त्वाच्या म्हणजे, शिक्षणासाठी पुरेसा निधी मिळावा, जुनी पेन्शन सुरू करावी, अर्थसंकल्पात शिक्षणावरील तरतुदी सातत्याने कमी होऊ नयेत, शिक्षकांच्या, शाळांच्या ज्या अनेक समस्या आहेत त्या सुटाव्यात आणि बदलत्या काळानुसार शिक्षणव्यवस्थेत आवश्यक त्या सुधारणा व्हाव्यात, यासाठी या मतदारसंघांना घटनात्मक महत्त्व देण्यात आले. शिक्षण क्षेत्रातील प्रश्न सभागृहात मांडणारा आणि सरकारला जाब विचारणारा आवाज म्हणून या प्रतिनिधींकडे पाहिले जाते.
एकेकाळी बी. टी. देशमुख यांनी आपल्या कार्यातून पदवीधर मतदारसंघाला वेगळी उंची मिळवून दिली. त्यांच्या कामावर विश्वास ठेवून  त्यांना पाच वेळा म्हणजे सलग तीस वर्षे पदवीधर मतदारसंघातून निवडून दिले. हा केवळ विजयांचा विक्रम नव्हता, तर नेतृत्वावरील विश्वासाचा दाखला होता. बीटी भाऊ जरी पदवीधर मतदारसंघातून निवडून जात होते, तरी त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये शिक्षण क्षेत्रात अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा घडवून आणल्या. शिक्षकांचे अनेक प्रश्न मार्गी लावले. एवढेच नव्हे, तर कृषी क्षेत्रातील सिंचनाचा अनुशेषसुद्धा शोधून काढून त्याकरिता राज्यपालांकडून “हा अनुशेष प्राधान्य क्रमाने भरून काढावा” असे दिशा निर्देश घेतले. 
मात्र, सिंचनाचा त्यांनी शोधून काढलेला हा अनुशेषच त्यांच्या मुळावर आला. विदर्भाच्या हक्काचा पैसा आता पळवून नेता येणार नाही या भीतीपायी महाराष्ट्रातील काही नेत्यांनी व्यवस्थित फिल्डिंग लावली आणि त्यांच्या मतदारसंघांमध्ये डॉ. रणजित पाटलांना उभे करून कधी नव्हे तितकी मतदार नोंदणी करून बीटींचा पराभव घडवून आणला. या मतदारसंघाची बीटी भाऊंनी उभी केलेली ती उंची त्यानंतर आलेल्या कुठल्याही आमदाराला कधीच गाठता आली नाही. 
शिक्षक हा समाजाला दिशा देणारा घटक आहे. तो विद्यार्थ्यांना केवळ अक्षरज्ञान देत नाही, तर योग्य-अयोग्याची जाणीव करून देतो. मग त्याच शिक्षकांच्या मतांचा सौदा पैठणी आणि पाकिटात होत असेल, तर त्यापेक्षा शिक्षणव्यवस्थेचे दुर्दैव कोणते?
२०२० ते २०२६ ह्या कार्यकाळातील शिक्षक आणि मतदार नसूनही आमदार म्हणून निवडून आलेल्या किरण सरनाईक यांच्या कार्यपद्धतीबाबत अनेक संस्थाचालक व शिक्षक नाराज होते. शिक्षकांचे आणि संस्थांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी ६ वर्षांत कुठलाच पुढाकार घेतला नाही, ६ वर्षांत संस्थांना साधी भेटही दिली नाही, असे आरोप केले जात होते.  या आरोपांचे मूल्यमापन मतदारांनी स्वतः करायला हवे होते. मात्र, मागील निवडणुकीच्या काळात त्यांनी केलेले पैठणी (?) वाटप आणि पाकिटांचे आमिष दाखविल्याच्या चर्चांनी शिक्षकांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न ऐरणीवर आणला होता. त्याचीच सुधारित पुनरावृत्ती त्यांनी या २०२६ च्या निवडणुकीतसुद्धा केली अशा चर्चांना उधाण आले होते. आश्चर्य म्हणजे या बाबतीत खुली चर्चा होत असताना आणि त्यासंदर्भात पोलीस स्टेशनमध्ये एक तक्रार दाखल झालेली असताना मग त्यावर FIR का दाखल करण्यात आला नाही? या सर्वात निवडणूक आयोगाची भूमिका संशय निर्माण करणारी ठरली आहे. 
हा प्रश्न किरण सरनाईक यांच्यापुरता मर्यादित नाही. तो प्रत्येक शिक्षकाच्या स्वाभिमानाचा आणि त्यांच्या “जनमानसातील प्रतिमेचा” आहे. शिक्षकांनीच जर आमिषांना बळी पडून मतदान केले, तर मग ते विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणा, मूल्यनिष्ठा आणि विवेकबुद्धीचे धडे कोणत्या नैतिक अधिकाराने शिकवतील? आणि त्यांच्यावर पालकांनी विश्वास का ठेवावा? असा प्रश्न निर्माण होतो. २३ ऑक्टोबर २०२६ ची निवडणूक म्हणूनच महत्त्वाची होती. 
निवडणुकीतील उमेदवार प्राधान्य क्रमांकाने निवडून द्यायचे असल्यामुळे नुटाने पर्याय म्हणून पुढे केलेल्या अदिती पोहरे, अविनाश बोर्डे, लहाने आणि कडू या शिक्षक असलेल्या ४ उमेदवारांचा तसेच देवकर, विघे,  देशपांडे इत्यादी पैकी कुणाचा विचार शिक्षकांनी उमेदवाराच्या पात्रतेनुसार, भूमिकेनुसार आणि शिक्षण क्षेत्रातील प्रश्न सोडविण्याच्या क्षमतेनुसार करतील, अशी अपेक्षा होती. पसंतीक्रमाने मतदान करताना कोणाला पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा किंवा अन्य क्रमांक द्यायचा, याचा निर्णयसुद्धा  विद्यार्थ्यांची प्रश्नपत्रिका आणि त्यात दिलेली उत्तरे पाहून त्यातील मेरिटचा, प्रथम क्रमांकाचा, द्वितीय, तृतीय, कॉपी करणारा विद्यार्थी कोण हे शोधून मार्क देण्यात  वाकबगार असणारे शिक्षक स्वतःच्या सद्सद् विवेकबुद्धीने करून मार्क देतील अशी अपेक्षा होती.
शिक्षकांनी कोणाला मतदान करावे, हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे; पण तो निर्णय साडीच्या रंगावर किंवा पाकिटातील रक्कम पाहून घेतलेला नसेल, तर तो शिक्षणाच्या भवितव्यावर, शिक्षकांच्या सन्मानावर आणि आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्याकडे पाहून देतील याबद्दल खात्री होती; मात्र तसे का घडले नाही याचे उत्तर भविष्यकाळात शिक्षकांना नक्कीच द्यावे लागेल.
कारण साडी काही दिवस उपयोगी पडेल, पाकिटातील पैसे काही दिवसांत संपतील; पण चुकीच्या प्रतिनिधीची किंमत पुढील अनेक वर्षे संपूर्ण शिक्षणव्यवस्थेला आणि समाजाला मोजावी लागेल, जशी ती मागील ६ वर्षांत चुकवल्या गेलेलीच आहे.
२३ ऑक्टोबरला पार पडलेली निवडणूक आणि त्यानंतर झालेल्या मतमोजणीतून दिसलेले चित्र हे सगळ्यांनाच विचार करायला लावणारे ठरले. ही केवळ आमदार निवडण्याची प्रक्रिया नव्हती, तर ती शिक्षकांच्या स्वाभिमानाची परीक्षा होती. शिक्षक मतदार या परीक्षेत उत्तीर्ण होणार, की पैठणी आणि पाकिटांच्या मोहापुढे किरण सरनाईकांना पुन्हा निवडून देऊन आपल्या प्रतिष्ठेचा पराभव करतील, की त्यांच्याऐवजी अन्य सक्षम उमेदवार निवडून देऊन शिक्षकांवर सरनाईकांनी लावलेले “लांछन” पुसून टाकतील याची बहुतेक लोकांना अपेक्षा होती, मात्र तसे झाले नाही. 
या संदर्भात कानोसा घेतला असता, बहुतेक शिक्षक पैसे देऊन मतदान करण्याचे समर्थन फार सुंदरपणे करतात.
त्यांना यात काहीच वावगे वाटत नाही. आपण थोडेच मागायला चाललो, ते देतात आपण घेऊन टाकायचे. पुन्हा सहा वर्षांत ते आपल्याला दिसत पण नाही आणि आपले कोणते कामही करत नाहीत. आपण कशाला फुकट मतदान करायचे, जेवढे भेटले तेवढे घेऊन टाकायचे. ही मानसिकता या “बुद्धिजीवी” (?) वर्गाची झालेली आहे. 
समाजामध्ये दोन लोकांवर जनता विश्वास आणि श्रद्धा ठेवायची त्यातील एक डॉक्टर दुसरा शिक्षक. डॉक्टरांवरील श्रद्धेला कोरोना काळानंतर तडा गेला. उरले होते शिक्षक. त्याच्या ताब्यामध्ये लोक आपली आयुष्यभराची कमाई म्हणजे आपला वंशाचा दिवा सोपवायचे. हे म्हणजे कुंभाराकडे माती देण्याचा प्रकार. हा कुंभार त्या मातीतून एक चांगली निर्मिती करेल, आपल्या वंशाच्या दिव्यातून चांगला प्रकाश पडेल, असा त्यांना विश्वास असायचा. 
मात्र, आलेल्या निकालावरून कानावर येत असलेली पैसे, पाकिटे, मोबाईल आणि सोन्याच्या शिक्क्याची माहिती खोटी नव्हती तर वस्तुस्थिती होती, अशी अनेकांनी कबुली दिली आहे. 
एकंदरीतच निवडणुकांमध्ये पैशांना आलेले महत्त्व आणि देशामधील बिघडलेली राजकीय परिस्थिती यावर निश्चितपणे गंभीरपणे विचार करावा लागेल, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. 
महाराष्ट्रमध्ये नुकत्याच झालेल्या पाच विधानपरिषद निवडणुकांपैकी तीन निवडणुका या पदवीधर मतदारसंघात म्हणजेच जनतेमध्ये झाल्या.  त्यामध्ये महाविकास आघाडीचे प्रतिनिधी निवडून गेले, तर ज्यामध्ये पैशाचा वापर करता येईल अशा मोजक्या मतदार असलेल्या शिक्षक मतदारसंघामध्ये पैशाचा वापर करून दोन प्रतिनिधी निवडून गेले. यावरून देशातील जनतेचा कौल लक्षात येतो.
देशातील सर्व सांविधानिक संस्था या पद्धतीने विद्यमान सरकारने ताब्यात घेतल्या आहेत. देशात १३ कोटी आणि महाराष्ट्र राज्यामध्ये २ कोटी ४० लाख मते बाद केली आहेत, आणि त्यावरूनच  केवळ दिल्लीतच नव्हे, तर देशामध्ये एसआयआर विरोधात मागील ३-४ महिन्यापासून आंदोलन पेटले आहे. 
शनिवार, ३१ ऑक्टोबर रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर राहुल गांधी यांनी “जनसंसद” बोलावली, तिचा निकाल अपेक्षित आहे. त्याचबरोबर भाजपानेसुद्धा देशामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये देश बचाव आंदोलन छेडले आहे. थोडक्यात जनसंघर्ष म्हणजे यादवी अटळ आहे.
उद्या एक नोव्हेंबरला दिल्लीमध्ये राहुल गांधींनी देश बचाव करिता “कॉल” दिला आहे, मागील २० जुलैच्या जंतर मंतरवरील आंदोलनाप्रमाणे सरकार हे आंदोलनसुद्धा चिरडून टाकते किंवा कसे हे रविवारी सायंकाळपर्यंत समजेलच.
खरे तर निवडणूक आयुक्त ही एक स्वायत्त संस्था आहे. तिला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तिनेच देणे अपेक्षित असताना भाजप मात्र त्याची उत्तरे देत आहे, यावरूनच “दाल में कुछ काला नसून संपूर्ण डाळच काळी आहे” ही बाब स्पष्ट होते. २००२ या वर्षावर आधारित एसआयआर केल्या गेले. मग २४ वर्षांमध्ये देशाची लोकसंख्या न वाढता की जर काही राज्यांतच एसआयआर केलेले असताना त्या मध्येच १३ कोटींनी कमी होत असेल, तर हे केवढे मोठे षडयंत्र आहे याची देशवासीयांनी कल्पना करावी. 
आपल्या संविधानातील तत्त्वानुसार “शंभर गुन्हेगार सुटले तरी चालतील; मात्र एका निर्दोषाला शिक्षा व्हायला नको”, तद्वतच लोकशाहीच्या मूळ तत्त्वानुसार “देशातील प्रत्येक १८ वर्षाच्या वरील पात्र नागरिक मतदानापासून वंचित राहायला नको” मात्र त्या पात्र नागरिकांचा शोध घेऊन त्यांचा समावेश करण्याऐवजी, “यादीत असलेल्यांनाही जर वगळल्या जात असेल” तर हा लोकशाही वर हुकूमशाहीने केलेला हल्ला समजायला हवा.
लोकशाही स्वातंत्र्याची ही दुसरी लढाई आहे असे समजून प्रत्येक नागरिकानी त्यानुसार स्वतःला “सिद्ध” करावे आणि लोकशाही वाचविण्याकरिता पुढे यावे याकरिता हा लेखन प्रपंच.

 

प्रकाश कमलाताई गोपाळराव पोहरे
मो. नं. : +९१-९८२२५९३९२१
प्रतिक्रिया देण्यासाठी थेट प्रकाश पोहरेंना 
संपर्क करा किंवा आपल्या प्रतिक्रिया 
2prakashpohare@gmail.com या इ-मेल
किंवा ९८२२५९३९२१ या व्हॉट्सअप वर पाठवा.  
प्रतिक्रिया देताना कृपया आपले नाव, 
गाव लिहायला विसरू नका.