जन-गण-मन

मानवनिर्मित महाप्रलय आता अटळ!

एका विशिष्ट उष्मास्थितीमुळे पाऊस न पडता हिमालयात बर्फवृष्टी होते, ज्यामुळे बर्फाचा तुकडा जिथे पडतो तिथेच स्थिर होऊन, बर्फावरणाचा (Permafrost) भाग बनतो व तेथील बर्फाखालचे खोल मृदावरण घट्ट पकडून ठेवतो.

मानवनिर्मित महाप्रलय आता अटळ!

नेपाळमधे घडले त्याची पुनरावृत्ती होईल का? हे कसे घडले? व असेच पुन्हा घडू शकेल काय? या प्रश्नांचीउत्तरे खूप घाबरवणारी आहेत. देशात २०१२ ला उत्तरकाशीमधे, तसेच तिबेट, चमोली, रूद्रप्रयाग, इथेही असेच प्रकार मागच्या काही काळात घडले. याची कारणमीमांसा ही मानव जातीच्या सामूहिक पापाचा सर्वात मोठा पुरावा देते. मागील१०० वर्षात “सुखलोलुपता” या एका गोष्टीसाठी प्रचंड धावपळ करणाऱ्या ‘माणूस’ प्राण्याने आपल्या सुखासिनतेच्या मृगजळाचा केलेला पाठलाग आपल्या या सर्वनाशासाठी कारणीभूत आहे. ही विनाश-शृंखला माणसाने कशी निर्माण केली ? हे समजून घेऊ या !

मी खात्रीने सांगतो, की हा लेख तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या विषयावरचा आहे! आज मोदीजी आणि राहुल गांधी थोडे बाजूला ठेवू या. ते एका मर्यादेपलीकडे आपले फार काही घडवू किंवा बिघडवू शकणार नाहीत, त्याहून हे महत्त्वाचे!
तुमची मुलं-नातवंडं नजरेसमोर आणा व वाचा!
४५४ कोटी वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या या पृथ्वीवर केवळ १० लाख वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या मानवाने या पृथ्वीवरचा ६ वा; परंतु (मानवाच्या उत्पत्ती नंतरचा, त्याच्या कारकिर्दीतला-) १ ला महा-प्रलय महत्प्रयासाने घडवून आणायचाच असा चंग बांधलेला आहे! आणि आता, अगदी ( फारच मोठे आश्चर्य घडले तरच-) तो टळू शकेल, अन्यथा तो जवळजवळ अटळ आहे!
लांड्या-लबाड्या करून लोकांत भांडणे लाऊन विद्वेष पसरवून सत्ता मिळवणे, समाजात हिंसा पसरवून त्या सत्तेने मत्ता मिळवणे, आणि त्यावर ऐष करणे यातच मर्दुमकी मानणाऱ्यांनी नक्की काय साध्य केले? मंत्री, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री व्हालही, पण शेवटी अगदी पुढील १०-१५ वर्षे पाहता पाहता, गेल्यावर तुम्ही, तुमची मुलं आणि नातवंडं कोणत्या स्थितीत असतील याचा कधी डोळे लावून गांभीर्याने विचार केला काय?- तो विचार आज करू या! हा कथाकादंबरीमधील कल्पनाविलास नाही, हे जळजळीत सत्य आहे!
२६ ऑगस्टला नेपाळच्या लिंडेखोला नदीमधे एक भीमकाय हीमनग/ग्लेशिअर कोसळला आणि त्याबरोबर महाप्रचंड हिमजलाचा मोठा प्रपात नदीपात्रात घुसला व वेगाने पात्रातून पुढे जाऊ लागला, एखाद्या मोठ्या भूकंपाचा धक्का बसावा तसा अवघा नेपाळ थरारून गेला आणि रस्त्यात येईल त्याला पोटात घेत हा जलप्रपात शेकडो इमारती, प्राणी व माणसे गिळून फस्त करत पुढे सरकला. रस्त्यातले ६ मोठे जलविद्युत प्रकल्पसुद्धा याच हिमजलाने गिळंकृत केले.
निसर्गाचा हा जलात्कार महाप्रलय म्हणण्यासारखा नाही पण, हे का घडले? या प्रश्नाचे विश्लेषण मात्र याहून कितीतरी मोठ्या संकटाकडे दिशानिर्देश करते.
शास्त्रज्ञांचा असा अंदाज आहे की, या पृथ्वीच्या जन्मानंतर आजतागायत ५ वेळा जीवसृष्टीचा संपूर्ण निप्पात झाला व नंतर पुन्हा पुन्हा पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण होत राहिली. या अशा ५ पैकी अगदी अलीकडचा जीवसंहार म्हणजेच 
६ कोटी ६० लक्ष वर्षांपूर्वी मेक्सिकोत झालेल्या  उल्कापातामुळे पृथ्वीवरील ७५ टक्के जीव नष्ट झाले. (विशेष म्हणजे तेव्हा या पृथ्वीवर मानव नावाच्या प्राण्याचा मागमूसही नव्हता) निसर्गाने केलेल्या या आघातानंतर २ वर्षेपर्यंत फारकाय तर सूर्यप्रकाशसुद्धा पृथ्वीपर्यत पोहचला नाही. एवढा हा जबर धक्का होता पण त्यानंतर आजपर्यंत एवढा भयावह महाप्रलय पुढे कधी झाला नाही. फक्त यात एक गोष्ट महत्त्वाची ती अशी की, उल्कापात, अतिविषारीवायू किंवा अतिवर्षा ही पूर्वीची कारणे संपूर्णत: नियंत्रणाबाहेर होती पण, आज मात्र माणूस आपल्या वाह्यातपणाने किंवा ईचकटपणामुळे  कथेमधील शेखचिल्ली सारखे आगाऊ धंदे करून हे संकट ओढवून घेत आहे.
नेपाळमधे घडले त्याची पुनरावृत्ती होईल का?
हे कसे घडले? व असेच पुन्हा घडू शकेल काय? या प्रश्नांचीउत्तरे खूप घाबरवणारी आहेत. देशात २०१२ ला उत्तरकाशीमधे, तसेच तिबेट, चमोली, रूद्रप्रयाग, इथेही असेच प्रकार मागच्या काही काळात घडले. याची कारणमीमांसा ही मानव जातीच्या सामूहिक पापाचा सर्वात मोठा पुरावा देते. मागील१०० वर्षात “सुखलोलुपता” या एका गोष्टीसाठी प्रचंड धावपळ करणाऱ्या ‘माणूस’ प्राण्याने आपल्या सुखासिनतेच्या मृगजळाचा केलेला पाठलाग आपल्या या सर्वनाशासाठी कारणीभूत आहे. ही विनाश-शृंखला माणसाने कशी निर्माण केली ? हे समजून घेऊ या !
भारताच्या उत्तरेकडील हिमालय खूप नवा-बालवयातला पर्वत आहे, जो ८ देशांतील ५५००० वर्ग किलोमीटर व्यापून १० मोठ्या नद्यांद्वारे या पृथ्वीवरील २०० कोटी (म्हणजे जगाच्या एक चतुर्थांश लोकांचा-)जीवनदाता म्हणून भूमिका निभावतो. एका विशिष्ट उष्मास्थितीमुळे पाऊस न पडता हिमालयात बर्फवृष्टी होते, ज्यामुळे बर्फाचा तुकडा जिथे पडतो तिथेच स्थिर होऊन, बर्फावरणाचा (Permafrost) भाग बनतो व तेथील बर्फाखालचे खोल मृदावरण घट्ट पकडून ठेवतो. मानवाने आसमंतात उत्सर्जित केलेल्या कर्बामुळे हिमालयात बर्फाऐवजी पाणी पडणे सुरू झाले, ज्यामुळे तेथील पक्का थर ढळून, तिथल्या मतीसदृश पदार्थांसह खाली ओघळला ज्यामुळे तेथील हिमनगाच्या(glacier)संरक्षक भिंती ढासळून तो रोखून धरलेला हिमजलसाठा खाली कोसळण्याचा धोका निर्माण झाला आणि हिमालयातून खाली आलेल्या मातीयुक्त अशा हिमजलाने भारतातील नद्यांत साचणे व ती पात्रे उथळ करून तो साठा बाहेर फेकून महापुरांचा धोका काही पटींनी वाढवणे सुरू झाले आहे. हे संकट किती मोठे आहे हा अंदाज तरी आहे का? हिमालयात ६०००महाकाय असे हिमजलसाठे आहेत, जे (आजतरी) बर्फाच्या पक्क्या भिंतीने धरून ठेवलेले आहेत. हा साठा ६००० अरब क्युबीक किलोमीटर एवढा असून भारतातील अहोरात्र वाहणाऱ्या सर्व नदीनाल्यांचे मिळून एकूण वर्षभर वाहून नेलेले जे १९००० क्युबीक किमी पाणी आहे त्याच्या तिप्पटीहून जास्त आहे.
आपण हिमालयाला सतत गरम करत आहोत. 
मागील काही काळामधे हिमालयाचे तापमान १.५ अंशाने वाढले ( हे मागील १००० वर्षांपेक्षा जास्त आहे) हाच वेग कायम राहिल्यास पुढील १५वर्षांत ३३ टक्के हिमजल भारतभर कोसळेल सुरुवातीला महापूर येईल पाणी वाहण्याचा भर ओसरल्यावर त्यापुढे भयावह अवर्षणाचा काळ सुरू होईल. त्रिशुंडी ही नदी गंगामातेची भुजा समजून पूजली जाते (आपले पूर्वज तेव्हा आपल्यापेक्षा हुशार होते) ही त्रिशुंडी तिबेटमधूननेपाळमार्गे आधी नारायण व पुढे गंडक बनून गंगेत मिसळून भारता मधील बिहार, उत्तर प्रदेश ची जीवनदायिनी होते ती सर्वप्रथम धोक्यात येईल, भारताचा २५ टक्के भूभाग वैराण होऊन विनाशाची सुरूवात होईल.
आपल्या गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ या चार धामांच्या वर चंपासर, चोराबाडी आणि सतोपंथ या नावाचे अत्यंत धोकादायक अशा पर्यावरणीय श्रेणीतील हिमनग-हिमजलसाठे आहेत, तेथे लाखो लोक दर्शनाला जातात त्यामुळे खूप काळजी वाटते.
त्याचवेळी जलजमीन, जंगलपर्वत असंतुलनाने मगर, वाघ, गिधाडे व मधमाशा संपतील आणि परागणाअभावी धान्योत्पादन थांबेल (त्यावेळी कोणता धर्म धोक्यात आला? हे सांगणारे) महापुरूष “झोला उठाके” निघून जायला हिमालयसुद्धा राहिलेला नसेल!
सूर्याची अतिनील व तीव्र ऊर्जा पृथ्वीवर येताना ती सुसह्य बनवून येथील जीवसृष्टीसाठी अमृत बनविण्यासाठीचे आदर्श पर्यावरण कोट्यवधी वर्षात विकसित झाले. अशी ऊर्जा जीवनानुकूल बनविण्यासाठी ११ किलोमिटरपर्यंतचे ओझोन सह इतर मित्रवायूंचे कवच बनले, आणि त्याला आवश्यक तेवढाच (म्हणजे १०लाखात २८०) या अनुपातात-प्रमाणात कार्बनडायऑक्साइड व इतर पोषक वायू निर्माण तर झालेच; परंतु असे प्रमाण टिकण्यासाठी वातावरणीय घटनांची (Cosmic Eco chain) एक साखळी पक्की करून (देवाने किंवा देव न मानणाऱ्यांच्यासाठी निसर्गाने-) जीवनानुकूलता सुनिश्चित केली. हे असे घडते की दिवसभरात सूर्य ऊर्जा-उष्मा देतो, रात्री झाडेजंगले, वाळवंट, समुद्र व माती ती ऊर्जा परतवून आवश्यकतेवढी ऊर्जा ठेवतात. असा एक लयबद्ध क्रियाकलाप निसर्गाने ‘सेट’केला.
कार्बन डाय ऑक्साइडचे पूर्वरूप असलेले सुप्त कार्बन हे जीवाश्म (fossil) रूपात जे पहुडलेले होते, ते मानव नावाच्या (व्रात्य माकडाने) मुक्त करून इंधन म्हणून वापरायला घेतले! आणि (प्रत्येकी एका सेकंदाला जगभरात रोडवर चालू असलेल्या २००कोटी मोटारींच्या धुरांड्यामधून कार्बन चे कार्बन डाय ऑक्साईडमधे रूपांतरित विष आसंमंतात सोडण्याचा प्रताप सुरू केला. एवढ्यावरच थांबला तर तो ‘हुशार’ माणूस कसला? वीजजनिर्मिती (४० टक्के) कारखाने
(२५टक्के) वाहतूक (१६ टक्के) जंगलतोड(१२ टक्के) व घरगुती वापर इत्यादी (७टक्के) या प्रकारे माणवाने सुखासिनकामना-जनीत अशी विष्ठा आसमंतावर फेकणे चालू केले व चालूच ठेवले ! स्वतःची मुलेबाळे उद्या आपल्या डोळ्यादेखत तडफडतील याची थोडीसुद्धा तमा जगभर सत्तेत असलेल्यांना का वाटत नसावी?
स्टॉकहोम, क्वेटो, कोपनहेगन पॅरिस, ग्लासगो याठिकाणी १९७२पासूनच्या ३०आंतरराष्ट्रीय परिषदांमधे पर्यावरण वाचविण्यासाठी जगभरातील सत्ताधीशांनी बैठका घेतल्या, पण जग वाचवण्यापेक्षा त्या लोकांनी आपापल्या खुर्च्या वाचविण्यालाच प्राधान्य दिले. अमेरिकेच्या क्लिंटन व ओबामासारख्या डेमॉक्रॅट पक्षाच्या अध्यक्षांनी हा प्रश्न थोडा गांभिर्याने घेतला, पण बुश आणि विशेषकरून आताच्या ट्रम्पसारख्या उथळ रिपब्लिकन अध्यक्षांनी २९१७ला आणि २०२५ ला या विषयातून डोके काढून घेतले व भारत व चीनवर खापर फोडून मोकळे झाले!
आज दुर्दैवाने जगभरात अत्यंत उथळ, आणि काहीही लायकी नसलेले बहुतेक राष्ट्रप्रमुख बसलेले आहेत (किंबहुना ते कमी अकलेचे असणे हेच त्यांचे विशेष Qualification आहे.
याहून किंचित जास्त अक्कल असती व ती जर ते वापरतील अशी भीती असती तर कदाचित ते तिथे बसवलेच गेले नसते अशी काही देशांची स्थिती आहे!)
जगभर राज्य करणारे जे जे जागतिक धोरणकर्ते म्हणवून घेणारे, निर्णयप्रक्रियेत कुठे असतील त्यांनी त्यांनी हे काम सर्वप्राथम्याने हाती घेऊन जमेल तेथे, शक्य तेवढ्यांना झोपेतून झिंझोडून कामाला लावले पाहिजे. आधी सर्व लोक जिवंत राहण्याचे बघू या व नंतर कोणता धर्म धोक्यात आला? वगैरे वगैरे बघू! 
या इथल्या ज्येष्ठ पिढ्या आता उताराला लागल्या आहेत (आणि ज्यांना पुढच्या पिढ्याच नाहीत ते लोक निश्चिंत राहूही शकतात) पण ज्यांना भविष्याची काळजी आहे, अशा “जेन झी आणि जेन अल्फा”ने निश्चिंत शेख चिल्लींकडे दुर्लक्ष करून आपला योग्य मार्ग लवकरात लवकर धुंडाळला पाहिजे. पण आता ती वेळही गेली आहे. काही तज्ज्ञांच्या मते २०२६ हे मागे फिरण्याच्या मुदतीचे शेवटचे वर्ष होते. गिरीश राऊत या पर्यावरण तज्ज्ञाबरोबर ४-५ वर्षांपूर्वी मुंबईत आम्ही ( मी व प्रकाश पोहरेंनी) चर्चा केलीहोती तेव्हा हताशपणे त्यांनी पुढील फक्त ३ वर्षे मानवाच्या हाती आहेत, असे उद्गार काढले होते.
आम्ही या विषयाचे जाणकार किंवा तज्ज्ञ नाहीत पण, संभाव्य बळी असल्याने यामधील तज्ज्ञांना आवाहन करून माहिती घेण्याएवढे मुमुक्षू तर नक्कीच आहोत !
काही आशावादी लोक ही भीती खोटी असून हे असे काहीच होणार नाही असे छातीठोकपणे सांगतात अशीही माहिती मिळत आहे. त्यांचे म्हणणे आहे की, हिमालयात आणि पृथ्वीच्या पर्यावरणात या वैश्विक घडामोडी सतत घडत असतात,  त्यामुळे त्यातएवढे घाबरण्यासारखे काहीही नाही! आमच्या मताला विरोध करीत असलेले खरे ठरोत आणि आम्हाला जाहीरपणे त्यांची हात जोडून क्षमा मागायची वेळ येवो, ही देवाजवळ प्रार्थना आहे!पण, जोपर्यंत ही भीती अभ्यासपूर्ण विवेचनाने पूर्णत: निरस्त होत नाही तोपर्यंत या विश्वाचे नेतृत्व करण्याएवढी रुंद छाती असलेल्यांनी आम्हासारख्या घाबरट लोकांस धीर देण्यासाठी या विषयावर एक विस्तृत श्वेतपत्रिका काढून आम्हाला आश्वस्त करावे ही विनंती आहे!

पुरुषोत्तम गावंडे 
७९७७१६३७७४