जन-गण-मन

देवेंद्रजी, सर्वोच्च प्राधान्याने शेतकरी वाचवा !

महाराष्ट्रात ४कोटी ३८ लाख एकर क्षेत्र पिकाखाली आहे. त्यापैकी १.५ कोटी एकर जमिनीवरील पिके नष्ट झाली.

देवेंद्रजी, सर्वोच्च प्राधान्याने शेतकरी वाचवा !

महाराष्ट्रातील खूप मोठ्या भागात सोयाबीनचे पीक ६०ते ७० टक्के बुडालेले आहे. शेतकरी आपल्याजवळील पैसा व सहकारी-खासगी कर्ज काढून शेतात टाकून बसलेला आहे. प्रत्येक एकरामागे साधारणपणे २५ ते ३० हजार रुपये आजपर्यंत शेतकऱ्यांकडून खर्च झालेला आहे, किमान तेवढे पैसे त्याला या नैसर्गिक आपत्तीमध्ये मदत म्हणून मिळाले, तरच शेतकरी पुन्हा उभा राहू शकेल.मुळात नैसर्गिक आपत्तीमध्ये दिलेली ही मदत सरकारकडे उपभोक्ता म्हणून याच मोठ्या संख्येने (५७ टक्के) असलेल्या शेतकऱ्यांनी सरकारी खजिन्यात जमा केलेला पैसा आहे. सरकारने फार मोठे उपकार करत असल्याचा आव न आणता केवळ कर्तव्यभावनेने सहाय्य केले पाहिजे, आणि हीच भूमिका सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही बाजूंच्या आमदारांनी सरकारवर दबाव आणून करवून घेतली पाहिजे.

आज संपूर्ण महाराष्ट्र १९७२च्या पेक्षाही जास्त विघातक अशा दुष्काळामध्ये होरपळत आहे. सुदैवाने, या परिस्थितीशी सामना करण्याची बौद्धिक व राजकीय क्षमता असलेले श्री.देवेंद्र फडणवीसांसारखे नेतृत्व आज महाराष्ट्राच्या सर्वोच्च स्थानी विराजमान आहे. त्यांनी जर का मनात आणले, तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना या अरिष्टाच्या कमीत कमी झळा बसतील आणि राज्य सुखरूपपणे या संकटाबाहेर येऊ शकेल.
१९७२ च्या आणि २०२६ च्या दुष्काळात फरक एवढाच, की तेव्हा अन्नधान्याचा तुटवडा संपूर्ण जगात कमी-अधिक प्रमाणात होता; परंतु आज (किमान भारतात तरी) १९७२ सारखी धान्याची टंचाई भासणार नाही. आज जगातील ४७ देशांमधील २६ कोटी (गाझा, सुदान इ. मधील) लोक भूकेशी सामना करताहेत; पण भारतात तसे चित्र अपेक्षित नाही. हे एक दुःखद आश्चर्य आहे, की पृथ्वीवर धान्य आहे; पण ते खरीदण्याला काही गरिबांजवळ पैसे नसल्यामुळे ते उपाशी आहेत.
महाराष्ट्रात चित्र वेगळे आहे. नापिकीमुळे राज्य आर्थिक संकटात आहे. या वर्षीच्या दुष्काळाचे स्वरूप आक्राळविक्राळ आहे. राज्याच्या ३५८ पैकी २६५ तालुक्यांत (७५ टक्के राज्यात) अवर्षण आहे. सोलापूर (६०%), धाराशीव (४५%), अहिल्यानगर (४२%), नांदेड (३८%), तर यवतमाळ (३०%) पर्जन्यमान तुटीने बाधित झाले आहे. संपूर्ण मराठवाडा, पश्चिम विदर्भ, सोलापूर, अहिल्यानगर, आणि जळगाव हा भाग ऑगस्ट आणि सप्टेंबर या महत्त्वपूर्ण महिन्यात ४० दिवसांपेक्षा जास्त काळ कोरडा राहिला, परिणामी सोयाबीन, कापूस, बाजरी, ज्वारी व मका ही पिके पूर्णतः उद्ध्वस्त झालीत. अहिल्यानगर या एका जिल्ह्यात ५ लाख हेक्टर पिकाखालील क्षेत्र बुडाले. यवतमाळमधील सर्व १६ तालुके, तर शेजारच्या नांदेडचे संपूर्ण १४ ही तालुके दुष्काळाच्या छायेने ग्रासलेले आहेत.
महाराष्ट्र सरकारने सप्टेंबरअखेर दुष्काळ जाहीर केला आणि ट्रिगर-१ अंतर्गत आवश्यक अशा उपाययोजना करण्याची जबाबदारी स्वीकारली. आता, या भागातील शेतकऱ्यांच्या सर्व कर्जाच्या वसुलीस स्थगिती, नव्या कर्जासाठी पुनर्गठन, वीज बिल वसुली थांबवणे, परीक्षा शुल्कमाफी, जनावरांसाठी चारा छावण्या, टॅंकरने पाण्याचा पुरवठा, रोहयोची कामे सुरू करणे, या प्रकारच्या उपाययोजना केल्या जातील. त्यासाठी गरजेचे असलेले पंचनामे तातडीने पूर्ण केलेले आहेत, असे सरकारने जाहीर केले आहे. यावरून आता सरकारने दुष्काळाशी लढायला कंबर कसली आहे, असे समजायला हरकत नाही. हे काम प्रभावीपणे आणि वेळेत झाले, तरच या उपाययोजनांचा उपयोग होईल, अन्यथा जर का चालढकल झाली, तर शेतकरी हवालदिल होणे व त्याची परिणती शेतकरी आत्महत्या प्रचंड प्रमाणात वाढण्यात होऊ शकेल, ही भिती आहे.
अशा परिस्थितीत केंद्र आणि राज्य सरकारची भूमिका फार महत्त्वाची ठरते. सध्या सरकारची आर्थिक स्थिती फार चांगली नाही. कंत्राटदारांची बिलं थकली आहेत आणि अनेक खात्यांच्या मागण्यांना छाटले जात आहे. (माझ्या मंत्रालयीन सूत्रांनी याबाबत खूप चिंता व्यक्त केली. त्यांची ती आकडेवारी मी विस्तार भयास्तव येथे लिहिणे टाळतो.) पण, ही झाली सामान्य परिस्थिती. परंतु जर आज निर्माण झाले तसे दुष्काळाचे मोठे संकट पुढे उभे ठाकले आणि कोट्यावधी शेतकऱ्यांच्या जगण्या-मरण्याचाच प्रश्न उद्भवला तर त्यावेळी सरकारने हातातील हजार कामे सोडून शेतकरी वर्गास कसे वाचविता येईल? या एकमेव अशा कामाला सर्वप्राथम्य देऊन इतर सर्वच कामांना मागे ठेवले पाहिजे, कारण माणसांच्या जीवाहून जास्त महत्त्वाचे काहीच असू शकत नाही! खरेतर आज सत्ताधारी आणि विरोधी अशा सर्व आमदारांनी सरकारला (अर्थात मुख्यमंत्र्यांना) किमान ४०, ००० कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी बाजूस काढायला भाग पाडले पाहिजे. किंबहुना ते शेतकऱ्यांची मुले म्हणवून घेणाऱ्या, या सर्वच आमदारांचे आद्य कर्तव्य आहे. 
या आमदारांपैकी कोण मुख्यमंत्री महोदयांना थेट आणि रोखठोक शब्दांत जाब विचारतात? ते आपण २०२९ पर्यंत (एक यादीच बनवून) लक्षात ठेवले पाहिजे. डीपीडीसीचा निधी भांडून भांडून वाटून घेणे आणि मतदारसंघातील विकासकामे करणाऱ्या कंत्राटदारांवर विशेष लक्ष ठेवणे या दोनच कामांसाठी आपण लोक प्रतिनिधींना निवडून पाठवत नसतो, तर असल्या कामांबरोबरच दररोज फासावर लटकवून घेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी (त्यांनीच उद्योगपती मार्फत आपल्या खिशातून अप्रत्यक्षपणे भरलेला ७५ टक्के महसूल-) आज मरताना तरी त्यांच्या वाट्याला आला पाहिजे, यासाठी या लोकांनी आग्रह धरला पाहिजे.
यावर्षी महाराष्ट्राच्या बहुतांश भागात अन्नाची नव्हे; पण पाण्याची तीव्र टंचाई भासणार आहे, कारण मोठ्या क्षेत्रात पाऊस अपुरा पडला आहे. याबरोबरच जनावरांना चारा मिळणे अवघड होऊन बसणार आहे. ग्रामीण भागात सरकार दुष्काळी कामे काढेल यात काही शंका नाही; पण ना धड शेतकरी ना मजूरदार अशा मधल्या वर्गात असलेल्या छोट्या शेतकऱ्यांच्या हालअपेष्टा होणार आहे. 
महाराष्ट्रातील खूप मोठ्या भागात सोयाबीनचे पीक ६०ते ७० टक्के बुडालेले आहे. शेतकरी आपल्याजवळील पैसा व सहकारी-खासगी कर्ज काढून शेतात टाकून बसलेला आहे. प्रत्येक एकरामागे साधारणपणे २५ ते ३० हजार रुपये आजपर्यंत शेतकऱ्यांकडून खर्च झालेला आहे, किमान तेवढे पैसे त्याला या नैसर्गिक आपत्तीमध्ये मदत म्हणून मिळाले, तरच शेतकरी पुन्हा उभा राहू शकेल.
मुळात नैसर्गिक आपत्तीमध्ये दिलेली ही मदत सरकारकडे उपभोक्ता म्हणून याच मोठ्या संख्येने (५७ टक्के) असलेल्या 
शेतकऱ्यांनी सरकारी खजिन्यात जमा केलेला पैसा आहे. सरकारने फार मोठे उपकार करत असल्याचा आव न आणता केवळ कर्तव्यभावनेने सहाय्य केले पाहिजे, आणि हीच भूमिका सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही बाजूंच्या आमदारांनी सरकारवर दबाव आणून करवून घेतली पाहिजे.
सरकार हे करू शकेल काय? हे समजून घेऊ या.
महाराष्ट्र सरकारच्या या वर्षाच्या अंदाजपत्रात ७ लाख २० हजार कोटींची तरतूद केलेली आहे. त्यापैकी १०,००० कोटींपेक्षा जास्त तरतुदीची ६ते ७ कामे खालीलप्रमाणे आहेत, जी सरकार एकतर पुढे ढकलू शकते किंवा त्यात फारमोठी काटछाट करून दुष्काळनिधी उभारू शकते-
(१) विविध लेखा- शीर्षात विखुरलेल्या एकत्रित जाहिराती, प्रसिद्धी, महोत्सव, कला-साहित्याची अनुदाने, विदेशदौरे, नुतनीकरणे, सांस्कृतिक व पर्यटनखर्च, प्रोत्साहक अनुदाने- ५०,००० कोटी  रु.
(२) वर्सोवा-बांद्रा सी लिंक- १८,००० कोटी रु.
(३) तिसरी मुंबई व वाढवण विकास- २०,००० कोटी रु.
(४) लाडकी बहीण योजना- ३६,००० कोटी रु.
(५) राष्ट्रीय आपदा प्रबंधन (NDRF) अंतर्गत ७५-२५ सूत्रानुसार केंद्र सरकारकडून अपेक्षित असलेला वाटा- ४००० कोटी  रु.
(६) केंद्रपुरस्कृत काही योजनांचा अखर्चित पैसा परत करणे. विलंबित (defer) करून तो येत्या वर्षातील तरतुदीतून कमी करण्याची हमी देऊन शेतकरी मदतीसाठी वळते करणे (उदाहरणार्थ पी एम जी एस वाय- ४००० कोटी). यासाठी दर 
महा किमान एकदा तरी आपल्या राजकीय कामासाठी शहांना भेटणाऱ्या एकनाथ शिंदेंनी एखादी भेट शेतकऱ्यांसाठीही कामी लावावी.
(७) २०१६ ला महाराष्ट्र सरकारने जसे मद्यावर प्रतिलिटर अतिरिक्त अबकारी शुल्क लावले व ते मदतीसाठी वापरले, त्याचप्रमाणे या वर्षीही २  रु. प्रतिलिटर लावले व ती रक्कम शेतकरी मदतनिधीत जमा केली, तर हरकत नसावी.
(८) या वर्षी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांकरिता “जिल्हा योजने”द्वारे DPDC ला २१,८६७ कोटी रु. सुपूर्द केलेत. या निधीतून थेट ५०% रक्कम कापून १०,००० कोटी रु. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरावी. (-पण पालकमंत्री होण्यासाठी जसे मंत्री एकमेकांच्या उरावर बसले ते पाहता खूप मोठी राजकीय इच्छाशक्ती वापरली तरच हे होऊ शकेल.)
वरीलप्रमाणे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उपलब्ध केलेला सुमारे ४० ते ४५ हजार कोटींचा निधी, महाराष्ट्राच्या दुष्काळबाधितांना कसा वाट्यास येईल ते (ढोबळमानाने) अंदाज लावता येण्यासारखे आहे- 
महाराष्ट्रात ४कोटी ३८ लाख एकर क्षेत्र पिकाखाली आहे. त्यापैकी १.५ कोटी एकर जमिनीवरील पिके नष्ट झाली. यापैकी अंदाजे 
७५लाख एकरांचे शेतकरी मदतीसाठी जर पात्र धरले (आयकरदाते, सरकारी नोकर, व निवृत्त इ. वगळता)तर त्यातील भागश: पूर्ण तर काहीजणांस अंशतः प्रतिएकर २५००० ते ३५००० रु. मदत  दिली तर जास्तीत जास्त ४०,००० कोटी रु. पुरेसे ठरतील. अर्थात हा ढोबळ अंदाज असला, तरीही तो वास्तवाच्या खूप जवळ जाणारा आहे. विदर्भातील मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना विदर्भात दररोज आठ-दहा शेतकरी आत्महत्या करतात, हे सत्य माहीत आहे. सद्य स्थितीतील संकटामुळे यात वाढ होण्याची शक्यता आहे. २०२३ च्या काही महिन्यांत तर एका यवतमाळ जिल्ह्यातच दिवसाला सरासरी २  शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत. आता हे थांबवलेच पाहिजे. आज शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत देण्याचा उपायच त्यांना धीर देऊ शकेल व वरीलप्रमाणे हे प्रचंड राजकीय इच्छाशक्ती वापरून देवेंद्र फडणवीसच करू शकतात! हितसंबंध गुंतलेले काही राजकारणी नाराज होतील; पण  एक सत्कृत्याची संधी समजून त्यांनी हे काम सर्वोच्च प्राथमिकतेने केले पाहिजे.

पुरुषोत्तम गावंडे 
७९७७१६३७७४