सरळ- सरळ

भेसळ : प्रश्न माणुसकीचा आणि सामाजिक विश्वासाचा !

भेसळ रोखण्यासाठी मोहीम नको, तर वर्षभर प्रभावी यंत्रणा हवी! कारवाईच्या बातम्यांपेक्षा भेसळ कमी झाल्याचे परिणाम महत्त्वाचे आहेत.

भेसळ : प्रश्न माणुसकीचा आणि सामाजिक विश्वासाचा !

भेसळ हा केवळ अन्नाचा प्रश्न नाही; तो माणुसकीचा आणि सामाजिक विश्वासाचा प्रश्न आहे. अधिक नफ्याच्या हव्यासापोटी दुसऱ्याच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. प्रशासनातील निष्काळजीपणा किंवा भ्रष्टाचारामुळे कारवाईला खीळ बसत असेल, तर जबाबदारीही निश्चित झाली पाहिजे.

ज़रा-से मुनाफ़े के लिए,
इंसानियत को बेचते हैं,
दूसरों की थाली में ज़हर डालकर, 
खुद को कारोबारी कहते हैं!
दिवाळी जवळ आली की खाद्यपदार्थांमधील भेसळीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येतो. मिठाई, दूध, तेल आणि मसाल्यांपासून अनेक पदार्थांमध्ये भेसळ होत असल्याचे उघड होते. छापे पडतात, नमुने तपासले जातात, माल जप्त होतो; पण प्रश्न असा आहे की, भेसळखोरांना कायमचा लगाम घालणार कोण? सणासुदीपुरती कारवाई आणि वर्षभर मोकळे रान, अशी परिस्थिती असेल तर ग्राहकांच्या आरोग्याचे रक्षण होणार कसे?
बाजारात मूळ वस्तू महाग आणि त्यापासून तयार झालेली पावडर स्वस्त, ही बाब विचार करायला लावणारी आहे. हळद गाठीचा दर जास्त असताना हळद पावडर अर्ध्या किंमतीत कशी मिळते? मिरचीचा भाव जास्त असताना तिची भुकटी कमी भावाने कशी विकली जाते? त्यात पुन्हा महागड्या घटकांचा समावेश असलेला गरम मसालाही कमी किमतीत उपलब्ध होतो. लोणच्याबाबतही असेच आहे. या अवास्तव किमतीं मागचे नेमके गणीत काय? प्रक्रिया आणि दर्जामुळे किमतीत फरक पडू शकतो; परंतु अवास्तव स्वस्त दरामागचे कारण शोधणे आवश्यक आहे.
काही मसाल्यांमध्ये निकृष्ट पदार्थ, शेंगदाण्याची व सुर्यफुलाची पेंड किंवा इतर स्वस्त घटक मिसळले जाण्याची शक्यता असते. त्यामुळे खर्च कमी होतो आणि नफा वाढतो. मात्र, नफ्यासाठी ग्राहकांच्या आरोग्याचा बळी देण्याचा अधिकार कुणाला आहे? दुधात भेसळ, मसाल्यांत भेसळ आणि मिठाईत भेसळ असेल, तर सामान्य माणसाने खायचे तरी काय?
दूध उत्पादनासाठी पशुपालन, चारा, देखभाल, वाहतूक आणि वितरण यांवर खर्च होतो. त्यामुळे संशयास्पदरीत्या कमी किमतीत मिळणार्‍या दुधाबाबत ग्राहकांनी सावध राहिले पाहिजे. प्रत्येक स्वस्त वस्तू भेसळयुक्त नसते; पण संशयास्पद उत्पादनांची तपासणी होणे गरजेचे आहे. भेसळ करणार्‍यांसाठी ग्राहकांचे आरोग्य गौण आणि स्वतःचा नफा सर्वाधिक महत्वाचा, ही मानसिकता समाजासाठी घातक आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मागील काही महिन्यांपासून खाद्यपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी प्रयत्न चालविले आहे.  काही मसाल्यांमध्ये मेटानिल यलो, रोडामाइन बी आणि सुदान यांसारख्या प्रतिबंधित रंगांचा वापर गंभीर बाब आहे. लेड क्रोमेटसारख्या विषारी पदार्थांमुळेही आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. विटांची भुकटी, खडू, लाकडाचा भुसा किंवा अन्य अयोग्य घटक मिसळणार्‍यांवर कठोर कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
मात्र प्रत्यक्षात दिवाळीच्या काळात छापे टाकून हे थांबणार नाही. भेसळ रोखण्यासाठी मोहीम नको, तर वर्षभर प्रभावी यंत्रणा हवी! कारवाईच्या बातम्यांपेक्षा भेसळ कमी झाल्याचे परिणाम महत्त्वाचे आहेत.
यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कारवाईतील पारदर्शकता. किती नमुने तपासले, किती नमुने अप्रमाणित आढळले, किती उत्पादकांवर कारवाई झाली आणि किती प्रकरणांत शिक्षा झाली, याची माहिती नागरिकांना मिळाली पाहिजे. केवळ जप्त केलेल्या मालाची आकडेवारी प्रसिद्ध करून प्रशासनाची जबाबदारी तेथे संपत नाही. दोषींना शिक्षा होईपर्यंत पाठपुरावा करणे आवश्यक आहे. मोठ्या व्यावसायिकांपासून छोट्या विक्रेत्यांपर्यंत नियमांची अंमलबजावणी समान पद्धतीने झाली पाहिजे. अन्यथा, कायद्याचा धाक सामान्य विक्रेत्यांपुरताच मर्यादित राहील आणि मोठे भेसळखोर मार्ग काढतील.
ग्राहकांनीही जागरूक राहावे. शक्य असेल तेव्हा अख्खे मसाले घेऊन स्वच्छतेने दळून वापरावेत. पॅकबंद पदार्थांवरील उत्पादकाचे नाव, परवाना क्रमांक आणि मुदत तपासावी. संशयास्पदरीत्या स्वस्त पदार्थ टाळावेत आणि भेसळीचा संशय आल्यास संबंधित अधिकार्‍यांकडे तक्रार करावी.
मात्र, प्रत्येक ग्राहकाला प्रयोगशाळेत तपासणी करूनच वस्तू खरेदी करणे शक्य नाही. त्यामुळे सुरक्षित आणि भेसळयुक्त अन्न उपलब्ध करून देण्याची प्राथमिक जबाबदारी उत्पादक आणि प्रशासनाची आहे. ग्राहकांनी जागरूक राहणे आवश्यक असले तरी सर्व जबाबदारी त्यांच्यावर ढकलून चालणार नाही. अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍यांना कायद्याचा धाक वाटला पाहिजे. ग्राहकांच्या तक्रारींची तातडीने दखल घेतली गेली पाहिजे आणि दोषी आढळणार्‍यांच्या आर्थिक ताकदीचा व राजकीय प्रभावाचा विचार न करता त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.
शेवटी, भेसळ हा केवळ अन्नाचा प्रश्न नाही; तो माणुसकीचा आणि सामाजिक विश्वासाचा प्रश्न आहे. अधिक नफ्याच्या हव्यासापोटी दुसर्‍याच्या आरोग्याशी खेळणार्‍यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. प्रशासनातील निष्काळजीपणा किंवा भ्रष्टाचारामुळे कारवाईला खीळ बसत असेल, तर जबाबदारीही निश्चित झाली पाहिजे.
मुनाफ़े के लिए किसी की जान से खिलवाड़ न हो,
हर थाली में ज़हर नहीं, सेहत का उपहार हो!

 

डॉ. राजेश राजोरे
मो. ९८२२५९३९०३
rajeshrajore@gmail.com
-खामगाव, जि. बुलडाणा. 
(लेखक हे दैनिक देशोन्नतीच्या बुलडाणा आवृत्तीचे संपादक
तसेच पत्रकारितेत पीएच.डी.पदवी प्राप्त आहेत.)