अग्रलेख

अहंकाराला दणका.......!

पराभव केवळ दोन जागांपुरता मर्यादित नाही. या पराभवाने एकूणच राज्यभरातील भाजपच्या संघटनात्मक रणनीतीवर, मतदारांशी असलेल्या संवादावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अहंकाराला दणका.......!

सत्तेचा अहंकार, खरे तर माज उतरायला वेळ लागत नाही. नागपूर आणि पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निकालाने हे दाखवून दिले. संविधानाने प्रदान केलेले मतदानाचे अमोघ अस्त्र जोपर्यंत सामान्य जनतेच्या हातात आहे तोपर्यंत या देशात कुणीही सत्तेची गुर्मी दाखवू नये, हा संदेश किमान या दोन निकालांनी नक्कीच दिला आहे. खरे तर हा पराभव केवळ दोन जागांपुरता मर्यादित नाही. या पराभवाने एकूणच राज्यभरातील भाजपच्या संघटनात्मक रणनीतीवर, मतदारांशी असलेल्या संवादावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. खरे तर नागपूर हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा राजकीय प्रभाव असलेला प्रदेश. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालयही याच शहरात आहे. अशा ठिकाणी भाजपला विजय मिळवता न येणे, हा संकेत चांगला नाही. पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाच्या हर्षदा देशमुख-जाधव यांनी भाजपच्या स्मिता जाधव यांचा पराभव केला. नागपूरमध्ये काँग्रेसचे अभिजित वंजारी यांनी भाजपच्या सुधाकर कोहळे यांना ३,२७१ मतांनी मागे टाकले. या दोन्ही निकालांनी महाविकास आघाडीला दिलासा दिला असला, तरी त्याचा अर्थ राज्यातील सर्वच राजकीय समीकरणे बदलली आहेत, असा काढता येणार नाही. मात्र, भाजपच्या राजकीय प्रभावाला प्रत्येक मतदारसंघात विजयाची हमी मानता येत नाही, हा संदेश निश्चितच महत्त्वाचा आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघ हा भाजपसाठी प्रतिष्ठेचा विषय होता. या मतदारसंघावर पक्षाची दीर्घकाळ राजकीय पकड राहिली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या मतदारसंघाचे अनेक वर्षे प्रतिनिधित्व केले होते. त्यामुळे हा मतदारसंघ पुन्हा ताब्यात घेण्यासाठी भाजप प्रयत्नशील होता. मात्र, पक्षाच्या प्रयत्नांना यश आले नाही. या निवडणुकीत अपक्ष उमेदवार नितेश कराळे यांना मिळालेल्या मतांनीही निकालाच्या गणितात महत्त्वाची भूमिका बजावली. पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये भाजपचे सुधाकर कोहळे आघाडीवर होते; परंतु आवश्यक मतांचा कोटा पूर्ण न झाल्याने दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी करण्यात आली. त्यानंतर अभिजित वंजारी यांनी विजय मिळवला. यावरून पदवीधर मतदारसंघातील निवडणूक ही केवळ पक्षाच्या पारंपरिक मतांवर जिंकता येत नाही, तर मतांचे हस्तांतरण, उमेदवाराची स्वीकारार्हता आणि मतदारांशी असलेला संपर्क यांनाही महत्त्व असते, हे स्पष्ट होते. अशा निवडणुकांमध्ये पडद्यामागची रणनीती किती महत्त्वाची असते, याची कल्पना फडणवीसांना नक्कीच होती. यापूर्वी राज्यसभेच्या निवडणुकीत त्यांनी अशाच रणनीतीने पारडे फिरवले होते. या पृष्ठभूमीवर नागपूरमधील पराभवाचे विश्लेषण करताना केवळ भाजपविरोधी वातावरणाला कारणीभूत ठरवणे पुरेसे ठरणार नाही. उमेदवाराची निवड, स्थानिक पातळीवरील संघटनात्मक काम, मतदारांशी असलेला संवाद आणि विरोधी मतांचे एकत्रीकरण या सर्व घटकांचा विचार करावा लागेल. मोठ्या नेत्यांच्या सभा, प्रचारयंत्रणा आणि कार्यकर्त्यांचे जाळे असूनही मतदारांचा अंतिम कौल वेगळा असू शकतो, हे या निकालाने अधोरेखित केले आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातील पराभवही भाजपला आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडणारा आहे. पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाला स्थानिक पातळीवर असलेला अनुभव, कार्यकर्त्यांचे जाळे आणि राजकीय संपर्क यांचा उपयोग झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. हर्षदा देशमुख-जाधव यांच्या विजयामुळे या गटाला नव्याने राजकीय बळ मिळाले आहे. या निवडणुकीत भाजपने पदवीधर मतदारांपर्यंत आपला संदेश कितपत प्रभावीपणे पोहोचवला, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. पदवीधर मतदार हा केवळ राजकीय घोषणांनी प्रभावित होणारा वर्ग नाही. रोजगाराच्या संधी, स्पर्धा परीक्षांमधील पारदर्शकता, सरकारी भरतीतील विलंब, शिक्षणाचा दर्जा, महागाई आणि भविष्यातील आर्थिक स्थैर्य यांसारख्या प्रश्नांचा त्याच्या मतदानावर परिणाम होऊ शकतो.
पदवीधर मतदारसंघातील निकालांचे विश्लेषण करताना या प्रश्नांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. एक बाब भाजप नेत्यांनी समजून घ्यायला हवी, जिथे भाजपला ठोस आणि विश्वासार्ह पर्याय उपलब्ध होता, आहे आणि असेल तिथे मतदारांनी भाजपला नाकारले आहे आणि भविष्यात नाकारेल. सत्तेचा अहंकार बाजूला सारून भाजप नेत्यांनी या गोष्टीचा गांभीर्याने विचार करायला हवा. अन्यथा हा अहंकार किंवा माज उतरायला वेळ लागणार नाही याचेच संकेत या निवडणुकीतून मिळाले आहे.