‘नमायण’

विचारांच्या जन्माची प्रसूतिवेदना!

आज शिक्षणाची काय अवस्था आहे? या अवस्थेची आणि व्यवस्थेची लक्तरे ‘जेन झी’ने चव्हाट्यावर आणलीच आहेत. ओशो रजनीश म्हणतात, व्यवस्थेला प्रश्न विचारण्याची ताकद शिक्षणाने आली पाहिजे.

विचारांच्या जन्माची प्रसूतिवेदना!

ज़रूरी नहीं रौशनी चिरागों से हो,
शिक्षा से भी घर रौशन होते हैं।
शिक्षकदिनी सर्वपल्ली डॉ. राधाकृष्णन यांना श्रद्धांजली वाहताना नरेंद्र मोदी यांनी शिक्षकांच्या राष्ट्रनिर्माण कार्यातील योगदानाबद्दलही अभिनंदन केले आहे. माजी खासदार राकेश सिन्हा यांनीही डॉ. राधाकृष्णन यांची फार सुंदर आठवण सांगितली आहे. डॉ. राधाकृष्णन म्हैसूर विद्यापीठाच्या महाराजा कॉलेजमध्ये तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते. त्यांची कलकत्ता अर्थात कोलकाता विद्यापीठात नियुक्ती झाली तेव्हा त्यांना घोडागाडीने रेल्वे स्थानकावर नेण्याचे ठरले. पण विद्यार्थ्यांनी घोडा बाजूला सारून स्वतःच गाडी स्थानकापर्यंत ओढत नेली. रेल्वे स्थानक फुलांनी सजवले होते आणि हजारो लोकांनी डोळ्यांत अश्रू आणून त्यांना निरोप दिला. हीच ती गुरुकुलाची भावना आहे, जी राधाकृष्णनांनी रुजवली. याच भावनेमुळे प्रजासत्ताकातील सर्वोच्च पद एका सामान्य शिक्षकाच्या पदापेक्षाही गौण वाटू लागले.
आज शिक्षणाची काय अवस्था आहे? या अवस्थेची आणि व्यवस्थेची लक्तरे ‘जेन झी’ने चव्हाट्यावर आणलीच आहेत. ओशो रजनीश म्हणतात, व्यवस्थेला प्रश्न विचारण्याची ताकद शिक्षणाने आली पाहिजे. जिथे ही ताकद आणि मुक्ती देणारी तीव्रता नसते, तिथे सत्याचा शोधही नसतो आणि त्याची प्राप्तीही नसते.
प्रश्न विचारण्याची वेदना ही विचारांच्या जन्माची प्रसूतिवेदना आहे. कोणत्याही सत्ताधीशांना माणसाला विचार असावा, असे कधीच आवडत नाही. कारण जिथे विचार असतो, तिथे बंडाचे बीज असते. विचार मुळातच बंड आहे. कारण विचार आंधळा नसतो; विचाराला स्वतःचे डोळे असतात.
खरे तर, इमारती, सुविधा आणि आलिशान वातावरणातील शिक्षण सामाजिक, समतावादी आणि संवेदनशील मूल्यांना प्रोत्साहन देत नाही. आलिशान सुविधांमध्ये मिळालेल्या शिक्षणावर संस्कृती उभारल्या गेल्या नाहीत आणि उभारल्या जाणारही नाहीत.
या ठिकाणी मला एका प्राचार्यांचा उल्लेख करावासा वाटतो.
यवतमाळला श्रीकृष्ण दत्तात्रय उपाख्य बाबाजी दाते यांनी स्वतः स्थापन केलेल्या महाविद्यालयाचे प्राचार्य होते. आज कोणत्याही कॉलेजच्या प्राचार्यांचे कार्यालय अतिशय आलिशान, सर्व सोयींनी सज्ज आढळेल; पण प्राचार्य बाबाजी दाते यांचे प्राचार्यांचे कार्यालय म्हणजे वऱ्हांड्यात एक फोल्डिंग लोखंडी टेबल व लोखंडी खुर्ची, झाले कार्यालय. वेशसुद्धा साधा शर्ट, धोतर आणि पायात चपला.
मात्र त्याग आणि अफाट बुद्धिमत्तेचा महासागर म्हणजे बाबाजी होते. बाबाजींचा वक्तशीरपणा आणि धाक इतका की, एकाही वर्गावर एकही प्राध्यापक एकही मिनिट उशिरा जायची हिंमत करत नसे. एकही विद्यार्थी आवारात भटकत नसे. रोज सकाळी पीटीचा तास आणि प्रार्थना सक्तीची होती.
आज शिक्षणाचे खासगीकरण झाले आहे. आलिशान, प्रचंड इमारतींमधून लाखो रुपये शुल्क आकारून शिक्षण दिले जात आहे. मात्र गरिबांना ते उपलब्ध नाही.
हे खरे आहे की, गुरुकुल भावनेचा आपला भूतकाळ कितीही सुवर्णमय असला तरी, आज आपण तिथे परत जाऊ शकत नाही किंवा विज्ञान, तंत्रज्ञान आणि संपत्तीवर केंद्रित असलेल्या जगाची वस्तुनिष्ठ परिस्थिती आपण अचानक बदलू शकत नाही.
तथापि, सध्याच्या शिक्षणाची प्रासंगिकता तीन पैलूंमधून मोजता येते. पहिले, ते मानवी संबंध आणि सामुदायिक जीवन किती प्रमाणात मजबूत करू शकते? दुसरे, नवउदारमतवादाने लादलेल्या विषमतेला नैसर्गिक मानण्याच्या प्रवृत्तीच्या विरुद्ध जाऊन, ते समतावादी स्वभाव किती प्रमाणात विकसित करू शकते? तिसरे, सामाजिक संघर्ष सोडवण्याची शक्ती ते किती प्रमाणात वाढवू शकते?
काही वर्षांपूर्वी दिल्लीत दक्षिण आशियाई देशांसाठी शिक्षणावर एक चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. भारत, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, भूतान, श्रीलंका आणि मालदीव या सात देशांतील विचारवंतांनी शिक्षणातील मूल्यहीनता आणि मुलींमधील कमी साक्षरता दर याबद्दल चिंता व्यक्त केली होती. ‘जेन झी’च्या जंतरमंतरवरील आंदोलनानंतर काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनीदेखील ‘छात्रो की गुंज’ कार्यक्रमात मुलींना केंद्रस्थानी ठेवले आहे.
दिल्लीच्या त्या परिषदेत एक महत्त्वाचा प्रश्न देशभर चर्चेत आला होता.
सुशिक्षित असूनही लोक अजूनही घृणास्पद गुन्हे का करतात? उच्च शिक्षण घेऊनही लोकांमध्ये नैतिकतेचा अभाव का असतो? आजही हे प्रश्न गंभीर आहेत.
‘युनेस्को’च्या २०२४ च्या जागतिक शिक्षण देखरेख अहवाल आणि भारतासाठी विशेष जाहीर केलेल्या ‘स्टेट ऑफ द एज्युकेशन रिपोर्ट २०२४’नुसार, भारतात प्राथमिक शिक्षणातील पटनोंदणीत मोठी प्रगती झाली असली तरी मूलभूत साक्षरता आणि शैक्षणिक गुणवत्तेच्या पातळीवर अजूनही गंभीर आव्हाने आहेत.
अहवालानुसार, पटनोंदणीचे प्रमाण चांगले असले तरी मुलांमध्ये ‘पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान’ (Foundational Literacy and Numeracy) वाढवणे हे सर्वात मोठे संकट बनले आहे. तिसरी इयत्तेतील केवळ ४३ टक्के मुले दुसरीच्या पातळीचे पाठ्यपुस्तक वाचू शकतात, म्हणजेच निम्म्याहून अधिक मुलांना पायाभूत वाचन करता येत नाही.
भारताने २०१४ ते २०२४ दरम्यान आपल्या एकूण देशांतर्गत उत्पादनाच्या (GDP) केवळ ४.३ टक्के हिस्सा शिक्षणावर खर्च केला आहे.
विद्यापीठांमध्ये कुलगुरू पदावर महिलांचे प्रमाण फक्त १३ टक्के इतके मर्यादित आहे. उच्च शिक्षणाचे हाल तर पाहवत नाहीत.
नव्या शैक्षणिक धोरणात विद्यार्थी-केंद्रित अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, या अभ्यासक्रमांचा प्रत्यक्ष अध्यापन कार्यभार महाविद्यालयांच्या कार्यभार निश्चितीमध्ये धरला जात नसल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. यामुळे एकीकडे तासिका तत्त्वावरील हजारो प्राध्यापकांच्या रोजगारावर गंडांतर निर्माण झाले असून, दुसरीकडे प्राध्यापकांवर अतिरिक्त अध्यापनाचा ताण वाढत आहे. परिणामी, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवरही विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
नवीन अभ्यासक्रम रचनेनुसार विद्यार्थ्यांना विविध कौशल्याधारित विषय शिकविणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, त्यासाठी आवश्यक कार्यभार अधिकृतरीत्या मंजूर नसल्याने वेळापत्रक तयार करणे आणि अध्यापनाचे नियोजन करणे अत्यंत कठीण झाले आहे.
देशात मोठ्या संख्येने शाळा आणि महाविद्यालये असून आणि सरकारने हजारो कोटी रुपये खर्च करूनही, प्रश्न असा आहे की या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये दिले जाणारे शिक्षण घेऊनही लोक नैतिकता का आत्मसात करू शकत नाहीत? भ्रष्टाचाराच्या भस्मासुराने प्रचंड उच्छाद का मांडला आहे? अनैतिकतेने कळस का गाठला आहे?
देशातील गुन्हेगारीचे प्रमाण सातत्याने का वाढत आहे? याचा अर्थ असा की, आपल्या शिक्षण व्यवस्थेत कुठेतरी कमतरता आहे. जे करायला हवे, ते करण्यात आपण अपयशी ठरत आहोत. नैतिकता आणि माणुसकी या अशा गोष्टी नाहीत, ज्या लोकांवर लादल्या जाऊ शकतात.
प्रामाणिकपणा, ऐक्य, अहिंसा, सत्यनिष्ठा आणि न्याय ही नैतिक मूल्ये आहेत. सत्य, धर्म, शांती, प्रेम, अहिंसा, पवित्रता, मानवता, करुणा, आदर, क्षमा, मैत्री, ऐक्य आणि आनंद या आध्यात्मिक मूल्यांच्या शाखा आहेत. व्यक्तींमध्ये हे गुण जोपासू शकेल अशी शिक्षणप्रणाली आणि शिक्षण व्यवस्था विकसित करण्याची गरज आहे.
आजचे शिक्षण केवळ स्पर्धात्मक वातावरणाला प्रोत्साहन देते. सर्वसाधारणपणे असे मानले जाते की, उच्च शिक्षणामुळे व्यक्तीला चांगले आणि वाईट यातील फरक ओळखता येतो आणि तिच्यात करुणाभावही वाढतो. तथापि, हे पूर्णपणे खरे नाही. कटू सत्य हे आहे की, केवळ या देशातच नव्हे, तर जगभरातील गुन्हेगार निरक्षर नसून सुशिक्षित व्यक्ती आहेत.
परिस्थिती इतकी बिघडली आहे की, भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांचे पेव फुटले आहे. मानवाच्या विज्ञानातील प्रगतीचा नैतिकतेवर काहीही परिणाम होत नाही. जर हे खरे असते, तर मानवाने आपल्या वैज्ञानिक प्रगतीच्याच गतीने नैतिकतेतही प्रगती केली असती. दळणवळण आणि माहितीच्या जागतिक प्रसाराचा नेमका उलट परिणाम झाला आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीची नैतिकता ढासळते, तेव्हाच तो गुन्हा करतो. म्हणून, केवळ शिक्षण पुरेसे नाही.  डॉ. राधाकृष्णन यांना श्रद्धांजलीचा उपचार आणि शिक्षकांच्या राष्ट्रनिर्माण कार्यातील योगदानाबद्दलच्या अभिनंदनाचा उपचार पुरेसा नाही.
गरज आहे अशा शिक्षणाची, जे केवळ त्यांच्या प्रगतीतच हातभार लावत नाही, तर त्यांना नैतिक मूल्ये शिकवते आणि समाजात शांततेने कसे जगावे, हेही शिकवते.

न.मा. जोशी
मो. ८८०५९४८९५१