गणेशोत्सवाच्या वाढत्या उत्साहासोबत ध्वनिप्रदूषण, वाहतूक कोंडी, मंडळांच्या कार्यकर्त्यांची मनमानी आणि उत्सवातील वाढते इव्हेंट-मार्केटिंग चिंतेचा विषय ठरत आहे. राजकीय पक्षांची डीजेवरील संदिग्ध भूमिका पोलिसांच्या कारवाईसमोर प्रश्न निर्माण करते. उत्सवाचे पावित्र्य, नागरिकांचे आरोग्य आणि कायद्याचा धाक कायम ठेवण्याची जबाबदारी आता पोलिसांची खरी कसोटी आहे.
महाराष्ट्रातील जनतेचे दैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणपती बाप्पाच्या या वर्षी बारा दिवसांच्या उत्सवाला सुरुवात झाली. गणपती उत्सव घरोघरी आणि सार्वजनिक मंडळातून मोठ्या उत्साहाने साजरा होत असतो. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणेशाला वंदन करूनच होते. प्रत्येक चांगल्या गोष्टीसाठी, कार्यक्रमासाठी, नव्या उपक्रमांसाठी बाप्पांचे आशीर्वाद मिळावेत, अशी प्रार्थना केली जाते. गणपती बाप्पा ही बुद्धी देवता आहे. तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता असे गणेशाचे वर्णन केले जाते. मग बारा दिवसांच्या सार्वजनिक उत्सवात मोठमोठे मंडप घालून, रस्ते अडवून, वाहतुकीची कोंडी करून आणि बाप्पांच्या मंडपात मोठ्या आवाजातील सिनेमातील गाणी लावून काय साध्य करायचे आहे? महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेनुसार गणेशोत्सव साजरा व्हावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. तरीही सरकारमधील भाजपा व मित्र पक्षांमध्ये मतभिन्नता आहे.
भाजपामध्येही काही जणांना डीजेच्या दणदणीत आवाजात गणेशोत्सव साजरा झाला पाहिजे, असे वाटते. गणेशोत्सवात कोणतेच निर्बंध नसावेत, असे भाजपाचे काही नेते उघड बोलत आहेत. तर याच पक्षाच्या काही आमदार-खासदारांनी ध्वनिप्रदूषणाला विरोध दर्शवला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतही गणेशोत्सवात डीजेवर बंदी कशाला? असा प्रश्न विचारणारे मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या पक्षाचा डीजेला विरोध, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या पक्षाचा आवाजच शांत झाला आहे. सत्ताधारी महायुतीतच डीजे, डॉल्बी किंवा डान्सविषयी एकमत नाही, मग गणेशोत्सव मंडळांच्या ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण ठेवणार कोण? सरकारचीच भूमिका ठाम नसेल, तर पोलीस-प्रशासन ठोस कारवाई तरी कशी करतील?
गणेशोत्सवातील डीजे, लाऊडस्पीकर्सच्या दणदणाटावर आणि लेझर लाईट्सच्या भडिमारावर नियंत्रण ठेवा, असे आवाहन इंडियन मेडिकल असोसिएशनने केले आहे. फटाक्यांच्या माळांमधून निर्माण होणाऱ्या प्रदूषणाबद्दलही आयएमएने चिंता व्यक्त केली आहे. ध्वनी आणि हवा प्रदूषणातून दरवर्षी शेकडो-हजारो लोकांच्या श्रवणशक्तीवर , अनेकांच्या दृष्टीवरही परिणाम होतो, याचाही इशारा दिला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ लक्ष वेधून घेत आहे. मंडळाचे दहा-पंधरा कार्यकर्ते वर्गणी मागण्यासाठी सोसायटीतील एका मध्यमवर्गीय कुटुंबाच्या घरी येतात. त्यावेळी घरातील मुलगी अभ्यास करीत असते. तिची आई घरी असते. वहिनी, गेल्या वर्षी तीनशे रुपये वर्गणी दिली होती, यावर्षी पाचशेची पावती फाडू का? असा प्रश्न एक कार्यकर्ता आईला विचारतो. ती त्यांना थांबा म्हणते. आतल्या खोलीत जाऊन एक फाईल घेऊन येते. तो कार्यकर्ता पुन्हा म्हणतो, पाचशेची पावती फाडतो, पैसे नंतर भाऊ घरी आले की द्या… त्यावर आई म्हणते, तुम्ही पावती फाडा, पण त्या अगोदर मी तुम्हाला काही पावत्या दाखवते, असे म्हणून ती फाईल त्यांच्या हातात देते. आई म्हणते- गेल्या वर्षी मिरवणुकीच्या वेळी माझी मुलगी रस्त्यावर उभी होती, डीजे नि लाऊडस्पीकरचे कर्णकर्कश आवाज ऐकून नंतर तिचे कान बधिर झाले, एका कानाने तिला ऐकूच येत नाही. दुसऱ्या कानाला मशीन लावावे लागते. अजूनही उपचार चालूच आहेत… या सर्व उपचाराची बिले या फाईलमध्ये आहेत… सर्व कार्यकर्ते गंभीर झाल्यावर आई म्हणते, माझ्या मुलीसाठी सांगत नाही हो, उद्या तुमच्यापैकी काही जणांवर अशी वेळ येऊ शकते…
रत्नागिरीहून पुण्यात करिअर करण्यासाठी आलेल्या विद्यानंद बापट या ३७ वर्षांच्या तरुणाने ध्वनिप्रदूषणाच्या समस्येला वाचा फोडली. पुणे महापालिकेत झालेल्या बैठकीत एक नागरिक म्हणून त्याने गणेशोत्सवातील डीजेला विरोध केला. डीजे शिवाय गणेशोत्सव साजरा करता येत नसेल, तर करू नका, काही बिघडणार नाही, अशा शब्दांत त्याने ठाम भूमिका मांडली. मंडळाच्या संतापलेल्या कार्यकर्त्यांनी त्याला अक्षरशः तेथून बाहेर काढले. त्याला कुणी गल्लीत कुत्रे विचारत नाही, अशा शब्दांत संभावना केली. टिळक पथावर एकाने हल्ला करून त्याला मारहाण केली. पण विद्यानंद बापट याचा आवाज हा महाराष्ट्रात घरोघरी पोहोचला आहे व सजग नागरिकांचे त्याला उत्स्फूर्त समर्थन मिळत आहे. तो कुठल्याही राजकीय पक्षाचा नाही, हीच त्याची मोठी जमेची बाजू आहे.
काळानुसार गणेशोत्सवाचे स्वरूप बदलत आहे. पण कानठळ्या बसविणारे आवाज हे बंद होणे गरजेचे आहे. मोठ्या आवाजाच्या स्पर्धेत भाग घेणे अनेकांना आवडते, डीजेच्या संगीतावर तरुणाई बेभान होऊन नाचते म्हणजे, ते योग्य व चांगले आहे असे नव्हे. पुणे शहराचे आमदार-खासदार भाजपाचे आहेत. पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपाची सत्ता आहे. मुंबई-नागपूर महापालिकेत भाजपा आहे. ठाण्यात शिंदेंची शिवसेना आहे. मग ध्वनिप्रदूषणावर महायुतीचे लोकप्रतिनिधी चिडीचूप का आहेत? मंडळाचे पदाधिकारी व हजारोंच्या संख्येने नाचणारी तरुणाई यांना दुखवायचे कसे, असे त्यांना वाटत असावे. हजारो-लाखोंच्या बेभान आनंदाला रोखण्याची कुणाची इच्छाशक्ती नाही, हाच यातून संदेश आहे.
मुंबई-ठाण्यातील डान्स बारमुळे तरुण पिढीचे जीवन उद्ध्वस्त होते आहे, याचे गांभीर्य ओळखून आर. आर. आबा पाटील यांनी गृहमंत्री असताना डान्स बारवर बंदी घातली. आता मुंबईत नुकत्याच झालेल्या दहीहंडी उत्सवात आयोजकांनी मंचावर डान्सबारचा आनंद मिळवून दिला, हे सर्व महाराष्ट्रातील जनतेने टीव्हीच्या पडद्यावर पाहिले. कोणत्या मंडळाने कुठे कुठे दहीहंडी फोडली, किती थर उंच उभे केले, यापेक्षा कोणत्या मंडळाच्या उत्सवात बॉलीवूडमधील कोण कोण हिरो-हिरॉइन आणि सेलिब्रेटी आले होते, कोणी फक्कड डान्स केले, कोणी सर्वात उत्तेजक व दिलखेचक नृत्य केले, याचीच चर्चा जास्त झाली. लाखो रुपयांची बिदागी घेणाऱ्या डान्सर स्टेजवरून समोरच्या तरुणाईला पप्पी देत होत्या. मी कोणाला भाऊ मानत नाही, असे सांगत होत्या. मंचावर छत्रपती शिवाजी महाराजांची व श्रीकृष्णाची प्रतिमा होती आणि मंत्र्यांच्या व राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत सेलिब्रेटींचे बीभत्स, किळसवाणे, आक्षेपार्ह डान्स चालू होते. पैशाची उधळण करून दहीहंडीचा डान्सबार झाला, आता गणेशोत्सवाचे तरी पावित्र्य राखा, असे सांगण्याची वेळ आली आहे.
दहीहंडी, गणेशोत्सवानंतर नवरात्र या उत्सवांचे स्वरूप इव्हेंट-मार्केटिंग झाले आहे. दहीहंडी उत्सवात हंडी फोडणाऱ्या मंडळास पाच ते पन्नास लाख बक्षीस देणारीही मंडळे आहेत. चंदेरी दुनियेतील हिरो-हिरॉइन्स किंवा डान्सर सेलिब्रिटीज कोणी दोन-पाच लाखांपासून ते पंधरा-वीस लाखांपर्यंत बिदागी घेतल्याशिवाय फिरकत नाहीत. एवढी उधळपट्टी करून चर्चा होते ती फक्त डान्सबारची. लावणीच्या नावाखाली हिडीस, बीभत्स नि उत्तेजक नृत्यांचे प्रदर्शन करण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. दहीहंडी उत्सवात मुंबई-ठाण्यात मिळून अडीचशेपेक्षा जास्त गोविंदा जखमी झाले, पाच जणांचे मृत्यू झाले. त्यांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे भविष्य काय, याची कोणाला चिंता नाही. दहीहंडी झाली, आता गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यात सारे गुंतले आहेत. नंतर नवरात्री गरब्याची अशीच धुमधडाक्यात तयारी सुरू होईल.
डॉ. सुकृत खांडेकर
ज्येष्ठ पत्रकार
मो. ९५९४२२४०००