देशभर मतचोरीचे आरोप गाजत आहेत. विविध राज्यातून तशा बातम्या आहेत.हे निवडणूक यंत्रणेच्या मदतीने घडल्याचे आरोप आहेत. यातून निष्पक्षतेवर प्रश्न निर्माण झाले.विरोधात आंदोलने सुरू झाली. त्या आंदोलनाच्या अधिकारावर निर्बंध लावले. यातून लोकशाहीच्या विश्वासार्हतेचा प्रश्न उभा ठाकला. संविधानाच्या अनुच्छेद १९(१)(अ) मध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा, तर अनुच्छेद १९(१)(ब) मध्ये शांततामयरीत्या एकत्र येण्याचा अधिकार आहे. आंदोलक देशाचे शत्रू नाहीत.
भारत लोकशाही देश. संविधानाने मतदानाचे आणि अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य दिले. त्यांच्या रक्षणासाठी यंत्रणा दिल्या. त्या निष्पक्ष असाव्यात. त्यात सरकारी हस्तक्षेपही नको. मात्र देशात नेमके उलटे चालल्याचा आरोप आहे. सध्या मतचोरी आणि अभिव्यक्तीवरील निर्बंध विरोधी वादळ आहे. सरकार संकटात आहे. तर्कवितर्कांचा महापूर आहे.
लोकशाहीचे सौंदर्य सत्ताधाऱ्यांच्या जयजयकारात नाही. प्रश्न विचारणाऱ्या निर्भय आवाजात असते. लोकशाहीचे सामर्थ्य विरोधकांचा आवाज ऐकण्यात असते. तो दाबण्यात नाही. मत मांडण्याचे स्वातंत्र्य. विरोध करण्याचा अधिकार. शांततामय आंदोलनाची मुभा. हे लोकशाहीचे प्राण आहेत. आंदोलनकाऱ्यांचा आवाज ऐकण्या ऐवजी रेल्वेगाड्या बंद करणे. मेट्रो बंद करणे. रस्त्यांवर अडथळे उभे करणे. आंदोलकांना आंदोलनस्थळी पोहोचण्या पूर्वीच ताब्यात घेणे. असे प्रकार घडत असतील, तर लोकशाहीच्या प्रकृतीची चिंता वाटते. सत्तेच्या विरोधातील आवाज रोखण्याच्या प्रयत्नांमुळे देशाच्या लोकशाही प्रतिमेवर प्रश्न उपस्थित झाले. लोकशाही म्हणजे पाच वर्षांनी मतदान करणे. त्यानंतर सरकारच्या प्रत्येक निर्णयापुढे मान झुकवणे नव्हे. सरकारच्या धोरणांवर प्रश्न विचारता येणे. अन्याया विरुद्ध संघटित होता येणे. ही लोकशाहीचीच लक्षणे आहेत. मतदानातून सरकार निवडले जाते. अभिव्यक्ति स्वातंत्र्यातून त्याला उत्तरदायी ठेवले जाते. एका अधिकाराचा गौरव करून दुसऱ्याचा संकोच करणे म्हणजे लोकशाहीचा आत्माच नाकारणे होय.
देशभर मतचोरीचे आरोप गाजत आहेत. विविध राज्यातून तशा बातम्या आहेत.हे निवडणूक यंत्रणेच्या मदतीने घडल्याचे आरोप आहेत. यातून निष्पक्षतेवर प्रश्न निर्माण झाले.विरोधात आंदोलने सुरू झाली. त्या आंदोलनाच्या अधिकारावर निर्बंध लावले. यातून लोकशाहीच्या विश्वासार्हतेचा प्रश्न उभा ठाकला. संविधानाच्या अनुच्छेद १९(१)(अ) मध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा, तर अनुच्छेद १९(१)(ब) मध्ये शांततामयरीत्या एकत्र येण्याचा अधिकार आहे. आंदोलक देशाचे शत्रू नाहीत. ते देशाचे नागरिक आहेत. संविधानाने दिलेल्या अधिकारांचा वापर करून सत्तेला जाब विचारत असतात. सरकार आणि देश या दोन वेगळ्या संकल्पना आहेत. सरकार बदलते. देश कायम राहतो. सरकारच्या निर्णयावर टीका करणे देशद्रोह नाही. दिल्लीतील जंतर-मंतरवर जेन-झी या नव्या पिढीतील तरुण आंदोलनासाठी एकत्र येतात. तेव्हा कायदा आणि सुव्यवस्था राखणे प्रशासनाचे काम आहे. त्यासाठी आंदोलनाचा अधिकारच निष्प्रभ करणे योग्य नाही. २०१९ मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये असे निर्बंध लादले होते. त्या निर्बंधांची आठवण जतंरमतंर वरील उपाययोजनांमुळे झाली. दोन्ही ठिकाणची परिस्थिती समान नव्हती . शांततामय आंदोलनाला हिंसक चौकटीतून पाहणे योग्य नाही. आंदोलकांना ताब्यात घेताना कायदेशीर प्रक्रिया पाळली का? कारवाईची कारणे स्पष्ट केली का ? संबंधितांना न्यायालयीन दाद मागण्याची संधी मिळाली का? याची उत्तरे प्रशासनाने द्यायला हवीत. सरकार विरोधी घोषणा दिल्या. धोरणांवर टीका केली म्हणून नागरिकांना मनमानी पद्धतीने रोखता येत नाही.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या लोकपाल आंदोलनाची तुलना आजच्या जेन-झी आंदोलनाशी केली जाते. रामलीला मैदानावर लोक मोठ्या संख्येने एकत्र आले होते. तेव्हा आंदोलन स्थळी येण्यास मज्जाव नव्हता. निर्बंध नव्हते. लोकशाहीतील अधिकार ,अभिव्यक्ती, पक्ष, विचारधारा सत्ताधाऱ्यांशी असलेल्या जवळीकीनुसार बदलता येत नाहीत. आपल्या विचारांशी सहमत असणाऱ्यांना आंदोलनाची मुभा. अन् विरोधकांना अडथळे. ही लोकशाही नव्हे. तो निवडक न्याय आहे. सरकारकडे पोलीस दल, प्रशासकीय यंत्रणा आणि कायद्याची अंमलबजावणी करण्याचे अधिकार असतात. आंदोलकांकडे त्यांचे प्रश्न, घोषणा आणि सामूहिक उपस्थिती हेच प्रमुख साधन असते. या असमान ताकदीचा विचार करून प्रशासनाने अधिक संयम दाखवणे आवश्यक आहे.
पोलिसांनी आणि आंदोलकांनी परस्परांचे शत्रू बनण्या ऐवजी संवादातून मार्ग काढला पाहिजे. शांततामय आंदोलनाचे संरक्षण करणे. सुव्यवस्था राखणे. या दोन्ही जबाबदाऱ्या एकाच वेळी पार पाडता येतात. देशातील मतचोरीच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी व्हावी. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या भूमिकेविषयी प्रश्न आहेत. तर त्यांची उत्तरे मिळाली पाहिजेत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या यंत्रणांकडून चिंता व्यक्त केली जाणेही महत्त्वाचे आहे. मानवी हक्कांच्या जागतिक चौकटीत अभिव्यक्ति स्वातंत्र्य आणि शांततामय आंदोलन एकत्र येण्याच्या अधिकाराला महत्त्व आहे.
या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाची भूमिकाही महत्त्वाची ठरते. नागरिकांचे अधिकार धोक्यात असताना वेळीच हस्तक्षेप होणे आवश्यक असते. अन्याय झाल्यानंतर मिळालेला दिलासा आणि अन्याय सुरू असतानाच मिळालेले संरक्षण यांत मोठा फरक आहे. न्याय व्यवस्थेचा सन्मान नागरिकांच्या घटनात्मक अधिकारांचे वेळेवर संरक्षण करण्यात असतो. ‘देर आये, दुरुस्त आये’ असे म्हणण्याची वेळ येऊ नये. इतकी तत्परता न्याय व्यवस्थेकडून अपेक्षित आहे. आंदोलना दरम्यान तरुणी आणि महिला आंदोलकांशी पोलिसांची झटापट झाल्याचे दाखवणाऱ्या चित्रफिती समाज माध्यमांवर फिरत आहेत. त्यांची स्वतंत्र पडताळणी व्हावी.
कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्यांनाही कायद्याच्या चौकटीतच काम करावे लागते. या सगळ्या घटनांमध्ये प्रसार माध्यमांची भूमिकाही महत्त्वाची आहे. माध्यमांनी सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेलाच प्राधान्य देऊन आंदोलकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले, तर माध्यमांच्या निष्पक्षतेवर प्रश्न उपस्थित होतात. ‘गोदी मीडिया’ हा शब्द अशाच पक्षपातीपणाच्या आरोपांतून प्रचलित झाला. लोकशाहीच्या चौथा स्तंभाने सरकारची प्रसिद्धी यंत्रणा बनू नये.
लोकांच्या प्रश्नांना स्थान देणे. ही स्वतंत्र पत्रकारितेची खरी कसोटी आहे. जेन-झीच्या नव्या पिढीला रोजगार आणि शिक्षणाची चिंता आहेच. पण संविधानाने दिलेले अधिकार प्रत्यक्षात किती प्रभावी आहेत. सरकारवर टीका करण्यासाठी किती मोकळीक आहे. निवडणूक प्रक्रियेवर किती विश्वास ठेवता येतो याचीही चिंता आहे. त्यांना स्वतंत्र प्रसार माध्यमें, निष्पक्ष न्याय व्यवस्था आणि निर्भय नागरिक असावेत असे वाटते. मतभेद असतानाही एकमेकांना आपले म्हणणे मांडू देणे, हीच स्वातंत्र्याची खरी ओळख आहे. सत्ताधाऱ्यांशी सहमत असणाऱ्यांना मोकळीक आणि विरोधकांना अडथळे, अशी व्यवस्था संविधानाच्या मूलभूत भावनेशी विसंगत ठरते. लोकशाहीचे सौंदर्य नागरिकांच्या चेहऱ्यावरील निर्भयतेत असते. प्रश्न विचारल्यामुळे नोकरी जाईल. आंदोलनात सहभागी झाल्यामुळे कारवाई होईल. सरकारवर टीका केल्यामुळे अडचणीत यावे लागेल.
अशी भीती लोकांच्या मनात निर्माण झाली. तर स्वातंत्र्याला अर्थ नाही. सत्ताधाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी. बॅरिकेड्स उभारून विचारांना कैद करता येत नाही. रेल्वेगाड्या थांबवता येतील.रस्ते अडविता येतील. आंदोलकांना ताब्यात घेता येईल. पण असंतोषाची कारणे नाहीशी करता येणार नाहीत.
जनतेच्या प्रश्नांना उत्तर दिल्या शिवाय अस्वस्थता संपणार नाही. सरकारचे सामर्थ्य विरोधकांना गप्प करण्यात नसते. तर त्यांचे म्हणणे ऐकून घटनात्मक मार्गाने प्रश्न सोडवण्यात असते. न्याय व्यवस्थेची प्रतिष्ठा वेळेवर न्याय देण्यात. माध्यमांची प्रतिष्ठा सत्तेला सत्याचा आरसा दाखवण्यात. सरकारची प्रतिष्ठा नागरिकांच्या अधिकारांचे संरक्षण करण्यात असते. लोकशाही जिवंत ठेवायची असेल, तर आवाज दाबण्या ऐवजी प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. तरुणांना रोखण्या ऐवजी त्यांचे म्हणणे ऐकावे लागेल. संविधानाच्या जयजयकार पेक्षा त्याने दिलेल्या स्वातंत्र्याचे प्रत्यक्ष संरक्षण करावे लागेल. आवाज दाबून तात्पूरती शांतता दिसेल. मात्र लोकशाही जिवंत ठेवता येणार नाही!
भूपेंद्र गणवीर
ज्येष्ठ पत्रकार, नागपूर.
मो. ९८३४२४५७६८