सरळ- सरळ

शिक्षकांच्या समस्यांचा वाली कोण?

महाराष्ट्रातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकांच्या निमित्ताने शिक्षकांचे प्रश्न पुन्हा चर्चेत आले आहेत. या निवडणुका पक्षीय चिन्हांवर नाहीत मात्र राजकीय पक्षांचे अधिकृत उमेदवार मैदानात आहेत.

शिक्षकांच्या समस्यांचा वाली कोण?

शिक्षकांच्या समस्यांचा वाली कोण? हा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. शिक्षकांना आश्वासने नकोत, तर त्यांच्या प्रश्नांवर ठोस निर्णय हवेत. कारण शिक्षक सक्षम असेल, तरच शिक्षण व्यवस्था सक्षम होईल आणि विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल बनेल.

शिक्षक के हाथों में 
देश का भविष्य होता है,
फिर क्यों वही शिक्षक 
समस्याओं से मजबूर होता है?
महाराष्ट्र राज्यातील शिक्षण व्यवस्थेची एकूणच अवस्था बिकट होत चालल्याचे अनेक बाबींवरून स्पष्ट होते. राज्यातील हजारो मराठी शाळा बंद झाल्या असून अनेक शाळांमधील विद्यार्थिसंख्याही मोठ्या प्रमाणात रोडावली आहे. मराठी शाळांचे अस्तित्व टिकविण्याचे आव्हान असतानाच शिक्षक, संस्थाचालक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या समस्याही गंभीर बनल्या आहेत. 
महाराष्ट्रातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकांच्या निमित्ताने शिक्षकांचे प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या निवडणुका पक्षीय चिन्हांवर नाहीत मात्र राजकीय पक्षांचे अधिकृत उमेदवार मैदानात आहेत. काही उमेदवार प्रत्यक्ष शिक्षक आहेत, तर काहींचा अध्यापन क्षेत्राशी थेट संबंध नाही. असे असले तरी शिक्षकांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडून येणार्‍या व्यक्तीकडून शिक्षकांना मोठ्या अपेक्षा असतात.
गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षक आमदारांकडून विविध आश्वासने दिली जातात. शिक्षकांच्या मागण्या शासनदरबारी मांडल्या जातील आणि त्यांची सोडवणूक केली जाईल, असे सांगितले जाते. मात्र, अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित राहतात. त्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजी वाढत आहे. काही ठिकाणी संस्थाचालकांचाही रोष पाहायला मिळतो.
शिक्षण संस्थाचालकांसमोरही अनेक अडचणी आहेत. शासनाचे बदलते धोरण, विविध शासन निर्णय (जीआर), वेळोवेळी निघणारे आदेश आणि आर्थिक तरतुदींमधील अनिश्चितता यामुळे संस्थांचे व्यवस्थापन करणे कठीण होत आहे. वेतनेतर अनुदान वेळेवर मिळत नसल्याने आर्थिक नियोजन कोलमडते. शाळांच्या इमारतींची देखभाल, शैक्षणिक साहित्य, वीजबिल आणि कर्मचार्‍यांचे वेतन यांसारखे खर्च भागविण्याचे आव्हान संस्थांसमोर उभे राहते.
दुसरीकडे, मराठी शाळांमधील विद्यार्थिसंख्या कमी होत असून इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे पालकांचा कल वाढत आहे. विद्यार्थ्यांचा कल बदलत आहे. कला शाखा बंद पडण्याच्या अवस्थेत आहेत. अनेक संस्थांना शाळा चालविणे कठीण झाले आहे. अनुदानित, विनाअनुदानित,  अंशतः अनुदानित, २० टक्के आणि ४० टक्के अनुदानाच्या टप्प्यात अडकलेल्या शाळा तसेच अल्पसंख्याक संस्थांच्या मान्यताप्राप्त शाळा अशा विविध स्तरांवर वेगवेगळ्या समस्या आहेत. परिणामी, शिक्षक आणि संस्थाचालक दोघेही अडचणीत आहेत.
शिक्षकांच्या सर्वाधिक महत्त्वाच्या समस्यांपैकी एक म्हणजे त्यांच्यावर सोपविली जाणारी अशैक्षणिक कामे. शिक्षकांचे मुख्य काम विद्यार्थ्यांना शिकविणे, त्यांच्यात विचारक्षमता विकसित करणे आणि त्यांना जबाबदार नागरिक म्हणून घडविणे हे आहे. मात्र, निवडणूकविषयक कामे, सर्वेक्षणे, माहिती संकलन आणि विविध प्रशासकीय जबाबदार्‍यांमुळे अध्यापनासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. शिक्षकांना शिकविण्यापेक्षा इतर कामांतच गुंतवून ठेवले, तर शैक्षणिक गुणवत्तेची अपेक्षा कशी पूर्ण होणार?
जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणीही अनेक शिक्षकांसाठी महत्त्वाचा विषय आहे. निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षितता मिळावी, ही त्यांची अपेक्षा आहे. याशिवाय, टप्प्याचे अनुदान वेळेवर न मिळणे, वेतनातील अनिश्चितता आणि सेवाविषयक प्रश्न यांमुळे शिक्षक आर्थिक अडचणीत सापडतात.
 स्वयं अर्थसहाय्य इंग्रजी शाळांना सर्रास मान्यता दिली जाते, मात्र तेथील शिक्षकांना अत्यल्प पगार असतो. तर भविष्याची सुरक्षितता नसते. एकूणच सर्व समस्यांचा परिणाम शिक्षकांच्या राहणीमानावर आणि मानसिक स्वास्थ्यावर होतो. विविध समस्यांमुळे शिक्षक मानसिकदृष्ट्या थकले असल्याचे जाणवते. अनेक शिक्षकांना आजार लागले आहेत. शिक्षकांच्या आत्महत्यांच्या घटना ही चिंतेची बाब आहे. प्रत्येक घटनेमागील कारण वेगळे असू शकते; मात्र अशा घटनांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. शिक्षकांना आर्थिक सुरक्षितता, मानसिक आधार आणि सन्मानाने काम करण्यासाठी पोषक वातावरण मिळणे आवश्यक आहे.
शिक्षक आणि संस्थाचालकांच्या समस्यांमागे शासनाच्या शिक्षणविषयक धोरणांचीही महत्त्वाची भूमिका आहे. शिक्षक आमदार आणि शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींना सोबत घेऊन शासनाने किती वेळा प्रश्न सोडविण्यासाठी ठोस प्रयत्न केले, याचा आढावा घेणे गरजेचे आहे. बैठका, निवेदने आणि आश्वासने यापलीकडे जाऊन प्रत्यक्ष निर्णय होणे महत्त्वाचे आहे. शासनाने शिक्षक, संस्थाचालक आणि संघटनांच्या प्रतिनिधींसोबत नियमित चर्चा करून प्रत्येक समस्येच्या निराकरणासाठी कालमर्यादा निश्चित करावी. कोणता प्रश्न सुटला आणि कोणता प्रलंबित आहे, याची स्पष्ट माहितीही द्यावी.
एकूणच, शिक्षक आमदारकीच्या निवडणुकांमुळे शिक्षकांच्या समस्या पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्या आहेत. शिक्षकांच्या समस्यांचा वाली कोण?  हा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. शिक्षकांना आश्वासने नकोत, तर त्यांच्या प्रश्नांवर ठोस निर्णय हवेत. कारण शिक्षक सक्षम असेल, तरच शिक्षण व्यवस्था सक्षम होईल आणि विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल बनेल. शेवटी या आशयाचा एक शेर आठवतो....
वादों से नहीं, काम से पहचान होनी 
चाहिए, शिक्षक के हर सवाल
 का समाधान होना चाहिए।

डॉ. राजेश राजोरे
 मो. ९८२२५९३९०३
rajeshrajore@gmail.com
(लेखक हे दैनिक देशोन्नतीच्या
बुलडाणा आवृत्तीचे संपादक तसेच 
पत्रकारितेत पीएच.डी.पदवी प्राप्त आहेत.)
खामगाव, जि. बुलडाणा.