देशाच्या नकाशावर दोन टोकं आहेत. एका टोकाला हिमालयाच्या कुशीत वसलेलं काश्मीर आहे. दुसऱ्या टोकाला समुद्र, नद्या, खारफुटी जंगलं आहेत. असंख्य बेटांनी व्यापलेलं सुंदरबन आहे. काश्मीरच्या दऱ्यांमध्ये बर्फ आहे. सुंदरबनमध्ये समुद्राचं खारं पाणी आहे. काश्मीरच्या सौंदर्यात डोंगर, फुलांच्या दऱ्या आणि अमरनाथ यात्रा आहे. सुंदरबनच्या सौंदर्यात नद्या, जंगलं, पक्षी, हरिणं आणि रॉयल बंगाल वाघ आहे. या दोन्ही टोकांना जोडणारी एक वेदनादायी गोष्ट आहे. दोन्हीकडे निर्वासित आहेत. काश्मीरमध्ये काश्मिरी पंडित आहेत. सुंदरबनमध्ये मारीचझापीयी मतुआ/नम:शुद्रा आहेत. दोघांनीही घरं गमावली. जमिनी गमावल्या. आठवणी गमावल्या. पिढ्यान्पिढ्या विस्थापनाची वेदना सोसली, पण या दोन निर्वासितांच्या प्रश्नांकडे सरकारने समान नजरेने पाहिलं नाही. एकाला धार्मिक अंगानं बघितले. दुसऱ्याला जातीय मानसिकतेनं पाहिलं. हाच अस्वस्थ करणारा प्रश्न आहे.
फाळणीच्या वेळी मतुआ/नम:शुद्र बहूल हा भाग पाकिस्थानला देण्यात आला. यामुळे या भागातील लोकांवर निर्वासितता ओढावली. ही फाळणीची चूक की उगवलेला सूड..? हा प्रश्न निर्वासितांच्या तिसऱ्या पिढीत आजही धगधगत आहे. काश्मिरी पंडितांचा विस्थापनाचा इतिहासही वेदनादायी आहे. धार्मिक दहशतवाद, धमक्या, हत्या आणि असुरक्षिततेच्या वातावरणामुळे हजारो कुटुंबांना काश्मीर खोरे सोडावं लागलं. त्यांच्या वेदनांना राष्ट्रीय पातळीवर आवाज मिळाला. तसाच प्रत्येक विस्थापिताला आवाज मिळायलाच हवा. प्रश्न एवढाच आहे की, जर एका निर्वासिताच्या वेदनेला राष्ट्रीय स्मृती, राजकीय प्राधान्य, सरकारी पॅकेज, माध्यमांचं लक्ष आणि चित्रपटसृष्टीचा आवाज मिळू शकतो. तर सुंदरबनच्या मतुआ निर्वासितांच्या वेदनेला तितकंच स्थान का मिळू नये? २०१७ मध्ये केंद्र सरकारने संसदेत देशात सुमारे ६२ हजार नोंदणीकृत काश्मिरी स्थलांतरित कुटुंबे असल्याचं सांगितलं होतं. नंतरच्या सरकारी नोंदींमध्येही हजारो स्थलांतरित कुटुंबांची संख्या नमूद करण्यात आली. त्यांच्या पुनर्वसनासाठी आर्थिक पॅकेज, घरं, सरकारी नोकऱ्या, निवासव्यवस्था आणि इतर योजना राबवण्यात आल्या. २००८ मध्ये जाहीर झालेल्या सर्वसमावेशक पॅकेजची किंमत १,६१८ कोटी रुपयांहून अधिक होती. नंतर अतिरिक्त सरकारी नोकऱ्या आणि निवास व्यवस्थेच्या योजनाही जाहीर झाल्या. मग मारीचझापीच्या निर्वासितांसाठी राष्ट्रीय स्तरावर अशीच व्यापक संवेदना कां नाही?
हा प्रश्न विचारताना इतिहासाच्या मागे जावं लागतं. १९४७ मध्ये भारताची फाळणी झाली. नकाशावर एक रेषा ओढली गेली. अन् लाखो लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. पूर्व बंगालमधील मोठ्या संख्येने हिंदूंना भारतात यावं लागलं. त्यात मतुआ समाजातील लोकांची संख्या लक्षणीय होती. त्यांची जमीन तिकडे होती. घरं तिकडे होती. शेती तिकडे होती. पूर्वजांची स्मशानभूमी तिकडे होती, पण राजकीय सीमारेषेने त्यांना अचानक परके ठरवलं. पुढे १९७१ मध्ये बांगलादेश मुक्तिसंग्रामाच्या काळातही मोठ्या प्रमाणावर निर्वासित भारतात आले. या लोकांनी भारताकडे आश्रयासाठी धाव घेतली. त्यांना वाटलं. आपण आपल्या देशात आलो आहोत. इथे तरी माणूस म्हणून जगता येईल, पण त्यांच्या वाट्याला कायमचा स्थैर्याचा सूर्य आलाच नाही. एका छावणीतून दुसऱ्या ठिकाणी. एका पुनर्वसन योजनेतून दुसऱ्या योजनेकडे आणि एका आश्वासनातून दुसऱ्या आश्वासनाकडे त्यांचं जीवन फिरत राहिलं. आजही तिच अवस्था आहे.
या इतिहासात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संदर्भ अत्यंत महत्त्वाचा आहे. बंगालमधील वंचित समाजघटकांशी बाबासाहेबांचं राजकीय नातं होतं. सामाजिक न्याय, प्रतिनिधित्व आणि मानवी प्रतिष्ठेसाठी त्यांनी दिलेला लढा या समाजाला आपला वाटत होता. त्यामुळे मतुआ समाजाच्या इतिहासाकडे केवळ स्थलांतरितांचा इतिहास म्हणून पाहणं योग्य ठरणार नाही. हा सामाजिक बहिष्काराविरुद्धच्या संघर्षाचा, स्वाभिमानाचा आणि समान नागरिकत्वाच्या शोधाचा इतिहास आहे. बाबासाहेबांनी संविधान दिलं ते कोणत्याही एका जातीसाठी किंवा धर्मासाठी नव्हे, तर प्रत्येक माणसासाठी. म्हणूनच आज प्रश्न असा आहे की, बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित असलेल्या वंचित समाजाच्या निर्वासित प्रश्नाला घटनात्मक न्यायाच्या केंद्रस्थानी आणणे. ही काळाची गरज आहे. भारताने चूक केली. त्या चुकीची पावती मतुआ समाजाच्या माथी मारणं ही सरकारची चूक आहे. ते दुबळे आहेत, त्यांचा आवाज नाही त्यामुळे त्यांची उपेक्षा हे बरोबर नाही. तथागत ट्रॅव्हल्सने सुंदरबनची सहल आयोजित केली. त्या सहलीवर २६ऑक्टोंबर-२०२६ मध्ये जाण्याचा योग आला. या सहलीत या प्रश्नाची तीव्रता जाणवली अन् मन दु:खी झालं. पर्यटनाच्या दृष्टीने सुंदरबन अद्भुत आहे. नद्या, समुद्र, खारफुटीची जंगलं, पक्षी, बेटं आणि वाघ पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात, पण या सौंदर्याच्या मागे इतिहासाची एक काळी सावली आहे. मारीचझापी. दंडकारण्यात पाठवण्यात आलेल्या अनेक बंगाली निर्वासितांचे तिथे मन रमले नाही. परिणामी आपल्या मातीत, संस्कृतीत जावे. ही मानसिकता झाली. १९७८ मध्ये सुंदरबन भागातील शंभरांवरील बेटांपैकी मारीचझापी बेट. हे बेट भारतात बंगालच्या सीमेलगत आहे. या बेटावर निर्वासितांनी वस्ती केली. या वस्तीची लोकसंख्या लाखांवर होती. त्यांनी जंगल साफ केलं. तलाव खोदले. मासेमारी सुरू केली. शेती करण्याचा प्रयत्न केला आणि स्वतःच्या हातांनी जीवन उभं करण्यास सुरुवात केली. निर्वासितांना भीक नको होती. त्यांना जगण्यासाठी जमीन हवी होती. श्रम करून जगायचं होतं, पण त्यांच्यासमोर राज्यसत्ता उभी राहिली.
संरक्षित वनक्षेत्र आणि पर्यावरणीय कायद्यांच्या आधारे मारीचझापीतील वस्ती हटवण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यानंतर आपल्याच सरकारने त्यांची नाकेबंदी केली. अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर निर्बंध लावले. आरोग्य सेवाही बंद केली.
निर्वासितांना सोयी सवलती देण्याची गरज होती. त्यांच्या सोबत सरकार क्रूरपणे वागले. या कारवाईत अनेकांचा जीव गेला. अनेक अभ्यासक, प्रत्यक्षदर्शींची कथनं आणि संशोधनपर साहित्य सांगतं. मारीचझापीतील मृतांची संख्या आजही वादग्रस्त आहे. तत्कालीन अधिकृत आकडेवारी आणि प्रत्यक्षदर्शी, संशोधक, पत्रकार यांच्या दाव्यांमध्ये मोठी तफावत आहे. काही सरकारी नोंदींमध्ये मृतांची संख्या अत्यल्प दाखवली. तर विविध संशोधन आणि तोंडी इतिहासांमध्ये हजारो मृत्यूंचे दावे करण्यात आलेत. मृतांची अचूक संख्या आजही वादाचा विषय असणं हीच तर मारीचझापीच्या इतिहासाची वेदना आहे. मृतांची संख्या किती ? यापेक्षा प्रश्न मोठा आहे. त्या लोकांचा आवाज कुठे गेला? त्यांच्या मृत्यूंची स्वतंत्र चौकशी का झाली नाही? बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर प्रयत्न का झाले नाहीत? त्यांच्या कुटुंबीयांच्या साक्षी का नोंदवल्या गेल्या नाहीत? इतिहासाच्या न्यायालयात मारीचझापीचा खटला अजूनही प्रलंबित का आहे?
काश्मिरी पंडितांच्या वेदनेला राष्ट्रीय स्मृती मिळाली. त्यांच्या विस्थापनावर पुस्तके आली, चित्रपट आले, सार्वजनिक चर्चा झाली, संसदेत प्रश्न उपस्थित झाले. त्यांच्या पुनर्वसनासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी विविध योजना राबवल्या. त्यांच्यासाठी सरकारी नोकऱ्या, निवासव्यवस्था आणि आर्थिक मदतीचे कार्यक्रम उभे राहिले. हा न्याय मारीचझापीतील पीडितांना का नाही? ते पीडित नव्हते का? त्यांची घरं घरं नव्हती? त्यांच्या आईंचे अश्रू अश्रू नव्हते? त्यांच्या मुलांचं भविष्य भविष्य नव्हतं? हा प्रश्न विचारल्यावरच न्यायाच्या दोन मापदंडांची शंका निर्माण होते.
भारतीय राज्यघटना आपल्याला याच ठिकाणी आरसा दाखवते. कलम १४ कायद्यापुढे समानता आहे. कायद्याचं समान संरक्षण सांगतं. कलम १५ धर्म, जात, वंश, लिंग आणि जन्मस्थानाच्या आधारावर भेदभाव करण्यास मनाई करतं. कलम १६ सार्वजनिक रोजगारातील समान संधीची हमी देतं. कलम २१ प्रत्येक व्यक्तीला जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार देतं. ही कलमं केवळ न्यायालयाच्या पुस्तकात ठेवण्यासाठी नाहीत. ती सत्तेच्या वर्तनाची कसोटी आहेत. मग एखाद्या विस्थापिताच्या दुःखाकडे पाहताना त्याची जात, आर्थिक स्थिती, राजकीय ताकद, माध्यमांमधील उपस्थिती हा निकष कसा होऊ शकतो? घटनात्मक भारतात पीडिताच्या दुःखाची किंमत समान असली पाहिजे.
भूपेंद्र गणवीर
ज्येष्ठ पत्रकार, नागपूर.
मो. ९८३४२४५७६८