पावसाची भीक नको, गावनिहाय नियोजन हवे
महाराष्ट्रात पाऊस अधिक पडला तर पूर. पाऊस थांबला, कमी पडला तर दुष्काळ. या द्रुष्टचक्रात शेतकरी अडला आहे. कोकणातील नद्या दुथडी भरून वाहतात तर विदर्भ-मराठवाड्यातील विहिरी तळ गाठतात. एका गावात नदीचे पाणी रस्त्यावर येते. तर दुसऱ्या गावात पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची वाट पाहावी लागते. हा विरोधाभास केवळ निसर्गाचा नाही. तो तेवढाच सरकारच्या अपयशी जल नियोजनाचा आहे. पावसाचे पाणी पूर बनण्यापूर्वी साठवणे. ते जमिनीत मुरवणे. दुष्काळ येण्यापूर्वी त्याची साठवण करणे. हीच महाराष्ट्राच्या जल सुरक्षेची दिशा हवी. महाराष्ट्राला पावसाची भीक नको. पाण्याचे गावनिहाय नियोजन हवे, कारण आभाळ दरवर्षी पाणी देते. ते आपण अडवत नाही. साठवत नाही. बंधारे कोरडे पडलेत. जनावरांच्या चाऱ्याचा, पाण्याचा प्रश्न उभा ठाकला. टँकरची वाट पाहणाऱ्या महिला अन् पिकांकडे हताशपणे पाहणारा शेतकरी हे ग्रामीण महाराष्ट्राचे वास्तव आहे. दुष्काळी महाराष्ट्रात लोक बादलीभर पाण्यासाठी त्रस्त आहेत. अन् तिकडे कुंभमेळ्यातील शाहीस्थानसाठी वीस हजार कोटीची उधळपट्टी होणार आहे. हे पुरोगामी महाराष्ट्राला पचणारे नसेल.
राज्यातील ३५८ तालुक्यांपैकी २६५ तालुके दुष्काळग्रस्त घोषित झाले, कारण सरकार पडलेल्या पावसाचे नियोजनात सपशेल अपयशी ठरले. महाराष्ट्राचे भौगोलिक क्षेत्रफळ सुमारे ३०७.५८ लाख हेक्टर आहे. त्यापैकी लागवडीयोग्य क्षेत्र सुमारे २२५ लाख हेक्टर आहे. या विशाल शेती व्यवस्थेवर लाखो शेतकरी कुटुंबांचे जीवन अवलंबून आहे. तरी ८० टक्के शेती पावसावर अवलंबून आहे. केवळ 20 टक्के क्षेत्र सिंचनाखाली आहे. त्यामुळे पावसाने दगा दिला की ग्रामीण अर्थकारण कोलमडते. महाराष्ट्रात सरासरी वार्षिक पर्जन्यमान सुमारे १,२०० मिलिमीटर आहे. ते कोकणात डबल आहे. मात्र विदर्भ, मराठवाड्यात कमी आहे.
९० टक्के पाऊस जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत पडतो. माणूस त्या पाण्याचा शोध घेत असतो हीच खरी शोकांतिका आहे. राज्यात सुमारे ३८० प्रमुख नद्या आहेत. याशिवाय हजारो उपनद्या ओढे-नाले महाराष्ट्राच्या भूमीतून वाहतात. नदी प्रवाहाची एकूण लांबी सुमारे १९,२६९ किलोमीटर आहे. एवढे विस्तृत नदीजाळे असलेल्या महाराष्ट्राला उन्हाळ्यात पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागणे हा विरोधाभास आहे. महाराष्ट्रातील सरासरी वार्षिक पृष्ठभागीय जल उपलब्धता सुमारे १६३.८२ अब्ज घनमीटर आहे. ही जल उपलब्धता साठवली तर कितीही दुष्काळ पडले तरी त्यावर सहज मात करता येईल, कारण असा एकही गाव नाही त्याच्या दहा किलोमीटर क्षेत्रात नदी किंवा नाला नाही. कोकणात प्रचंड पाऊस पडतो. डोंगर उतार तीव्र असल्याने नद्या वेगाने समुद्राकडे धावतात. मोठ्या प्रमाणावर पाणी अरबी समुद्रात जाते. नदीजोड प्रकल्प राबवून त्या भागातील पाणी मराठवाडा विदर्भात आणता येते. मात्र, येडे सरकार पूर्व विदर्भातील पाणी नेण्यासाठी नदीजोड प्रकल्प राबविते. अन् स्थानिक नेते मौन आहेत. या नेत्यांना भविष्य माफ करणार नाही.
महाराष्ट्राच्या टोकावरील गोंदिया जिल्ह्यातील अनेक तालुक्यात शेती आणि पिण्याच्या पाण्याची ओरड आहे. त्या तालुक्यांना काखेजवळील गोसेखूर्दचे सुद्धा पाणी दिले जात नाही, कारण बळी तो कान पिळी असा कारभार आहे. अगोदर सिंचन, रस्त्यांचा निधी पश्चिम महाराष्ट्राने पळविला. मग साखर कारखाने पळविले. आता हक्काचे पाणी पळविण्याचे डाव आहेत.त्या लॉबीच्या दबावात आपले मुख्यमंत्री आहेत. मोठी धरणे आवश्यक असतील तेथे ती असावीत. त्यासोबत हजारो लहान जलसाठे, बंधारे, शेततळी, तलावांचे पुनरुज्जीवन, नालाबांधणी, पाणलोट विकास आणि भूजल पुनर्भरणाची साखळी उभी करावी. पडलेला प्रत्येक थेंब जमिनीत मुरवावे लागेल. तेव्हाच शेतीची तहान भागविता येईल. २०२२-२३ मध्ये राज्यातील एकूण पाणीवापर सुमारे ३४.९ अब्ज घनमीटर होता आणि त्यातील सुमारे २०.९ अब्ज घनमीटर पाणी सिंचनासाठी वापरले गेले. ऊस पिकाला पाणी जास्त लागते. महाराष्ट्रातील ऊस क्षेत्र सुमारे ११.६७ लाख हेक्टर आहे. उसावर पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे अर्थकारण, साखर उद्योग, रोजगार आणि ग्रामीण अर्थव्यवस्था जोडलेली आहे. ज्या प्रदेशात पाण्याची उपलब्धता मर्यादित आहे., तेथे पीकपद्धती आणि जल उपलब्धता यांचा ताळमेळ घालण्याचे धाडस सररारला करावे लागेल. ‘जिथे पाणी तिथे पीक’ ऐवजी ‘जितके पाणी तितके पीक’ ही नवी जलसंस्कृती निर्माण करावी लागेल. ठिबक आणि तुषार सिंचनाचा विस्तार याच कारणामुळे महत्त्वाचा आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब पिकाच्या मुळापर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे.
महाराष्ट्राची आणखी एक गंभीर समस्या म्हणजे भूजलावर वाढलेले अवलंबित्व. विहिरी आटल्या, बोअरवेल खोल गेल्या. एका बोअरवेलला पाणी मिळाले नाही की दुसरी, तिसरी, चौथी बोअरवेल खोदली जाते. पण जमिनीत पाणीच मुरले नाही तर कितीही खोल गेले तरी एक दिवस भूजलाचा साठा संपतो. भूजल हा कायम ठेवीचा पैसा नाही. आपण जितके काढतो तितके परत जमिनीत मुरवले नाही तर भूजलाची ही ‘बँक’ही दिवाळखोर होईल. पिण्याचे पाणी हा तर माणसाच्या जगण्याचा प्रश्न आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या सुमारे १२.९ कोटींच्या आसपास आहे. २०३० पर्यंत घरगुती पाण्याची मागणी सुमारे २५० टीएमसी, म्हणजे जवळपास ७ अब्ज घनमीटरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. शेतीला पाणी हवे, उद्योगांना पाणी हवे, शहरांना पाणी हवे, पण माणसाला जगण्यासाठी पाणी सर्वप्रथम हवे, म्हणून पाणी वाटपात पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य हवे. नवी धरणे हवीत. धरणात साठलेले पाणी कालव्यात यावे. कालव्यातील पाणी शेवटच्या शेतापर्यंत पोहचावे. शेतात पोहोचलेले पाणी नियोजनबद्धरित्या वापरले नाही. तर शेतकऱ्याची तहान भागणार नाही. राज्यात अंतिम सिंचन क्षमता सुमारे १२६ लाख हेक्टरपर्यंत वाढवता येऊ शकते, असा जलसंपदा नियोजनातील अंदाज आहे. मात्र, वर्तमान सिंचन क्षमता सुमारे ५६.३३ लाख हेक्टर आहे. पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी किती अडवता येईल, हा प्रश्नही आता गंभीरपणे विचारला पाहिजे. १६३.८२ अब्ज घनमीटर ही सरासरी पृष्ठभागीय जल उपलब्धता आहे.
महाराष्ट्राने मोठ्या धरणांच्या पलीकडे जाऊन लहान साठवणुकींचे महासंचय उभे केले पाहिजेत. एका नाल्यावर बंधारा, दुसऱ्या ओढ्यावर जलसंधारणाची कामे, तिसऱ्या गावात शेततळे, चौथ्या गावात पाणलोट उपचार आणि पाचव्या गावात भूजल पुनर्भरण. अशा हजारो उपायांची एकत्रित बेरीज महाराष्ट्राचा जलसाठा वाढवू शकते. प्रत्येक गावाचा स्वतःचा जललेखा असला पाहिजे. गावात वर्षभरात किती पाऊस पडतो? किती पाणी वाहून जाते? किती पाणी जमिनीत मुरते? किती भूजल उपलब्ध आहे? किती विहिरी आहेत? शेतीला किती पाणी लागते? पिण्यासाठी किती लागते? उद्योगांना किती लागते? पुढील पाच वर्षांची पाण्याची गरज किती असेल? या सर्व प्रश्नांची उत्तरे गावनिहाय उपलब्ध झाली पाहिजेत. पाण्याचे नियोजन जिल्ह्याच्या नकाशावर नव्हे, तर गावाच्या नकाशावर उतरले पाहिजे. महाराष्ट्रातील शेतकरी पावसासाठी आभाळाकडे पाहतो. त्याला सुयोग्य जल व्यवस्थेसाठी सरकारकडे पाहता आले पाहिजे. महाराष्ट्रात पाणी कमी आहे, पाणी असमान आहे. पावसाचा काळ मर्यादित आहे. साठवणूक अपुरी आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यातील पाणी वाचवायचे असेल तर आकाशातून पडणाऱ्या पाण्याचा प्रत्येक थेंब जपावा लागेल. नदीला केवळ वाहणारा प्रवाह न मानता जीवनरेखा मानावी. नाल्याला भूजल पुनर्भरणाची शिरा मानावी. तलावाला गावाच्या सौंदर्याचा भाग न समजता भविष्यातील पाण्याची बँक मानावी. दुष्काळ कायमचा टाळण्यासाठी पाणी जमिनीत उतरवणे हे धोरण हवे. भूजल पुनर्भरण हवे. पिकांची रचना बदलावी लागेल. ठिबक आणि तुषार सिंचन वाढवावे लागेल. पाणलोट क्षेत्रे जपावी लागतील. शहरांतील सांडपाण्याचा पुनर्वापर वाढवावा लागेल. पाण्याला अमर्याद संसाधन समजण्याची मानसिकता बदलावी लागेल. पाण्याचे शास्त्रीय, शाश्वत आणि गावनिहाय नियोजन हवे. आभाळ आपले काम दरवर्षी करते. आता महाराष्ट्र सरकारने आपले काम करावे. पावसाच्या प्रत्येक थेंबाला दिशा द्यावी. ते अडवावे, साठवावे तेव्हा शेतक़ऱ्यांच्या शेतात अन् घराघरात नळाचे पाणी जाईल. सध्या महाराष्ट्रातील शेती आणि माणूस तहानलेला आहे.
भूपेंद्र गणवीर
ज्येष्ठ पत्रकार, नागपूर.
मो. ९८३४२४५७६८