भारतात आरएसएस आणि परदेशात एचएसएस (हिंदू स्वयंसेवक संघ) असे हे जाळे आहे. भारतात आरएसएसची शासकीय नोंदणी नाहीच; मात्र परदेशात एचएसएसची सरकारदरबारी नोंदणी झालेली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यपद्धती आणि परदेशातील हिंदू स्वयंसेवक संघाशी असलेल्या संबंधांवरून पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. संघाची प्रतिमा, त्याचे वैचारिक स्वरूप आणि परदेशातील संस्थांशी असलेले संबंध याबाबत विविध दावे आणि प्रश्न उपस्थित होत आहेत. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या परदेश दौऱ्याच्या पृष्ठभूमीवर या प्रश्नांकडे पुन्हा गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) कोणत्याच धर्माचा द्वेष करीत नाही हे बाह्य जगाला पटवून देण्यासाठी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत महोदय पश्चिमेत दौऱ्यावर आहेत. अमेरिका आणि कॅनडा भेट आटोपून ते आज यूके (युनायटेड किंगडम- इंग्लंड, वेल्स, स्कॉटलॅंड आणि उत्तर आयर्लंड) मध्ये आहेत. या सर्व देशांतील मानवाधिकार संघटनांनी आरएसएसवर बंदी घालण्याची मागणी त्यांच्या- त्यांच्या सरकारांकडे केली. अमेरिकी संसदेच्या (काँग्रेस) आयोगानेही बंदीचाच सूर काढला. या विरोधाची धार बोथट करण्यासाठी, संघ स्वच्छ आहे अशी प्रतिमा निर्माण करण्यासाठी भागवती प्रयत्न सुरू आहेत. या विधानाने काही जण दुखावतील. आमचा नाइलाज आहे.
भारतात आरएसएस आणि परदेशात एचएसएस (हिंदू स्वयंसेवक संघ) असे हे जाळे आहे. भारतात आरएसएसची शासकीय नोंदणी नाहीच; मात्र परदेशात एचएसएसची सरकारदरबारी नोंदणी झालेली आहे. प्रसंग आणि देशपरत्वे या संघटना सोयीनुसार आपापले चेहरे बदलतात.
एचएसएस म्हणते, आमच्यावर आरएसएसचा प्रभाव आहे; परंतु आम्ही त्यांना निधी देत नाही. किंवा ते आम्हाला निधी देत नाहीत. वैचारिक समानता वगळता आमचे कोणतेही संबंध नाहीत. याउलट, आरएसएस म्हणते, परदेशातील एचएसएस आमच्याच शाखा आहेत!
वरील वाक्य लिहिताना आमच्यापुढे यूकेच्या चॅरिटी कमिशनचा २ सप्टेंबर २०१६ चा “चौकशी अहवाल: हिंदू स्वयंसेवक संघ (यूके)” आहे. या अहवालासंदर्भात “सबरंग इंडिया” डिजिटल न्यूज पोर्टल, ब्रिटनमधील नोंदणी असलेले “सिव्हील सोसायटी मीडिया” (वेबसाइट civilsociety.co.uk) आणि नेदरलॅंडमध्ये हेग येथे नोंदणी असलेल्या “द लंडन स्टोरी” फौंडेशनचे (ई- मेल: editor@thelondonstory.org) वृत्त आहे.
यूकेच्या चॅरिटी कमिशनने प्रसिद्ध केलेला चौकशी अहवाल मुस्लीम आणि ख्रिश्चन धर्माच्या द्वेषाशी संबंधित आहे. हिंदू स्वयंसेवक संघाने (एचएसएस यूके) हिअरफोर्डशायर येथे २०१४ साली तेरा वर्षांखालील मुलांसाठी उन्हाळी प्रशिक्षण शिबीर (HSS leadership/summer camp- २६जुलै ते ०३ ऑगस्ट) आयोजित केले होते. या शिबिरात आयटीव्ही नेटवर्कने स्टिंग ऑपरेशन (गुप्ततेने चित्रीकरण/वार्तांकन) केले. त्यावर आधारित “चॅरिटीज बिहेव्हिंग बॅडली” माहितीपट हार्डकॅश प्रोडक्शनने तयार केला.
हा माहितीपट Exposure: Hatred and extremist views in charities (धर्मादाय संस्थांमधील द्वेष आणि अतिरेकी दृष्टीकोन उघड करणे) या नावाखाली आयटीव्ही नेटवर्कवरून १८ फेब्रुवारी २०१५ रोजी प्रसारित/प्रक्षेपित झाला.
मुस्लीम सर्वात वाईट, ख्रिश्चनांचा हिंदूविरोधी कट:
वरील माहितीपटात जे दिसले त्यानुसार, शिबिरार्थी मुलांना हिंदू इतिहास शिकविताना प्रशिक्षक म्हणाले-
१)“The number of good Muslims can be counted on fingers” चांगल्या मुस्लिमांची संख्या बोटांवर मोजता येईल.”
२) “To destroy Hindu history is the secret conspiracy of the Christians” हिंदू इतिहास नष्ट करणे हा ख्रिश्चनांचा गुप्त कट आहे.”
३) “If it comes to Islam, they are the world’s worst religion.” - इस्लामचा प्रश्न असेल, तर तो जगातील सर्वांत वाईट धर्म आहे.
एका विद्यार्थ्याने विचारले, “Do you think Muslims are the biggest problem for Britain?” (ब्रिटनसाठी मुस्लीम म्हणजे सर्वांत मोठी समस्या आहे, असे आपणास वाटते काय?).
प्रशिक्षकाचे उत्तर- “Yes. For everybody, foreverybody.” (होय. प्रत्येकासाठी ..प्रत्येकासाठी...)
सरकारी चौकशी:
वरील प्रसारणानंतर UK Charity Commission ने लगेच सरकारी चौकशी सुरू केली. २ सप्टेंबर २०१६ रोजी चौकशी अहवाल आला. (अधिकृत मूळ अहवाल Hindu Swayamsevak Sangh (UK)— Charity Commission Inquiry Report.)
आरएसएसपासून दूर रहा:
आरएसएसपासून दूर रहा, असा इशारा यूके चॅरिटी कमिशनने एचएसएसला दिला, असे वृत्त “सबरंगइंडिया” ने ३ सप्टेंबर २०१६ रोजी दिले.
वरील वृत्तात पुढे सांगण्यात आले, की “हिंदू स्वयंसेवक संघावर (एचएसएस) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (आरएसएस) कोणताही प्रभाव किंवा नियंत्रण नसावे.
आरएसएसशी संबंधित लिंक्स टाळणे आवश्यक आहे. आरएसएसचे एचएसएस आणि तिच्या कामकाजावर कोणतेही नियंत्रण किंवा प्रभाव राहणार नाही. हे सुनिश्चित करण्यासाठी विश्वस्तांनी सक्रिय पावले उचलावीत, असे अहवालात नमूद आहे.
अहवालानुसार, आयोगाने धर्मादाय संस्था (एचएसएस) आणि आरएसएस यांच्यातील संबंधांबाबत विश्वस्तांना अनेक बाबींवर प्रश्न विचारले. विश्वस्तांनी उत्तर दिले की, ‘एचएसएस आरएसएसला निधी देत नाही किंवा आरएसएसकडून निधी घेत नाही. दोन्ही संस्था एकमेकांपासून पूर्णपणे वेगळ्या आणि स्वतंत्र आहेत आणि त्यानुसार त्या एकमेकांवर अवलंबून नाहीत.”
एचएसएस यूके आणि वाद:
कायद्यानुसार १९६६ साली धर्मादाय संस्था म्हणून स्थापन झालेल्या एचएसएस यूकेची सदस्यसंख्या आज दहा हजार आहे. प्रतिबंधित संघटनांशी कथित संबंध असल्याच्या आरोपावरून ती २००० सालापासून चॅरिटी कमिशनच्या चौकशी रडारवर आहे.
चौकशी अहवालातील दाव्यानुसार, गुजरातमधील भूकंपग्रस्तांच्या मदतीच्या नावाखाली, लेस्टर-स्थित नोंदणीकृत धर्मादाय संस्था एचएसएस (HSS) आणि तिची निधी उभारणारी शाखा सेवा इंटरनॅशनल (Sewa International) यांनी निधी गोळा केला होता. या दोन्ही संस्था आरएसएसच्या यूके शाखा आहेत. अधार्मिक, धर्मनिरपेक्ष, अराजकीय आणि पूर्णपणे मानवतावादी संस्था असल्याचा दावा असूनही, त्यांच्या निधी उभारणीचा मुख्य उद्देश भारतातील आरएसएसच्या आघाड्यांपर्यंत पैसा पोहोचवणे हा आहे.
भारताने प्रवेश नाकारला:
वरील धर्मादाय निधीचा वापर नेमका कशा प्रकारे करण्यात आला, याची माहिती घेण्यासाठी चॅरिटी कमिशन यूकेच्या अधिकाऱ्यांनी गेल्यावर्षी भारताचा व्हिसा मिळविण्याचा प्रयत्न केला होता; मात्र भारत सरकारने (मोदी सरकार) त्यांना भारतात प्रवेश नाकारला!
आमचे आकलन स्पष्ट आहे- आरएसएसवर बाह्य जगाचा विश्वास नाही. कथनी- करणीत बाह्य जगाला तफावत दिसते. संघाची प्रतिमा डागाळलेली आहे. ती कट्टर धर्मांध आहे, हा बाह्य जगाचा दृढ समज आहे. हा समज दूर करण्याचे “भगिरथ... नव्हे, भागवती प्रयत्न” सुरू आहेत. यूके चॅरिटी कमिशनच्या अधिकाऱ्यांना भारतात प्रवेश का नाकारण्यात आला? प्रधानमंत्री मोदी संघातच घडले आहेत...!!
प्रभाकर कोंडबत्तुनवार
मो. ९४०५७५०४६०
(लेखक प्रसिद्ध पत्रकार आणि
ज्येष्ठ संपादक आहेत.)