अग्रलेख

अंकल सॅम ‘ तडजोडीवर आले…!

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांच्या भारत दौऱ्याकडे त्या दृष्टीने पाहावे लागेल. हा दोन देशांमधील राजनैतिक कार्यक्रम नाही, तर भारत-अमेरिका संबंधांची दिशा ठरविणारा महत्त्वाचा टप्पा आहे.

अंकल सॅम ‘ तडजोडीवर आले…!

कधी धमक्या, कधी चापलुसी, कधी विनवणी, कधी बढाई आणि अलीकडील काळात तर अप्रत्यक्षपणे थेट सत्तापालटाचा प्रयत्न असे सगळे प्रयोग करूनही भारत सरकार आपल्याला दाद देत नाही हे लक्षात आल्यावर शेवटी ‘अंकल सॅम ‘ अर्थात अमेरिका भारतासोबत तडजोडीवर उतरल्याचे दिसते. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांच्या भारत दौऱ्याकडे त्या दृष्टीने पाहावे लागेल. हा केवळ दोन देशांमधील राजनैतिक भेटीगाठींचा कार्यक्रम नाही, तर भारत-अमेरिका संबंधांची दिशा ठरविणारा महत्त्वाचा टप्पा आहे. व्यापारातील मतभेद, रशियाकडून होणारी तेलखरेदी, संरक्षण सहकार्य आणि जागतिक राजकारणातील बदलत्या समीकरणांच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. अमेरिकन परराष्ट्र मंत्र्यांच्या मुंबईत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी होणाऱ्या चर्चेतून दोन्ही देशांच्या संबंधांतील तणाव कमी होण्याची अपेक्षा आहे.भारत आणि अमेरिका हे दोन्ही देश लोकशाही व्यवस्था, आर्थिक सहकार्य आणि इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सुरक्षेच्या मुद्द्यांवर एकमेकांचे महत्त्वाचे भागीदार आहेत. चीनच्या वाढत्या प्रभावाला संतुलित करण्यासाठीही या भागीदारीचे महत्त्व मोठे आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय राजकारणात मैत्रीचे संबंध केवळ समान विचारांवर टिकत नाहीत, ते परस्परांच्या हितसंबंधांचा आदर करण्यावर टिकतात. भारत-अमेरिका संबंधांमधील सर्वांत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रस्तावित द्विपक्षीय व्यापार करार. दोन्ही देशांमध्ये या करारासाठी चर्चा सुरू असून, त्यातील पहिल्या टप्प्याचे काम अंतिम स्वरूपाकडे जात असल्याचे भारतीय अधिकाऱ्यांनी सूचित केले आहे. मात्र, कराराच्या अटी भारताच्या अर्थव्यवस्थेला आणि देशांतर्गत उद्योगांना कितपत अनुकूल असतील, हा प्रश्न अद्याप महत्त्वाचा आहे. अमेरिकेला भारतीय बाजारपेठेत अधिक वाव हवा आहे, तर भारताला आपल्या शेतकऱ्यांचे, लघुउद्योगांचे आणि देशांतर्गत उत्पादकांचे हित जपायचे आहे. या दोन्ही अपेक्षांमध्ये समतोल साधणे गरजेचे आहे. अमेरिका ही भारतासाठी मोठी निर्यात बाजारपेठ आहे. त्यामुळे व्यापार संबंध मजबूत होणे आवश्यक आहे. परंतु, करार घाईघाईने पूर्ण करण्यापेक्षा तो दीर्घकालीन आर्थिक हित लक्षात घेऊन करणे अधिक महत्त्वाचे आहे. करार झाला म्हणजे यश आणि करार झाला नाही म्हणजे अपयश, असे सरधोपट समीकरण भारताने स्वीकारू नये.रुबियो यांच्या भारत दौऱ्यात मुंबई आणि गुजरातमधील जामनगर या ठिकाणांना महत्त्व देण्यात आले आहे. मूळात या दौऱ्यादरम्यान ते राजधानी दिल्लीत जाणारच नाहीत. मुंबईत व्यापार, गुंतवणूक आणि सामरिक सहकार्याशी संबंधित चर्चा अपेक्षित आहेत, तर जामनगरमधील तेलशुद्धीकरण प्रकल्पाच्या भेटीमुळे ऊर्जा सहकार्याला विशेष महत्त्व मिळाले आहे. रुबियो यांनी नवी दिल्लीऐवजी मुंबईत भारतीय परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा करण्याचे नियोजन केल्यामुळे राजकीय वर्तुळात प्रश्न उपस्थित झाले आहेत. काही विरोधकांनी या व्यवस्थेवर टीका केली आहे. तथापि, केवळ भेटीचे ठिकाण पाहून भारताची प्रतिष्ठा ठरविणे योग्य ठरणार नाही.  राजनैतिक संबंधांमध्ये प्रतीकांना महत्त्व असते, परंतु प्रतीकांपेक्षा प्रत्यक्ष निर्णय अधिक महत्त्वाचे असतात. भारताने या भेटीकडे भावनिक दृष्टिकोनातून नव्हे, तर राष्ट्रीय हिताच्या कसोटीवर पाहिले पाहिजे. भारताच्या परराष्ट्र धोरणासमोरील दुसरे मोठे आव्हान म्हणजे रशियाकडून होणारी तेलखरेदी. भारताची ऊर्जा सुरक्षा ही देशाच्या आर्थिक विकासाशी थेट जोडलेली आहे. स्वस्त आणि विश्वासार्ह ऊर्जा स्रोत मिळविणे ही कोणत्याही सरकारची प्राथमिक जबाबदारी असते. भारताने रशियाकडून तेल खरेदी करण्याचा निर्णय घेताना प्रामुख्याने आपल्या आर्थिक गरजांचा विचार केला  आहे. मात्र, रशियावरील निर्बंधांच्या संदर्भात अमेरिकेने भारतावर अतिरिक्त शुल्क लादण्याची शक्यता व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर व्यापार आणि ऊर्जा सहकार्याचे प्रश्न अधिक गुंतागुंतीचे झाले आहेत. येथे भारताने स्पष्ट भूमिका घेण्याची गरज आहे. अमेरिकेशी मैत्री महत्त्वाची असली, तरी भारताचे ऊर्जा धोरण वॉशिंग्टनच्या राजकीय सोयीवर अवलंबून राहू शकत नाही. भारताला रशियाशी संबंध ठेवण्याचा अधिकार आहे, तसेच अमेरिकेशी आर्थिक आणि सामरिक सहकार्य वाढविण्याचाही अधिकार आहे.भारत-अमेरिका संबंधांचे भवितव्य केवळ व्यापार करारावर अवलंबून नाही. संरक्षण उत्पादन, कृत्रिम बुद्धिमत्ता, महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान, ऊर्जा आणि गुंतवणूक या क्षेत्रांत सहकार्य वाढविण्याची मोठी संधी दोन्ही देशांसमोर आहे.