Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > संपादकीय > लेख

जन-गण-मन

राहुल गांधी- प्रगल्भ, तत्त्वचिंतक, राष्ट्रनेता!

भाजपाने राहुल गांधी हेच त्यांच्या सत्तेला मुख्य आव्हान आहे, हे ओळखले आहे.


राहुल गांधी-  प्रगल्भ तत्त्वचिंतक राष्ट्रनेता

राहुल गांधी यांच्याविषयीची पारंपरिक प्रतिमा आणि प्रत्यक्षातील त्यांचा राजकीय प्रवास यामध्ये मोठी तफावत आहे. सातत्याने टीका, पराभव आणि उपहास सहन करतही त्यांनी राजकारणात आपली भूमिका अधिक ठामपणे मांडली. त्यांच्या विचारांची दिशा, स्वराज्याची संकल्पना, विविध मुद्द्यांवरील भाकिते आणि बदलत गेलेली राजकीय परिपक्वता यांचा तटस्थपणे घेतलेला हा वेध.

सुरुवातीलाच एक अस्वीकरण (ज्याला सोप्या शब्दामध्ये Disclaimer म्हणतात) तसे सांगून टाकतो, की माझा काँग्रेस या पक्षाशी काहीही संबंध नाही, फक्त एक तटस्थ भारतीय म्हणून आज पहिल्यांदाच राहुल गांधींवर लिहितो आहे. त्यांचा धर्म कोणता? जात कोणती? या गोष्टीत मला काही रस नाही, एक भारतीय नेता एवढ्या स्वच्छ अशा नजरेने त्यांच्याकडे मी पाहतो.
मागील आठवड्यात राहुल गांधींचे एक भाषण खूप गाजले, मी ते दोन वेळा लक्षपूर्वक ऐकले! राहुल गांधींच्या विरोधकांसह प्रत्येक भारतीयाने ते ऐकले पाहिजे व नंतर राहुल गांधींच्याबाबत नव्याने आपले मत बनवले पाहिजे. (बाकी पप्पू अशी संभावना करणाऱ्या वरपासून खालपर्यंतच्या “खऱ्या पप्पूंना” दुर्लक्षून) राहुल गांधी यांचे आपण यथार्थ असे पुनर्मूल्यांकन केले पाहिजे, असे वाटायला भाग पाडणारे हे भाषण आहे.
त्यांच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे, तात्काळ संदर्भ देत उत्स्फूर्त-extempore असे त्यांचे अर्थपूर्ण भाषण असते. ते कधीही कागदावर मुद्दे लिहून आणत नाहीत किंवा टेलीप्रॉम्टर सारखे एखादे यंत्र वापरत नाहीत, थेट वार्ताहरांना अंगावर घेत उत्तरे देतात, संवाद करतात! ऑक्सफर्ड आणि केंब्रिजचे पोस्ट ग्रॅजुएट असलेले राहुल त्यांच्या बुद्धिचातुर्याने आज देशभर गर्दी खेचत आहेत!
विदेशातही ओरडायला आणि रडायला माणसे भाड्याने आणायची गरज त्यांना भासली असं दिसलं नाही. “हराभरा स्वराज” या भाषणात त्यांनी थोडीशी तत्त्वचिंतकासारखी सुरुवात केली. “स्वराज” या शब्दाचा खरा अर्थ काय? Freedom हा एक प्रतिशब्द Synonym म्हणून ‘स्वराज’ शब्दाचा गर्भितार्थ-connotation व्यक्त करण्यासाठी पुरेसा नाही हे मांडून, त्यानंतर आपले भारतीय राजकारण “खरे स्वराज” निर्माण करण्यासाठी कसे वापरावे लागेल, हे त्यांनी सुक्ष्मपणे परंतु सहज कळेल अशा भाषेत या भाषणात मांडले.
Freedom म्हणजे “जा तुम्हाला मोकळे केले, वाट्टेल तसे वागा” असे म्हणणे आहे; मात्र त्याच वेळी “स्वराज”म्हणजे स्वतःवर केलेले, स्वतःस योग्य वाटेल असे स्व-नियमन आहे. Freedom मध्ये मुक्ती आहे. “स्वराज किंवा स्वराज्यात मात्र स्वतःला वळण लावण्याची “जबाबदारी” आहे. Freedom हे अकर्मण्य व passive आहे, तर स्वराज/स्वराज्य हे positive-active आहे. 
जाऊ द्या, हे अवघड तत्त्वचिंतन बाजूला ठेवत ते म्हणाले, की “प्रत्येक व्यक्ती” ही एक स्वतंत्र घटक/unit आहे व प्रत्येकाला आपले आपले एक मनोविश्व आहे, आपले आपले एक सत्य आहे. आपण म्हणतो , “व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती” तसेच समजा. देशातील प्रत्येक व्यक्तीला त्याचे स्वत:चे एक “सत्य” जाणवते, ते जोपासण्याची परिस्थिती निर्माण करून देणे हीच सरकारची जबाबदारी असते, असे ते म्हणाले.
पिता आणि पूत्र, भाऊ आणि भाऊ, पती आणि पत्नी एकाच मताचे असावे, असाही हट्ट आपण धरायला नको! एवढी वैविध्याची तरतूद ज्यात असते ते स्वराज! प्रत्येक भारतीयाला असा जो एक “स्व” आहे तो (इतरांच्या “स्व”चा उचित सन्मान राखत-) जपता येतो का? हाच सवाल आहे, व यावरच देशाचे राजकारण चालावे, हाच राहुल गांधींच्या भाषणाचा सारांश होता.
काही महिन्यांपूर्वी कोणीतरी म्हणाले की राहुल गांधी शेकडो निवडणुका हरले, २०१९ ला एका नटीकडून पराभूत झाले; पण लगेच कार्यान्वित झाले. सातत्याने अपयशामुळे त्यांच्या जागी जर कोणी असता, तर राजकारण सोडून दिले असते; पण उलट ते २०१९ नंतर जास्त आक्रमक झाले. नेता यशामुळे नव्हे, तर अपयशाने आकार घेतो! जो विपरीत परिस्थितीत आपली तत्त्वे उराशी घट्ट धरून पुढे पुढे जातो, तोच खरा नेता असतो! हे स्थित्यंतर- transformation २०१९ च्या नंतर राहुल गांधींमध्ये दिसते, असे मला वाटते.
आपण मोघम टोलेबाजी न करता, राहुल गांधी यांनी राजकीय प्रगल्भता कधी कधी दाखवली आणि मोदींना (सुरुवातीला जरी त्यांची खिल्ली उडवली तरी-) नंतर तेच करणे भाग पडले! असे कधी कधी घडले? ती विस्तृत यादीच पाहू या!
(१) १२ फेब्रुवारी २०२०ला राहुल गांधी म्हणाले, “कोरोना परदेशातून येतोय, एअरपोर्टवर लक्ष द्या!” मोदींनी हसून खिल्ली उडवली. निवडणुका घेतल्या, विदेशी पाहुण्यात रमले. पुढे दुर्दैवाने राहुल गांधी खरे ठरले; पण तोवर उशीर झालेला होता! ४१ दिवसांच्या उशिराने २५ मार्चपासून  (विधानसभा निवडणुकांच्या नंतर) लॉकडाऊन लावले आणि उशिराची किंमत देशाला लाखो जीवांच्या रूपाने मोजावी लागली, तेव्हा राहुल गांधींची परिपक्वता दिसली.
(२)आक्टोबर २० ला राहुल गांधी म्हणाले, की “मोदीजी, लिहून ठेवा, ३ वादग्रस्त कृषी कायदे मागे घेणे अटळ आहे, उगीच ताणू नका!” मोदी उडवून लावत गप्प बसले. परिणामी ७०० लोक बळी गेल्यानंतर १३ महिन्यांनी प्रगल्भ राहुल जे म्हणाले तेच नोव्हेंबर २१ ला करणे भाग पडले!
(३) जीएसटी बाबत राहुल गांधी २०१७ ला म्हणाले, “आमचे सुटसुटीत स्ट्रक्चरच वापरा, स्लॅब कमी करा.” मोदींनी खिल्ली उडवली, पुढे फसलेल्या नोटाबंदी नंतर लाखो छोटे उद्योग बंद पडल्यानंतर आणि सर्व व्यापारी वर्ग रस्त्यावर उतरल्यावर २०२५  मध्ये करांचे २ स्लॅब कमी करून राहुल म्हणाले होते, तेच करावे लागले!
राहुल गांधींच्या सूचनांची अशी यादी खूप मोठी आहे- 
(४) चीनचे प्रदेश बळकावणे असो किंवा 
(५) आयात शुल्कवृद्धीबाबत सूचना असो, की
(६) २०१९ ची NYAY संकल्पना असो, अथवा 
(७) जातीय जनगणनेची मागणी असो, किंवा 
(८) राहुल गांधींनी थेट मदत खात्यात जमा करा म्हटले 
की, छे, छे, फ्रिबीचे वाटप करणार नाही म्हणायचे आणि पुढे, ‘शेतकरी सन्मान’ किंवा लाडकी बहीण म्हणत नंतर तेच करायचे! असेच आधी मोदींनी राहुल गांधींच्या भूमिकेला कमी लेखत सतत टाळले; पण भविष्यात त्यांना तेच करावे लागले! हा राहुल गांधींचा नैतिक विजय आणि राजकीय प्रगल्भतेचा पुरावा आहे!
राहुल गांधींच्या व्यक्तिमत्त्वात २०१४ ते २०१९ या ५ वर्षांत कमी दिसलेली राजकीय दूरदृष्टी ही २०१९ पासून आजपर्यंत चढत्या भाजणीने अधिकाधिक प्रभावी-धारदार होत आली आहे. आणि २०२६ च्या या वर्षीच्या पावसाळी संसद अधिवेशनात, तर राहुल गांधींनी कमालच केली! “अब मोदी और शहा सदनमे नही आयेंगे”, अशी  भविष्यवाणी केली जी, तंतोतंत खरी ठरली!
भाजपाने राहुल गांधी हेच त्यांच्या सत्तेला मुख्य आव्हान आहे, हे ओळखले आहे. वर वर जरी ते राहुल गांधींबाबत बेफिकीर असल्याचे दाखवत असले, तरी नेहरूंच्या चारित्र्यहननासाठी हजारो कोटींची यंत्रणा उभी करून ते जी तीव्र मोहीम राबवत आहेत, ते उगीच नाही! भाजपाच्या खास कार्यपद्धती प्रमाणे, (राहुल गांधींचे पणजोबा-) जवाहरलाल नेहरू यांचे त्यांची सख्खी बहीण, विजयालक्ष्मी पंडित किंवा त्यांची सख्खी भाची नयनतारा सहगल यांच्यासोबतचे वात्सल्यपूर्ण आलिंगनाचे फोटो समाजमाध्यमावर फिरवत, त्यांचे चारित्र्यहनन करून राहुल गांधींबाबत जनमानस गढूळ करणे हा त्याच मोहिमेचा एक भाग आहे.
‘साधनशुचिता’ हे महात्मा गांधींनी काँग्रेसला दिलेले एक मूल्य आहे. म्हणजे केवळ साध्यच शुद्ध असून भागत नाही, ते साध्य करण्यासाठी वापरायचे साधनही स्वच्छ व पवित्र असावे हा या साधनशुचितेचा अर्थ! पण हा भाजपाकडील तत्त्वाचा भाग नाही, ते कोणत्याही मार्गाने होवो, यश मिळवले पाहिजे ही हिंदुत्ववादी विचारांना मुभा आहे. उदाहरणार्थ: मोदीजी गुजरातमध्ये एकदा बोलले, “हम ऐसी मशीन लगाएंगे, के ईधरसे आलू डालो, उधरसे सोना निकालो!” बोलले मोदी, पण त्यांचा संदर्भ देत तेच राहुल गांधी उपहासाने बोलले, तर तो तेवढाच नेमका तुकडा कापून (मोदींना अलगद बाजूला काढत) राहुल यांच्या तोंडी ते घालून बदनामी केली! अशी असंख्य तंत्रे अवलंबत राहुल गांधींना बदनाम करण्याचा भाजपाकडून प्रयत्न झाला.
नेमके पंडित नेहरूजी सोडून बाकी सर्व काँग्रेसी नेत्यांवर त्यांनी बळजबरीने अतिक्रमण केलेले आहे. सरदार पटेल, सुभाषचंद्र बोस, डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्यापासून ते चरणसिंगांच्या पर्यंत जे जे दिसेल त्यांना त्यांना (फक्त राहुल गांधी यांचे पणजोबा सोडून-) भाजपावाल्यांनी बळजबरीने भगवा शेंदूर फासण्याचा प्रयत्न केला आहे, ते राहुल गांधींच्या राजकारणाचा धसका घेऊनच होत आहे! राहुल गांधी एक राजकीय आव्हान उभे करण्यात यशस्वी ठरले असाच याचा अर्थ आहे!
राहुल गांधी यांच्या व्यक्तिमत्त्वात अजून काही आहे जे त्यांच्या विरोधकामध्ये सापडणार नाही. राहुल यांच्या आई-बहिणींबाबत पातळी सोडून काही शब्द वापरले गेले. “कांग्रेस की विधवा” किंवा “सौ करोड की गर्लफ्रेंड”, “बारबाला”, असे घाण शब्दप्रयोग केले गेले; पण तरीही राहुल गांधी किंवा प्रियंका गांधींनी विरोधक बोलतात म्हणून (मधु किश्वर किंवा सुब्रमण्यम स्वामींनी खूप साहित्य निर्माण करून ठेवले असले तरीही) पातळी सोडून हीन दर्जा गाठला नाही. भाजपाचा निशिकांत दुबे तर, चारित्र्यहनन करणारी खोटी मशीन असल्यासारखा बरळतो! पण तरीही सुसंस्कृत अशा राहुल-प्रियंका यांनी असल्या अधमाकडे दुर्लक्षच करायचे ठरवले! त्यामुळे लोकांच्या मनात त्यांचा सन्मान वाढला. आपल्या आजीने आणि पित्याने या देशासाठी प्राण गमावले या हौतात्म्याचा गैरफायदा त्यांनी कधी लोकांकडे मागितला नाही, किंवा या अशा पृष्ठभूमीवर अनेकदा लोकांनी नाकारले म्हणून  
आदळआपटही केली नाही.  उलट लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेता असताना स्वतःच्या खुर्चीवरून उठून पंतप्रधानांना प्रेमाने आलिंगन देण्यासाठी जाऊन माणुसकीचे दर्शन घडवले (ते महामानव जागचे हलले नाहीत, हा त्यांचा स्वभाव!) परंतु देशाच्या इतिहासाने नोंद घेतली असती असला तो क्षण राहुल गांधींनी निर्माण करण्याचा प्रयत्न केला, देश काय याची नोंद घेणारच नाही का?
दुसराही एक प्रसंग आहे! राहुल-प्रियंका हे दोघे त्यांच्या वडिलांची हत्या करणाऱ्या नलिनीला भेटायला तरुंगात गेले तो आहे! तेव्हाचे फोटो पहा. या दोन लेकरांनी कमालीच्या संयमाने तो प्रसंग हाताळला, आणि तिला अत्यंत निरागसपणे विचारले, “माझ्या वडिलांना मारताना तुला काहीच कसे वाटले नाही गं?” मनाचा मोठेपणा  हा ईश्वरी देणगी आहे, ती नशिबानेच मिळते व किंमत चुकवूनच ती जन्मभर बाळगावी लागते! हेच औदार्य राहुल यांना आभाळाएवढं मोठं करते! याचं “पोलिटिकल मार्केटिंग” करण्याचा विचार ते करू शकले नाहीत हा भाग वेगळा! 
राहिला मुद्दा प्रामाणिकपणाचा! राहुल गांधी व सोनिया गांधींवर प्रसारमाध्यमामध्ये खूप आरोप झालेत; पण १२ वर्षे ईडी, सीबीआय, (आणि त्याही पलीकडे जे पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ जाहीरपणे म्हणाले ते ते) सर्व कब्जात असून १ दिवसाचीही शिक्षा/कारावास किंवा आरोपसिद्धी जर करता आली नाही, तर ते आरोप खोटे आहेत हे वेगळे सिद्ध करायची गरजच उरत नाही! नाही म्हणायला तसा एक प्रयत्न झाला; परंतु ईडी ने ८ तास कसून चौकशी केल्यावर शेवटी हात जोडून राहुल गांधींना “आपण जावे” असे म्हणण्यापेक्षा जास्त काही घडले नाही!
हे सर्व भारतीय जनता, उघड्या डोळ्यांनी पहात आहे आणि कोत्या मनाने “माईक” बंद केल्यामुळे “स्पीकर”मधून जरी शब्द बाहेर पडणे बंद केले, तरी १४५ कोटी लोकांच्या हृदयाची दारे ते कशी बंद करू शकतील? आजवरच्या जगाच्या 
इतिहासात कोणत्याही उगवत्या सक्षम अशा राष्ट्रनेत्याला कोणीही थांबवू शकलेले नाही. राहुल यांच्या अश्वमेधाचा घोडा अडवून त्यांच्या   नेतृत्वापासून भारतीयांना दूर ठेवू शकेल अशी (आदरणीय श्री. अटलबिहारी बाजपेयींच्या सारखी) राजनैतिक व नैतिक शक्ती आज तरी त्यांच्या विरोधकांपैकी कोणातही नाही!

पुरुषोत्तम गावंडे 
७९७७१६३७७४

Related to this topic: