उरे‘बोलो जय श्रीराम अन करो यैशोअराम’ हो शेंड्यावरचे सदाबहार जवानीत येल नत्थुआबा! ईतल्यात शाईनिंग ईंडियाचं भवितव्य घळोयासाठी युवापिळीले बुद्धीनं ‘तंदुरुस्त’ व्हासाठी बेज्याच जोऱ्यानं मेहनत करुन रायले बावा!
अबे तोंडफोळ्या, माया ‘ईकासाच्या’ झटक्यानं कोमात जायेल बंगरस्या बाबुराव, तुले ससरीच्या माया हातून घळेल येकबी ‘पुन्न्याईचं’ काम तुया पोटात पचत नाई काय? तुले हजारखेप सांगु सांगु थकलो का माया ‘ईकासकामाच्या’ आठीत बोलु नोको तरी तु काहून आयकत नाईस?
मले तुमचा अंदरला साराच ‘जांगळबुत्ता’ मालुम असल्यानं मायाशी काई खेटे घीवू नोका नत्थुआबा! तुमी त्या जंतर-मंतरवरच्या ‘जेनझी’चा येवळा धसका घेतला का तुमची देव-धर्माची पुन्न्याई अन जातीपातीची शिष्टाई सारी ‘मातीमोल’ झाली! तुमी जरी साऱ्या पक्षाच्या झेंड्याचे रंग बदलले पन चलवाद्या राजकारनात ‘युवाक्रांती’चा ज्वालामुखीवानी नवाच फंडा जलमाले आला!
पन तुमी काई म्हना नत्थुआबा, मले ईम्मानानं सांगा बरं, तुमी अन् तुमच्या मंत्र्या-संत्र्याईनं अंदरल्या पयशाच्या कमाईच्या नावाखाली स्पर्धा परीक्षेच्या पेपरफुटीचं नवं धस्कट गरीब ईद्यार्थ्यावर लादल्यानं बयादाटून सोताच्या घरावर गोटे आपटले? तसबी तुमचं काम म्हंजे येकदम ‘चोखट अन् गुयचट’ हायेच म्हना! ‘मुहमें राम और बगलमे छुरी, भाळ मे जाये ईंडिया मगर दिल की हौस करेंगे पुरी?’ ईतकं सीनठोक काम हाये राजेहो!
मले ईतिहास वाचाले भाग पाळू नोका बरं आबा, पयले नीटचे पेपर फुटले मंग सीईटी, त्याच्याबाद येकामांग येकेक हरेक स्पर्धा परीक्षेचे पेपर फुट्याची तुमच्याच परिवारातल्या सोंगाळ्या सख्ख्या साथीदाराईनं शप्पथच घेतली! मंग असे बंगरस्यावानी हरेक परिक्षेचे पेपर फुटले थं शाईनिंग ईंडियातली गरीब युवा पीळी कशी शिक्शन घील? सरकार तुमचं, शिक्शनमंत्री तुमचा मंग हे सोंगाळे कोचिंगक्लासवाले जबरदस्तीनं पेपर फोळून अचाट कमाई कसे काय करतात? म्हंजे युवापीळीले शिक्शन क्षेत्रात असे घापले करुन ‘बरबाद’ कराचा ठेका घेतला काय? नक्कीच ‘कमळ’ फुलोयासाठी चिखलात कुठीतरी पानी मुरुन रायलं हेच खरं समजावं काय?
येकाईकळे देशाचं काईतरी नवं भवितव्य घळोयासाठी ज्या नव्या जेनझीले सोंगाळे मंत्री-संत्री पेपरफुटीच्या तितंब्यानं ‘घायल’ करुन रायले तं दुसऱ्या ईकळे देशातल्या शेतकऱ्याले वदरचा निसर्ग, मायबाप हेंबाळ्या सरकारचे खोटे आश्वासनं, वांजोटं पेपरफुटीनं कोमात जानारं शिक्शनक्षेत्र, मुजोर बेपाऱ्याईचा बेभाव, वदरुन सरकारी म्हागाईची गच्यांडी अशा सतरासे छप्पन संकटाईच्या ईचुकाट्यानं या देशातला कष्टकरी शेतकरी अन गोरगरीब ईद्यार्थी ‘खल्लास अन् कंगाल’ व्हून रायला ना!
गंगाजलावानी पवित्र शिक्शनक्षेत्रातले कोचिंगच्या धंद्यातले भगिरथ, तुमच्या ‘ढमक्या अन् बहुरुपी’ सरकारच्या आशिर्वादावरच पेपरफुटीची मलाई खाऊन तुमच्यावरच ‘शिरजोर’ झाले! या बेसरमावानी कारभारानं मायबाप सरकार जर ईतकं हतबल व्हते म्हनून या जेनझीच्या रुपानं युवापीळीच्या कायजातला नवा ‘ज्वालामुखी’चा फंडा जलमाले आला!
‘भीक नोको पन कुत्रा आवरं’ या म्हनीवानी पयले नत्थुआबा तुमी बाजींद्या सरकारातले ‘शकुनीमामा ओयखून तेईचा तकळबंद करा मंग जय श्रीरामाले सावरा! महाभारतातल्या धृतराष्टाच्या गांधारीवानी डोयावर पट्टी बांधून संजयच्या भरोशावर राजोट करनाऱ्याईचा जमाना फक्त ईतिहासातच वाचाले भेट्टे!
बापहो, या कृषीप्रधान देशातल्या शेतकऱ्याच्या, नव्यापीळीच्या जेनझीच्या आंगातलं रगत तेईले बसनाऱ्या ‘ढोरकोंब्यानं’ येकखेप ज्वालामुखीवानी उसयलं थं ते थंड कराची कोनाच्या बापाची औकात नसते! ‘अती तथी माती’ व्हतं असील तं हे ध्यानात ठुन या चतऱ्या सरकारनं टायमावर पेपरफुटीची झालेली चुक दुरुस्त केली पायजे! फक्त दोस्तान्यातल्या उद्योगपतीचे मुके घीवून, बेपाऱ्याईले बेभावानं जतनेले ‘लुटाची’ संधी दिवून कोन्त्याबी राजकारनाची ‘तुरफाई’ करनं जमत नसते! आधुनिक युवापीळीची ताकद म्हंजे सागरातला उसळता ‘ज्वालामुखी’ असते! तो येकखेप कायजातून उसयला तं सरकारले पयता भुई कमी पळते?
काहो नत्थुआबा, तुमी दोन हजार चौदापासून शेतकऱ्याले, जेन झीले ‘अच्छेदिनाची’ सलाईन लावून, देवधर्माचा जातीपातीचा ‘ढोरकोंबा’ दिवून कसातरी हा महाखटला वांढाय चाकं लावून चालून रायले? पन जयश्रीरामाच्या घोषनेची ‘टाॅनिक’ आता जनतेनं देल देवळातल्या दानाच्या चोरीनं ‘ओम फट स्वाहा:’ झाली! म्हंजे तुमी ‘देव सोन्याचा’ केला अन् जनतेले म्हागाईचे, ईद्यार्थ्याईले परीक्षेच्या पेपरफुटीचे ढोरकोंब्यावर ढोरकोंबे बसूनच रायले? तुमी येवळे बुद्धीवान ‘नत्थुआबा’ असल्यावरबी तुमच्याच हाताखालचे दिवानजी-मुनीमजी म्हंजे ‘मंत्री-संत्री’ हे कसे काय बेसरमावानी पेपरफुटीचा भोंगया ‘तमाशा’ उघळ्या डोयानं पावून रायले? येवळी मोठी जीवाले जीव देनारी भारताची संस्कृती असल्यावरबी या आधुनिक शाईनिंग ईंडियातल्या शिक्शन घेनाऱ्या ईद्यार्थ्यावर ‘जीव द्याची’ पायी कोनं आनली?
पयलेच तं बावा, या कृषीप्रधान देशातला शेतकरी तुमच्या या खोट्या आश्वासनानं, ‘अच्छे दिना’च्या हेंबाळ्या राजकारनानं वावरं पळीत ठुन ‘गयफास’ घ्याले तळफळते! जो शेतकरी घामकष्टानं शेती पिकोवून अख्ख्या जगाच्या पोटातली भुक भागोते, त्याच्यावरच जर गयफास घ्याची पायी येते मंग ‘जेन झी’चा जंतर-मंतरवर उसयेल ‘दांगळो’ करनं हे चुक की बरोबर हाये याचं
पयले शेंड्यावरच्या सोन्याच्या खुर्चीत बसून चिंतन करा! का यालेच बावा ‘सत्यमेव जयते’ची राजोट करनं समजावं काय...??
अरुण मोडक
९८२२५९३९४७