शिक्षक हा केवळ ज्ञान देणारा नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणारा मार्गदर्शक असतो; मात्र अशैक्षणिक कामांच्या वाढत्या ओझ्यामुळे शिक्षकांचा विद्यार्थ्यांशी असलेला जिव्हाळ्याचा संवाद कमी होत आहे. शिक्षणाचा केंद्रबिंदू विद्यार्थी असताना शिक्षकांनाच अध्यापनापासून दूर नेले जात असेल, तर ही परिस्थिती चिंताजनक आहे. शिक्षकांना अध्यापनासाठी पुरेसा वेळ आणि स्वातंत्र्य मिळाले, तरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासह शिक्षणाचा खरा उद्देश साध्य होईल.
‘आवडते मज मनापासुनी शाळा;
लाविते लळा जसा माउली बाळा.’
ही ओळ गुणगुणतच तुम्हा- आम्हाला आयुष्याचे भान आले. एखाद्या बाळाला त्याची माउली जशी लळा लावते, त्याच्यासाठी इष्ट काय? अनिष्ट काय? याचे संस्कार करत करत मोठे करते त्याचप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्याची शाळा ही त्याच्यावर माउलीप्रमाणे लळा लावणारी, त्याच्यावर सुसंस्कार करून; त्याला आयुष्याचे भान देऊन आयुष्याचा महोत्सव करायला शिकवणारीच असावी, असे वाटत राहते..; आणि असे वाटत असतानाच शाळेपासून; शिक्षकांपासून दूर जात असलेली बालके आतड्याला पीळ देऊन जातात. तसे पाहिले, तर यात त्यांचा काहीच दोष नाही. याला सर्वतोपरी जबाबदार आहेत ती शिक्षणक्षेत्राने वा इतर क्षेत्रांनी शिक्षकांवर लादलेली अशैक्षणिक कामे! असे मला इथे ठामपणे वाटते. या कामांमुळेच विद्यार्थी व शिक्षक यांच्यातील दुरावा दिवसेंदिवस वाढत चाललाय. या वास्तवाकडे आता डोळेझाक करून चालणार नाही.
कोणत्याही क्षेत्रातील सुधारणांचा पाया हा शिक्षण प्रक्रियेमुळेच मजबूत करता येतो. व्यक्तीच्या जीवनात त्याचे ‘सकारात्मक जगणे’ याचा पाया शिक्षण प्रक्रियेतूनच पेरला जातो म्हणूनच प्रत्येक व्यक्तीचे शालेय जीवनापासूनचे शिक्षण जास्तीत जास्त अनुभवात्मक व्हायला हवे. त्याचे एक सकारात्मक, उज्ज्वल, आत्मनिर्भर, सुंदर सफल घडविण्यासाठी त्याचे शालेय शिक्षण कामी यायला हवे, तसेच त्याची स्वप्न साकार करण्यासाठी, ‘आयुष्य खऱ्या अर्थाने जगायला शिकणे’ या एका गोष्टीसाठी त्या शिक्षणाची मदत व्हायला हवी आणि जर का एका शिक्षकाला हे सगळे करायचे असेल; शिकणाऱ्याला हवे ते देता यायला हवे, असे वाटत असेल; किंबहुना हेच शिक्षणाचे खरे उद्दिष्ट आहे, असे मानून ते उद्दिष्ट साध्य करायचे असेल, तर त्याचा संपूर्ण वेळ त्याच्या बालकांसाठी त्याला मिळायला हवा. त्यांच्यासाठी खर्च करता यायला हवा. त्यासाठी त्याला त्या बालकांच्या संपर्कात राहता यायला हवे; आणि जर का असे होत नसेल, तर संपूर्ण शिक्षण प्रक्रिया नासतेय वा नासवली जातेय, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
किती गंमत आहे पहा......
बालकांचा मोफत व शक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम २७ नुसार शिक्षकांना अशैक्षणिक कामांसाठी नियुक्त करण्यास मनाई करण्यात आली आहे. राज्यातील सर्व मुलांना गुणात्मक व दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शिक्षण हक्क कायद्यानुसार वर्षातून प्राथमिक वर्गासाठी किमान २०० दिवस आणि उच्च प्राथमिक वर्गासाठी किमान २२० दिवस अध्यापन होणे बंधनकारक आहे, असा शासन निर्णय महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत २३ ऑगस्ट २०२४ रोजी परिपत्रकाद्वारे निर्गमित झालेला आहे. या अनुषंगाने शैक्षणिक व अशैक्षणिक कामांसंदर्भात चर्चा होऊन त्या कामांचे वर्गीकरणही करून दिले आहे. असे असूनही शिक्षकांच्या दैनंदिन कार्यात अशैक्षणिक कामांचाच भडीमार होताना दिसतोय; नव्हे दर दिवशी तो पावलोपावली वाढत जातोय आणि हा भडीमार आज घडीला प्रत्येक शिक्षक प्रत्यक्ष अनुभवतोय आणि त्यामुळे तो त्रासतोय, वैतागतोय. असल्या अशैक्षणिक कामांमुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक, तसाच सर्वांगीण विकास खुंटतोय. त्यामुळे प्रत्येक शिक्षक अस्वस्थ झालेला दिसतो आणि त्यातल्या त्यात शिक्षकाची अस्वस्थता शिगेला पोहोचवणारी बाब म्हणजे शासनाने बळजबरी लादलेली ‘शिक्षक पात्रता परीक्षा’ होय. या परीक्षेमुळे नोकरी जाण्याच्या भीतीपोटी अनेक शिक्षकांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले आहे. अशा मानसिक अवस्थेत एक शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना काय देऊ शकेल? एवढे असूनही सरकारच्या भूमिकेशी समायोजन करून ४७ ते ४९ डिग्री तापमानात सहा ते आठ तास जनगणनेची कामे करून कोणतीही विश्रांती न घेता प्रसंगी कुटुंबाशी दुरावा निर्माण करून स्वतःला खोलीत कोंडून घेत शिक्षक २८ जूनला होऊ घातलेल्या टीईटी परीक्षेची तयारी करतो आणि २७ जूनला परीक्षेला अगदी काही तास उरले असताना पेपरफुटीची बातमी त्याला मिळते, त्यावेळी त्या शिक्षकाची अस्वस्थता समजून घेण्यासाठी प्रत्येकाला शिक्षकच व्हावे लागेल. याही पुढे जाऊन परीक्षेच्या नवीन तारखेची वाट पाहत असताना एक महिना उलटून जातो; पण परीक्षेची कुठलेही तारीख जाहीर होत नाही तेव्हा त्याच्याजवळ असलेल्या एका महिन्याच्या अवधीत तो शाळा, घर, मुलंबाळं सगळे सांभाळून तारेवरची कसरत करत सी टी ई टी परीक्षेची कशीबशी तयारी करतो आणि परीक्षेला आठ ते दहा दिवस बाकी असतानाच परीक्षा निरर्थक कारणे देऊन पुढे ढकलली जाते. एका हाडाच्या शिक्षकाला कुठे घेऊन जाणार आहे ही अस्वस्थता!
आर.टी.ई. ॲक्ट २००९ मधील कलम २७ मधील जी अनिवार्य कामे शिक्षकांना दिलेली आहेत ती प्रत्येक शिक्षक जबाबदारीने चांगल्या प्रकारे पूर्ण करतोच. त्या व्यतिरिक्त प्रत्येक शिक्षकाच्या अध्यापन वर्गाच्या अनुषंगाने येणारी आणि शिक्षणाशी संबंधित असलेली इतर बरीच कामेही उदा. यु-डायस प्लस व सरल प्रणालीच्या माहितीचे अद्ययावतीकरण, शाळाबाह्य मुलांचा शोध, नवसाक्षर सर्वेक्षण, केंद्र व राज्य सरकार पुरस्कृत विविध विद्यार्थी लाभांच्या योजना राबविण्यासंदर्भातील कामे, शालेय पोषण आहार निगडित कामे, विद्यार्थी शैक्षणिक विकासाच्या संदर्भातील कामे, गैरहजर मुलांच्या पालक भेटी व उद्बोधनासाठीची कामे, पट नोंदणी, शाळा पूर्वतयारी, शैक्षणिक जाणीव जागृती संबंधातील कामे, उदा. मेळावा, शिबिरे इत्यादी. लोकसहभाग घेऊन शाळा सुधार योजनांची कामे, उल्हास नवभारत साक्षरता अंतर्गत येणारी विविध कामे, इत्यादी कामेही तो संपूर्ण जबाबदारीने निमूटपणे करतच असतो. ही सर्व कामे सांभाळून त्याला आपल्या विद्यार्थ्यांत रमायचे असते, त्यांची सुख-दुःख जाणून घ्यायची असतात, त्यांच्यात सामाजिक व भावनिक बुद्धिमत्ता वाढीस लावायची असते, स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून या नव्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी खंबीरपणे जगायला हवे; त्यासाठी त्यांना एक निडर, खंबीर, आग्रही, जबाबदार, कर्तव्यनिष्ठ नागरिक बनवण्यासाठीचे प्रयत्न करायचे असतात. तो एक चांगला माणूस म्हणून जगावा यासाठी त्यांच्यात सुसंस्काराचे बीजं पेरायचे असतात आणि खरंतर हेच एका खऱ्या शिक्षकाचे कर्तव्य असते. हे सर्व संस्कार विद्यार्थ्यांवर करता येण्यासाठी, या गोष्टींच्या संस्काराचे बीज त्याला त्यांच्या बालकांच्या शालेय जीवनात पेरता येण्यासाठी पुरेसा सहवासच अशैक्षणिक कामाच्या गराड्यामुळे मिळत नसेल, तर यापेक्षा मोठे दुर्दैव ते कोणते?
शिक्षण जर का अशैक्षणिक कामांच्या गराड्यामुळे एका शिक्षकाला विद्यार्थ्यांपासून दूर घेऊन जात असेल; त्या विद्यार्थ्यांपासून त्याला तोडत असेल, तर त्या शिक्षणाचा फायदा तरी काय? असा प्रश्न आपल्याला पडल्यावाचून राहत नाही.
अंजली खोरखेडे
खामगाव, मो.७९७२८२१११७