स्टेट लाइन

सरसंघचालकांचा अमेरिका दौरा

न्यूयॉर्क येथील मॅडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये मोहन भागवत यांनी दिलेल्या भाषणाने त्यांचे विरोधकही स्तंभित झाले.

सरसंघचालकांचा अमेरिका दौरा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या पृष्ठभूमीवर सरसंघचालक मोहन भागवत यांचा अमेरिका-कॅनडा दौरा विशेष चर्चेत राहिला. न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये झालेल्या कार्यक्रमात त्यांनी हिंदुत्व, विविधता, एकता आणि मानवतेविषयीची भूमिका मांडली. परदेशात स्थायिक भारतीयांनी कर्मभूमीशी प्रामाणिक राहावे आणि जन्मभूमीशी नाते जपावे, हा संदेशही त्यांनी दिला. त्यांच्या भाषणावर उमटलेल्या विविध प्रतिक्रिया आणि अमेरिकेतील कार्यक्रमाची व्यापक उपस्थिती यामुळे या दौऱ्याला वेगळे महत्त्व प्राप्त झाले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सन २०२५ मध्ये शंभर वर्षे पूर्ण झाली.  सन २००९ पासून मोहन भागवत हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक या पदावर काम करीत आहेत. संघाच्या शताब्दी वर्षात सरसंघचालकांच्या नुकत्याच झालेल्या अमेरिका- कॅनडा दौऱ्याला विशेष महत्त्व होते.  गेल्या बारा वर्षांहून अधिक काळ भारतात केंद्रात भाजपाच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार आहे. नरेंद्र मोदी यांनीही पंतप्रधानपदाची हॅटट्रीक करण्याचा विक्रम संपादन केला आहे. मोदी, तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह केंद्रातील बहुसंख्य मंत्री हे संघाचे स्वयंसेवक आहेत. देशातील बावीस राज्यांत भाजपा सत्तेवर आहे. सतरा राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री आहे.  देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाचे बहुतेक मुख्यमंत्री व सर्वाधिक मंत्री हे संघाच्या संस्कारातून पुढे आले आहेत. त्यामुळेच सरसंघचालक काय म्हणतात याकडे सर्व देशाचेच नव्हे, तर जगाचे लक्ष असते. भाजपाच्या सरकारमागे जसा जनाधार आहे, तसेच संघ शक्ती निस्वार्थी संघ स्वयंसेवकांची शिस्तबध्द फौज आहे. म्हणूनच केंद्रात किंवा राज्यात जिथे भाजपाचे सरकार आहे ते स्थिर व भक्कम आहे.
न्यूयॉर्क येथील मॅडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये मोहन भागवत यांनी दिलेल्या भाषणाने त्यांचे विरोधकही स्तंभित झाले. हिंदुत्वाचा पुरस्कार करताना त्यांच्याकडून भारतातील अल्पसंख्य समाजाविषयी काही टीका टीपणी होईल असे काहींना वाटले होते. भारतातील मुस्लीम समाजाविषयी ते कटू बोलतील अशी काहींना भिती होती. भारतातील भाजपा सरकार हे मुस्लिमांना दुय्यम वागणूक देते असा दुष्प्रचार अनेक देशांत हितसंबंधी लोकांनी पसरवला आहे; पण भाजपाची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक यांनी हिंदू आणि हिंदुत्व हा विचारच किती विशाल व उदारमतवादी आहे हे जगाला समजावून सांगितले. भागवत यांच्या न्यूयॉर्कमधील भाषणाला न्यूयॉर्कचे भारतीय वंशाचे असणारे महापौर जोहरान ममदानी  यांनी कठोर विरोध दर्शवला होता.  भागवत यांच्या भाषणाच्या वेळी अमेरिकेतील विविध संघटनांनी निदर्शने केली. संघ विरोधी घोषणा फलक फडकावले. धार्मिक स्वातंत्र्यावरील एका आयोगानेही भागवतांच्या कार्यक्रमाला विरोध केला होता; पण  त्यांच्या भाषणात कोणी अडसर निर्माण केला नाही. अमेरिकन सरकारने त्यांना पुरेशी सुरक्षा व्यवस्था दिली होती. युनिवर्सल वननेस सेलिब्रेशन (वन वर्ल्ड, वन ह्युमॅनिटी) या कार्यक्रमात भागवत यांनी त्यांच्या भाषणातून विविधतेतील एकता जपणे आणि बहुविधतेचा सन्मान करणे हाच जगाला संदेश दिला. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त एक विश्व, एक मानवता हा उत्सव योजला होता. भारताच्या डीएनएमध्ये विविधता आणि एकता आहे, असे त्यांनी सुंदर व सुखद विचार आपल्या ४२ मिनिटांच्या भाषणातून आंतरराष्ट्रीय मंचावरून मांडले. न्यूयॉर्कमधील कार्यक्रमाला पाच हजारांहून अधिक मूळ भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक सहभागी झाले होते. भागवत यांच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डनमधील कार्यक्रमाचे आयोजन हिंदूज फॉर एन्गेजमेंट अँड डायलॉग या संस्थेने केले होते. भागवत यांचे भाषण ऐकण्यासाठी तीस देशांतील  १६ विविध धर्मांचे १८० हून अधिक धार्मिक नेते उपस्थित होते. 
अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांना उद्देशून भागवत म्हणाले-  जे लोक भारताबाहेर अन्य देशात जाऊन स्थायिक झाले आहेत, त्यांच्यासाठी तो देश त्यांची कर्मभूमी आहे.  आपले कर्तव्य काय आहे? आपण अमेरिकेत राहात असू, इथेच कमवत असू, तर आपण अमेरिकेचाच एक भाग झालो आहोत.  अशा परिस्थितीत आपले इथले वर्तन योग्य असले पाहिजे. आपल्या कर्मभूमिशी आपण प्रामाणिक राहिले पाहिजे…
भारत ही तुमची आणि तुमच्या पूर्वजांची जन्मभूमी आहे. त्यामुळे भारतासाठी काही करणे शक्य असेल तर अवश्य करा; मात्र तुमची जन्मभूमी तुमच्याकडून ही अपेक्षा करते की, ज्या मूल्यांच्या आधारे तुमचे आणि तुमच्या पुर्वजांचे, जीवन घडले आहे, तीच मूल्ये सोबत घेऊन तुमच्या कर्मभूमीत काम करा… या मोहन भागवतांच्या उपदेशाला सर्वाधिक टाळ्यांचा कडकडाट झाला.
सारे मानव एक आहेत, यावर हिंदुत्वाचा विश्वास आहे. भारतात मुस्लीम असूच नयेत, असे एखाद्याला वाटत असेल तर तो खरा हिंदू नाही, अशी भूमिका मोहन भागवत यांनी मांडली व त्यालाच हिंदुस्तानातील मीडियामध्ये सर्वाधिक प्रसिध्दी मिळाली. संघाची भारतात भूमिका वेगळी असते आणि सरसंघचालक अमेरिकेत वेगळेच बोलतात म्हणून विरोधी पक्षांनी टीका केली. सत्तेवर बसलेल्या संघ स्वयंसेवकांना तसे वागायला सांगा, अशीही टीका झाली. गेल्या बारा वर्षांत भारतात मुस्लीम व्देष किती वेगाने पसरवला गेला याची  मुस्लीम नेत्यांनी आठवण करून दिली.
सरसंघचालक मोहन भागवत यांना विरोध करणे हा अमेरिकेत विचार स्वातंत्र्याचा भाग असू शकतो; पण त्यांच्या कार्यक्रमाच्या वेळी संघाच्या विचारसरणीला विरोध करताना दिलेल्या घोषणा या भारत विरोधी होत्या. एवढेच नव्हे, तर खलिस्तान झिंदाबाद अशा घोषणा देणारे युवक भारताचा तिरंगा पायदळी तुडवतानाचे व्हिडिओ जगभर व्हायरल झाले आहे. मग अशा वेळी न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी चूपचाप कसे बसले होते? एखाद्या खासगी कार्यक्रमावर महापौरांनी टीका- टीपणी करणे हे तर चुकीचे आहेच; पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व नरेंद्र मोदी यांचा ते मत्सर करतात, अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली आहे. महापौर ममदानी हे हिंदू विरोधी आहेत, असा हिंदू संघटनांनी आरोप केला आहे.
मॅडिसन स्क्वेअर गार्डन मधील कार्यक्रमास येणाऱ्या पुरुषांना भारतीय महिला राखी बांधून त्यांचे स्वागत करताना दिसत होत्या. भारतीय संस्कृती, भारतीय परंपरा आणि बंधुभाव अशा अनोख्या रक्षाबंधनातून दिसून आला. मोहन भागवत मंचावर येताच एका भारतीय महिलेने त्यांना राखी बांधून भारतीय संस्कृतीचे दर्शन सर्व जगाला घडवले. 
न्यूयॉर्कमधील मॅडिसन स्क्वेअर गार्डनला सुध्दा आगळे वेगळे महत्त्व आहे. न्यूयॉर्कमधील मॅनहटनमधील हे प्रसिध्द स्थळ आहे. इनडोअर एरिना आहे. येथे मोठ मोठे क्रीडा महोत्सव,  कॉमेडी शो, प्रदर्शन, मोठे सार्वजनिक कार्यक्रम होत असतात. मॅडिसन स्क्वेअर गार्डन १९६८ मध्ये उभारले गेले.  ११ फेब्रुवारी १९६८ मध्ये कार्यक्रमांसाठी खुले झाले. एमएसजी नावाची आता चौथी भव्य इमारत उभी राहिली आहे. आपले राजकीय पुनरागमन झाल्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी येथे जंगी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.   रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अधिवेशन येथे २००४ मध्ये झाले.  डेमॉक्रॅटिक पार्टीचे संमेलन येथे १९७६, १९८० व १९९२ मध्ये झाले. सन २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याच ठिकाणी  योजलेल्या मोठ्या कार्यक्रमात भाषण दिले होते. याच ऐतिहासिक वास्तुमध्ये २९ ऑगस्ट २०२६ रोजी सरसंघचालकांनी भाषण देऊन सर्व जगाचे लक्ष वेधून घेतले.  मोहन भागवतांच्या भाषणासाठी जमलेले लोक मोठ्या उत्साहाने आले होते. मॅडिसन स्क्वेअर गार्डनच्या इन्फोसेस थिएटरची क्षमता ५५७० आहे. हे विशाल सभागृह खचाखच भरले होतेच शिवाय अनेक आगंतुक व निमंत्रितांना बाहेर उभे राहावे लागले.
भागवत यांनी आपल्या अमेरिकेच्या मुक्कामात इस्कॉन सेंटरला भेट दिली. स्वामी प्रभुपाद यांनी  १९६६ मध्ये इस्कॉनची स्थापना केली. इस्कॉन या वर्षी अमृतमहोत्सव साजरा करीत आहे. इस्कॉनची जगात १२० देशांत १३०० मंदिरे आहेत.
सरसंघचालक मोहन भागवत यापूर्वी २०१८ मध्ये अमेरिकेच्या दौऱ्यावर आले होते. शिकागो येथे ७ ते ९ सप्टेंबर या काळात भरलेल्या दुसऱ्या वर्ल्ड कॉँग्रेसमध्ये ते सहभागी झाले होते. त्या अधिवेशनात ६० देशांतील २५०० प्रतिनिधी उपस्थित होते. वर्ल्ड काँग्रेसच्या उद‌्घाटनाच्या कार्यक्रमातच मोहन भागवत यांचे भाषण झाले होते.  

डॉ. सुकृत खांडेकर
ज्येष्ठ पत्रकार
मो. ९५९४२२४०००