भाष्य

महिला सक्षमीकरणाच्या चर्चेत दलित महिलेचा स्वतंत्र प्रश्न

दलित महिलांच्या परिस्थितीविषयी बोलताना माझ्या डोळ्यांसमोर केवळ आकडेवारी येत नाही. तर आपल्या मुलांना चांगले आयुष्य मिळावे, अशी इच्छा बाळगणाऱ्या त्या महिलांचे चेहरेही समोर येतात.

महिला सक्षमीकरणाच्या चर्चेत दलित महिलेचा स्वतंत्र प्रश्न

आज महिला आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरून आवाज उठवत आहेत. पुरुषप्रधान व्यवस्थेला आव्हान दिले जात आहे आणि समानतेची मागणी केली जात आहे. नुकत्याच जंतरमंतरवर झालेल्या आंदोलनादरम्यान महिला पत्रकारांशी कथित गैरवर्तन झाल्याची घटनाही समोर आली. या घटनेने सार्वजनिक ठिकाणी महिलांची सुरक्षितता आणि संस्थात्मक उत्तरदायित्व यांबाबत प्रश्न उपस्थित केले. मात्र, महिला हक्कांच्या या व्यापक चर्चेत एका प्रश्नावर थांबून विचार करणे गरजेचे आहे—प्रत्येक महिलेचा संघर्ष सारखाच असतो का?
एखादी महिला आपल्या हक्कांसाठी उभी राहते, तेव्हा तिचा संघर्ष प्रामुख्याने पुरुषप्रधान व्यवस्थेविरुद्ध असतो. पण दलित महिलेच्या वाट्याला या संघर्षासोबत जातिभेदाच्या भिंतीचाही सामना येतो. आर्थिक परिस्थितीतील अडचणी हा संघर्ष आणखी कठीण करतात. मुद्दा कोणत्या महिलेचे दुःख मोठे आहे, हा नाही. तर समानतेपर्यंत पोहोचण्यासाठी कोणाला किती अडथळे पार करावे लागतात, हा आहे.
उत्तर प्रदेशातील भदोही येथे घडलेले २० वर्षीय राणी वनवासीचे प्रकरण याच प्रश्नाकडे लक्ष वेधते. प्रसूतीच्या कळा सुरू झाल्यानंतर राणीला महाराजा चेतसिंह जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मुसहर समाजातील असल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करून घेतले नाही, असा तिच्या कुटुंबीयांचा आरोप होता. मात्र, रुग्णालय प्रशासनाने जातीय भेदभावाचा आरोप फेटाळून लावत गंभीर रक्तक्षयामुळे तिला दुसरीकडे पाठवण्यात आल्याचे सांगितले. रुग्णालयातून परत जात असताना राणीने रस्त्याच्या कडेला बाळाला जन्म दिला. नंतरच्या चौकशीत वैद्यकीय निष्काळजीपणा आढळून आला आणि संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.
जातीय भेदभावाचा आरोप हा चौकशीचा विषय आहे. मात्र, प्रसूतीच्या वेदनांनी त्रस्त असलेल्या महिलेसोबत झालेला निष्काळजीपणाही तितकाच गंभीर आहे. त्या क्षणी राणीला चौकशीची किंवा नुकसानभरपाईची नव्हे, तर उपचारांची गरज होती. कारवाई नंतरही करता आली असती; पण त्या रात्री तिने जे सहन केले, त्याची भरपाई कोण करणार?
दलित महिलांचा संघर्ष एखाद्या एका घटनेतून निर्माण झालेला नाही. जातिभेद आणि लैंगिक असमानतेमुळे त्यांना दीर्घकाळ शिक्षण, संसाधने, सन्मान आणि संधी यांपासून दूर ठेवण्यात आले आहे. संविधानाने समानतेचा अधिकार दिला आणि अस्पृश्यता नष्ट केली. तरीही कायदा आणि सामाजिक व्यवहार यांच्यातील अंतर आजही कायम आहे.
राष्ट्रीय दलित मानवाधिकार अभियानाच्या ‘फाइव्ह इयर्स ऑफ कास्ट-बेस्ड अॅट्रोसिटी’ या अहवालात राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या २०१९ ते २०२३ या कालावधीतील आकडेवारीचे विश्लेषण करण्यात आले आहे. या अहवालानुसार, या काळात अनुसूचित जातींच्या महिलांवरील बलात्काराच्या नोंदवलेल्या प्रकरणांत १९.७ टक्क्यांनी वाढ झाली. या आकडेवारीमागे अशाही अनेक महिला आहेत, ज्यांच्यासाठी तक्रार दाखल करणे, न्याय मिळवण्याच्या प्रक्रियेत टिकून राहणे आणि सामाजिक दबावाचा सामना करणे सोपे नसते. कायदा अस्तित्वात असणे आणि पीडितेला वेळेवर न्याय मिळणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.
 समानतेचा प्रश्न रुग्णालयापूर्वीच शाळेत सुरू होतो. दलित मुलीला शाळेत जाता येते का? आर्थिक अडचणींमुळे तिचे शिक्षण मध्येच थांबते का? आणि उच्च शिक्षणापर्यंत पोहोचल्यानंतरही तिला आपल्या सामाजिक ओळखीमुळे अपमान सहन करावा लागत नाही ना? डॉ. पायल तडवी यांचे प्रकरण सांगते, की उच्च शिक्षणात प्रवेश मिळणे म्हणजे सन्मान आणि समानतेची हमी नव्हे. शिष्यवृत्ती, वसतिगृह आणि प्रवेशाच्या सुविधांसोबतच असे वातावरणही आवश्यक आहे, जिथे एखाद्या विद्यार्थ्याच्या गुणवत्तेकडे त्याच्या जातीच्या चष्म्यातून पाहिले जाणार नाही.
नोकरी मिळाल्यानंतरही संघर्ष संपत नाही. शेतात काम करणाऱ्या, बांधकामाच्या ठिकाणी मजुरी करणाऱ्या किंवा इतरांच्या घरांत घरकाम करणाऱ्या महिलांच्या श्रमावर अनेक कुटुंबांचे जीवन अवलंबून असते. तरीही त्यांना योग्य मजुरी, सुरक्षितता आणि सन्मान नेहमीच मिळतो असे नाही. जातीवरून अपमानास्पद बोलण्यापासून ते वेगळी भांडी ठेवण्याच्या मानसिकतेपर्यंत, भेदभाव आजही रोजच्या व्यवहारात दिसतो. सामाजिक समानतेबद्दल बोलताना आपल्या घरांत काम करणाऱ्या महिलांशी आपण कसे वागतो, त्यांचे श्रम आपण खरोखरंच सन्मानाने स्वीकारतो का, हे प्रश्नही स्वतःला विचारायला हवेत.
बिहारमधील भागलपूर जिल्ह्यात सुलतानगंजजवळ नोनसर नावाचे एक गाव आहे. येथे मुसहर समाजाची मोठी लोकसंख्या आहे. गावात सवर्ण कुटुंबेही राहतात. त्यापैकी एक घर आमचेही आहे. मात्र, दोन्ही समाजांच्या वस्त्या वेगवेगळ्या आहेत. एकाच गावात राहत असूनही त्यांच्यातील सामाजिक अंतर मी जवळून पाहिले आहे.
जेव्हा जेव्हा मी गावी जाते आणि मुलांमध्ये मिसळते, तेव्हा त्यांचे शिक्षण, राहणीमान आणि कौटुंबिक परिस्थिती समजून घेण्याची संधी मिळते. या मुलांना चांगले शिक्षण घ्यायचे आहे; पण आर्थिक अडचणी अनेकदा त्यांच्या वाटेत उभ्या राहतात. महिलांचा दिवस घर सांभाळणे, मजुरी करणे आणि मुलांचे संगोपन करणे यातच जातो. आजारपण आले की उपचारांची चिंता वेगळीच असते.
या अडचणींसोबत सामाजिक भेदभावही जोडलेला आहे. स्वतंत्र वस्त्यांमध्ये राहण्यापासून ते घरकाम करणाऱ्या महिलांसाठी वेगळी भांडी ठेवण्याच्या मानसिकतेपर्यंत, जातिभेदाचा प्रभाव रोजच्या जीवनात दिसून येतो. या गोष्टी मी बाहेरून येऊन पाहिलेल्या नाहीत. गावात राहताना आणि तिथल्या लोकांमध्ये जाताना मला त्या समजल्या आहेत. त्यामुळे दलित महिलांच्या परिस्थितीविषयी बोलताना माझ्या डोळ्यांसमोर केवळ आकडेवारी येत नाही. तर आपल्या मुलांना चांगले आयुष्य मिळावे, अशी इच्छा बाळगणाऱ्या त्या महिलांचे चेहरेही समोर येतात. मात्र, त्या आयुष्यापर्यंत पोहोचण्याचे मार्ग त्यांच्यासाठी आजही सोपे नाहीत.
तरीही त्यांच्या आयुष्याकडे केवळ गरिबी आणि भेदभावाच्या चौकटीतून पाहणे योग्य ठरणार नाही. त्या मेहनत करतात, कुटुंब सांभाळतात आणि आपल्या परीने बदल घडवण्याचा प्रयत्न करतात. प्रश्न असा आहे की, त्यांच्या मेहनतीनंतरही आणि आकांक्षा असूनही समाजातील अंतर कमी होत नाही.
पंचायती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महिलांच्या आरक्षणामुळे दलित महिलांना राजकीय सहभागाच्या संधी मिळाल्या आहेत. मात्र, निवडून येणे आणि स्वतंत्रपणे निर्णय घेता येणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. एखाद्या महिला प्रतिनिधीच्या मताला गांभीर्याने घेतले जात नसेल किंवा तिच्या निर्णयांवर इतरांचे वर्चस्व असेल, तर केवळ प्रतिनिधित्वामुळे समानता साध्य होत नाही. लोकशाहीत पदापर्यंत पोहोचणे हे पहिले पाऊल आहे; त्या पदावर बसून स्वतःच्या विवेकाने निर्णय घेता येणे हे पुढचे पाऊल आहे.
महिला सक्षमीकरणाच्या चर्चेत हिंसा, सुरक्षितता, रोजगार आणि राजकीय सहभाग यांसारखे मुद्दे उपस्थित केले जातात. हे सर्व मुद्दे महत्त्वाचे आहेत. पण एखाद्या व्यक्तीकडे केवळ महिला म्हणून पाहिल्याने तिची संपूर्ण सामाजिक कहाणी समोर येत नाही. दलित महिलेला पुरुषप्रधान व्यवस्थेसोबतच जातिभेदाचा आणि अनेकदा आर्थिक अभावाचाही सामना करावा लागतो. एका महिलेचे दुःख दुसऱ्या महिलेपेक्षा मोठे ठरवण्याचा हा प्रयत्न नाही. मुद्दा इतकाच आहे की, प्रत्येक महिलेची सुरुवात एकाच ठिकाणाहून होत नाही.
म्हणून महिला सक्षमीकरणाचे मोजमाप केवळ महिलांना किती अधिकार मिळाले, यावरून करता येणार नाही. त्या अधिकारांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग किती समान आहे, हेही पाहावे लागेल. रुग्णालयात आलेल्या महिलेला सर्वप्रथम रुग्ण म्हणून पाहिले जावे, कामाच्या ठिकाणी तिच्या जातीपेक्षा तिच्या गुणवत्तेला महत्त्व मिळावे, घरकाम करणाऱ्या महिलेच्या श्रमाचा सन्मान व्हावा आणि पंचायतीत निवडून आलेल्या दलित महिलेला स्वतःचे निर्णय घेण्याचा अधिकार वारंवार सिद्ध करावा लागू नये—समानतेचा खरा अर्थ हाच आहे.
महिला सक्षमीकरणाच्या चर्चेत दलित महिलेचा प्रश्न हा वेगळा किंवा दुय्यम प्रश्न नाही. तो याच संघर्षाचा अविभाज्य भाग आहे. हा प्रश्न अनुत्तरित राहिला, तर समानतेची कोणतीही चर्चा अपूर्णच राहील.

निमिषा सिंह
मो. ९९५८३२९७७६