मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःच्या अटींवर जगणारा, स्वतःचे नियम स्वतः बनवणारा आणि अभिनयाचा एक नवा मानदंड निर्माण करणारा अवलिया कलावंत म्हणजे नाना पाटेकर. पडद्यावरची कमालीची आक्रमक संवादफेक, अत्यंत वास्तववादी अभिनय आणि खऱ्या आयुष्यातील तितकाच रोखठोक स्वभाव यांमुळे त्यांनी गेल्या चार-पाच दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर अखंड अधिराज्य गाजवले आहे.
नाना पाटेकर यांच्या चित्रपट प्रवासाची सुरुवात ‘सिंहासन’ या राजकीय चित्रपटातून झाली असली, तरी त्यात त्यांची भूमिका काही विशेष प्रभावी किंवा लक्षवेधी नव्हती; मात्र तिथून सुरू झालेला त्यांचा अभिनयप्रवास पुढे अत्यंत विस्तृत होत गेला. ‘परिंदा’, ‘क्रांतिवीर’, ‘अंकुश’, ‘प्रहार’, ‘अपहरण’, ‘वेलकम’ ते अगदी ‘नटसम्राट’पर्यंत प्रत्येक भूमिकेत त्यांनी स्वतःचा जीव ओतला. ‘क्रांतिवीर’ चित्रपटातील त्यांचा क्लायमॅक्सचा संवाद—“ये हिंदू का खून है, ये मुस्लिम का खून है, बता इसमें से हिंदू का कौन सा, मुस्लिम का कौन सा?”—हा हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील मैलाचा दगड मानला जातो. नाना केवळ एक अभिनेते म्हणूनच थांबले नाहीत, तर ते एक उत्तम लेखक, चित्रकार आणि संवेदनशील दिग्दर्शकही आहेत. भारतीय सैन्याला समर्पित करून त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘प्रहार’ हा चित्रपट शिस्त, देशभक्ती आणि वास्तववादाचे अजोड उदाहरण मानला जातो. या चित्रपटातील भूमिकेला आणि दिग्दर्शनाला न्याय देण्यासाठी नानांनी स्वतः प्रत्यक्ष लष्करात जाऊन अतिशय कठोर मराठा लाईट इन्फंट्रीचे प्रशिक्षण पूर्ण केले होते. रंगभूमीवरील त्यांच्या या उत्तुंग योगदानामुळेच पुढे त्यांना अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमानही मिळाला. नानांमधील स्वाभिमान, आक्रमकता आणि स्वतःच्या तत्त्वांशी तडजोड न करण्याची वृत्ती अगदी त्यांच्या सुरुवातीच्या काळातही तितकीच स्पष्ट होती. जेव्हा ते चित्रपटसृष्टीत नवखे होते आणि फारसे प्रसिद्ध नव्हते, तेव्हा यवतमाळमध्ये ‘हमीदाबाईची कोठी’ नाटकाचा प्रयोग सुरू होता. मी स्वत: त्या प्रयोगाला हजर होतो. या नाटकाच्या दिग्दर्शिका विजया मेहता या नानांच्या अभिनय प्रवासातील मुख्य मार्गदर्शक आणि गुरू मानल्या जातात. काही महिन्यांपूर्वीच वयाच्या ९१ व्या वर्षी विजयाबाईंचे निधन झाले आणि रंगभूमीवरील एका मोठ्या अध्यायाचा अंत झाला. या नाटकात अशोक सराफ, भारती आचरेकर, निना कुलकर्णी आणि स्वतः विजया मेहता यांसारखे दिग्गज कलावंत होते. प्रयोगादरम्यान प्रेक्षकांमध्ये प्रचंड चुळबुळ आणि गोंधळ सुरू झाला. आवाज पोहचत नसल्यामुळे त्यांनी आरडा ओरड सुरू केली होती. एका प्रसंगात नाना पाटेकर आणि भारती आचरेकर दोघेच स्टेजवर होते. प्रेक्षकांचा आवाज असह्य झाल्यावर नानांनी कोणतीही भीडभाड न ठेवता सहकलाकार भारती आचरेकरांना संवाद थांबवायला सांगितले आणि स्वतः माईकचा ताबा घेत संपूर्ण प्रेक्षागृहाला जाहीरपणे ठणकावले—“आवाज चांगला येईपर्यंत प्रयोग थांबवतो!” एवढ्यावरच न थांबता प्रयोग थांबवून त्यांनी यवतमाळच्या आयोजकांची ज्या कडक भाषेत कानउघाडणी केली, त्याची आठवण नाट्यसृष्टीत आजही काढली जाते.
नानांचे Tantrums, मूड्स आणि अतरंगी किस्से गेली चाळीस वर्षे गॉसिप कॉलमचा एक अविभाज्य घटक राहिले आहेत आणि याबाबतीत ते अगदी राजकुमार किंवा किशोर कुमार यांनाही मागे टाकतील असे म्हटले जाते. तरीही, त्यांच्यातील कलाकाराचा हाच अवलियापणा काही ठिकाणी अप्रतिम जोड निर्माण करून गेला. राजकुमार यांच्यासारख्या कमालीच्या लहरी अभिनेत्यासोबत नानांचे मात्र खूप छान जमले. तसेच, नानांनी स्वतःहून अमोल पालेकरांना विचारले होते, “तू तुझ्या चित्रपटात काम करण्याविषयी मला का विचारत नाहीस?” आणि याच संवादातून अमोल पालेकरांचा प्रसिद्ध चित्रपट ‘थोडासा रुमानी हो जाये’ साकार झाला.
‘परिंदा’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांच्याशी नानांचा झालेला वाद तर तुफान गाजला होता. सेटवर दोघांमध्ये कमालीचा वाद झाला, ज्या रागाच्या भरात चोप्रा यांनी नानांचा कुर्ता थेट फाडून टाकला; पण त्याहूनही भयानक गोष्ट म्हणजे या चित्रपटाच्या क्लायमॅक्समधील आगीचा प्रसंग! आजकालच्या चित्रपटांसारखे स्पेशल इफेक्ट्स किंवा बॉडी डबल न वापरता, त्या सीनमध्ये खरोखरच खरीखुरी आग लावली गेली होती. फाटलेल्या कुर्त्यात आणि चारी बाजूंनी पेटलेल्या खऱ्या आगीच्या लोटांमध्ये नानाने तो प्रसंग चित्रित केला. या आगीचे भीषण चटके नानांना प्रत्यक्ष सहन करावे लागले होते, ज्याचा उल्लेख आजही चित्रपटसृष्टीत आवर्जून केला जातो.
तथापि, समीक्षकांच्या मते नानांच्या अभिनयाला एक दुसरी बाजूही आहे. जयवंत दळवी लिखित ‘पुरुष’ नाटकातील ‘गुलाबराव’ ही खलनायकी भूमिका असो किंवा ‘नटसम्राट’मधील आप्पासाहेब बेलवलकर; नानांच्या अभिनयात अत्यंत आक्रमक आणि ‘हाय-पीच’ संवादफेकीचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. ‘पुरुष’ नाटकातील त्यांची डरकाळी आणि आक्रस्ताळेपणा प्रेक्षकांना थरकाप उडवणारा वाटला, तर ‘नटसम्राट’ नाटकातील “हे स्वर्गस्थ शक्तींनो...” या प्रसिद्ध स्वगतातही त्यांनी हाय-पीचचा वापर करून प्रेक्षकांकडून टाळ्या मिळवल्या.
नानांचे कौटुंबिक आणि वैयक्तिक आयुष्यही तितकेच विस्कळीत आणि वादांनी वेढलेले राहिले. पत्नी नीलकांती यांच्याशी वैचारिक मतभेद झाल्यानंतर ते गेल्या ३५ वर्षांहून अधिक काळापासून एकमेकांपासून वेगळे राहत होते. त्यांना मल्हार नावाचा मुलगाही आहे; परंतु एवढी वर्षे वेगळे राहूनही नाना पत्नी नीलकांती यांना अधिकृत घटस्फोट द्यायला अजिबात तयार नव्हते; कोणत्याही परिस्थितीत घटस्फोट द्यायचा नाही यावर नाना ठाम होते.
या वादळी आणि तापट स्वभावामागे मात्र मातृभाषेचा अभिमान जपणारा आणि अंतःकरणाने अत्यंत संवेदनशील माणूसही दडलेला होता. ‘कोहराम’ चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासारख्या महानायकासमोर काम करताना, नानांनी एका भन्नाट बंगाली गेटअपमध्ये हातात सिगारेट घेणाऱ्या साध्या पोलिसाची भूमिका इतकी सहजतेने साकारली होती की, अमिताभ यांच्या उपस्थितीतही त्यांनी संपूर्ण स्क्रीन व्यापून टाकला होता.
पुढे हाच सहजपणा ‘कौन बनेगा करोडपती’ (KBC) च्या मंचावरही पाहायला मिळाला. तिथे अमिताभ बच्चन आपल्या नेहमीच्या भव्य सूट-बूटच्या रुबाबात सूत्रसंचालन करत होते, तर त्यांच्यासमोर हॉट सीटवर नाना पाटेकर अगदी साध्या पायजमा-सदऱ्यात बसले होते. कुठलाही आव न आणता नानांनी अमिताभ यांच्यासमोर बसून ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या दुःखाचा आणि अश्रूंचा पाढा अत्यंत प्रामाणिकपणे वाचला.
अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या सोबतीने नानांनी ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून पाण्याचे पुनर्भरण करणे, बंधारे बांधणे आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आर्थिक आधार देण्यासाठी केलेले काम ऐतिहासिक मानले जाते. बॉलिवूडच्या अथांग ग्लॅमरस जगात राहूनही नाना नेहमी अत्यंत साधे राहिले. १९८९ मध्ये जेव्हा त्यांना ‘परिंदा’तील अन्ना च्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला, तेव्हा त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीच्या एवढ्या मोठ्या मंचावर आवर्जून मराठीतून संवाद साधून आपल्या संस्कृतीचा गौरव केला होता.
त्यांच्यात एक मिश्कील आणि दिलखुलास माणूसही तितकाच जिवंत होता. १९९५ मध्ये ४० व्या फिल्मफेअर सोहळ्यात नानांना ‘क्रांतीवीर’साठी, तर माधुरी दीक्षितला ‘हम आपके हैं कौन’साठी पुरस्कार मिळाला होता. तब्बल २५ वर्षांनंतर एका सोहळ्यात जेव्हा हे दोघे एकत्र आले, तेव्हा नानांनी मंचावर माधुरीची मस्करी करत म्हटले होते, “तुला आठवतंय का? तुला पुरस्कार खूप मिळाले असतील, मला एकच मिळाला म्हणून माझ्या चांगला लक्षात आहे!”
थोडक्यात सांगायचे तर, नाना पाटेकर हे चित्रपटसृष्टीतील एक अत्यंत गुंतागुंतीचे, ‘कच्चे आणि अस्सल’ (Raw & Unfiltered) व्यक्तिमत्त्व होते. त्यांचा आक्रसताळेपणा, सेटवरचा अतिरेकी संताप आणि विस्कळीत कौटुंबिक आयुष्य या सर्व मानवी त्रुटींना नाकारता येत नाही; पण त्याचवेळी त्यांची अफाट अभिनयक्षमता, निस्पृहता आणि शेतकऱ्यांचे अश्रू पुसणारे त्यांचे विशाल हृदयही दुर्लक्षित करता येत नाही. अनेक विरोधाभासांनी नटलेला हा अवलिया ‘नटसम्राट’ भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात कायम अमर राहील.
जयंत माईणकर
ज्येष्ठ पत्रकार
मो. ९८२१९१७१६३