भारतात एक राजकीय सहिष्णूतेची महान अशी परंपरा आहे. लोकशाहीत सत्ताधारी बहुमताच्या जोरावर आपल्या विचारसरणीनुसार सरकारची धोरणे राबवते, विरोधक त्या धोरणांना विरोध करतात आणि सामान्य जनता या दोहोंपेक्षाही वेगळाच सूर लाऊ शकते. या तिन्ही प्रवाहांचे अस्तित्व हेच लोकशाहीचे सौंदर्य आहे! यातील एखादा प्रवाह जर नसला तर (खरा प्रामाणिक) सत्ताधारी अस्वस्थ झाला पाहिजे, पण हे तेव्हाच घडू शकेल जेव्हा त्या सत्ताधाऱ्यांच्या रक्तामध्ये लोकशाही वाहत असेल!
सध्या नवी दिल्लीला लष्करी छावणीचे स्वरूप आले आहे. राजधानीसह देशभरात आंदोलक विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांसाठी निदर्शने व आंदोलनांचे हत्यार उपसलेले आहे. दिल्लीत अमित शाहांचे ५०,००० सशस्त्र पोलीस तैनात आहेत, कारण दिल्ली पोलीस हे थेट केंद्राच्या अखत्यारित काम करते. तिरंगा फडकवणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी अटकही केली आहे.
(सध्यातरी) मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना त्या पदावरून हटवण्याच्या एका मुख्य मागणीसाठी हे आंदोलन चालू आहे. तर, हे आंदोलन म्हणजे अराजकता माजविण्याचा प्रयत्न आहे व यामागे विदेशी ताकद आहे, असे मोदी-वादी मंडळीचे म्हणणे आहे. आपण फक्त या दोनपैकी“वास्तव” काय ? हे समजून घेऊ.
लोकशाहीमधे जन-आंदोलने नित्याची असतात किंबहुना लोकशाहीच्या हृदयाची ती स्पंदनेच म्हणावीत. लोकशाहीवर (खरी) श्रद्धा असलेले नेते, जनक्षोभाकडे लोक-प्रतिक्रियेचा उपयुक्त स्रोत(source of feedback) म्हणून पहात असतात, अशी अनेक उदाहरणे प्रगल्भ भारतीय लोकशाहीच्या इतिहासात नोंदली गेली आहेत. पण, तेव्हा कोणत्या नेत्याने अशा आंदोलनांना “अराजकता” म्हटले नाही. इंदिरा गांधींविरूद्ध तर, जयप्रकाश नारायण यांनी थेट सैन्यदलांस “सरकारचे आदेश पाळू नका” हे म्हणायलाही कमी केले नव्हते, तरीसुद्धा त्याला भारतीयांनी “अराजकता” म्हटले नाही. आणि हो, मोदीजी तुमचा पक्ष सैन्याने सरकारचे आदेश पाळू नये असे म्हणणाऱ्यांच्या बाजूने उभा होता! तेव्हा ती “अराजकता” नव्हती का?
१९५५ ला सेनापती बापट आणि एस. एम. जोशी जेंव्हा एरवडा जेलमध्ये उपोषणाला बसले, तेंव्हा नेहरूजी स्वत: जेलमध्ये जाऊन त्यांना भेटले व आपली भूमिका मांडली. नागा लिडर फिझो हे जेंव्हा आंदोलनास बसले तेंव्हा नेहरूजी आपला अहंगंड मधे न आणता ४ वेळा त्यांना भेटले व समजूत काढण्याचा प्रयत्न केला. १९५७ ला कलकत्याच्या धान्य आंदोलकांना नेहरूजी जाऊन भेटले आणि मागण्या मान्यही केल्यात.
१९६६ चे पंजाब विभाजन असो की आसामचा प्रश्न असो, इंदिराजींनी जीवाची पर्वा न करता थेट आंदोलकांशी संवाद करून प्रश्न हाताळले.
महाराष्ट्रात अत्यंत जहाल जांबुवंतराव धोटेंना वसंतराव नाईकांनी थेट आंदोलनस्थळी जाऊन त्यांच्या मांडीलामांडी लावून मागण्यांसाठी चर्चा
केली, तेव्हा सौजन्याने अवघे चित्रच पालटवले!
मोदीजी, तुम्ही समोर येत उत्तरे का देत नाहीत? देश पेटतोय आणि तुम्ही कुठे आहात?
भारतात एक राजकीय सहिष्णूतेची महान अशी परंपरा आहे. लोकशाहीत सत्ताधारी बहुमताच्या जोरावर आपल्या विचारसरणीनुसार सरकारची धोरणे राबवते, विरोधक त्या धोरणांना विरोध करतात आणि सामान्य जनता या दोहोंपेक्षाही वेगळाच सूर लाऊ शकते. या तिन्ही प्रवाहांचे अस्तित्व हेच लोकशाहीचे सौंदर्य आहे! यातील एखादा प्रवाह जर नसला तर (खरा प्रामाणिक) सत्ताधारी अस्वस्थ झाला पाहिजे, पण हे तेव्हाच घडू शकेल जेव्हा त्या सत्ताधाऱ्यांच्या रक्तामध्ये लोकशाही वाहत असेल! नाईलाज म्हणून जेव्हा सत्ता मिळवण्यासाठी, (खोटी खोटी) घटनेची शपथ घ्यावी लागते, पण प्रत्यक्ष मात्र त्यांना ही लोकशाही “दळभद्री” वाटते त्यांना कधीही लोकशाहीतील आंदोलनांचे हे महत्त्व कळणार नाही. तुमचा पक्ष तर आर.एस.एस. चे अपत्य आहे, ज्याचे सरसंघचालक राजेशाहीसारखे मरेपर्यंत गादीवर राहतात, तुम्हाला लोकशाहीचे मूल्य कळावे अशी अपेक्षा तरी कशी करावी?
मोदीजी, ही तरुण मुले-मुली अति उच्चशिक्षित आहेत. यांना सहजासहजी कोणी बहकावून वापरू शकेल एवढे ते अनपढ नाहीत. तरुण एवढे चवताळून आंदोलनाला सज्ज झालेत या मागील सत्य तसे तुम्हाला माहीत आहेच, पण हे आंदोलन जास्त चिघळू न देता, लवकर संपवणे फक्त तुमच्याच हातात आहे, तेच तुम्ही करावे!
कोणताही प्रामाणिक माणूस छलकपट आणि कारस्थान करून निवडणूक जिंकायचा प्रयत्न करत नसतो, तुमचा ज्ञानेशच्या बदमाशांमागे जर हात नसेल तर, त्याला जनक्षोभाला सामोरे जाऊ द्या ना? “स्वायत्त”पणे उत्तरे दे म्हणा!
या तरुण आंदोलकांना ज्ञानेशकुमार देशाचा व लोकशाहीचा दुश्मन का वाटतो? आणि, ज्ञानेशकुमार गुप्ता हा प्रामाणिक आहे असे आपणास का वाटते? - या दोन्ही प्रश्नांची उत्तरे सरकार म्हणून तुम्ही व आंदोलकांनी या देशातील जनतेला दिलीच पाहिजेत. ती उत्तरे तुम्ही व अभिजित दिपकेंकडून अपेक्षित आहेत.
वर उल्लेख केलेले देशाचे थोर नेते आंदोलनास सामोरे गेले, त्यांची बाजू समजून घेतली आणि आपली भूमिका समजावून सांगितली, तसेच आता तुम्हीही केले पाहिजे!
आता आंदोलकांना कोणत्या घटनांच्या आधारे ज्ञानेशकुमार आक्षेपार्ह वाटतो ते पाहू आणि आंदोलकांचा तो गैरसमज सरकार म्हणून तुम्ही कसा खोडून काढू शकाल? ते आपण पाहू या.
(१) मुळात या ज्ञानेशकुमारची नेमणूक कशी झाली? सर्वोच्च न्यायालयाच्या ५ न्यायाधीशांचे पूर्णपीठ,”प्रधानमंत्री, विरोधी पक्ष नेता आणि सरन्यायाधीश या ३ जणांची समिती निवडणूक आयुक्तांची नेमणूक करेल”- असा निर्णय देते, त्याला फिरवून (व त्याविरूद्धची याचिका दीर्घ काळ प्रलंबित ठेवून-)सरन्यायाधीशांना निवड समितीमधून काढून, त्याऐवजी अमित शाह यांना आणण्यामुळे मोदी-शाह हे दोघेच जो ठरवतील तो मुख्य निवडणूक आयुक्त होणार! ही स्थिती ज्ञानेशची नेमणूक “पूर्ण पीठाच्या घटनात्मक निवाड्याच्या विरोधातील असेल ती लोकशाही व घटनेच्या आशया (spirit) विरूद्ध असल्याने“प्रामाणिक” म्हणावी की, “बेईमानीची”?
मोदीजींची भूमिका:- होय, सरकारने जे काही केले ते योग्यच होते! हे मोदीजींनी आंदोलकांना भेट देऊन पटवून द्यायला काय हरकत आहे?
(२) ज्ञानेशकुमारला जी माहिती मागितली ती त्यांना द्यावी लागू नये यासाठी नियमात बदल करून सरकारने त्यांना मदत केली. ही माहिती देण्यामुळे देशावर कोणते संकट कोसळणार होते? ही लपवालपवी करण्यास सरकारकडून ज्ञानेशकुमारांना का मदत करण्यात आली? हा आंदोलकचा सवाल आहे!
मोदींची भूमिका:- हे करताना देशहितासाठीच ही लपवालपवी करणे आवश्यक होते ही गोष्ट मोदीजींनी आंदोलकांना भेटून पटवून द्यावी!
(३) प.बंगालमधे लाखो नावे वगळून निवडणूक पार डल्यानंतर “ती” सर्व नावे पुन्हा मतदारयादी मध्ये पूर्ववत घातली गेली, अर्थात तिथे मोदींचा पक्ष सत्तेत आला, हे ज्ञानेशचे कारस्थानच!
मोदींची भूमिका:- हा केवळ योगायोग होता व हे कृत्य ज्ञानेशकुमारला मोदी-शाहांनी कायदा आणून नेमल्याच्या उपकारांची परतफेड नव्हती हे मोदीजींनी आंदोलकांना भेटून पटवून द्यावे!
(४) कायद्याने मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना जे पदसिद्ध अधिकार आहेत ते केंद्रीय पातळीवर
घेऊन थेट वगळणे/वाढवणे हे ज्ञानेशकुमारचे कृत्य गुन्हेगारी स्वरूपाचे असून केवळ मोदींनी कायद्याने त्यांना immunity दिल्यामुळेच ते हे करू शकले, हे कारस्थान आहे हे आंदोलकांना वाटते.
मोदींची भूमिका:- ते करण्यास सरकारकडून मदत झाली नाही, हे मोदीजींनी आंदोलकांना भेटून पटवून द्यावे.
(५)तिन्ही निवडणूक आयुक्त समान दर्जाचेच असताना, २ जणांनी आम्हाला अंधारात ठेवले व ज्ञानेशकुमारांनीच निर्णय घेतले अशी तक्रार केली, पण ज्ञानेशकुमारला immunity चे जे वरदान दिले त्यामुळे त्यांनी थेट दुर्लक्ष करायचे आणि ते “स्वायत्त”आहेत ही सबब वापरून पुढे गप्प बसायचे! या तंत्राने भारतातील निवडणूक तंत्र भ्रष्ट करण्याचे कारस्थान देशविरोधी आहे!
मोदींची भूमिका:-हे असे नाही, ही गोष्ट मोदींनी आंदोलकांना भेटून पटवून द्यावी.
वरीलप्रमाणे एकूण ज्ञानेशकुमार हे देशाच्या निवडणूक प्रक्रियेला बेकायदेशीरपणे वापरून
पक्षपातासह गुन्हेगारी कृत्य करत आहेत, असा माणूस देशहिताचा नाही म्हणून हटवला पाहिजे.
(६) याशिवाय, डाटा केवळ ४५ दिवसांत नष्ट करण्याचे काहीच कारण नसताना तसे करणे हे “पुरावा नष्ट करण्याचे” गुन्हेगारी कृत्य आहे.
वरील सर्व वास्तवांच्या आधारे, आपला देश व देशाचा प्राण असलेली निवडणूक यंत्रणा जर राखण्यासाठी तरुण पुढे आलेत तर त्यामध्ये काय वावगे आहे? हीच तर देशभक्ती आहे!
मोदींची भूमिका:- हे तरुण आंदोलक विदेशी ताकदीवर (सी.आय.ए.)काम करतात असा तुमच्या लोकांचा दावा आहे. तुमची आणि ट्रम्प यांची घनिष्ठ मैत्री आहे, असाही दावा करण्यात येतो. शिवाय ईस्रायलशी तुमचे व्यक्तिगत खूप चांगले संबंध आहेत. शिवाय, तुमच्या हातात रॉ आहे, आयबी आहे, सीबीआय आहे ईडी आहे!
हे सर्व कामाला लावा! आणि या आंदोलकांची माहिती देशासमोर उघड करा, अन्यथा कोणी मोदीविरूद्ध बोलले की, विदेशी/अर्बन नक्षल/ किंवा देशद्रोही म्हणण्याची युक्ती आता पुरे! हे बिनबुडाचे व खोटे बोलणे हास्यास्पद दिसते!
बरे, समजा आंदोलकांनी अशा आंदोलनाच्या मार्गाने नव्हे तर, वेगळ्या मार्गाने जायला हवे होते असा सल्ला काही “मोदी-वादी” अत्यंत हुशारीने देतात! तेव्हा त्यांना खात्री असते की आपल्या “हुशार” माणसाने एवढा बंदोबस्त तर नक्कीच करून ठेवला आहे की, उद्धव ठाकरेंसारखे वर्षानुवर्षे खेपा मारत बसले तरीही “वही होता है जो मंजूर ए मोदी होता है॥” म्हणूनच थेट रस्त्यावर उतरून जाब विचारण्याशिवाय दुसरा काहीही पर्यायच उरलेला नाही ! कदाचित याचं औषध “बसवलेल्या” लोकांना देता येणार नाही हीच सत्ताधारी लोकांची गोची आहे! म्हणूनच “कोर्टात जा की!” हा कुत्सित सल्ला देणारे, आंदोलनानंतर मात्र चवताळलेले दिसतात! आणि, वरील गंभीर (चुका नव्हे) गुन्ह्यांबाबत तुम्ही ज्ञानेशबरोबर नसाल तर… तुमच्या पक्षाने “स्वायत्त” ज्ञानेशकुमार विरूद्ध आंदोलनामध्ये उतरून व महाभियोग आणून ग्यानेशकुमारला हाकलून देशभक्ती सिद्ध करावी!
या परिस्थितीत मोदीजी, तुम्ही पुढे येऊन तुमची बाजू देशासमोर मांडावी, आंदोलकांनीही त्यांची बाजू देशासमोर मांडावी, आणि त्यानंतर लोकच ठरवतील की, तुम्हा दोघांपैकी देशभक्त कोण? आणि देशद्रोही कोण? आणि, ते काम तुम्ही दोघेही करू नका, सार्वभौम जनतेला करू द्या!
पुरुषोत्तम गावंडे
मो.नं. ७९७७१६३७७४