अग्रलेख

महायुतीत घमासान…!

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत महायुतीला पाचपैकी केवळ दोन जागांवर विजय मिळवता आला.

महायुतीत घमासान…!

विधान परिषद निवडणुकीनंतर भाजप आणि शिंदेसेनेत अगदी कट्ट्यावर शोभावा असा कलगीतुरा सुरु आहे. पुणे आणि नागपूर पदवीधरच्या हक्काच्या जागा गमवाव्या लागल्यामुळे भाजपमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी पुणे पदवीधर आणि खास करून संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात उघडपणे युतीच्या विरोधात काम केल्याचा आरोप भाजप प्रवक्ते सातत्याने करीत आहेत. यातून सत्तेसाठी एकत्र आलेल्या या दोन पक्षांमधील परस्पर विश्वास किती तकलादू असू शकतो, हे पुन्हा एकदा दिसून येत आहे. विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत महायुतीला पाचपैकी केवळ दोन जागांवर विजय मिळवता आला. या निकालाने भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील मतभेदांना तोंड फोडले आहे. पराभवाचे आत्मपरीक्षण करण्याऐवजी एकमेकांवर खापर फोडण्याची स्पर्धा सुरू झाल्याने महायुतीच्या एकजुटीविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांचे महत्त्व केवळ संख्याबळापुरते मर्यादित नसते. या मतदारसंघांतील मतदार सुशिक्षित, जागरूक आणि राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारा असतो. त्यामुळे येथील निकाल हे पक्षांच्या संघटनात्मक ताकदीचे, स्थानिक नेतृत्वाचे आणि सरकारच्या कामगिरीविषयीच्या जनमताचे संकेत देणारे ठरतात. अशा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश न मिळणे ही बाब गंभीर म्हणावी लागेल. मात्र, या पराभवातून धडा घेण्याऐवजी मित्रपक्षांमध्येच आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी पुणे आणि नागपूरमधील पराभवासाठी शिंदेसेनेच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. पुण्यात शिंदेसेनेने ऐनवेळी स्वतंत्र उमेदवाराला पाठिंबा दिल्यामुळे भाजपचे नुकसान झाल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच छत्रपती संभाजीनगरमध्येही मित्रपक्षांमधील विसंवादाचा फटका बसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. शिंदेसेनेच्या नेत्यांनी हे आरोप फेटाळून लावत भाजपच्या नेतृत्वावर आणि निवडणूक व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित केले आहेत. मित्रपक्षांनी एकमेकांना सहकार्य केले नाही, स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या भूमिका घेतल्या आणि युतीधर्माचे पालन झाले नाही, अशा तक्रारी दोन्ही बाजूंनी पुढे येत आहेत. या वादातून एक गोष्ट स्पष्ट होते. महायुतीमध्ये जागावाटपापासून स्थानिक नेतृत्वापर्यंत आणि प्रचाराच्या रणनीतीपासून कार्यकर्त्यांच्या समन्वयापर्यंत अनेक प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत. राज्यात सत्तेचा वाटा मिळवताना एकत्र येणाऱ्या पक्षांना निवडणुकीच्या मैदानात परस्परांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा सांभाळता येत नसतील, तर त्या युतीच्या स्थैर्याबाबत शंका निर्माण होणे स्वाभाविक आहे. खरे तर महायुतीतील संघर्षाचे मूळ केवळ विधान परिषद निवडणुकीच्या निकालात नाही; तर सत्तेतील भागीदारी आणि राजकीय वर्चस्वाच्या स्पर्धेत दडलेले आहे. भाजप हा राज्यातील सर्वांत प्रभावशाली पक्ष म्हणून आपले वर्चस्व कायम ठेवू इच्छितो. दुसरीकडे, एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही केवळ भाजपची सहायक संघटना नसून स्वतंत्र राजकीय अस्तित्व असलेला पक्ष आहे, हे दाखवून देण्याचा प्रयत्न करते. दोन्ही पक्षांच्या या भूमिकांमध्ये संघर्षाची बीजे आहेत. भाजपला आपल्या संघटनात्मक ताकदीच्या आधारे अधिकाधिक जागांवर वर्चस्व हवे आहे, तर शिंदेसेनेला सत्तेतील सहभागाबरोबरच राजकीय प्रतिष्ठा आणि निर्णयप्रक्रियेत योग्य स्थान हवे आहे. या महत्त्वाकांक्षांमध्ये समन्वय साधण्यात अपयश आले, की युतीच्या एकजुटीला तडे जाणे अपरिहार्य ठरते. या निकालातून भाजपनेही आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. प्रत्येक पराभवाचे खापर मित्रपक्षावर फोडून स्वतःची जबाबदारी संपत नाही. उमेदवारांची निवड, स्थानिक कार्यकर्त्यांमधील नाराजी, मतदारांपर्यंत पोहोचण्यात आलेले अपयश आणि बंडखोरी हे घटकही पराभवासाठी तितकेच महत्त्वाचे ठरतात. या पृष्ठभूमीवर निवडणुकीच्या निकालाचे योग्य ते परीक्षण करून फडणवीस आणि शिंदे या दोन्ही नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना योग्य संदेश आणि समज दिली नाही तर या विसंवादाचे पडसाद आता लवकरच होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही दिसून येतील आणि कदाचित त्याचे पर्यवसान महायुतीच्या ऐक्याला धक्का पोहोचण्यातही होऊ शकते. हे टाळायचे असेल तर दोन्ही पक्षांनी परस्परांचा राजकीय अवकाश मान्य करीत कार्यकर्त्यांमध्ये समन्वय निर्माण करण्यासाठी, मतभेद मिटवण्यासाठी सक्षम यंत्रणा उभी करणे गरजेचे आहे.