आकलन

भारतातील‌ जेन झी अस्वस्थ का?

भारताची Gen Z एकसंध नाही. उच्च-मध्यमवर्गीय तरुण जागतिक करिअरशी स्पर्धा करतो. मध्यमवर्गीय तरुण पदवी, कोचिंग आणि स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून स्थैर्य शोधतो.

भारतातील‌ जेन झी अस्वस्थ का?

दिल्लीत अस्वस्थता दिसत आहे.‌ ही अस्वस्थता जेन झी आणि काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांच्या आंदोलनांतून‌ जन्मास आली आहे.‌ ही आंदोलने परस्पर पुरक आहेत. या आंदोलनासाठी  प्रस्थापित “उजव्या” सरकारवर ठपका ठेवला पाहिजे. हे विधान सत्तेतील जणांना आणि या सत्तेच्या समर्थकांना रुचणार नाही. आमचा नाईलाज आहे. या देशातील प्रस्थापित लोकशाही आणि  लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्यासाठी विरोधी पक्ष रस्त्यावर उतरले आहेत. ही राजकीय वैचारिक लढाई आहे. डावे विचार‌‌ या देशासाठी घातक आहेत असे जाहीरपणे बोलणारे कट्टर उजवे‌‌ या देशाचे रुपांतर धर्मधिष्ठीत  राज्यात करण्यासाठी अहर्निश प्रयत्नरत आहेत. स्वप्नपूर्तीसाठी साम- दाम - दंड - भेद, असे सर्वच मार्ग अवलंबून सर्व संवैधानिक संस्थांना पोखरले आहे.‌ या पार्श्वभूमीवर‌‌ वरील आंदोलनाची दखल जगाला घ्यावी लागत आहे.
जेन झी अस्वस्थ का?
भारतातील Gen Z (साधारण 1997–2012 मध्ये जन्मलेली पिढी ) अस्वस्थ का आहे, याचे उत्तर केवळ “बेरोजगारी” किंवा “सोशल मीडिया”मध्ये सापडत नाही. २०२६ मधील घडामोडी पाहिल्या तर अपेक्षा आणि प्रत्यक्ष अनुभव यांच्यातील मोठी दरी हा केंद्रबिंदू दिसतो.
या  अस्वस्थतेला “नव्या पिढीची चंचलता” किंवा सोशल मीडियाचा प्रभाव, अधीर स्वभाव किंवा “नवी पिढी वेगळी आहे” असे‌ संबोधता येणार  नाही. ही अस्वस्थता देशाच्या  विकासाच्या वचनात आणि तरुणांच्या प्रत्यक्ष अनुभवात निर्माण झालेल्या वर्गीय दरीचा राजकीय परिणाम आहे. स्वातंत्र्योत्तर भारताने शिक्षण, मेहनत आणि गुणवत्तेच्या आधारावर सामाजिक उन्नतीची शक्यता निर्माण करण्याचे वचन दिले. उदारीकरणानंतर या वचनाला बाजारपेठ, कौशल्य आणि वैयक्तिक यशाची जोड मिळाली. आज Gen Z त्या  वचनांचा हिशेब मागत आहे. कारण शिक्षण वाढले, आकांक्षा वाढल्या; पण समान संधी त्याच प्रमाणात वाढल्या नाहीत. हीच या पिढीच्या अस्वस्थतेची राजकीय मुळाक्षरे आहेत.
भारताची Gen Z एकसंध नाही. उच्च-मध्यमवर्गीय तरुण जागतिक करिअरशी स्पर्धा करतो. मध्यमवर्गीय तरुण पदवी, कोचिंग आणि स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून स्थैर्य शोधतो. ग्रामीण आणि निम्नवर्गीय तरुणासाठी स्थिर उत्पन्न आणि शहरात टिकून राहणे हेच मोठे आव्हान आहे.
म्हणजे एकाच “Gen Z” च्या आत अनेक भारत आहेत. उच्चवर्गीय तरुणाला संधींची निवड करावी लागते. निम्नवर्गीय तरुणाला संधी मिळवण्यासाठी लढावे लागते. मध्यमवर्गीय तरुणाला आपली सामाजिक स्थिती टिकवण्यासाठी सतत स्पर्धा करावी लागते. त्यामुळे अस्वस्थता समान असली तरी तिचे राजकीय अर्थ वेगळे आहेत.
रोजगार हा या पेचाचा केंद्रबिंदू आहे.  भारत सरकारच्या 2025च्या  अहवालानुसार, 15–29 वयोगटातील बेरोजगारी 9.9 टक्के आणि शहरी तरुणांमध्ये 13.6 टक्के होती. शिक्षण आणि कौशल्य मिळवूनही स्थिर रोजगाराची हमी नसेल, तर तरुणाच्या मनात प्रश्न निर्माण होतो—विकास कोणासाठी आणि त्याचा हिस्सा माझ्यासाठी कुठे? याच ठिकाणी परीक्षा आणि भरतीचे राजकारण महत्त्वाचे ठरते. सरकारी नोकरी अजूनही भारतातील मोठ्या वर्गासाठी सामाजिक स्थैर्य आणि उन्नतीचे साधन आहे. त्यामुळे पेपरफुटी, परीक्षा रद्द होणे, निकालातील विलंब किंवा भरती प्रक्रियेतील अनिश्चितता ही केवळ प्रशासकीय चूक नसते. ती सामाजिक गतिशीलतेच्या एका महत्त्वाच्या मार्गावरचा विश्वास डळमळीत करते.  त्याची किंमत वर्गानुसार बदलते. श्रीमंत विद्यार्थी आणखी एक वर्ष कोचिंग घेऊ शकतो. मध्यमवर्गीय कुटुंब कर्ज काढू शकते. गरीब विद्यार्थ्यासाठी मात्र एक वर्ष म्हणजे उत्पन्नाची संधी गमावणे. त्यामुळे “मेरिट”ची भाषा समान असली तरी स्पर्धेची सुरुवात समान ठिकाणाहून होत नाही.‌ 
डिजिटल भारत आणि प्रत्यक्ष भारत यातील दरी महत्त्वाची आहे. मोबाईलवरील जग संधी समान असल्याचा भास निर्माण करते.  सामाजिक वास्तव त्या संधींचे वर्गीय वाटप दाखवते.
यामुळे Gen Z पारंपरिक राजकीय भाषेलाही प्रश्न विचारते. तिला केवळ राष्ट्र, विकास किंवा रोजगाराची घोषणा पुरेशी वाटत नाही. ती विचारते—किती रोजगार? कोणत्या प्रकारचे? कोणासाठी? शिक्षणाचा खर्च कोण उचलणार? परीक्षा किती विश्वासार्ह? सामाजिक उन्नतीची दारे कोणासाठी किती खुली? हे प्रश्न कोणत्याही एका पक्षाचे नसून राज्यव्यवस्थेच्या विश्वासार्हतेचे प्रश्न आहेत.
जात, वर्ग, लिंग आणि ग्रामीण-शहरी स्थान या प्रश्नांना आणखी गुंतागुंतीचे करतात.
सामाजिकदृष्ट्या वंचित तरुणासाठी शिक्षण आणि रोजगार म्हणजे केवळ वैयक्तिक यश नव्हे. ते ऐतिहासिक विषमतेतून बाहेर पडण्याचे साधन आहे. महिलांसाठी रोजगाराबरोबर सुरक्षितता आणि सामाजिक स्वायत्ततेचे प्रश्न जोडलेले आहेत. ग्रामीण तरुणासाठी शहराकडे स्थलांतर हे करिअरची निवड नसून अनेकदा मजबुरी असते.
म्हणून Gen Z च्या अस्वस्थतेचा गाभा “तरुणांना काय हवे?” यात नसून “भारतीय समाज त्यांना काय देऊ शकतो?” यात आहे. आणि इथेच राजकारणाची खरी कसोटी लागते.
Gen Z कोणत्याही एका पक्षाची कायमची मतपेढी असणार नाही. तिचे राजकारण अनुभवाधारित आहे. ज्याच्याकडे सत्ता आहे त्याला प्रश्न; आणि ज्याच्याकडे सत्ता नाही त्याच्याकडून पर्यायाचा हिशेब—ही तिची संभाव्य राजकीय भूमिका अधिक महत्त्वाची आहे.  Gen Z ची अस्वस्थता ही व्यवस्थेविरोधातील  बंड आहे, किंवा  “नाराज तरुणांची पिढी” म्हणून दुर्लक्ष करणे त्याहून अपुरे आहे. तिच्या अस्वस्थतेला शांत करण्याचा प्रश्न नाही. तिला अस्वस्थ करणाऱ्या संरचनात्मक कारणांना बदलण्याचा प्रश्न आहे.
सर्वांच्या आकांक्षा वाढल्या असल्या तरी  संधी अजूनही सर्वांच्या झाल्या आहेत का—हा प्रश्नच तिच्या अस्वस्थतेचा राजकीय केंद्रबिंदू आहे.
समस्या केवळ “नोकरी नाही” एवढी नाही. प्रश्न आहे “शिक्षण, पदवी, स्पर्धा परीक्षा आणि अनेक वर्षांची तयारी केल्यानंतरही स्थिर भविष्य मिळेल का?”‌ यामुळे परीक्षा आणि भरतीतील गैरप्रकार Gen Z ला अत्यंत तीव्रपणे भिडतात.
“आमचे म्हणणे ऐका” असे
Gen Z चे म्हणणे आहे.
या पिढीचै आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे 
ती फक्त “सरकारने आमच्यासाठी काय केले?” याऐवजी  “सरकारने हे असे का केले?” असा प्रश्न विचारते. म्हणून पारदर्शकता, उत्तरदायित्व, परीक्षा, भरती, निवडणूक प्रक्रिया, भ्रष्टाचार, महिला-सुरक्षा इत्यादी प्रश्न एकमेकांशी जोडले जात आहेत.
भविष्यातील अनिश्चितता
Gen Z ची अस्वस्थता वर्तमानापेक्षा भविष्याबद्दल अधिक आहे.
कायमस्वरूपी नोकरी मिळेल का?
स्पर्धा परीक्षा पारदर्शक राहतील का?
पदवीला रोजगारमूल्य राहील का?
AI मुळे नोकऱ्यांचे काय होईल?
घर घेणे किंवा आर्थिक स्वावलंबन शक्य होईल का? सामाजिक आणि राजकीय व्यवस्था आपल्याला ऐकेल का? या प्रश्नांची उत्तरे अनिश्चित असतील तर आर्थिक वाढीची आकडेवारी तरुणाला समाधान देत नाही. गेल्या चार महिन्यांत स्पष्ट झालेले चित्र असे की, सोशल-मीडियावरील  असंतोषापुरती मर्यादित  असलेली ही अस्वस्थता आता  रस्त्यावर येऊ शकते आणि संघटित राजकीय दबाव निर्माण करू शकते !
जुलै 2026 च्या आंदोलनात हजारो तरुण रस्त्यावर आले आणि शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला!! आमचे आकलन स्पष्ट आहे- भारतातील Gen Z अस्वस्थ आहे, कारण तिच्या आकांक्षा वेगाने वाढल्या आहेत; पण त्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी शिक्षण, रोजगार, परीक्षा, भरती आणि सार्वजनिक संस्थांची विश्वासार्हता त्याच वेगाने बदललेली नाही. ते बदल करण्याची  प्रस्थापित सरकारची मानसिकताही नाही!

 

 प्रभाकर कोंडबत्तुनवार
 मो.  ९४०५७५०४६०
(लेखक प्रसिद्ध पत्रकार आणि 
ज्येष्ठ संपादक आहेत)