स्टेट लाइन

दडपशाहीला झुरळे ऐकतील का?

कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दीपके, सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना दिल्ली विमानतळावरच पोलिसांनी त्यांच्या दंडाला धरून ताब्यात घेतले. अटक केलेले तिघेही उच्चशिक्षित आहेत.

दडपशाहीला झुरळे ऐकतील का?

दिल्लीतील ज्ञानेशकुमार हटाव आंदोलनाला रोखण्यासाठी करण्यात आलेली नाकेबंदी, मेट्रो स्थानके बंद ठेवण्याचा निर्णय आणि आंदोलकांची धरपकड यामुळे लोकशाहीतील आंदोलन स्वातंत्र्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला आळा घालण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. मात्र, दडपशाहीने तरुणांचा आवाज दाबता येईल का, सरकारच्या या भूमिकेमुळे लोकशाही मूल्यांचे काय होणार, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. विरोधाचा आवाज दडपण्याच्या प्रयत्नांवरही चर्चा सुरू झाली आहे.

दिल्लीत ज्ञानेशकुमार हटाव या मागणीसाठी होणाऱ्या आंदोलनाची झलक कॉक्रोच जनता पार्टीने मुंबई व बंगळुरूमध्ये दाखवली होती. चार महिन्यांपूर्वी याच झुरळांच्या पार्टीने दिल्लीत जंतरमंतरवर छत्तीस दिवस ठिय्या मांडून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊन दाखवला होता. त्यांची एकजूट, जिद्द, चिकाटी व कल्पकता साऱ्या देशाने बघितली. पोलिसांच्या दडपशाहीला देशातील तरुणाई घाबरत नाही, हे कॉक्रोच जनता पार्टीने दाखवून दिले आहे.
मतदार नोंदणी सर्वेक्षणात (एसआयआर) मोठा घोटाळा झाला असल्याचा गवगवा झाला. देशातील तेरा कोटींपेक्षा जास्त नावे मतदार यादीतून बाद झाल्यानंतर देशात होणाऱ्या निवडणुकांविषयी सर्वत्र संशयाचे वातावरण निर्माण झाले. मुख्य निवडणूक आयुक्त मनमानी कारभार करीत आहेत व निवडणूक आयोगाची यंत्रणा भाजपच्या विजयासाठी राबत आहे, असे जाहीरपणे आरोप होऊ लागले. दोन आयुक्तांना विश्वासात न घेता मुख्य निवडणूक आयुक्त कसे मनमानी वागतात, याचा इंडियन एक्स्प्रेसने पोलखोल केल्यावर विरोधी पक्षाच्या संशयाला पुष्टी मिळाली. भाजपला विजय मिळतो तो मोदींमुळे नव्हे, तर निवडणूक आयोगाच्या मदतीमुळे, हा आरोप तर भाजपला जिव्हारी लागला. एकीकडे राहुल गांधी मोदी, शहा, ज्ञानेशकुमारांना या देशाचे खलनायक ठरवत आहेत, तर भाजप राहुल गांधींना नालायक म्हणून हिणवत आहे. खलनायक विरुद्ध नालायक अशा संघर्षात कॉक्रोच जनता पार्टीने ज्ञानेशकुमार हटाव मोहीम सुरू केली. ही मोहीम भाजपसाठी आणखी डोकेदुखी ठरू लागली.
कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दीपके, सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना दिल्ली विमानतळावरच पोलिसांनी त्यांच्या दंडाला धरून ताब्यात घेतले. अटक केलेले तिघेही उच्चशिक्षित आहेत. ते जणू कोणी अट्टल गुन्हेगार, गँगस्टर किंवा अंडरवर्ल्डशी संबंधित आहेत, अशा आविर्भावात पोलिसांनी त्यांना विमानातून खेचून बाहेर काढले. हे तिघे देशातील लक्षावधी विद्यार्थी-तरुणांचे नेतृत्व करीत आहेत; पण आम्ही त्यांना गुन्हेगारांसारखे कसे वागवू शकतो, हाच संदेश दिल्ली पोलिसांनी दिला. त्यांना कुठे नेले, रात्रभर कुठे ठेवले, याविषयी पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळली. त्याच दिवशी अभिजीतच्या आजीचे त्यांच्या गावी निधन झाले; पण त्याला तिच्या अंत्यसंस्काराला जाता आले नाही. 20 जुलै रोजी दिल्लीत पोलिसांनी विद्यार्थी मोर्चावर खिळे ठोकलेल्या काठ्यांनी जसा निर्घृण लाठीमार केला होता, तीच मानसिकता आजही कायम आहे, हे त्यांच्या कारवाईतून दिसले. दुसऱ्या दिवशी या तिघांनाही दंडाधिकारी न्यायालयात पोलिसांनी हजर केले व एक वर्षभर शांतता भंग न करण्याच्या अटीवर प्रत्येकी पन्नास हजार रुपयांच्या जामिनावर सोडले. त्यांनी दिल्लीत येऊन काहीही केलेले नसताना पोलिसांनी त्यांची वरात काढली.
कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांनी दिल्लीची नाकेबंदी केली होती. दहा तासांसाठी नवी दिल्ली व हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकांकडे देशाच्या विविध भागांतून येणाऱ्या अडीचशे रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या. दिल्लीतील सत्तावन्न मेट्रो स्थानके बंद ठेवण्यात आली. जंतरमंतरच्या चार किलोमीटर परिसरात इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली. दिल्लीतील जंतरमंतरवर किती तरुणाई येईल, दोन लाख, पाच लाख की दहा लाख, याचा अंदाज पोलिसांना येईना. त्यामुळे जंतरमंतरभोवती दहा फूट उंचीचे बॅरिकेड्सचे सहा थर लावले होते. कोणत्याही परिस्थितीत झुरळे जंतरमंतरवर पोहोचता कामा नयेत, यासाठी हा सारा आटापिटा होता. रात्री उशिरा नि पहाटे मुलामुलींच्या घरी जाऊन, वसतिगृहांचे दरवाजे ठोठावून विद्यार्थ्यांना बाहेर पडू नका, अशी तंबी दिली गेली. उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान व पंजाबकडून दिल्लीकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांवर नाकेबंदी करण्यात आली. ज्यांनी जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न केला, त्या मुलामुलींना बकोटीला धरून किंवा फरफटत पोलीस व्हॅनमध्ये नेण्यात आले.
सोळा ते पंचवीस वयोगटातील मुले-मुली ही काय गुन्हेगार आहेत काय? या देशाचे ते नागरिक आहेत. विद्यार्थी आहेत. देशाचे भविष्य घडविणारी नवीन पिढी आहे. पण वरिष्ठांकडून जसे आदेश येतात, ते पोलिसांना पाळावे लागतात. दिल्ली महानगराची लोकसंख्या दोन कोटींवर आहे. या महानगरात रोज ऐंशी लाख वाहने (मोटारी, बसेस, टेम्पो, टॅक्सीज, रिक्षा) प्रवाशांना घेऊन फिरत असतात. शेजारील राज्यांतून रोज हजारो वाहने ये-जा करीत असतात. पण मेट्रो बंद, रेल्वे बंद आणि नाकाबंदीचे आदेश देऊन आपण कोणाचे जनजीवन विस्कळीत करीत आहोत, याचेही भान वरिष्ठांना नसावे, याचे आश्चर्य वाटते. झुरळांचे आंदोलन हाणून पाडण्यासाठी चाळीस हजार पोलीस तैनात होते. सीमा सुरक्षा दलाच्या फौजा नि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकड्याही दिल्लीच्या रस्त्यांवर फिरत होत्या. हजारो मुलांना पकडून नेण्यासाठी नव्या कोऱ्या बसेसची रांग तयार ठेवली होती. हे सर्व कोणासाठी? कशासाठी? एका संविधानात्मक पदावर बसलेल्या सर्वोच्च नोकरशहाला वाचविण्यासाठी की विरोधातील आंदोलन चिरडून टाकण्यासाठी?
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी संसदेत व रस्त्यावर सरकारविरोधात जिद्दीने लढत आहेत. राहुल यांना राजकारण समजत नाही, परिपक्वता नाही, विरोधी पक्षनेत्याचे महत्त्व व मर्यादा त्यांना कळत नाहीत, त्यांचा अभ्यास नाही आणि आता तर ते नालायक आहेत, इथपर्यंत भाजप त्यांच्यावर हल्ले चढवत आहे. ज्ञानेशकुमार हटाव आंदोलनात दिल्ली पोलिसांनी त्यांना कसे फरफटत नेले किंवा पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर त्यांना कसे उचलून नेले, हे सर्व देशाने बघितले आहे. विरोधी पक्षनेत्याला ‘शॅडो प्राइम मिनिस्टर’ म्हणून ओळखले जाते. पण राहुल गांधी या पदावर आल्यापासून सरकारला मोठी डोकेदुखी झाली आहे.
ज्ञानेशकुमार हटाव आंदोलनात ममता बॅनर्जी (पश्चिम बंगाल), अरविंद केजरीवाल (दिल्ली), पिनराई विजयन (केरळ) आणि माणिक सरकार (त्रिपुरा) या चार माजी मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दीपके, सौरभ दास, आशुतोष रांका व रत्ना सिंग यांना उचलले. तसेच डेरेक ओ’ब्रायन, जॉन बिटास, संजय सिंह, डोला सेन, समीरूल इस्लाम, प्रतिमा मंडल आणि साकेत गोखले या खासदारांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. याखेरीज मुंबईत तुषार गांधी, गुरुग्राममधून ध्रुव राठी, दिल्लीत नेहा बोरा, योगेंद्र यादव, प्रशांत भूषण, मनीष सिसोदिया, गोपाल राय, वृंदा करात, के. के. शैलजा आणि एम. ए. बेबी यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. दिल्लीत आठ हजार, मुंबईत सहाशे, तर देशभरात कॉक्रोच जनता पार्टीच्या वीस हजार जणांना तरी आंदोलन करताना पोलिसांनी ताब्यात घेतले.
पोलीस आंदोलनाला परवानगी देत नाहीत; दिली तर खंडीभर अटी घालून मर्यादित काळासाठी देतात. सरकारला आंदोलने, मोर्चे आवडत नाहीत. मग लोकशाहीत विरोधी पक्षाने आंदोलन करायचे कसे व कुठे? सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जंतरमंतर, बोट क्लब येथे वर्षानुवर्षे आंदोलने होत आहेत. काँग्रेस, इंडिया आघाडी नि कॉक्रोच जनता पार्टी पोलिसांची परवानगी नसताना ज्ञानेशकुमार हटाव आंदोलन आणखी किती दिवस चालू ठेवणार?

 

डॉ. सुकृत खांडेकर
ज्येष्ठ पत्रकार
मो. ९५९४२२४०००